समलैंगिक संबंधाची सुरुवात कशी होते? : सामाजिक जाणिवांच्या कोंदणात आकार घेणारी लैंगिकता

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


साल २०१८ एका बाबतीत अतिशय महत्वाचं ठरणार आहे. सुप्रीम कोर्टाने अत्यंत महत्वाचा निर्णय देऊन समाजाला २१ व्या शतकात सरळ ढकललं आहे. खरंतर याची सुरवात २००९ सालीच दिल्ली न्यायालयाच्या एका निर्णयाने झाली होती. समलैंगिकता म्हणजे गुन्हा नव्हे असा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला होता.

पण सर्वोच्च न्यायालयाने त्यावर नापसंतीची मोहोर उमटवली. एक चांगली सुधारणा भारतीय संघाने मॅच गमवावी तशी आपण गमावली.

हे समलिंगी संबंध म्हणजे आहे तरी, कसलं खटलं? किंवा हे कलम ३७७ आहे तरी काय असा प्रश्न अनेकांना पडतो. असा काय भारतमातेच्या समोर पडलेला हा गहन मुद्दा आहे? इथपासून ते घालवून टाका ही विकृती आणि रोग इतका प्रचार होतो.

मागे एकदा एका स्वयंभू सिद्ध योगी पुरुषाने समलिंगी संबंध हा एक रोग असून तो आपल्या औषधाने बरा होऊ शकतो अशी आवई उठवली होती. (बुढे बच्चे जवान बजाव ताली).

समलिंगी संबंध सुरु होण्यासाठी काही भावनिक, मानसिक आणि सामाजिक  कारणे असतात. समलिंगी संबंधांची सुरवात कशी होते हे पाहण्यासाठी प्रथम आपण स्वत:पासून सुरवात करूया. जगभरात प्रत्येक मनुष्य प्राण्याला एक अतिशय लाडका मित्र किंवा मैत्रीण असते. मुलगा मुलगी मित्र असण्यात गैर काहीच नाही. पण अश्या मैत्रीपर जोड्या काही लहानपणापासून नसतात.

अगदी लहान मुलांना तर मुलगा-मुलगी आणि एकमेकांपासून आपण वेगेळे आहोत हे कळतही नसते. पुढे जरा जाणत्या वयात ते कळतं. एक टप्पा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो ज्याला आपण पौगंडावस्थेची सुरवात म्हणतो. खास करून मुलींना जास्त परिपक्वता असल्याने हा टप्पा त्या आत्मविश्वासाने झेलू शकतात. मुलांसाठी मात्र हा बऱ्याच अंशी कोशात जाण्याचा काळ असू शकतो.

आपल्या शरीरात होणारे बदल तो आईला तर सांगूच शकत नाही. बापाला सांगावं अशीही परिस्थिती नसते. मन मोकळं करायला मग आपल्याच वयाचा एखादा मुलगा भेटतो. ही साथ आयुष्यभर राहिली तर तो आपला बेस्ट फ्रेंड बनू शकतो.

आपल्या समाजात किमान ८० टक्के लोकांना असाच बेस्ट फ्रेंड वयाच्या १२ व्या, १३ व्या वर्षी किंवा त्याही आधी मिळालेला असतो. इथपर्यंत अत्यंत स्वाभाविक असा हा प्रवास असतो. 

 

section377-inmarathi
thenewsminute.com

समस्या उद्भवते जेंव्हा आपल्या ‘कम्फर्ट झोन’मध्ये गेलेली व्यक्ती तिकडेच राहायला बघते तेंव्हा. वय वर्ष १२ आणि १३ हे ‘मुली वाईट असतात’ म्हणण्याचं असू शकतं. १४ किवा १५ व्या वर्षी दोन्ही बाजूंना विभिन्नलिंगी व्यक्तींबद्दल बोलण्याची सवय लागते. पुढे विभिन्नलिंगी मैत्री आणि कळत नकळत प्रेम.

हा टप्पा काहींच्या आयुष्यात येतंच नाही. व्यक्ती समलिंगी होऊ लागते ती तेव्हापासून. कारण तो नकळत घडलेला क्रांतिकारी बदल त्याच्या बाबतीत घडत नाही. (योगी पुरुषाने यावर, असेल तर, औषध द्यावं.)

काही लोकांच्या बाबतीत हा प्रकार एकदम वेगळा घडतो. घरात स्त्री जातीचं प्राबल्य अधिक असेल तर स्त्री हीच आदर्श वाटायला लागते. मग तिच्यासारखं वागणं, दिसणं, बोलणं आणि चालणं सुरु होतं. काहींचे पुढे लैंगिक प्राधान्यक्रम बदलतात.

पण हे कारण अनेक तज्ञ नाकारतात. शिवाय हे टाळणं सोपही असतं. त्यासाठी मुलाला किंवा उलट वातावरणातल्या मुलीला आपापल्या साजेश्या वातावरणात गुंतवून ठेवणे  कधीही उत्तम.

सामाजिक कारणांनीही समलैगिकता वाढू शकते. तुरुंगात काही वर्षे राहून आलेले अनेक कैदी उभयलिंगी झालेले असतात. पुरुष कैद्यांमध्ये आपापसात संबंध तयार होतात. अनेक वर्षे जोडीदारापासून दूर राहिल्याचा हा परिणाम असतो.

अश्या कैद्यांमध्ये जो उंचीने त्यातल्या त्यात कमी आहे किंवा गोरा आहे आणि  शरीरीरिकदृष्ट्या कमजोर आहे. अश्या कैद्यांना साडी नेसवून त्यांच्याशी संभोग प्रक्रिया उरकली जाते.

 

jail-inmarathi01
youtube.com

एखादा दणकट कैदी त्याचा नवरा बनून त्याचा संरक्षक बनून राहू शकतो.

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका नामांकित तुरुंगात पुरुष कैद्यांमध्ये साड्या सापडल्याचं प्रकरण उघडकीला आलं होतं. महिलां कारागृहात पुरुष जेलर किंवा पोलिस अधिकाऱ्यांनाही शिरकाव करायला परवानगी नसते.

वर्षानुवर्षे लैंगिक भावनांचे दमन झाल्यामुळे एखादा पुरुष दिसला की महिला कैदी त्याच्यावर तुटून पडायची शक्यता नाकारता येत नाही. अश्या अवस्थेत महिला असो वा पुरुष, आपापल्या परीने आपला मार्ग शोधून काढत असतात. महिलांच्याही तुरुंगात पुरुषांचे कपडे सापडले होते.

तुरुंग बाजूला ठेवला तर पोटापाण्यासाठी गाव सोडून आलेल्या परराज्यातल्या लोकांच्या लैंगिक भावनांचेही असेच दमन होत असते. पण त्यांना पर्याय उपलब्ध असतात. (समाजातल्या वेश्या या घटकाचे महत्व आता ध्यानात यायला हरकत नाही).

भारतीय दंड साहितेतले कलम ३७७ समलिंगी संबंधांना वर्ज्य ठरवते. मुळात कलम ३७७ म्हणजे समलिंगी संबंध नाही. कलम ३७७ मध्ये अश्या तऱ्हेच्या संभोग प्रक्रियांचा समावेश आहे, ज्यामुळे प्रजोत्पादन होत नाही. यात सोडोमी अथवा प्राण्यांशी संभोग आणि मानवी संभोग प्रक्रिया, ज्यामुळे संतती प्राप्त होऊ शकत नाही. यात समलिंगी संबंधांनाही गृहीत धरले गेले आहे.

यापैकी प्राण्यांशी संभोग हे अमानवी सदरातले अघोरी कृत्य असल्याने ते शिक्षेस पात्र आहे.

इतर तरतुदींमध्ये ज्या  वेगवेगळ्या संभोगप्रक्रिया आहेत तो मानवी जीवनाच्या खाजगी आयुष्याचा मुद्दा आहे, याबद्दल प्रगत देशांत कलह चालू होता. कोणी काय खावे, प्यावे  हे जसे  सरकारने ठरवू नये तसे दोन सुजाण लोकांनी एकमेकांशी कसे संबंध ठेवावेत यावरही सरकारने काही सांगू नये असा अनेकांचा आग्रह होता.

काही वर्षांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालायाने कलम ३७७ मधून समलैंगिकता काढली जावी असा निष्कर्ष दिला. संतती प्राप्ती होणे अथवा न होणे यावरून एखाद्या शरीर संबंधाचे पावित्र्य आणि मुळात ग्राह्यपण धरायचे असेल तर ते योग्य नाही. ही मानसिकता मध्ययुगीन आहे. असा निष्कर्ष दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आणि या चर्चेला सुरवात झाली.

 

section377-inmarathi01
freepressjournal.in

भारतामध्ये रघुनाथ कर्वे यांनी संतती नियोजनासाठी जागृती कार्यक्रम सुरु केला होता. त्यासंदर्भात स्वखर्चाने आवश्यक ती सामग्रीही रघुनाथपंत पुरवत होते. या आठवणींना उजाळा मिळाला.

संतती नियमन करणाऱ्या जोडप्यांनाही अपवित्र ठरवणार का यावर विचार सुरु झाला. परंतु पुढे २०१३ सालच्या शेवटी हे काटे फिरले आणि सर्वोच्च न्यायालयाने हा मध्ययुगीन बाणा कायम ठेवला. पुन्हा यावर जे मंथन सुरु झाले त्याला आता आनंदी पूर्णविराम लागेल.

मात्र हा निर्णय म्हणजे केवळ समलिंगी संबंधांमधल्या व्यक्तींचा विजय नसून एका मोठ्या वर्गाला यामध्ये न्याय मिळाला आहे.

गेल्या वर्ष दीड वर्षांमध्ये सार्वजनिक जीवनात समूहरूपात किन्नर जमातीच्या लोकांचे अस्तित्व दिसू लागले आहे. भारतीय पौराणिक कथांमध्ये शिखंडी, बृहन्नडा, किन्नर किंवा अर्धनारीनटेश्वर या माध्यमांतून किमान या जमातीची दखल घेतली गेली होती. पण ती तेवढीच.

लहान मूल उभयलिंगी जन्माला आल्यावर आईबापांनी त्याची जबाबदारी टाकून द्यायची आणि उभयलिंगी जमातीने त्याला आपलं मानायचं हाच शिरस्ता.

या जमातीतल्या लोकांच्या अंत्ययात्रांबद्दल तर जीवघेण्या गोष्टी कानावर येतात. जन्माच्या दाखल्यापासून स्त्री की पुरुष हे नमूद करावं लागतं. शाळेत प्रवेश मिळायला समस्या होते. पुढची प्रगतीच खुंटते. आणि प्रारब्ध म्हणजे रस्त्यावर आणि गाडीत भीक मागणं.

या सरकारच्या काळात मेल, फिमेल याचबरोबर ट्रान्सजेंडर हा रकाना आला आणि समाज एक पाऊल पुढे गेला. आता हे उभयलिंगीचे समूह कामावर जाताना पाहिले. याची सुरवात शबनम मौसीने मध्यप्रदेशात निवडणूक जिंकून करून दिली होती. मधू किन्नर छत्तीसगढमध्ये महापौर झाल्या. पण हे अपवादच. एरवी किळस आणि विनोद याच्यापलीकडे उभयलिंगींना स्थान नव्हतं.

एखाद्या विरोधी नेत्याने सरकारला ‘हिजडा’ म्हणून कर्तृत्वहीन ठरवलं जाणं यातच या समाजाबद्दलची अनास्था दिसते. आता या वृत्तींना आळा बसेल अशी अपेक्षा बाळगूया.

 

DAD-GAY-RIGHTS-INDIA-inmarathi
huffingtonpost.in

मतभेद कितीही असतील पण समाजाने थोडा वेगळा विचार करायला सुरवात केली आहे, हे दाखवण्यासाठी हा प्रपंच. जाता जाता काश्मीरमध्ये घडलेली एक वरवर गंमतशीर वाटणारी पण गंभीर गोष्ट-

एका जर्मन मुलाचे एका काश्मिरी गाईडवर प्रेम जडले. घरच्यांच्या विरोधात जाऊन तो गाईड त्या जर्मन मुलाबरोबर राहू लागला. पुढे घरच्यांची फार भुणभुण नको म्हणून त्या काश्मिरी मुलाने जर्मन जोडीदाराला शस्त्रक्रिया करून लिंग बदलायला सांगितले. हो नाही हो नाही म्हणत तो जर्मन मुलगा तयार झाला. त्याने शस्त्रक्रिया करून घेतली आणि तो स्त्री झाला.

झाले, त्या काश्मिरी मुलाचे त्या जर्मन मुला/मुलीवरचे प्रेम उडाले. कारण या कश्मीरी मुलाला फक्त मुलांमध्येच रस होता. पुढे जर्मन व्यक्तीने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि खटला उभा राहिला. फिर्यादी वकील जर्मन मुलाची बाजू मांडू लागले.

‘न्यायाधीश महोदय पहा या निष्पाप मुलाकडे, याने आपल्या प्रेमाखातर स्वत:ला स्त्री बनवले, आता त्याच्याशी हा मुलगा लग्न करत नाही तर ही फसवणूक नाही का?’


यावर आरोपीचा वकील म्हणू लागला-

‘न्यायाधीश महोदय, कोणता पुरावा आहे की याला स्त्री म्हणता येईल? याला किंवा हिला मुल होऊ शकते का?’

यावर फिर्यादी वकील म्हणू लागला-

‘न्यायाधीश महोदय, जगात कितीतरी महिला अश्या आहे की, ज्यांना मुलं होत नाही किंवा ज्या मुल होऊ देत नाही, मग त्यांना लग्न करायचा हक्क नाही का?’

पुढे केस बाहेर सेटल झाल्याचे कळले.

भावना कश्याही असोत, मुर्खासारखे वाहवत जाऊ नये हेही तितकेच खरे. 


===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Sourabh Ganpatye

लेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.

sourabh has 42 posts and counting.See all posts by sourabh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?