“टीचर, काल रात्री पालकाची भाजी खाल्ली होती का?”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : वैभव तुपे

===

जाहिरात ही एकमेव अशी गोष्ट आहे जी चोवीस तास आपल्या सोबत असते. घरी, ऑफिसात, बसमध्ये, ट्रेनमध्ये, शाळेत, सरकारी कार्यालयांमध्ये इतकंच काय अगदी नैसर्गिक विधीच्या सार्वजनिक ठिकाणी सुद्धा ‘जाहिरात’ आपला पिच्छा काही सोडत नाही.


आपलं विश्वच जणू या जाहिरातींनी व्यापून टाकलंय. अशा परिस्थितीत जाहिरातींचा बरा-वाईट परिणाम आपल्यावर झाला नाही, तरंच नवल! नाही का?

हा परिणाम गृहीत धरूनच तर हजारो कंपन्या जाहिराती बनवत असतात. तोच साध्य झाला नाही तर जाहिराती बनवून फायदा तरी काय? पण असं होतं नाही. हल्ली जाहिरातीशिवाय एखादं उत्पादन बाजारात आलं तर जगातलं आठवं आश्चर्यच म्हणावं लागेल! असो..

आज मुद्दा तो नाहीये, आज मुद्दा आहे जाहिरातींचं कंटेंट! त्यातल्या त्यात अगदी विशेष मुद्दा म्हणाल तर जाहिरातींमधली शिक्षक-विद्यार्थी पात्रं!

हल्ली सोशल मीडियाचा वापर खूप वाढलाय. अनेक बऱ्या-वाईट गोष्टींसाठी त्याचा वापर होतो. लोक ‘लिहिते’ (खरं तर ‘नको तितके लिहिते झाले’!) झालेत. हळूहळू रुजणाऱ्या सोशल मीडियाची पाळंमुळं कधी रुजली ते आपल्यालाही कळलं नाही.

 

social-media-inmarathi
onlinelpntorn.org

ते नेट पॅक वगैरे आवाक्यात आल्यापासून तर काही विचारूच नका! शंभरात एखादा नंबर असा असेल जो सोशल मीडियावर अॅक्टीव्ह नाही. हे सगळं सुरू होता होता ट्रोलिंग कधी सुरू झालं आपल्यालाही कळलं नाही. हळूहळू या ट्रोलिंगचेही बरेवाईट परिणाम समोर येऊ लागलेत.

या सगळ्या गोंधळात ट्रोलर्स नेहमी आपलं टार्गेट शोधत असतात (यावर एक पुस्तक सुद्धा आलंय). असंच कुणाच्यातरी डोक्यातून एखाद्या ‘मास्तर’चा एखादा एपिसोड निघाला असेल आणि तेंव्हापासून शिक्षकांवर विनोद करण्याची जी काही गंमत सुरू झाली ती आजतागायत सुरूच आहे!

तर आजचा मुद्दा आहे जाहिरातीतले ‘मास्तर!’

खरंतर शिक्षक म्हणा किंवा मास्तर म्हणा, दोन्ही शब्दांना एक स्टेटस आहे. पण हल्ली का कुणास ठाऊक जाहिरातींमध्ये शिक्षक ज्या पद्धतीने समोर आणले जातात ते खरोखर डेअरिंगबाज काम आहे राव!

एक उदाहरण सांगतो. कोलगेटची ती ‘झिगझाग’ टूथब्रश वाली जाहिरात आठवतेय? शाळेत टेबलजवळ एक लहान मुलगा, त्याचे पालक आणि शिक्षिका असा कोरम बसलाय. अचानक तो मुलगा त्या तरुण शिक्षिकेला विचारतो,


‘टीचर, कल रात आपने पालक की सब्जी खायी?’

 

colgate-inmarathi
youtube.com

का तर म्हणे तिच्या दातात रात्री खाल्लेल्या पालकाची भाजी अडकलेली तशीच होती! मग कुणीतरी दीडशहाणा अँकर येतो आणि कोलगेटचा ब्रश कसा तुमचे दात साफ करतो हे सांगतो.  आता मला सांगा, जगातला कोणता शिक्षक किंवा कोणती शिक्षिका असेल हो जिच्या दातात रात्री खाल्लेल्या पालकाच्या भाजीचे अवशेष शिल्लक असतील?

किती उथळ कन्सेप्ट आहे ही जाहिरातीची! कोलगेटचा ब्रश चांगला आहे हे सांगायला शिक्षकांची प्रतिमा मलिन करण्याची गरज काय?

नुकतीच अजून एक जाहिरात आलीय. कसलातरी मलम आहे. शिक्षक एबीसीडी असं काहीतरी शिकवत असतात. बी फॉर? असं ते विचारतात आणि मग तो विद्यार्थी सांगतो, बी फॉर बीटेक्स!


हेच पाहायचं बाकी राहिलं होतं आता. जसं काही बी शिकवायचं जगातलं एकमेव उदाहरण उरलंय हे! फालतुगिरी नुसती!

तशी उदाहरणं पुष्कळ आहेत. हे अजून एक, शेवटचं! कसलीतरी डान्स ची स्पर्धा असते, ती स्पर्धक विद्यार्थिनी ब्रेक मध्ये काहीतरी खात असते. त्यावर तिच्या डान्स टीचर तिला म्हणतात की,


हे सगळं खाऊ नको, हेव्ही होईल. (म्हणजे डान्स परफॉर्मन्सच्या दृष्टीने हेव्ही होईल असं) त्यावर ती मुलगी म्हणते की आईने बनवलंय मिस, लाईटच वाटेल! आणि मग कुठल्यातरी त्या लाईट तेलाची भलावण!

त्या पोरीचा जो तो टोन आहे बोलण्याचा, तो पहा. काय कळतंय मॅडम तुम्हाला? असा अर्थ निघतो त्यातून सरळ सरळ! म्हणजे त्या डान्स शिकवणाऱ्या बाईंपेक्षा हिच्या पुऱ्या महत्वाच्या!

 

fortune-oil-ad-inmarathi
youtube.com

अशी कितीतरी उदाहरणं अजून देता येतील.

खरं तर कालानुरूप होणारे बदल सुसह्य असतील तर नक्कीच स्वीकारले जातात. पण बदलाच्या नावाखाली एखाद्या पदाची प्रतिष्ठा तर आपण घालवत नाही ना? हेही जाहिरात क्षेत्रातल्या मंडळींनी पाहायला पाहिजे!


फार दिवस नाही झालेत, अगदी पंधरा वर्षांपूर्वीच्या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षकांची फक्त आडनावं माहीत असायची! आता केजीतली मुलं पण अंजली मिस वगैरे सरळ नावाने हाक मारतात.

बदल होतच असतात, तो थांबवणारे तुम्ही आम्ही कोण? पण हे बदल होत असतांना त्यात कुठेतरी ताळतंत्र हवंच.

किमान जाहिरातीसारख्या क्षेत्रातल्या लोकांनी तरी ते ठेवायलाच हवं. आपण जाहिरातीच्या नावाखाली काय दाखवतोय? शिक्षकांची काय प्रतिमा समाजापुढे ठेवतोय याबद्दल कुठेतरी यांनी स्वतःच विचार करायला हवा.

कारण आमच्यासारखा एखादा ‘मास्तर’ जेंव्हा हे सांगण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा, तो टिकेचाच नव्हे तर, उपहासाचा आणि कुचेष्टेचा सुद्धा विषय होतो. उलट अजून जोरात ट्रोलिंग सुरू होतं.

 

bhide-tarakmehta-inmarathi
w3livenews.com

हेच सगळं शिकत आपली मुलं मोठी होणार का? काय प्रतिमा होत असेल त्यांच्या शिक्षकांबद्दल त्यांच्या मनात? याचाही विचार गांभीर्याने कुठेतरी व्हायला हवा.

या सगळ्याचे परिणाम कदाचित आज समोर दिसत नसतील, पण अजून काही वर्षांनी नक्कीच याचे गंभीर परिणाम समोर दिसतील. आता तुम्ही म्हणाल की, काय राव लगेच सिरीयस वगैरे होताय, गंमत आहे ती! जरा लाईटली घ्या की!

आमच्यासारखे हल्लीच्या पिढीतले ‘मास्तर’ हे खिलाडूवृत्तीने वगैरे घेतीलही हो. पण शिक्षकांची नक्की काय प्रतिमा आपण नव्या पिढीपुढे ठेवणार आहोत आणि त्यातून अख्खी पिढी काय घेणार आहे याचाही कुठेतरी विचार व्हायला हवा!

बाकी ‘थांब’ म्हटल्याने कुणी थांबत नाही, सोशल मीडिया आणि जाहिरात क्षेत्रात तर थांब म्हटल्यावर जास्तच चेव येईल लोकांना! त्यामुळे थांबा वगैरे म्हणणार नाही.. चालू द्या.. वाढीव रे आवाज!


===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.
One thought on ““टीचर, काल रात्री पालकाची भाजी खाल्ली होती का?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?