“त्या इशा, अंजलीवर काय संकटे येत असतील कुणास ठाऊक”: IPL ला वैतागलेल्या गृहिणीची व्यथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आयपीएल काय चालू झालं अन् सगळ्या क्रिकेटवेडयांना जणू घरातल्या टीव्हीवर राज्य करण्याचं कारणच मिळालं…आज काय मुंबई व्हर्सेस चेन्नई तर उद्या काय बँगलोरचे रॉयल चॅलेंजर्स व्हर्सेस कोलकताचे नाईट रायडर्स…

सगळ्या मॅचेस सारख्याच! नेमकं कोणाला सपोर्ट करणार? एका बाजूला कोहली तर एका बाजूला धोनी..

त्यामुळे फॅन लोकांची “विठ्ठला…. कोणता झेंडा घेऊ हाती?” अशी परिस्थिती होते. फेथफुल फॅन्स नावाचा प्रकारच ह्या आयपीएल ने बदलून टाकलाय. आज मुंबईला सपोर्ट करणारे दोन तासात लगेच चेन्नई सुपरकिंग्ज च्या बाजूने ओरडा आरडा करतात.

आपण मुंबईकर म्हणून मुंबईला सपोर्ट करायला जावं तर आपला आवडता खेळाडू नेमका विरोधी गटात असतो. मागच्या वर्षी चेन्नईकडून खेळणारा ह्यावेळी भलत्याच टीम मध्ये असतो.

फॅन लोकांची ह्यामुळे मोठीच गोची होत असणार..

 

ipl inmarathi
india.com

मला वाटतं बरेच लोक टीमपेक्षा त्या प्रत्येक बॉलला चीअर करत मोहक नृत्यप्रदर्शन करणाऱ्या काकवांसाठीच मॅच बघतात की काय!

असो! नमनाला घडाभर तेल ओतून आता मूळ विषयाकडे वळूया..

तर ह्या आयपीएलने सर्व घरातल्या महिलांची मोठी गोची केली आहे. आम्हाला ना अंजली बघायला मिळते ना ईशा! त्या राधिकावर बिचारीवर काय काय प्रसंग येत आहेत हे सुद्धा आम्हाला कळायला काही मार्ग नाही.

त्या इतकुश्या मोबाईलवर डोळे बारीक करून करून सिरीयल बघायला मेली काही मज्जा नाही हो! शिवाय तिकडे सुगरण आणि आम्ही सारे खवय्ये बघायला न मिळाल्यामुळे आमचे घरबसल्या फुकटात होणारे कुकरी क्लासेसही मिस होतात.

ह्यामुळे आमच्या घरच्यांना आमच्या स्वयंपाकघरातल्या प्रयोगांपासून काही दिवस विश्रांती मिळालीये हा भाग वेगळा.. पण आमच्यातल्या क्रिएटीव प्रयोगशील सुगरणीची पंचाईत होतेय त्याचं काय करायचं?

 

cheerleaders-ipl-inmarathi
storiesincorporated.com

कारल्याची पौष्टिक खीर, उरलेल्या आईस्क्रीमची भजी आणि ओट्सचे पौष्टिक थालीपीठ कसे करायचे हे किती छान दाखवतात त्या कार्यक्रमात!

ते बघायला न मिळाल्यामुळे आमच्या मुलांना उद्या डब्यात काय बरं पौष्टिक पदार्थ द्यायचा हे ठरवताना आमच्या बाई नाकी नऊच येत आहेत.

आयपीएल ने घराघरांत नुसता उच्छादच मांडला नाहीये तर घरातल्या नवरा नामक बिचाऱ्या व्यक्तीला पार पांगळा अन् अन् मुलांना वेडं करून टाकलंय…

घरात जरा मदत करणारे नवरे हल्ली टीव्ही समोरून हलू सुद्धा शकत नाहीत. काय सांगू तुम्हाला हो, बिचाऱ्यांची अगदी पाणी पिण्याची सुद्धा पंचाईत झालीये.

हात पाय सहकार्य करत नाही. मॅच सुरू असली की बिचाऱ्यांची शुद्धच हरपते. समोरचा काय बोलतोय हे ऐकू येत नाही की टीव्ही शिवाय काही दुसरं दिसत नाही.

 

ipl inmarathi
india.com

अगदी बोलणं सुद्धा बंद होतं अन् फक्त अरेऽऽऽऽ , ओऽऽऽय , व्वा ऽऽऽ , सहीऽऽऽ असे असंबद्ध आवाज तोंडातून काढता येतात. मधून मधून फक्त प्लेअर आउट आहे की नाही ह्यावर मात्र गरमागरम डिस्कशन होते.

मी काय तर घरा घरातल्या मैत्रिणींची ही सध्या कॉमन तक्रार आहे की त्यांच्याही घरातल्या पुरूष मंडळींना हीच आयपीएलची बाधा झालीये.

ह्या आयपीएल चा एक मात्र फायदा झाला आहे. मॅच सुरू असताना पुढयात काहीही जेवायला वाढलं तरी हे आयपीएल बाधीत लोक काही तक्रार करत नाहीत.

भाजीत मीठ जास्तं झालं, पोळी करपली किंवा कच्ची राहिली किंवा भाताची खीर तयार झाली तरी हे बिचारे पूर्वीसारखे कटकट न करता ते सगळं मजेत जेवतात.

असो.. पण तरीही ह्या आयपीएल बाधितांची अवस्था मला तरी बघवत नाही. कुणाला ह्यावर काही उपाय सापडला तर मला पुढच्या आयपीएलची सुरूवात व्हायच्या आधी प्लीज नक्की कळवा ..

– एक मालिकाप्रेमी गृहिणी

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?