इस्लामची तलवार आणि दिल्लीचा विध्वंस – अमीर तैमूर (भाग -२)

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

पहिल्या भागाची लिंक: इस्लामची तलवार – अमीर तैमूर : भाग १
=
=====

हिंदूकुश.

पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर हिंदूकुश आडवा तिडवा पसरलाय. ऊंचच उंच ढगात गेलेला हा महाकाय पर्वत! हिंदूकुश हा ‘हिंद कोह’चा अपभ्रंश आहे. हिंद म्हणजे सिंधू नदी आणि कोह म्हणजे पर्वत. सिंधू नदीलगतचा पर्वत-हिंदूकुश! जुन्या पारशी भाषेत हिंदूकुशचा अर्थ “हिंदूंच्या मरणाची जागा” असा होतो म्हणतात. हिमालय नेहमी भारताला चिनी-मंगोल आक्रमकांपासून वाचवत आला. एखाद्या ढालीसारखा.

hindukush-map-marathipizza

मात्र हिंदुकुश कधीच ढाल बनू शकला नाही. ह्या पर्वत रंगांतली एक जागा भारतासाठी श्राप ठरली. खूप मोठा श्राप! खरं तर पूर्व आशियाला मध्य आशिया आणि आखाती प्रदेशांशी, युरोपशी जोडणारा हा रस्ता होता. प्रचंड मोठा व्यापार ह्या मार्गाने चालत असे. हा शापित मार्ग म्हणजे – खैबर खिंड!

khaibar-khind-pass-marathipizza
खैबर खिंड

पाकिस्तान-अफगाण सीमेजवळ तोरखाम जवळचा हिंदूकुशच्या अजस्त्र रांगांतून जाणारा हा चिंचोळा मार्ग… महमूद गझनवी पासून अहमद शाह अब्दालीपर्यंत सगळे परकीय आक्रमक ह्याच रस्त्याने भारताचे लचके तोडून गेलेत. खैबर खिंड नसती तर आज चित्र काहीसं वेगळं नक्कीच असतं.

सन 1398च्या हिवाळ्यात ही अपशकुनी जागा पुन्हा एकदा गजबजून गेली. आणखी एक लाखोंची एक क्रूर, धर्मवेडी रानटी फौज खैबर खिंड ओलांडत होती. ह्यावेळी दिल्लीची दौलत पाहून तैमूरलंग दिल्लीचा सत्यानाश करायला येत होता.

मोहम्मद तुघलक मरून पाच दशके होत आली होती. दिल्लीच्या तख्तावर ह्यावेळी नसिरुद्दीन तुघलक विराजमान होता. खैबर खिंडीतुन हिंदूकुश पार केल्यावर 24 सप्टेंबर 1398 रोजी तैमूरच्या फौजांनी अटकेपाशी सिंधू ओलांडली. 30 सप्टेंबरला हे वादळ तुलांबा शहरात पोचलं. शहरातल्या सगळ्या रहिवाश्यांची कत्तल करुन संपत्ती लुटायला बरलास फौजांना फार वेळ लागलाच नाही. पाठोपाठ हीच अवस्था मुलतानची झाली. तुघलकाला कसलीच चिंता फिकीर नव्हती. तैमूरला दिल्लीपाशी पोचता पोचता जाटांचा प्रखर विरोध सोसावा लागला पण संख्येने निम्म्याहून कमी असणारे जाट लाखोंच्या त्या क्रूर बरलास फौजांसमोर टिकाव धरू शकले नाहीत. जाटांची खानदानेच्या खानदाने छाटली गेली. स्त्रियांवर बलात्कार झाले. तुघलकाने जाटांची कसलीही मदत केली नाही. दिल्लीला पोहोचेपर्यंत तैमूरने रस्त्यात असलेल्या प्रत्येक गावाची धूळधाण उडवली. असंख्य माणसे कापली, स्त्रिया कैद केल्या. नसिरुद्दीन तुघलक मात्र नाकर्तेपणाचा कळस रचत दिल्लीत सिंहासनावर ऐश करत बसला होता.

तुलांबा, मुलतान ही शहरे उध्वस्त झाली. जहाँपनाह आणि सिरी ही गावे नेस्तनाबूत करून त्यातला प्रत्येक माणूस कापून काढण्यात आला.

taimur e lang 01 marathipizza

स्रोत

मेरठला मात्र तैमूरला खच्चून मार बसला. मेरठच्या गुर्जर राजा जोगराज सिंहाला नसिरुद्दीन तुघलकापेक्षा जास्त आपल्या प्रजेची चिंता होती. त्याने आधीच पूर्वतयारी केली. तैमूर मेरठला पोचला तसा संख्येने निम्म्या असणाऱ्या राजपूत, जाट आणि गुर्जर फौजा जीव खाऊन बरलास फौजांवर तुटून पडल्या. तुंबळ हाणामारी झाली. तैमूरच्या सैन्याने तुफान मार खाल्ला. आपण दिल्लीत काबीज करायला आलो आहोत, मेरठसारख्या लहान शहरांवर वेळ, पैसे आणि जीव खर्च नकोत करायला म्हणून तैमूरने मेरठचा नाद सोडला आणि तो रस्ता बदलून दिल्लीकडे निघाला. दिलेर जोगराज सिंहाने मेरठ वाचवले.

अखेर डिसेंबर 1398मध्ये तैमूरने दिल्ली गाठली. दिल्ली येईपर्यंत तैमूरने एक लाख भारतीय कैद केले होते. आपली फौज तैमूरपेक्षा जास्त आहे, प्रदेश आपला आहे शिवाय आपल्याकडे लढाऊ हत्ती आहेत म्हणून महामूर्ख नसिरुद्दीन गाफील होता. हे ही खरंच. तातारी-बरलास फौजांना हत्ती फारसे माहित नव्हते. हे लोक हत्तीला वचकून असत. ह्यावर तैमूरने एक जबरदस्त उपाय योजला. दिल्लीजवळ पोचून सर्वात आधी त्याने कैद केलेले सर्व एक लाख कैदी कापून काढले. एक लाख माणूस एका दिवसात कापला गेला. हे क्रौर्य पाहून तुघलकी फौजांचे अर्धे अवसान गळाले. लढाऊ हत्तींवर भरोसा ठेवून गर्भगळीत झालेली तुघलक सेना रणात उतरली.

17 डिसेंबर 1398 रोजी मध्यआशियायी बरलास फौज तैमूरसारख्या अद्वितीय सेनापतीच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय उपखंडातली तुघलकी सेना हत्तीच्या भरवशावर एकमेकांना भिडल्या. सोंडेवर विषारी खिळे लावलेले शेकडो हत्ती बरलास फौजेवर चालून गेले. हत्ती हा प्राणी खूप लवकर भांबावून जातो ही माहिती तैमूरने काढून ठेवली होती. तैमूरने सोबतच्या शेकडो उंट आणि रेड्यांच्या पाठीवर मोठमोठे गवताचे भारे बांधले आणि पेटवले. असे हे उंट आणि रेडे भाल्याच्या टोचण्या देऊन हत्तींकडे पिटाळण्यात आले. शेकडो प्राणी पाठीवर आग घेऊन भयाण किंचाळत अंगावर येतायत हे पाहून तुघलकाचे हत्ती भांबावले, पिसाटले आणि मागे फिरून त्यांनी स्वतःच्याच सैन्याला तुडवायला सुरुवात केली…!

असंख्य तुघलक सैनिक स्वतःच्याच हत्तींखाली चिरडून मेले. मौका साधून तैमूरची बरलास-तातार फौजेने तुघलकाची फौज उभी फाडून काढली. अटळ पराभव आणि तैमूरचे क्रौर्य पाहिलेला नसिरुद्दीन तुघलक काही माणसे आणि परिवार घेऊन राणांगणातून पळून गेला!! व्हायचं ते झालं…दिल्ली सताड उघडी पडली. धन-दौलत-संस्कृती-सोनं, रत्ने, धान्याने आणि समृद्धतेने ओसंडून वाहणारी दिल्ली तैमूरच्या निर्दयी पंजात आली.

taimur-e-lang-03-marathipizza
तैमूर

दिल्लीत घुसून तैमूरने तेच केलं जे तो करायला आला होता. तिकडे लांब समरकंदमध्ये त्याला दिल्लीच्या संपत्तीची खुशबू जाणवली होती. शिवाय हिंदुस्तान हा काफिर प्रदेश. दिल्लीचे तुघलक मुसलमान असले तरी ते ह्या काफ़िराना जिवंत कसे सोडतात? धर्मांतर का करून घेत नाहीत? कापून का टाकत नाहीत? लवकरात लवकर हिंदुस्तानात जाऊन तुघलकासारख्या नाकर्त्या सुलतानाला हटवून तिथे एक मजबूत आणि खरी खुरी रियासात कायम व्हायला हवी, हिंदूस्तानातले काफिर एकतर अल्लाहला शरण आले पाहिजेत किंवा खतम झाले पाहिजेत हा उद्देश्य ठेवून तैमूरने दिल्लीवर स्वारी केली होती!

15 दिवस ती रानटी तातारी फौज दिल्लीच्या रस्त्यावर क्रौर्याचा आविष्कार करत नंगा नाच करत राहिली! हजारो माणसे मारली गेली. प्रत्येक स्त्री एकतर मारली तरी गेली नाहीतर तिच्यावर बलात्कार, तो ही अनेकवेळा झाला. लहान मुले, वृद्ध देखील सोडण्यात आले नाहीत.

प्रत्येक घर लुटून काढण्यात आले. तैमूरला न मानणाऱ्या, क्रौर्य नं पाहवणाऱ्या खुद्दार मुस्लिम सरदार आणि सैनिकांना देखील मुस्लिम असून सोलून काढण्यात आले. दिल्लीच्या रस्त्यांवर मारल्या गेलेल्या लोकांच्या मुंडक्यांची जागोजागी आरास करण्यात आली. दिल्लीवर इतका क्रूर हल्ला ह्याआधी कधीही झाला नव्हता, ना पुढे कधी झाला. अंदाजे दोन ते तीन लाख माणूस मेला. तैमूरचं समाधान होऊस्तोर दिल्ली लुटून चाटून पुसून काढण्यात आली.

ही कत्तल इतकी भयंकर होती की कित्येक दिवस दिल्लीत कुजत पडलेल्या लाखो प्रेतांमुळे आजूबाजूच्या लहान वस्त्यांत रोगराई पसरली. दिल्लीत क्वचित माणूस रस्त्यांवर बाहेर जायला धजावे.

taimur-e-lang-delhi-attach-plague-marathipizza

1399च्या सुरुवातीला खिजर खानाला सत्ता देऊन तैमूरने दिल्ली सोडली! जाताना तो हजारो गुलाम, सोनं-हिरे-मोती-जवाहिर लादलेले शेकडो हत्ती घेऊन गेला. तैमूरलंगचा आयुष्यातला हा सर्वात मोठा विजय होता! आणि भारताला झालेली सर्वात क्रूर जखम. अय्याश आणि मूर्ख नसिरुद्दीन तुघलकाच्या नाकर्तेपणाची किंमत हिंदूस्तानाला दिल्लीचा गळा चिरून चुकवावी लागली!

तैमूरचं अस्तित्व भारतात ह्या हल्ल्यापुरतं नव्हतं! तैमूर नंतर त्याचंच रक्त पुन्हा दिल्लीवर चाल करून आलं आणि ह्या हल्ल्यानंतर 127 वर्षांनी तीमुरच्या खानदानाने दिल्लीवर भारतीय इतिहासातली सर्वात प्रसिद्ध मजबूत सत्ता प्रस्थापित केली. तैमूरच्या सख्ख्या नातवाचा पणतू म्हणजेच आपल्याला माहित असणारा झहिरुद्दीन मोहम्मद बाबर! पहिला मुघल सुलतान. तैमूरच्या मिरान शाह ह्या मुलाची पाचवी पिढी! गम्मत म्हणजे तैमूरने ज्याला सत्ता दिली त्या खिजर खानाच्या वंशजांनी हि सत्ता बहलोल लोधीला स्वेच्छेने सोपवली आणि बहलोल लोधीचा नातू इब्राहिम लोधीला पुन्हा तैमूरच्या वंशजाकडून पहिल्या पानीपत युद्धात पराभव स्वीकारावा लागला!

अमीर तैमूर स्वतःला “इस्लामची तलवार” म्हणवून घेत असला तरी त्याने पर्शियामध्ये मुसलमानांची अशीच कत्तल घडवून आणली. तुर्कीचा महापराक्रमी सुलतान बय्यझीद यल्दरम ज्याने स्पेनपर्यंत मजल मारून युरोपीय ख्रिश्चनांना जेरीला आणलं होतं त्याचाही तैमूरने सत्यानाश केला!

अमीर तैमूरच्या क्रौर्याबद्दल, त्याच्या चाणाक्ष सैन्यनीतीबद्दल आणि इतर काही गोष्टींबद्दल थोडी अजून माहिती पुढच्या लेखात.

पुढील भागाची लिंक: इस्लाम ची तलवार आणि १७ लाखांची कत्तल : आमिर तैमूर (भाग ३)

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

 

Suraj Udgirkar

A small town person who loves to write, read & then wrangle about it. usual business.

suraj has 31 posts and counting.See all posts by suraj

One thought on “इस्लामची तलवार आणि दिल्लीचा विध्वंस – अमीर तैमूर (भाग -२)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?