' हिंदूंवरील अन्यायाचा इतिहास, कुंदन चंद्रावत आणि खोट्या पुरोगामीत्वाची थेरं – InMarathi

हिंदूंवरील अन्यायाचा इतिहास, कुंदन चंद्रावत आणि खोट्या पुरोगामीत्वाची थेरं

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

कुंदन चंद्रावत नावाच्या उज्जैनच्या एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्याने केरळच्या मुख्यमंत्र्याचा शिरच्छेद करणाऱ्याला एक करोड रुपयांचे बक्षीस जाहीर करणारे वक्तव्य केले आणि समस्त प्रसारमाध्यमांच्या हातात आयते कोलीतच मिळाले. चोहीबाजूने अतिप्रचंड टीका होऊ लागली. कुंदन चंद्रावतनं त्याची माफी मागितली. संघाने त्याच्यावर कारवाई करून काढून टाकल्याचं जाहीर केलं आणि हे प्रकरण आता संपलंय असं अप्रत्यक्ष जाहीर केलं आणि प्रसारमाध्यमांना हे वक्तव्य संघाचे कधीच नाही आणि नव्हते असे निवेदन पण दिलं. अर्थात संघाकडून तेच अपेक्षित होतं.

आत्तापर्यंत असे असंख्य फतवे, अप्रत्यक्ष आदेश, अश्या प्रकारची वक्तव्यं ही डाव्या विचारसरणीकडून, मुल्ला मौलवींकडून झाली नाहीत असं नाही पण कोणावर काही कारवाई झाल्याचं ऐकिवात आलेलं नाही. संघाने लगेच तडकाफडकी कारवाई केली. असो.

Kundan Chandrawat marathipizza

हिंदू जगामध्ये अल्पसंख्य आहेत. माना अथवा नका मानू ही वस्तुस्थिती आहे. इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म जोमाने आणि जोराने वाढत आहे. हिंदूंनी आत्तापर्यंत बरीच आक्रमणे सोसलीयेत. आधी बुद्ध धर्मियांनी आक्रमण करून हिंदूंची अमानुष कत्तल केली. (ज्याचे संदर्भ ज्ञानेश्वर कुलकर्णी लिखित कवी कालीदासांच्या चरित्रात सापडतात.) नंतर इस्लामिक राज्यकर्त्यांनी ८ शतके हिंदूंना अक्षरशः आणि अर्थशः पिळून काढलं. आणि त्यानंतर ब्रिटिश शासनकर्त्यांनी तेच नेटाने पुढे नेले…आणि जाता जाता हिंदू-मुस्लिम द्वेषाचं रोपटं लावून गेले.

नंतरच्या सरकारने त्यांचे हे धोरण अगदी नेटाने पाळले आहे…अजूनही पाळले जात आहे.

१९२१ साली मोपल्याचे प्रकरण घडले, ज्याला खिलाफत चळवळीची पार्श्वभूमी होती. हे प्रकरण घडायच्या आधी ज्यांना ज्यांना तशी कल्पना दिली गेली होती त्यापैकी बर्याच जणांनी असे काही घडायची शक्यता धुडकावून लावली होती. आणि ते प्रकरण घडले. आजही ते प्रकरण वाचताना अंगावर काटा उभा राहतो. शब्दंही त्या अत्याचाराचं वर्णन करायला कमी पडतील. अर्थात ते प्रकरण गुरख्यांच्या सेनेने नंतर मोडून काढले. पण तोपर्यंत जे काही घडले होते ते घडलेच. कदाचित भविष्यात घडणार्या घटनांची ती पूर्वसूचनाच होती. पण त्या घटनेकडे कोणीच गाम्भीर्याने पाहिले नाही. बहुतांश, अशी काही घटना घडलीये हे कोणी मान्यंच करायचं नाही. त्यानंतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत हिंदूंवर कसे आणि कधी अत्याचार होत गेले हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

 

moplah violence marathipizza

 

त्यानंतर फाळणी झाली. मुस्लिम तत्त्वज्ञानाच्या पार्श्वभूमीवर जे अतिशय पवित्र होते. त्यांना वेगळा भाग देण्यात आला पाकिस्तान. आणि जे कोणी अपवित्र होते ते भारतात राहिले. फाळणीनंतर हिंदूंवरच्या अत्याचारासंदर्भात तर स्पष्ट विधाने करण्यात आली होती की, हिंदूंनी प्रतिकार नं करता होणाऱ्या अत्याचाराचा सामना करावा. मशिदीचा सहारा घेणाऱ्या हिंदूंनातर जबरदस्तीने काढण्यात आले. हिंदूंवरच्या आया बहिणीवरच्या अत्याचाराने तर परिसीमा गाठली होती.

त्याच पार्श्वभूमीवर हिंदू कोड बिल लागू करण्यात आलं. फक्त हिंदूंना. अर्थात ह्या हिंदू कोड बिलाने हिंदूंच्या आयुष्यात आमूलाग्र चांगला बदल घडवला. पण हेतु पुरस्सर मुस्लिमांना ह्यातून वगळले गेले. कारण? मुस्लिम तुष्टीकरण…! खरं तर धर्माच्या नावावर त्यांना वेगळा देश तोडून दिल्यावर, जिथे मुस्लिम जनसंख्या तुलनेने अत्यल्प होती आणि विरोधाची धार तुलनेने कमीच असली असती, तिथे भारतीय कोड बिल सादर करून सर्व धर्मांना जर त्यात अंतर्भूत केले गेले असते तर भविष्यातल्या समान नागरी कायद्याच्या फरफटीची शक्यताच उद्भवली नसती. शिवाय तेंव्हा “मुस्लिम व्होट बँक” नावाच्या प्रकारावरून राजकारण होण्याची शक्यताही नव्हती. कारण काँग्रेस सोडून दुसरा कोणताही पक्ष नव्हता. त्यांच्या धर्माचा मान ठेवण्याच्या नावाखाली त्यांना त्यांच्या धर्मानुसार वागायला परवानगी दिली गेली. इथेही त्यांच्या तुष्टीकरणासाठी कायदे बनवले गेले नाहीत. ओरडणाऱ्यांना ओरडू दिलं पण जे काही करायचं ते त्या सरकारने केलंच.

नंतर सतत धगधगत असणाऱ्या काश्मीरबद्दल काय लिहू? काश्मिरी पंडितांवरच्या अत्याचाराबद्दल काय लिहू?

kashmiri-pandit-family-in-kashmir marathipizza

सुरुवातीपासून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार झाले नाहीत? त्यांच्याकडेही हेतुपुरस्सर दुर्लक्ष झालं नाही? ती जखम बरी नं होण्यासाठी का मलमपट्टी केली गेली नाही? काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांना एव्हढे पोसायला कोण कारणीभूत ठरलं? ह्या सगळ्यात पुन्हा मुस्लिम तुष्टीकरण…

=====
काश्मिरी पंडितांचे काय हाल झालेत, त्यांना काश्मीर मधून कसं हाकलून दिलं गेलं – हे माहिती नसेल तर नक्की वाचा :

काश्मिरी पंडितांसाठी नरकाहून वाईट ठरलेला पृथ्वीवरचा स्वर्ग: कश्यपमूर, अर्थात काश्मीर!
=====

आणि…१९८६ साली शाहबानो प्रकरण घडलं…

shah bano marathipizza

 

ह्या शाह बानोचा मोहम्मद अहमद खानशी निकाह झाला होता १९३२ साली. २ मुलं आणि ३ मुली ह्यांचा नंतर जन्म झाला. मोहम्मद अहमद खाननं साधारण १९७५ च्या सुमारास ह्या शाह बानो ला घरातून बाहेर काढलं. तिने सीआरपीसीच्या सेक्शन १२५ अंतर्गत महिना ५०० रुपयांच्या पोटगीसाठी याचिका दाखल केली, इंदोरच्या मॅजिस्ट्रेटसमोर.

सीआरपीसीच्या सेक्शन १२५ अंतर्गत कोणतीही बायको, घटस्फोटिता, पालक, पाल्य पोटगीसाठी दावा दाखल करू शकतात.

१९७८ मध्ये मोहम्मद अहमद खाननं तिला तलाक दिला. त्यानंतर तिने दुसरं लग्न केलं नाही. आता बचाव करताना मोहम्मद अहमद खाननं सांगितलं की शाह बानो त्याची बायको नाही. तेंव्हा त्याची तिला पोटगी द्यायची काहीही जबाबदारी नाही.

मुस्लिम पर्सनल लॉ नुसार तलाकनंतर नवऱ्याची बायकोप्रती जबाबदारी फक्त दोनच बाबतीत असते. एक म्हणजे मेहेर आणि दुसरं म्हणजे इद्दत पुरती पोटगी. मेहेर ही एक रक्कम असते की जी निकाह करते वेळेस निश्चित केलेली असते की जी तलाक, जर झाला तर, नंतर नवर्याने बायकोला द्यायची असते. आणि इद्दत म्हणजे तलाकनंतरचा फक्त तीन महिन्याचा काळ, अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर तलाकनंतर तीन मासिक पाळ्यांचा कालावधी. तोही ८७ दिवसांचा… संपलं…!

मोहम्मद अहमद खाननं असा बचाव करायचं कारण म्हणजे त्याने आधीच दोन वर्षे २०० रुपये प्रति महिना तिला पोटगी दिलेली होती आणि त्याचबरोबर ३००० रुपये कोर्टात डिपॉझिट केले होते, मेहेर म्हणून. तरीही कोर्टाने त्याला अतिरिक्त २५ रुपये प्रति महिना शाहबानोला द्यायची ऑर्डर केली. पोटगीची रक्कम खूप कमी होती म्हणून शाहबानो ने मध्यप्रदेशच्या हायकोर्टात अपील दाखल केलं. हायकोर्टाने ते अलाउ करून १७९.२० रुपयाची पोटगी द्यायची ऑर्डर केली. त्याच्याविरुद्ध मोहम्मद अहमद खाननं सर्वोच्च न्यायालयात अपील केलं, जे त्या न्यायालयाने फेटाळून लावलं…

आणि ऐतिहासिक निर्णय दिला की इद्दत च्या कालावधीनंतर सुद्धा मुस्लिम नवर्याने बायकोला पोटगी द्यावी, सीआरपीसीच्या सेक्शन १२५ च्या अन्वये.

झालं…”इस्लाम खतरेमे है” च्या आरोळ्या सुरु झाल्या. सर्व तथाकथीत मुस्लिम विचारवंत ह्यांच्या बैठका वाढू लागल्या. पहिल्यांदाच न्यायालयाने त्यांच्या धर्मात हात घातला होता. इतरांच्या बाबतीत जे काही करायचं ते करा पण इस्लामला हात नाही कोणी लावू शकत हा त्यांचा स्टॅन्ड होता. अख्खे मुस्लिम जनमानस ढवळून निघाले. राजीव गांधीचे सरकार होते. सर्व मुल्ला, मौलवी गेले त्यांना भेटायला. गंभीर इशारे दिले. सरकारला धोका उत्पन्न करण्याची गर्भित धमकी दिली. राजीव गांधी घाबरले आणि संसदेला हाताशी धरून “मुस्लिम वूमन (प्रोटेक्शन ऑफ राईट ऑन डायव्होर्स) ऍक्ट १९८६” पास केला. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवली. सीआरपीसीचा सेक्शन १२५ हा मुस्लिमांना लागू होणार नाही आणि लागू करायचा असेल तर दोघांनी तसं ऍफेडेव्हिट सादर करावं असं सांगितलं गेलं. आता कोण मुस्लिम नवरा नसती आफत ओढवून घेईल असं ऍफेडेव्हिट सादर करून? आता पुन्हा तो इद्दतचा नियम लागू केला गेलाय.

इथं काय झालं? मुस्लिम जनता सर्वोच्च न्यालयाचा निर्णय, की जो कायदाच असतो, तो मानायला तयार नव्हती तेव्हा कायदा पुन्हा वळवला गेला… त्यांच्या तुष्टीकरणासाठीच ना?

ह्यापलीकडे पूर्वोत्तर राज्यातले होणारे धर्मान्तर, कैराना, लव्ह जिहाद सारखी प्रकरणे वेगळीच. जो पर्यंत आपल्या स्वतःवर ही वेळ येत नाही तो पर्यंत आपल्या त्यातले कळत नाही आणि मग आपण त्या गोष्टी थोतांड म्हणून गृहीत धरतो. आपण जर काही वाईट भोगत असू तर सारी दुनिया वाईट आहे हे म्हणणे जसे अयोग्य तसेच जर आपण काहीच भोगलेले नसताना इतरांचे सोसणे नाकारणे हेही अयोग्यच. तसं पाहता इथे वर काही प्रातिनिधिक उदाहरणेच सांगितली आहेत. अनेक ठिकाणी वस्तुस्थिती प्रचंड भीषण आहे. ह्या पार्श्व्भूमीवर काही अपवादातीत प्रकरणात जर एखाद दुसऱ्या हिंदूंकडून जर काही कुंदन चंद्रावत सारखी वक्तव्ये केली गेली तर त्या मागची कारणे नं लक्षात घेता सरसकट सर्वांना झोडपणे हे किती योग्य आहे? आत्तापर्यंत हिंदूंनी काही हिंसक सुरुवात केलीये, सक्तीचे धर्मान्तर केलेय, इतर धर्मातल्या लोकांवर अमानुष अत्याचार केलेत त्यांना बाटवण्यासाठी अश्या घटना कितिश्या घडल्यात?

आत्तापर्यंत हे सगळं घडत असताना अशी किती वर्तमानपत्रे होती, अशी किती प्रसारमाध्यमे होती जी हिंदूंच्या न्यायासाठी झगडत होती? आत्तापर्यंत इतक्या ठिकाणी हिंदूंवर अत्याचार झाले, कितीठिकाणी त्या अत्याचाराला वाचा फुटली? केरळात कित्येक वर्षे झाली हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहे, किती जणांनी त्याला आवाज दिला? केरळातल्या एकूण १४ जिल्ह्यांपैकी ५ जिल्ह्यातल्या (मल्लापुरम, वायनाड, एर्नाकुलम, इडुक्की आणि कोट्टायम) हिंदूंना अश्या प्रकारे एक तर मारण्यात आलंय किंवा हुसकावण्यात आलंय की तिथे आज मुस्लिम लोकसंख्या वाढवली जात आहे. बाकीच्या ९ जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती यायला कितीसा वेळ लागणार आहे?

आत्तापर्यंत शांत असणारा हा समाज आता बोलू लागतोय आणि नेमक्या त्याच वेळी असहिष्णुतेचा साक्षात्कार होणे हा फक्त योगायोग आहे का? की आतापर्यन्त शांतपणे सगळं बघत आणि अनुभवत असणाऱ्या हिंदू समाजाने तसेच बसणं अभिप्रेत आहे प्रसारमाध्यमांना? का कोणी मूर्ख योगी वा साध्वी काही बोलली कि लगेच नसणारा “भगवा दहशतवाद” शोधून काढणे आमच्या प्रसारमाध्यमांचे आणि आमच्या नेत्यांचे आद्यकर्तव्य ठरते?

इतके दिवस, इतकी वर्षे एखाद्याच्या परिवारातले सदस्य जर एका राज्यात वेचून सातत्याने मारले जात आहेत म्हणून अश्या प्रकारची प्रतिक्रिया कुंदन चंद्रावतने दिली. कुंदन चंद्रावतला शिव्या घालणाऱ्यांनी जरा केरळ शासनाच्या ह्या धोरणाकडे सुद्धा लक्ष द्यावं. मुळात, केरळ सरकारच्या पाठिंब्याने होत असलेली कत्तल पुरोगाम्यांनी आधीच थांबवली असती तर कुंदनवर असं काही बोलण्याची वेळच आली नसती. हा विचार पुरोगामी करणार आहेत काय? की धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंचा बळी देत रहाणे योग्य आहे?

मी बार्शीत राहतो. पुण्यातून जेंव्हा जेंव्हा बार्शीत जातो तेंव्हा शक्यतो रात्र झालेली असते. बाबांना काही येऊ देत नाही. बार्शीच्या बाळेश्वर नाक्यावर उतरतो आणि चालत घरी जातो. साधारण ५-१० मिनटात घरी पोहोचतो. एसटीतून उतरल्या उतरल्या मी दोन्ही हातात दगडं घेतो. कारण जायच्या रस्त्यात खूप कुत्री असतात. आणि कुत्र्यान्च्या कपाळावर कधीच लिहलेलं नसतं कि कुठलं कुत्रं कधी चावणार आहे ते. तेव्हा कोणी कुत्रा आपल्याला चावायच्या आधीच आपण काहीतरी करायला हवं म्हणून मी त्यांना भीती दाखवायला म्हणून हातातली दगडं त्यांच्यावर उगारतो आणि खूप कमी वेळा मी त्यांना दगडं मारलेली आहेत. कुत्री घाबरून दूर पळतात आणि मी घरी सुरक्षित पोहोचतो. माझ्या हातातली दगडं जर मी उगारली नाहीत तर कुत्र्यांनी मला चावण्याची शक्यता वाढते. आधी बऱ्याच जणांना कुत्री चावली आहेत म्हणून मी ती खबरदारी घेतो. ती खबरदारी घेताना कोणतेही नृशंस कृत्य करत नाहीये ह्याचं मला पूर्ण भान असतं.

कुंदन चंद्रावतने बोललेले वाक्य, मला त्या कुत्र्यांवर उगारलेल्या दगडांसारखं वाटतं. मी दगड उगारताना माझी भीती कमी होत असते. अर्थात, कुत्र्यांना दगड मारणे आणि माणसांची कत्तल करणे ह्याच फरक आहे. त्यामुळे चंद्रावत चं वक्तव्य, त्या मागील विचार चूकच आहे. पण मी इथे त्या विचारांचं समर्थन करत नाहीये, तर त्या विचारामागचं कारण, मानसशास्त्र समोर ठेवू पहात आहे. आज केरळात जे काही असंख्य संघाचे कार्यकर्ते त्यांना नेमून दिलेले कार्य करीत आहेत, निश्चित त्यांच्याही मनात ही भीती थोडी फार असेलंच, की उद्या त्यांना कोणीतरी मारेल! मग अश्यावेळेस माझ्या राज्यात तर मला कोणी एव्हढं स्पष्टपणे साथ देणारं नाहीये तेंव्हा कोणी दुसर्या राज्यातला जर मला साथ देत असेल, निदान बोलून का होईना, तर मला दिलासा वाटेल ना? हेच ते मानसशास्त्र.

संघ काही संत नाही. मुळात तसं पाहायला गेलं तर कोणीच संत नसतो. मुळात संत असणारे जगद्गुरू तुकोबाराय बोलून गेलेत कि, “भले त्यासी देऊ, गांडीची लंगोटी, नाठाळाचे माथी, हाणू काठी” ते तर सरळ हाणायला सांगतात. इथे तर फक्त बोललं गेलंय. करणाऱ्याला कायद्याची भीती नाही पण त्या विरोधात बोलणाऱ्याला कायद्याचा बडगा हवा – अशी एककल्ली मागणी का होत आहे? सहिष्णुतेची अपेक्षा फक्त हिंदूंकडूनच. कायद्याचा मान राखण्याची, कायदा पाळण्याची आणि कायद्याची शिक्षा सहन करण्याची अपेक्षा देखील हिंदू कडूनच! ह्यावर लगेच तथाकथित त्रयस्थ लोकं अनुनासिक आवाजात म्हणायला सुरुवात करतात, कि अरे त्यांनी गाय मारली कि लगेच आपण वासरू मारायचं का? मग ह्यावर त्यांच्या पुढ्यात दुसरी गाय उभी करून मार बाबा तिला अजून असं म्हणायचं? हिंदूंनी योग्य वर्तन करायला हवंच…त्यांच्यावर कायद्याचा धाक हवाच – पण इतरांवर देखील हवा…हे दुर्लक्षित का केलं जातंय? हिंदूंचं वेगळं आस्तित्व जपणे आपण मान्य करणार आहोत? कि समस्त हिंदूंच्या अंतापर्यंत आपण सहिष्णुच राहणार आहोत आणि आमच्या पूर्वजांनी केलेल्या चुकांची पुन्हा पुनरावृत्ती करणार आहोत? ह्याचा अर्थ लगेच हिंदूंनी रस्त्यावर येऊन हाणामारी करावी किंवा दंगल करावी असं अजिबात म्हणणं नाही… फक्त दरवेळेस सहिष्णुतेची अपेक्षा फक्त हिंदूंकडून करू नये.

 

tip-of-the-iceberg-marathipizza
Image by © Ralph A. Clevenger/CORBIS

 

वर लिहलेलं फक्त पाण्यात बुडालेल्या बर्फ़ाचे जसं एकदशांश टोक दिसतं तसं प्रातिनिधिक आहे. नं दिसणारी नऊ-दशांश परिस्थितीसुद्धा दिसू शकते, फक्त त्याला डोळे उघडे असावे लागतात.

हिंदू धर्मियांना इतर धर्मांधां पेक्षा तथाकथीत हिंदू निरपेक्ष लोकांकडून जास्त धोका आहे.

जाता जाता एकच प्रश्न….

“इस्राईल हा देश जर धर्मनिरपेक्ष आणि खरंच शांतताप्रिय असता तर तो जगाच्या नकाशावर दिसला असता का?”

(प्रस्तुत लेखाचा हेतू हा कोणाच्याही भावना भडकावयाचा नसून केवळ हिंदूंच्या परिस्थितीची कल्पना देण्याचा आहे. गैरसमज नसावा.)

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?