“फिरोज शाह तुघलक” या धर्मांध शासकाचं नाव आता क्रिकेट स्टेडियमवरून काढलं गेलंय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

दिल्लीतील प्रसिद्ध क्रिकेट स्टेडियम “फिरोज शाह कोटला” स्टेडियमबद्दल तर बहुतेक सर्वांनाच माहिती आहे. नवी दिल्लीतील ह्या स्टेडियमला फिरोज शाह ह्यांचे नाव देण्यात आले होते.

कोलकाताच्या ईडन गार्डन नंतर हे भारतातील सर्वात जुने क्रिकेट स्टेडियम आहे जे आजही सुस्थितीत आहे आणि जिथे आजही आंतरराष्टीय सामने खेळले जातात. ह्या स्टेडियमचे नुकतेच नवे नामकरण करण्यात आले आहे.

आता हे स्टेडियम अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम ह्या नावाने ओळखले जाईल. अरुण जेटली हे DDCA चे म्हणजेच दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष होते. अरुण जेटली ह्यांचे २४ ऑगस्ट २०१९ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.

त्यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून १२ सप्टेंबर २०१९ रोजी राजधानी नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या एका कार्यक्रमात फिरोज शाह कोटला स्टेडियमला अरुण जेटली ह्यांचे नाव देण्यात आले.

गृहमंत्री अमित शहा ह्यांनी ह्या नामकरण सोहळ्यात अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमचे उदघाटन केले. ह्या सोहळ्यास अरुण जेटली ह्यांचे कुटुंबीय हजर होते.

 

Arun Jetley Stadium Inmarathi
India Today

अरुण जेटली ह्यांनी दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवले होतेच, शिवाय ते बीसीसीआय म्हणजेच बोर्ड ऑफ कन्ट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे ही उपाध्यक्ष होते.

ह्या सोहळ्याला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली , क्रीडा मंत्री किरण रिजिजू, माजी क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड, माजी कर्णधार कपिल देव आणि माजी खेळाडू चेतन चौहान हे उपस्थित होते.

अरुण जेटली ह्यांच्याच अध्यक्षतेखाली ह्या स्टेडियमचे नूतनीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे नाव ह्या स्टेडियमला देणे हे त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन आहे.

जरी स्टेडियमला अरुण जेटली ह्यांचे नाव आले असले तरी मैदानाला फिरोज शाह कोटला ह्यांचेच नाव आहे. अनेकांना प्रश्न पडतो की हे फिरोझ शाह कोण होते आणि स्टेडियमला त्यांचे नाव का देण्यात आले होते? आज आपण फिरोझ शाह ह्यांच्याविषयी जाणून घेऊया.

फिरोझ शाह कोटला किंवा कोटला ही सुलतान फिरोझ शाह तुघलक ह्याने स्वतःच्या वास्तव्यासाठी दिल्लीत बांधलेली एक गढी होती. त्यावेळी हा भाग फिरोझाबाद नावाने ओळखला जात असे.

 

Pheroz shah Mehta Inmarathi
The Better India

फिरोझ शाह तुघलक हा दिल्लीचा सुलतान होता. ह्याने १३५४ साली फिरोझाबाद हे शहर वसवले होते. फिरोझाबाद ही त्यावेळी दिल्ली सल्तनतची नवी राजधानी होती. ह्याच राजधानीत फिरोझ शाह कोटला म्हणजे फिरोझ शाहची गढी सुद्धा होती.

सुलतान फिरोझ शाह तुघलक ह्याचा जन्म १३०९ साली झाला होता. हा तुघलक राजवंशातील एक तुर्की मुस्लिम शासक होता. त्याने दिल्ली सल्तनतवर १३५१ ते १३८८ इतकी वर्षे राज्य केले.

त्याचे वडील रजब हे गाझी मलिकचे लहान भाऊ होते. गाझी मलिक हा भारतात तुघलकी शासनाचा संस्थापक होता. गाझी मलिक नंतर त्याचा मुलगा मुहम्मद बिन तुघलक सत्तेवर आला आणि त्याच्या मृत्यूनंतर सत्ता फिरोझ शाह तुघलक ह्याच्याकडे आली.

मुहम्मद बिन तुघलक ह्याच्या मृत्यूनंतर सत्तेवर येण्यास फारसे कोणी उत्सुक नव्हते. अखेर मंत्र्यांनी व इतरांनी मनधरणी केल्यावर फिरोज शाहने दिल्ली सल्तनतच्या राज्यकारभाराची जबाबदारी अंगावर घेतली.

फिरोझ शाहने १३५१ साली ऑगस्ट महिन्यात राज्यकारभाराची जबाबदारी घेतल्यावर सगळी कर्जे माफ केली होती. मुहम्मद तुघलक ह्याने शेतकऱ्यांवर सौंधर ऋण लादले होते ते सुद्धा फिरोझ शाहने माफ केले.

पण त्याने जौनपूरच्या अटाला देवी मंदिराची नासधूस करून तिथे अटाला मशीद बांधली.

 

Muhhamad Bin Tughlak Inmarathi
The Sunday Guardian

तो एक कट्टर सुन्नी धर्मांध मुस्लिम होता. त्याने राज्यकारभार हातात घेतल्यावर सिल्ली सल्तनत मधून वेगळे झालेल्या प्रदेशांवर परत ताबा मिळवण्यासाठी बंगाल आणि सिंध प्रदेशावर आक्रमण केले.

१३५५ साली त्याने बंगालवर आक्रमण केले त्यावेळी बंगालवर शमसुद्दीन इलियास शाहचे राज्य होते. त्याच्यावर विजय मिळवणे फिरोझ शाहला शक्य झाले नाही.

तो १३५५ साली दिल्लीला परतला. त्याने १३५९ साली परत बंगालवर आक्रमण केले पण ह्यावेळी त्याचा शमसुद्दीनचा मुलगा सिकंदर शाहने पराभव केला.

१३६० साली फिरोझ शाहने जाजनगर (उडीसा) वर आक्रमण केले आणि तिथले शासक भानुदेव (तिसरे)ह्यांचा पराभव केला व जगन्नाथपुरी मंदिराचा विध्वंस केला.

१३६१ साली त्याने नगरकोटवर आक्रमण केले आणि चक्क सहा महिने तिथल्या लोकांनी सुलतानच्या सेनेला कडवे प्रत्युत्तर दिले. कालांतराने तिथल्या जनतेने सुलतानाचे अधिपत्य स्वीकार केले आणि त्याला वार्षिक कर देण्यास सहमती दिली.

ह्या लहानमोठ्या लढाया सोडल्यास फिरोज शाहच्या नावावर फारसा मोठा पराक्रम नाही. त्याने साम्राज्यविस्तारासाठी फार प्रयत्न केले नाहीत आणि जी काही युद्धे केली ती फक्त त्याचे साम्राज्य परकीय आक्रमणापासून वाचवण्यास त्याला करावी लागली.

 

Battle field Inmarathi
DNA India

त्याच्या शासनकाळात त्याने २४ कर बंद केले आणि केवळ ४च कर सुरु ठेवले. शेतसारा, खुम्स (युद्धातील लुटीचा माल), जजिया आणि जकात इतकेच कर वसूल केले जात असत.

त्याने आंतरिक व्यापाराला चालना देण्यासाठी अनेक कर बंद करून टाकले. तसेच फळांच्या १२००० बागा लावल्या. तसेच सिंचनाच्या सुविधेसाठी यमुना व सतलज ह्या नद्यांतून अनेक कालवे काढले.

त्याच्या शासनकाळात त्याने जवळजवळ ३०० नव्या नगरांची स्थापना केली. हरियाणा, फिरोजाबाद, फातेहाबाद, जौनपूर, फिरोजपूर ही त्यातील काही शहरे आहेत. ह्यातील यमुना नदीच्या किनाऱ्यावर वसवलेले फिरोझाबाद त्याच्या सर्वाधिक आवडीचे होते.

फिरोझ शाहने मुस्लिम अनाथ स्त्रिया, विधवा आणि मुलींच्या मदतीसाठी “दिवान ए खैरात”नावाचा विभाग सुरु केला तसेच गरीब लोकांवर मोफत उपचार व्हावेत म्हणून “दारुल शफा” नावाचा एक सार्वजनिक दवाखाना सुद्धा सुरु केला.

हे सगळे करताना त्याने कडक इस्लामी कायदे लागू केले आणि त्यांचे कठोर पालन व्हावे असा त्याचा दंडक होता. त्याच्या शासनकाळात धर्मगुरूंचा प्रभाव पुनश्च स्थापित झाला होता.

त्याने मुसलमान अपराध्यांना मृत्युदंड देणे पूर्ण बंद करून टाकले आणि हिंदूंवर जिजिया कर लादला. फिरोझ शाह हा त्या काळातील सर्वात धर्मांध शासक होता.

तुघलक हा एक धर्मांध मुसलमान होता. त्याने धर्मप्रसारक आणि धर्मअभ्यासकांना अनेक महत्त्वपूर्ण सवलती दिल्या. त्याने सर्व बिगर मुस्लिमांवर जिझीया कर लादला. त्याच्या आधीच्या शासकांनी त्या आधी भिकाऱ्यांवर कर लादले नव्हते. पण त्याने भिकाऱ्यांकडूनसुद्धा करवसुली सुरु केली. कट्टर मुस्लिम धर्मगुरू ज्या प्रथा इस्लामच्या विरुद्ध मानत होते, त्याने त्या प्रथांवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला.

उदाहरणार्थ, मुस्लिम स्त्रियांनी घराबाहेर पडून त्यांच्या संतांच्या मझारीवर जाऊन प्रार्थना करण्याच्या प्रथेचा त्याने निषेध केला. मुस्लिम धर्मगुरू ज्यांना पाखंडी किंवा विधर्मी मानत असत अश्या अनेक इतर मुस्लिम पंथियांचा त्याने छळ केला.

सुलतानाने श्रीमंत लोक/ मोठे लोक आणि उलेमान्यांना खुश ठेवण्याचे ठरवले जेणेकरून तो शांततेत राज्यकारभार करू शकेल. त्याच्या शासनकाळात दक्षिणेकडील राज्ये सल्तनतपासून वेगळी झाली होती आणि गुजरात आणि सिंध ह्या प्रांतात बंडखोरी सुरु होती. बंगाल प्रदेशाने तर आपले स्वातंत्र्य ठामपणे सूचित केले होते.

सुलतानने इसवी सन १३५३ आणि १३५८ मध्ये बंगालवर आक्रमण केले. त्याने कटक ताब्यात घेतले, पुरीच्या जगन्नाथ मंदिराचा विध्वंस केला. तसेच उडीसा येथील जाजनगरचा राजा गजपतीला खंडणी देण्यासाठी भाग पाडले. त्याने कांग्रा किल्ल्याला वेढा घातला आणि नगरकोटला खंडणी देण्यासाठी भाग पाडले, तसेच थत्ताच्या बाबतीत सुद्धा असेच धोरण ठेवले.

दरबारात किंवा इतर ठिकाणी योग्यतेच्या आधारावर पद देण्याऐवजी तुघलकाने श्रीमंत आणि अमीर उमरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनाच त्यांची पदे आणि जागीर दिली. सैन्यात सुद्धा असेच केले गेले. एखाद्या म्हाताऱ्या सैनिकाला त्याच्या ऐवजी त्याच्या मुलाला किंवा जावयाला, किंवा त्याच्या गुलामाला सैन्यात पाठवण्याची मुभा होती.

त्याने त्याच्या मंत्र्यांना /उमरावांना/अधिकाऱ्यांना पगारवाढ दिली. हात कापणे वगैरे अश्या कठोर शिक्षा त्याने थांबवल्या. मुहम्मदाने वाढवलेला जमिनीवरील करही त्याने कमी केला. तुघलकाच्या शासनकाळाचे वर्णन हे मध्ययुगीन भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे युग म्हणून ओळखले जाते.

त्याने एका वैतागलेल्या सैनिकाला एकदा सोनेरी टांक दिले जेणेकरून तो सैनिक त्याच्या हलक्या दर्जाच्या घोड्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी लिपिकाला लाच देऊ शकेल.

 

Jizya Tax Inmarathi
Aussie Madness

मुसलमान धर्माच्या शिक्षण व प्रसारासाठी त्याने अनेक मकबरे व मदरश्यांची निर्मिती केली. त्याच्या काळात त्याने स्वतःच लाचखोरीला प्रोत्साहन दिले. तो स्वतः लाच देणे घेणे ह्यात अग्रेसर होता. त्याच्या शासनात मुसलमान जनतेच्या भौतिक उन्नतीला त्याने प्राधान्य दिले.

फिरोझ शाहच्या मृत्यूच्या आधी त्याची दोन मुले फतेखां आणि खान जहाँ मरण पावली. त्यामुळे त्याच्यावर मोठाच आघात झाला. अखेर सप्टेंबर १३८८ साली वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. दिल्लीतील हौजखास परिसरात त्याचे दफन करण्यात आले.

तर ह्या फिरोज शाहचे नाव ह्या स्टेडियमला देण्यात आले होते. अखेर हे नाव बदलून आता अरुण जेटली ह्यांचे नाव देण्यात आले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on ““फिरोज शाह तुघलक” या धर्मांध शासकाचं नाव आता क्रिकेट स्टेडियमवरून काढलं गेलंय

  • September 18, 2019 at 2:53 pm
    Permalink

    स्टेडीअमला फिरोज शहा कोटला हे नाव कोणी व केव्हा दिले हा महत्त्वाचा उल्लेख लेखात नही.त्यामुळे लेख अपूर्ण आहे.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?