' माय नेम इज खान – पण मी मुस्लिम नाही! : चंगेज खान – भाग १ – InMarathi

माय नेम इज खान – पण मी मुस्लिम नाही! : चंगेज खान – भाग १

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक : सूरज उदगीरकर 

===

मध्ययुगाचा उत्तरार्ध चालू होता. आपल्याकडे महाराष्ट्रात यादव राजे सुखाने राज्य करत असले तरी पृथ्वीराज चौहानला हरवून घौरीने दिल्ली काबीज केल्यानंतर कुतूबुद्दीन ऐबक हा मामेलुक गुलाम दिल्लीचा सुलतान बनला होता.

अरबस्तानात उमय्यद खलीफाना हरवून आलेले अब्बासिद खलिफा भरात होते. तिकडे पालिकडे जेरुसलेमपाशी ख्रिश्चनांच्या कृसेड चालल्या होत्या.

इकडे इराण-अफगाण भागात सेलजुकांचा पाडाव झाल्यानंतर अल्लाउद्दीन टेकिशाने ख्वारझेमीद राजवट सुरु केली होती.

चीनमध्ये जुरचेन जीन, सॉन्ग, झी शिया वगैरे राजवटी आपापसात भांडत होत्या.

सगळीकडे गदारोळ गोंधळ चालला होता…तसाच गोंधळ चीनच्या उत्तरेकडे गोबी वाळवंटाच्या पलीकडच्या लांब लांब पसरलेल्या मैदानी-पहाडी प्रदेशात देखील होता. हा प्रदेश म्हणजे आजचा मंगोलिया!

 

mangolia-inmarathi

 

तिथे वेगवेगळ्या टोळ्या आपापला प्रदेश आणि लोक घेऊन नांदत होत्या. अनेक टोळ्या आपापसात मैत्री ठेऊन असत.

बहुतकरून एकमेकांना लुटून चरितार्थ चालवत. लिहिणे-वाचणे प्रकार नव्हता. येतंच नव्हतं. भूक लागली की प्राणी मारून खायचे नाहीतर लुटालूट हाणामारी करायची. वाट्टेल तिकडे तंबू गाडून राहायचं.

अचानक रात्री बेरात्री जुरचेन, सॉन्ग वगैरेंच्या गावावर हल्ला करून लुटून निघून जायचं. असले धंदे चालले होते. हे लोक खानाबदोष होते. कसलाही ठावठिकाणा नसणारे बंजारे. आज इथे तर उद्या तिथे!

अशा सगळ्या गदारोळात काही टोळ्यांच्या एका संघाचा एक प्रमुख होता – येसुगाई.

येसुगाईच्या घराण्याला उत्तरी चीनच्या जीन राजवटीडून “खगन” पदवी मिळाली होती. येसुगाईला दोन-चार बायका आणि 6 मुलं होती.

त्यातला सर्वात चुणचुणीत होता तीमुजीन! खेन्ती पर्वतांच्या पायथ्याशी कुठेतरी तीमुजीनचा जन्म झाला.

जन्मताना तीमुजीन मुठीत रक्ताची गाठ घेऊन जन्माला. हे मोठे कारनामे करणाऱ्या शूरवीराचं लक्षण मानलं जाई.

येसुगाईच्या टोळीचं(वंशाचं) नाव होतं “बोर्गीजीन”. एक दिवस येसुगाईला त्याच्या शत्रूंनी, तातारी लोकांनी विष घालून मारून टाकले! येसुगाईची बायको आणि मुलं उघड्यावर पडली. बोर्गीजीन लोकांनी त्यांना जबाबदारी झटकून हाकलून लावलं.

 

tribes-in-mongolia- inmarathi

 

तीमुजीन आणि इतर सगळे गरिबीत मिळेल ते खाऊन हिंडत राहिले. एक दिवस तीमुजीनला येसुगाईच्या “ताईचीउद” ह्या आधी मित्र असलेल्या टोळीने कैद केले. पण तीमुजीन त्यांच्या तावडीतून निसटला. ह्या सुटकेमुळे तीमुजीनला बराच आदर सन्मान मिळत गेला.

येसुगाईच्या संघातल्या एका टोळीत “जमुखा”म्हणून एक शूर पोरगा तीमुजीनचा मित्र होता. इतका घनिष्ट की दोघांनी अंगठे कापून रक्ताच्या साक्षीने मैत्रीची शपथ घेतली होती.

जमुखाच्या मदतीने तीमुजीनने स्वतःची टोळी बनवायला सुरुवात केली. पुढे “बोर्ते खातून” नावाच्या एका मुलीशी त्याने लग्न केले.

लग्न करून टोळीची ताकद वाढवायचा नादाला लागलेला तीमुजीन कष्टाचे डोंगर उपसत हिंडत फिरत राहिला. सोबतीला जमुखा होताच. दोघांनी मिळून लुटालूट, शिकार, छोट्या मोठ्या धाडी टाकून आणि इतर टोळ्यांशी युद्धे करून बस्तान बसवायला सुरुवात केली.

एक दिवस रात्री अचानक “मेर्किट” वंशाच्या टोळीने तीमुजीनवर हल्ला केला. बरीच कापाकाप केली. मेर्किट जास्त ताकदवान असल्याने तीमुजीन आणि जमुखा संधी पाहून कसेबसे निसटले पण बोर्ते मेर्किटांच्या तावडीत सापडली.

मेर्किट मुखीया तिला उचलून घेऊन गेला. तीमुजीन सूडाच्या भावनेने पेटून उठला. तो तडक तोघरुलकडे पोचला. तोघरुल येसुगाईचा मित्र आणि एका ताकदवान टोळीचा प्रमुख होता.

जसा जमुखा तीमुजीनचा मित्र होता तसा तोघरुल येसुगाईचा मित्र होता. मैत्रीला जागून तोघरुलने स्वतःचे 20 हजार सैनिक तीमुजीनच्या मदतीला दिले. तीमुजीनने मेर्किट टोळीला धूळ चारून बोर्तेला परत मिळवलं.

पुढे 9 महिन्यात बोर्तेला मुलगा झाला. तो मुलगा तिमूजीनचा की मेर्किट मुखियाचा असा संभ्रम असताना तीमुजीनने त्याला स्वतःच्या मुलाप्रमाणेच सांभाळलं.

तीमुजीन आपल्या टोळीत कर्मानुसार पदे बहाल करायचा, जन्मानुसार नाही. त्यामुळे जमुखा आणि तीमुजीनमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. जमुखाचं म्हणणं होतं की पदे जन्मनिहाय उच्च-नीचतेवर आधारलेली हवीत.

हळू हळू जमुखाला प्रमुख होण्याचीदेखील लालसा निर्माण झाली. एक दिवस तडका फडकी जमुखा टोळीतल्या बऱ्याचशा लोकांना घेऊन निघून गेला आणि त्याने स्वतःची टोळी बनवली.

 

gengiskhan_inmarathi

 

सुरुवाती सुरुवातीला जमुखा तीमुजीनच्या वाटेला आला नाही. पण हळू हळू जमुखा ताकदवान बनला. त्याने तिमूजीनच्या लोकांना लुटायला सुरुवात केली. त्याच्या टोळीवर धाड टाकायला सुरु केलं.

एका धाडीत तो तीमुजीनचे सरदार कैद करून घेऊन गेला आणि त्यांना उकळत्या पाण्यात जिवंत उकडून काढलं! तीमुजीन संतापला. आहेत नाहीत तेवढे सगळे सैनिक घेऊन त्याने जमुखावर हल्ला चढवला. तीमुजीन आणि जमुखा उघड आणि कट्टर शत्रू बनले.

तीमुजीन अत्यंत चलाख सेनानी होता. युद्ध हे शत्रूला खतम करूनच जिंकता येतं आणि शत्रूला खतम करायचं असेल तर त्याला जवळ न येऊ देताच मारण्यात शहाणपण आहे हे ओळखून त्याने जास्तीत जास्त तिरंदाजीवर भर दिला. त्याच्या टोळीत प्रत्येकाला कठोर प्रशिक्षण घ्यावं लागे. धनुष्य-बाण हा त्याच्या सैनिकांचा आत्माच बनला होता.

त्याच्या सैन्यात बहुतकरून घोडेस्वारच असत. त्याच्या चपळ, अचूक आणि चिवट सैन्याच्या सर्वात समोर उभा होऊन तीमुजीन अश्या अश्या कलुप्त्या लढवत असे की शत्रू भांबावून जाई. तो सैन्याच्या तुकड्या बनवून लाटेप्रमाणे शत्रूवर सोडत असे.

ह्यावेळी युद्धासाठी तीमुजीनने ढगाळ दिवस निवडला.

हे सगळे मंगोल लोक आभाळाला देव मानत आणि ढगांच्या कडकडाटाला भिऊन असत. मुद्दाम असा दिवस निवडून तीमुजीन जमुखावर चालून गेला.

सुरुवातीला एक लहानशी तुकडी पाठवून त्याने जामुखाच्या सैन्याला तिचा पाठलाग करत स्वातःकडे येण्यास भाग पाडलं आणि टप्प्यात येताच त्याच्या अचूक तिरंदाजांनी बाणांचा वर्षाव करून असंख्य लोकांना कंठस्नान घातलं.

सोबत विजांचा कडकडाट होत असल्याने जामुखाच्या सैन्याचा धीर खचला. ते पाहून तीमुजीन पूर्ण ताकदीनिशी शत्रूवर तुटून पडला. तीमुजीनच्या सैन्याच्या लाटांवर लाटा जमुखाच्या सैन्यावर तुटून पडल्या.

जमुखाचा सगळा जोर संपला. काही लोकांना घेऊन तो पळून गेला. तीमुजीनच्या टोळीत आनंदी आनंद पसरला. आता मंगोलियाच्या ताकदवान टोळ्यांपैकी एक टोळी तीमुजीनची होती.

gengiskhan-inmarathi

 

नंतर काही दिवसांनी जमुखाला त्याच्याच 2 सेनापतीनी कैद करून तीमुजीनकडे आणलं. जमुखाला तीमुजीनच्या हवाली केल्यावर मोठे बक्षीस मिळेल शिवाय सैन्यात जागा मिळेल अशी त्यांना आशा होती. पण झालं उलटं! जमुखाशी गद्दारी केल्याचं पाहून तीमुजीनने त्याना मारून टाकण्याचा हुकूम दिला.

झालं गेलं सगळं विसरून तीमुजीन पुन्हा जमुखाला टोळीत सामील करून घ्यायला तयार होता. पण हाराकीरीने स्वाभिमान दुखावलेल्या जमुखाने नकार दिला. तो म्हणाला –

तू आता प्रमुख राजा आहेस. आभाळात एका वेळी 2 सूर्य राहू शकत नाहीत. तीमुजीन…मला मानाचं मरण हवंय…माझं रक्त सांडता कामा नये.

ही जमुखाची विनंती तीमुजीनने मान्य केली आणि त्याच्या पाठीचा मणका उलटीकडून मुडपून त्याला मारण्याचा हुकूम दिला! हे मानाचं मरण समजलं जाई!

जमुखाच्या मृत्यूनंतर सगळीकडे तिमूजीनचा दबदबा निर्माण झाला. सगळ्या टोळ्या त्याला सर्वात मोठा प्रमुख मानायला लागल्या. संपूर्ण मंगोलियामध्ये त्याला कोणीही मोठा शत्रू उरला नव्हता…पण तीमुजीनला तिथे थांबायचं नव्हतं. त्याला सगळं जग जिंकायचं होतं!

तीमुजीनला आता सगळ्या मंगोलियामध्ये एका वेगळ्या नावाने ओळखलं जाऊ लागलं…आणि तेच नाव तीमुजीनने देखील स्वीकारलं. आजही आपण त्याला त्याच नावाने ओळखतो.

तीमुजीनने नव्या नावासह प्रचंड मोठी कामगिरी केली! आजपासून 800 वर्षांपूर्वी जग पायाखाली तुडवणारा, रोमन साम्राज्याच्या दुप्पट आणि आजच्या अमेरिकेच्या दीडपट प्रदेशावर हुकूमत गाजवणारा, चिनी, इस्लामी, रोमन, युरोपीय सगळ्या राजांच्या राजवटी धुळीत घालणारा जगात होऊन गेलेला हाच तो सर्वात शक्तिशाली, सर्वात सामर्थ्यवान शासक, कुशल राजकारणी आणि खुंखार लढवैय्या…ज्याचं नाव होतं…

खान…चंगेज खान…! खरा उच्चार “चिंगीस हान”! आणि बाकी जगात ह्याला म्हणतात गेंघीस खान!

 

changez-khan-inmarathi

 

 

सर्वात महत्वाची गोष्ट – मोगल (मुघल) हा शब्द मंगोल ह्या शब्दाचा अपभ्रंश असल्याने आणि आडनाव “खान” असल्याने चंगेज खान हा बहुतांश लोकांना मुसलमान वाटतो. पण तो मुसलमान नसून “टेंग्रीस्ट” होता.

त्याबद्दल आणि चंगेजबद्दल अजून काही माहिती पुढच्या भागात. पुढील भागाची लिंक :

===

हे ही वाचा – जगातील सर्वात मोठ्या ईस्लामी रियासतचा विध्वंस: चंगेज खान – भाग २

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?