' पुस्तकांचा खजिना म्हणून ओळखली जाणारी ही लायब्ररी प्रसिद्ध आहे भयावह कारणांसाठी! – InMarathi

पुस्तकांचा खजिना म्हणून ओळखली जाणारी ही लायब्ररी प्रसिद्ध आहे भयावह कारणांसाठी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

ही वास्तू आहे, कलकत्त्यातील ‘नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया’ ची ब्रिटीशकालीन प्राचीन वास्तू. असं म्हणतात, की कलकत्त्याच्या नॅशनल लायब्ररी ऑफ इंडियाच्या इमारतीत आहे भूत..!

सन १८३६ मध्ये बांधली गेलेली ही लायब्ररीची ईमारत सुरुवातीला ‘कलकत्ता पब्लिक लायब्ररी’ या नावाने ओळखली जात होती. या ईमारतीला एकदा तरी भेट द्यावी असे या ईमारतीचे महत्त्व आहे.

ही वास्तू देखणी तर आहेच, शिवाय या लायब्ररीत जवळपास २,२७,००० इतकी पुस्तकं, ८६००० इतके जुने नकाशे, ४५ किमी भरेल इतकी शेल्फ स्पेस आणि एका वेळी ५५० पेक्षा जास्त लोक राहू शकतील इतकी मोठी ही जागा आहे.

 

national library inmarathi
trippertravles.com

 

परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की सध्या ही वास्तू या उपयुक्त आणि महत्त्वाच्या कारणांसाठी म्हणून कमी आणि तिथे असलेल्या (नसलेल्या) भुतांसाठी म्हणून अधिक ओळखली जाते.

या वास्तूशी अनेक भुतांच्या कथा जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळेच या ईमारतीत काम करणारे कर्मचारी देखील आपल्या ऑफीस अवर्सपेक्षा जास्त उशीरापर्यंत तिथे थांबायला मागत नाहीत.

तिथले रखवालदार देखील रात्री पहारा करताना आपल्या जवळ हनुमान चालिसाचे पुस्तक घेऊन फिरतात. असं केल्याने कोणतंही भूत आपल्याजवळ फिरकणार नाही अशी त्यांची श्रद्धा असते.

ही इमारत ब्रिटिशपूर्व भारतात बंगाल प्रांतात राज्य करत असलेल्या मिर जाफर याने बांधलेली होती आणि त्याने ती भारताच्या पहिल्या ब्रिटीश गव्हर्नर जनरल, लॉर्ड वॉरन हेस्टींग्ज याला भेट दिली होती.

 

hasting house inmarathi
wmcarey.edu

 

१८५४ पासून ही आलिशान, शाही वास्तू बंगालच्या गव्हर्नरची राहण्याची वास्तू म्हणून घोषित झाली. त्यानंतर १८५४ ते १९११ या दरम्यान इथे अनेक ब्रिटीश गव्हर्नर जनरल राहून गेले.

त्यानंतर ब्रिटीशांनी आपली राजधानी कलकत्त्याहून दिल्ली येथे हलवली आणि या वास्तुचे रुपांतर नॅशनल लायब्ररीत करण्यात आले.

३० एकरच्या भव्य परिसरात बांधलेली ही वास्तू अतिशय देखणी अशी प्राचीन आणि ब्रिटीशकालीन वास्तू आहे.

सुरुवातीला मीर जाफर याने बांधलेल्या आणि नंतर ब्रिटीशांना भेट म्हणून दिलेल्या या वास्तुचे नुतनीकरणही झाले होते.

 

national library 2 inmarathi
en.wikipedia.org

 

वॉरन हेस्टींग्जचे भूत –

या ब्रिटिशांच्या पहिल्या गव्हर्नर जनरलचे, म्हणजेच वॉरन हेस्टींग्जचे भूतही या वास्तूत फिरते आणि अनेकांना त्याची धूसर आकृती दिसते असं म्हटलं जातं.

मात्र त्याचे भूत लोकांवर हमला करण्यासाठी किंवा त्यांना घाबरवण्यासाठी फिरत नसून ते आपल्याला निर्दोष ठरवणारी काही कागदपत्रे शोधण्यासाठी तिथे अजूनही फिरते असे म्हणतात.

या गव्हर्नरवर काही आरोप लावले गेले होते. आणि ते आरोप दूर करणारी काही कागदपत्रे त्याला हवी होती. जी तेव्हा त्याला सापडली नव्हती.

मात्र त्यानंतर त्याच्यावरील सर्व दोषारोप दूर झाले होते. तरीही त्याचे भूत अजूनही ती कागदपत्रे त्या वास्तूत शोधत फिरते अशी अफवा आहे.

 

warren hasting inmarathi
thesundayposts.com

 

लॉर्ड मेटकाफच्या बायकोचे भूत –

इथे फिरत असलेल्या भूतांच्या अफवांमध्ये एक महत्त्वाचं भूत म्हणजे लॉर्ड मेटकाफ या गव्हर्नरचं भूत आहे असं म्हणतात.

तुम्ही जर इथल्या दालनांमध्ये पुस्तकं बघत एकटे फिरत असलात, तर तिचे श्वास तुम्हाला जाणवतील असे म्हटले जाते. तिला वस्तू जागच्याजागी आणि नीटनेटक्या ठेवण्याची सवय होती.

त्यामुळे तुम्ही जर एखादं पुस्तक बघायला, किंवा वाचायला घेतलंत आणि ते नीट जागेवर ठेवले नाहीत तर तिची उपस्थिती आणि तिचे श्वास अधिक जाणवतात.

 

mystery in library inmarathi
youtube.com

 

मजूरांचे भूत –

अजून एक असेही म्हटले जाते की या ईमारतीच्या दुरुस्तीचे काम चालू असताना काही अपघातामुळे तिथे काही मजूर मरण पावले होते. त्या मजूरांची भूतेही तेथे अधुनमधून दिसत असतात.

विद्यार्थ्याचे भूत –

एक कहाणी अशीही सांगितली जाते, की येथे एकदा एक विद्यार्थी आपल्या संशोधनाच्या अभ्यासाठी आत शिरला आणि तो पुन्हा कधीच परत बाहेर आला नाही आणि कुणालाही दिसला नाही.

तो गायबच झाला आणि त्याचं काय झालं हे नंतर कोणालाही कधी कळलं नाही.

या इमारतीत संध्याकाळनंतर म्हणे विविध धूसर आकृत्या फिरताना दिसतात आणि इथले रखवालदारही इथं रात्रीची ड्युटी करायला घाबरतात.

 

library in night inmarathi
treebo.com

 

मात्र आजवर या भुतांनी कोणालाही इजा पोचवल्याची घटना घडलेली नाही किंवा कुणाला मारलेलं ऐकीवात नाही याचा अर्थ ही भूतं शांतीपूर्ण भूतं असणार!

दार नसलेली खोली –

या सर्व अफवा किंवा कहाण्यांवर कळस चढवला तो २०१० साली या ईमारतीत तळमजल्यावर सापडलेल्या एका खोलीने. या खोलीला आत जाण्यासाठी किंवा तिथून बाहेर येण्यासाठी दरवाजाच नाही.

किंवा एखादी गुप्त वाटही नाही. त्यामुळे याच्या आत काय आहे हे देखील कोणालाही ठाऊक नाही. ही अशी बंदिस्त रुम कशासाठी आहे? आणि त्याच्या आत काय आहे यासंबंधी कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

लोक म्हणतात ती रुम जर फोडली तर त्यातून मृत व्यक्तींचे सांगाडे निघतील. काही म्हणतात, त्यातून खजाना बाहेर निघेल. ही बंदिस्त जागा जवळपास १००० स्क्वेअर फिट एवढी मोठी आहे.

लोकांना असेही वाटते, की इथे दंड दिलेल्या लोकांना मारण्यात आले असावे.

सध्या इंजिनिअर्स आणि आर्किटेक्ट यांनी खूप प्रयत्न करूनही त्यांना या जागेभोवती एकही फट सापडलेली नाही, की जेणे करून आत काय आहे, किंवा ही जागा अशी बंदिस्त का आहे ते कळू शकेल.

ही वास्तू प्राचीन आणि सुंदर स्थितीत असलेली देखणी वास्तू असल्याने तिचा हा भाग पाडून बघताही येणार नाही.

 

national library kolkata inmarathi
outlookindia.com

 

म्हणून या ठिकाणी भींतीला ड्रील करून एखादं भोक पाडून त्यातून आरपार काही बघता येऊन दिसतं का ते बघण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मात्र ही वास्तू राष्ट्रीय ठेवा असल्याने योग्य परवानगी आणि प्रक्रिया पार पाडल्याशिवाय ते करता येणार नाही असे तिथले डायरेक्टर श्री. स्वपन चक्रवर्ती म्हणाले.

अशा रीतीने ही देखणी वास्तू अफवांच्या भोवऱ्यांत अडकलेली आहे. भारतात अशा अनेक वास्तू आहेत आणि त्यांच्या भोवती असे गूढ वलय, दंतकथा, अफवा, भयकथा पसरलेल्या असतात.

या किती खऱ्या आणि किती खोट्या हे कळणे कठीण. ही वास्तू जवळपास २५० वर्षे जुनी वास्तू. साहजिकच हिच्या भोवतीही अशा दंतकथा जोडल्या गेल्या असणार.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?