' अर्जेंटिनाच्या परकीय भूमीवरील ‘हस्तिनापुर’ शहर, जे चक्क लॅटीन अमेरिकन चालवतात! – InMarathi

अर्जेंटिनाच्या परकीय भूमीवरील ‘हस्तिनापुर’ शहर, जे चक्क लॅटीन अमेरिकन चालवतात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

महाभारत म्हणजे धर्म आणि अधर्माची लढाई! सत्य आणि असत्याचे द्वंद्व! पांडवांची बाजू खरी तर कौरवांची बाजू खोटी! आणि नेहमीप्रमाणे विजयश्री पडली खऱ्याच्या गळ्यात म्हणजेच पांडवांच्या गळ्यात

“हस्तिनापूर” शहर बऱ्याच कारणांनी महाभारतात महत्त्वाचे आहे. प्राचीन भारतात हस्तिनापुर अस्तित्वात होते, पण परदेशात हस्तिनापूर आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का?

अर्जेंटिनामध्ये हस्तिनापुर शहर…? काहीसं ऐकायला विचित्र वाटतं ना?…अहो, पण हे अगदी खरं आहे. अर्जेंटिनाच्या परकीय भूमीवर आपल्या महाभारतात ऐकलेलं हस्तिनापुर शहर अस्तित्वात आहे.

हे शहर म्हणजे काही ओसाड नगरी वगैरे नाही, तर त्यामागे खरोखरच हिंदू संस्कृतीचा प्रभाव आहे.

हिंदू संस्कृतीपासून प्रेरित होऊन अर्जेंटिनावासियांनी एक शहर उभारले आहे आणि त्याला ‘हस्तिनापुर’ असे नाव दिले आहे.

तेथील रहिवाश्यांनी येथे मंदिरं उभारली आहेत. मंदिरांमध्ये आणि मंदिराच्या आवारामध्ये हिंदू देवतांच्या मूर्तींची स्थापना देखील केली आहे.

१२ एकर मध्ये पसरलेल्या या शहरामध्ये जेवढी लोकसंख्या आहे, त्यापेक्षा जास्त देवांच्या मूर्ती आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये.

 

hastinapur-city-marathipizza01

 

शहराला भेट द्यायला येणाऱ्यांमध्ये लॅटीन अमेरिकन आणि हिंदू धर्मीयांची रेलचेल असते. हे शहर सुगंधी वनस्पतींसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि शहरात पाउल टाकल्यापासून ते शहर सोडेपर्यंत तो सुवास आपली पाठ काही सोडत नाही.

या सुवासासोबतच सगळीकडे विविध सुगंधाच्या अगरबत्त्यांचा देखील सुवास दरवळत असतो. त्यामुळे येथील वातावरण चैतन्यपूर्ण आणि मोहक भासते.

अगोदर सांगितल्याप्रमाणे येथे प्रसिद्ध हिंदू देव-देवतांच्या मूर्ती जागोजागी दिसतात. भगवान शंकर, श्री गणपती, महाविष्णू आणि सूर्य देवांच्या मूर्ती जरा जास्त प्रमाणात आढळतात.

अजून एक मुख्य गोष्ट म्हणजे येथे पाच पांडव आणि त्यांची पत्नी द्रौपदी यांच्या देखील मूर्ती आहेत. अहो शेवटी ज्यांच्या राज्याची ही राजधानी त्यांनाच मान दिला नाही तर कसा चालेल.

 

hastinapur-city-marathipizza02

 

मुख्य मंदिरातील वातावरण हे कोण्याही हिंदू भक्ताचं मन प्रसन्न करणारं आहे. मंदिरात नेहमी भजन-कीर्तन सुरु असते. टाळ मृदुंगाचा, अभंगाचा आवाज कानी घुमत असतो.

भक्तांची तर सारखी रीघ सुरु असते. डोळे मिटून देवासमोर उभे राहून आपली गाऱ्हाणी मांडणाऱ्या भाविकांमध्ये हिंदूंसोबतच लॅटीन अमेरिकनही असतात हे विशेष!

हे शहर आसपासच्या परिसरात ज्ञान भांडार म्हणून प्रसिद्ध आहे. कारण हिंदू संस्कृतीतील अमुल्य ग्रंथ आणि इतर अनेक विषयांवरची पुस्तके आपल्यात साठवून एक भलेमोठे ग्रंथालय येथे उभे आहे.

दर आठवड्याला १२ स्थानिक लोक एकत्र जमून मंदिरांची आणि शहराची साफसफाई करतात. कधी कधी तर फिरायला आलेले पर्यटक देखील या चांगल्या कार्यात हातभार लावतात.

 

hastinapur-city-marathipizza03

 

विदेशातील या हस्तिनापुर शहराची सर्वात महत्त्वाची खासियत म्हणजे, या शहरामध्ये कोणीही धर्मगुरू नाही आहे. येथे कोणावरही धर्म लादला जात नाही किंवा कोणत्याही प्रकारचे कर्मकांड येथे होत नाही.

येथे जायचे ते केवळ मन प्रसन्न करण्यासाठी, योगा करण्यासाठी किंवा चैतन्यमय वातावरणात भटकण्यासाठी..!

अजून एक अभिमानास्पद गोष्ट म्हणजे येथे गणेश चतुर्थी, बैसाखी आणि कित्येक प्रसिद्ध हिंदू सण उत्साहाने साजरे केले जातात. या हस्तिनापुर शहरामध्ये योग विषयात पदवीत्तर शिक्षण घेण्यासाठी विकेंडला वर्ग भरवले जातात.

हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तीन वर्ष लागतात. हस्तिनापुरमध्ये सध्या जवळपास २५०० विद्यार्थी योग आणि अध्यात्माचे शिक्षण घेत आहेत.

हस्तिनापुर फाउंडेशनने भारतीय तत्त्वज्ञानावर अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत आणि भगवत गीता, भक्तिसूत्र, उपनिषद, श्रीमत् भागवतम आणि योग विषयक पुस्तकांचे भाषांतर केले आहे. नुकतेच त्यांनी महाभारताचे स्पॅनिश भाषेमधील भाषांतर प्रसिद्ध केले आहे.

 

hastinapur-city-marathipizza04
newseastwest.com

 

हस्तिनापुर फाउंडेशनची स्थापना अडा अल्ब्रेक्ट यांनी १९८१ रोजी केली. त्यांनी अर्जेंटिनाच्या लोकांना भारतीय तत्वज्ञानाची ओळख करून दिली.

‘भारतातील संत आणि त्यांची शिकवण’ आणि ‘हिमालयातील भिक्षूंची शिकवण’ यांसारखी दर्जेदार पुस्तके त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरली आहेत.

कधी संधी चालून आलीच तर या परदेशातील हस्तिनापुर शहराला नक्की भेट द्या!!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?