“अपना टाईम आयेगा” म्हणत झपाटून ध्येयामागे धावायला शिकवणारा “गली बॉय”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखिका : प्राजक्ता काणेगावकर

===

आपल्या आसपास आपलं जगणं सुसह्य करणारी माणसं वावरत असतात. त्यांनी आपलं जगणं सुसह्य करावं यापलीकडे त्यांना काही वैयक्तिक आयुष्य असेल असा विचार सहसा आपण करतोच असं नाही.

रोज अर्धा तास बसचे पैसे वाचावेत म्हणून चालत कामावर येणाऱ्या माणसावर आपण डाफरु शकतो.

चहापाणी, अधूनमधून खायला देणे यापलीकडे आपली सहानुभूती जात नाही. यात चूक बरोबर काही नाही. आपल्या परिघात राहून आपण चार पावलं सगळ्यांबरोबर चालत रहातो.

अशाच एका घरातून आलेला मुराद. नाव मुराद कारण घरच्यांच्या प्रामुख्याने आईच्या आशा त्याच्यावर एकवटलेल्या. तो शिक्षण पूर्ण करेल आणि एक पांढरपेशी पगाराने बरी नोकरी करेल यासाठी तिची धडपड असते.

 

gullyboy-inmarathi
hollywoodreporter.com

बाप एका श्रीमंत शेठकडे ड्रायव्हरची नोकरी करतो. त्याने त्याच शेठच्या घरात नोकरी करणाऱ्या मुलीशी दुसरं लग्न केलंय आणि तिला तो घरी घेऊन आलाय. या सगळ्या परिस्थितीमुळे मुरादची आई बिथरलीय.

इथून सुरु होते मुरादची गोष्ट. त्याला या पिंजऱ्यातून सुटका हवीय. कंटाळलाय तो त्याच्या आसपासच्या परिस्थितीला. पण त्याला मार्ग सापडत नाहीये. त्याला वेगळं आयुष्य हवंय.

त्याचं मन मोकळं होतं त्याच्या लिखाणातून. त्याच्या गाण्यांमधून. त्याला मार्ग सापडतो. स्वप्नं बघण्याची हिंमत मिळते. त्याचं स्वप्न पूर्ण होतं का? कसं होतं? वगैरे मी सांगणार नाही. ते प्रत्यक्ष बघण्यातच गंमत आहे.

रणवीर सिंग या चित्रपटाची जान आहे. तो मुराद अक्षरशः जगलाय. त्याचा कोंडमारा, संताप, स्वतःला सिद्ध करण्याची धडपड सगळं त्याने फार समर्थपणे दाखवलं आहे.

पदोपदी होणारा सहन करावा लागणारा अपमान तर त्याच्या नजरेत आणि चेहऱ्यावर वाचून घ्यावा.

वडिलांसाठी बदली ड्रायव्हर म्हणून काम करताना एके दिवशी शेठच्या कुटुंबात चर्चा सुरु असते. शेठच्या मुलीला परदेशात शिकायला जायचं नसतं. शेठ मुरादला विचारतो त्याचं शिक्षण किती झालंय ते.

मुराद अभिमानाने डिग्रीचं लास्ट ईयर म्हणून सांगतो. पटकन शेठ म्हणतो “बघ. आजकाल कुणीही ग्रेज्युएट होतं”.

 

ranveer-inmarathi
Scroll.in

मुरादचा चेहरा खर्रकन उतरतो. ज्या शिक्षणासाठी त्याच्या आईवडिलांनी काबाडकष्ट केलेले असतात, करतायत त्या सगळ्या कष्टांची किंमत शून्य आहे हे त्याच्या चेहऱ्यावर दिसतं.

मला स्वतःला हा सीन खूप लागला. आपली सगळी सिस्टीम या एका सीनमध्ये अक्षरशः नागडीउघडी पडते.

त्याच झोपडपट्टीत असलेल्या गुंड, ड्रग्जचा धंदा करणाऱ्या मित्रावर लहान मुलांना असल्या कामाला लावतो म्हणून हात उचलणारा मुराद, त्याच मित्राच्या मदतीने खोलीचं पागडी भाडं भरायचं म्हणून कार्स चोरून विकतो.

त्याचा राग कीव नाही येत आपल्याला. त्याचं वागणं आपल्याला नीट समजतं.

ह्याच मित्रासाठी तो जबानी द्यायला म्हणून पोलीस स्टेशनवर जाणाऱ्या मुरादचा मूळचा चांगुलपणा लख्ख दिसतो. तो एक जगणं शोधणारा, जगण्याचे मार्ग शोधणारा तुमच्याआमच्यासारखा माणूस आहे याचा कुठेही विसर पडत नाही चित्रपट बघताना.

तो समाजाच्या ज्या स्तरातून आलाय तिथे त्याचे जगण्याचे प्रश्न कमालीचे गंभीर आहेत. आणि तरीही यातून बाहेर मी पडेन या एका आशेवर त्याचं जगणं सुरु आहे.

 

gully-inmarathi
deccanchronicles.com

एकीकडे कलाकार असलेला हळवा मुराद दुसरीकडे जगण्याची रोजची भलीबुरी लढाई लढणारा मुराद हे दोन रस्ते सतत एकमेकांना छेद देतात. त्या प्रत्येक चौकात त्याच्याबरोबर आपणही थबकतो, कासावीस होतो.

चित्रपट भावनाप्रधान आहे पण melodramatic नाही, सहजपणे धारावीतलं जगणं दाखवणारा आहे पण त्याचं भांडवली प्रदर्शन मांडणारा नाही.

सफीना आणि मुरादच्या नात्याचे चढ उतार दाखवणारा आहे पण ती त्याची ताकद आहे हे कुठेही आपल्या नजरेआड होत नाही.

सर्वच कलाकारांचं काम जबरदस्त आहे यात. आलिया भट तर outstanding आहे. मुरादवर मनापासून प्रेम करणारी, त्याच्याबद्दल पझेसिव्ह, प्रोटेक्टिव्ह असणारी, practical, त्याच्यासाठी मुलींशी मारामारी करणारी सफीना बघणं ही ट्रीट आहे.

तिच्याशिवाय मुरादची व्यक्तीरेखा अपूर्ण आहे. विजय राज, सिद्धार्थ चतुर्वेदी, अमृता सुभाष सगळेच कमाल आहेत. We demand more from the likes of Zoya Akhtars and Reema Kagatis of the world. You rock girls.

सेल्समधली मामाने चिकटवून दिलेली नोकरी सोडल्यावर वडील घरी येतात मुरादच्या. त्याचं स्वप्न तो पहिल्यांदाच वडिलांच्या समोर ठाम उभं राहून सांगतो. वडिलांना कळून घ्यायचं नसतं. त्यांची परिस्थिती त्यांना दिसत असते.

 

boy-inmarathi
bollywood.com

वडील म्हणतात,

“सपने वही देखो जो अपनी सच्चाईसे मेल खाते हो” मुराद पटकन म्हणतो

“मै सच्चाई के लिये सपने नही बदलता,सपनोंके लिये सच्चाई बदलना चाहता हू”

त्याचं स्वतंत्र अस्तित्वच नाकारणाऱ्या वडिलांपासून सुरु होणाऱ्या, आसपासच्या समाजापर्यंत येऊन थांबणाऱ्या, त्याच्या हिंमतीवर राग, संशय, हेवा असणाऱ्या प्रत्येकासमोर तो ठाम उभा रहातो या एका वाक्याने. आणि यशस्वीही होतो.

एक क्षण असंही वाटतं की नसता यशस्वी झाला तरी चाललं असतं कारण ती प्रकाशाची एक दिशा त्याला सापडलीय त्या दिशेने तो चालत रहाणार आहे. ती दिशा सापडणं हेच आधी किती महत्वाचं आहे कारण

परिस्थितीशरण जगण्यात, लढण्यातही कुठेतरी एखादी ठिणगी लपलेली असते. ती विझू द्यायची, राखेत, मातीत गाडायची का तिच्यावर फुंकर घालून ती चेतवायची असे प्रश्न पडतच असतात.

बव्हंशी त्या ठिणगीला तुमच्याआमच्यासारख्यांच्या आयुष्यातही चाकोरीबाहेरच्या वाटेवरच्या मशालीचा दर्जा मिळत नाही. मुरादसाठी तर हा प्रश्नच उद्भवत नाही. तरीही तो ठाम उभा रहातो.

त्याच्यापरीने त्याला सुचेल त्या मार्गाने लढतो. स्वतःच्या स्वप्नासाठी, त्या स्वप्नावर असलेल्या विश्वासासाठी.

 

alia-gully-inmarathi
Exchange4media.com

अपना टाईम आयेगा मग एक गाणं, एक कविता अशी रहात नाही.

It becomes a mantra to fight and to survive… For gully boy who never admitted defeat.

मी सहसा चित्रपटाचे रिव्ह्यू लिहित नाही. पण हा चित्रपट मनावरुन उतरायलाच तयार नाहीये. म्हणून लिहावं लागलं. खूप लिहिता येईल यावर. पण जे मला पटकन भावलं, लक्षात राहिलं ते लिहिलंय.

या चित्रपटाला अनेक पदर, पैलू आहेत. एका लेखात ते सगळे लिहिणं अशक्य आहे आणि म्हणूनच प्रत्यक्ष बघणे हा एकमेव पर्याय आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?