आता स्वर्गातही क्रिकेटचे तेज तळपेल.. कारण माझे गुरू आता तिथेही पोहचले आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

रमाकांत आचरेकर यांचे बुधवारी, ०२ जानेवारी २०१९ रोजी निधन झाले. अनेक नामवंत क्रिकेटपटूंनी आपला प्रशिक्षक  गमावला.

वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

आज सचिन तेंडुलकर या नावाभोवती असणारे वलय आपण सर्व जाणतो. मात्र हा खेळाडू ज्या प्रशिक्षकाने घडवला ते नाव म्हणजे रमाकांत विठ्ठल आचरेकर!

 

ramakant-achrekar-inmarathi
Rediff.com

सचिन तेंडूलकरचे प्रशिक्षक म्हणून ते क्रिकेटप्रेमींमध्ये ओळखले जात असले तरी त्यांची ही ओळख इतकीच मर्यादित नाही. त्यांनी अनेक खेळाडू नावारूपाला आणले.

मुंबई क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली गेली त्यात आचरेकर सरांचे योगदान मोठे आहे.

  • खेळाडू म्हणून रमाकांत आचरेकर

खेळाडू म्हणून रमाकांत आचरेकर इतके नावारूपाला आले नाही जितकी त्यांची कारकीर्द प्रशिक्षक म्हणून गाजली.

वयाच्या अकराव्या वर्षी ते क्रिकेट या खेळाशी जोडले गेले. १९४५ मध्ये त्यांनी न्यू हिंद स्पोर्टस क्लब मधून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. 

याव्यतिरिक्त ते यंग महाराष्ट्र इलेव्हन, गुलमोहर मिल्स आणि मुंबई बंदर या क्रिकेट संघाकडून देखील खेळले.

रमाकांत आचरेकर यांनी एकच प्रथम श्रेणी क्रिकेट सामना खेळला.

१९६३ मध्ये झालेल्या मोईन- उद- डोवला चषक स्पर्धेत स्टेट बँक ऑफ इंडिया विरुद्ध हैदराबाद या सामन्यात ते स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून खेळले. या सामन्यात त्यांनी ३० धावा केल्या.

  • प्रशिक्षक म्हणून नवीन डावाला सुरुवात

रमाकांत आचरेकर यांचे नाव सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक म्हणून सर्वच क्रिकेटप्रेमींना ज्ञात आहे. मात्र क्रिकेटचा देव घडवताना त्यांनी अनेक उत्तमोत्तम क्रिकेटपटूही घडवले.

 

tendulkar-achrekar-inmarathi

 

खेळाडू म्हणून त्यांची कारकीर्द मोठी झाली नाही. त्यानंतरही त्यांनी क्रिकेटकडे पाठ न फिरवता प्रशिक्षक होण्याचे ठरवले.

शारदाश्रम इथे त्यांनी या नवीन डावाला सुरुवात केली. पुढे शारदाश्रमने मुंबई आणि भारतीय संघाला अनेक नामवंत क्रिकेटपटू मिळवून दिले.

शिवाजी पार्कच्या मैदानावर एका छोट्या सुरुवातीनंतर त्यांनी मागे वळून न पाहता अनेक खेळाडूंना घडवले.

शारदाश्रम शाळा आणि आचरेकर सर हे एक यशस्वी समीकरण मुंबई क्रिकेटच्या आजवरच्या मोठ्या यशाचे गमक आहे.

इथून सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे, अमोल मुजुमदार, अजित आगरकर, रमेश पोवार, समीर दिघे, अतुल रानडे यासह अनेक नामवंत खेळाडू तयार झाले.

क्रिकेटचे गमभन गिरवण्यास या खेळाडूंनी इथूनच सुरुवात केली. याव्यतिरिक्त शारदाश्रमचे विद्यार्थी नसूनही बलविंदरसिंग संधू, लालचंद राजपूत, सुभाष क्षीरसागर यांचाही या मोठ्या खेळाडूंमध्ये समावेश होतो.

आचरेकर सर नेट्स मधील क्रिकेटला अधिक महत्त्व न देता प्रत्यक्ष सामन्यांना जास्त महत्त्व द्यायचे. एक खेळाडू म्हणून तुमची जडणघडण प्रत्यक्ष सामन्यातच अधिक होत असते यावर त्यांचा विश्वास होता.

खेळाडूंनी केलेल्या चुका त्यांच्या लक्षात आणून देऊन त्या कशा सुधारता येतील यावर ते आपले लक्ष केंद्रित करत.

जर एखाद्या खेळाडूने गुणवत्ता दाखवली तर त्याच्यासाठी ते अधिक परिश्रम घेत. ते शिस्तप्रिय होते.

शिवाय खेळाडूंचा मैदानातील वावर हा देखील शिस्तशीर असला पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष होता. त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे खेळाडूंमध्ये त्यांचा मोठा दरारा होता.

अर्थात यात अंतिम हित खेळाडूंचे आहे याची जाणीव निर्माण झाली की खेळाडूही या शिस्तीचे कसोशीने पालन करत. ते शिस्तशीर असले तरी आपले विद्यार्थी त्यांना प्रिय होते.

कधी एखाद्या खेळाडूची आर्थिक परिस्थिती चांगली नसली तरी ते त्याला मदतीचा हात देऊन त्याच्या खेळासाठी प्रोत्साहन देत.

इतकेच काय मुंबईत पाऊस असो, दंगल, तर कधी आंदोलन अशावेळी हे खेळाडू अडकून पडत तेव्हा आचरेकर सर त्यांना जबाबदारीने घरी सोडवून येत तर कधी आपल्या घरीही ठेवून घेत.

त्यांना आपल्या प्रत्येक खेळाडूची तितकीच काळजी होती. क्रिकेट हा खेळ आहे, पण यामुळे खेळाडूंचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत नाही ना याचीही ती तितकीच दखल घेत.

आचरेकर सरांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे खेळ संपल्यानंतर ते खेळाडूंशी ते कसे खेळले याविषयी चर्चा करत.

तेव्हा खेळाडूंना आश्चर्य वाटत असे की प्रत्यक्ष मैदानावर नसणारे आचरेकर सर आपल्या खेळाविषयी इतके बारीक-सारीक असे जाणून आहेत. तेव्हा खेळाडूंना उमगत की सरांचे आपल्यावर बारीक लक्ष असते.

  • सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक

रमाकांत आचरेकर यांनी खेळाडू म्हणून सचिन तेंडुलकरला घडवले.

हा खेळ त्यांच्या शिष्याने इतक्या उंचीवर नेऊन ठेवला आहे की आता रमाकांत आचरेकरांची  प्रशिक्षक पदाची कारकीर्द सचिन शिवाय अपूर्ण आहे.

 

sachin-tendulkar-ramakant-achrekar-inmarathi
dnaindia.com

त्यामुळे सचिन तेंडुलकर कसा घडला याविषयी प्रत्येक क्रिकेटप्रेमीला उत्सुकता ही असतेच.

सचिन आचरेकर सरांकडे आला त्यावेळी तो केवळ बारा वर्षांचा होता. तेव्हा आचरेकर सर यांनी हा अजून लहान आहे पुढच्या वर्षी याला घेऊ शकतो असे सचिनचा भाऊ अजितला सांगितले.

त्यावर अजितने आपण एकदा त्याची फलंदाजी बघावी आणि मग निर्णय घ्यावा अशी विनंती केली.

तेव्हा सचिन फलंदाजी करत असताना त्याला कळणार नाही अशा रीतीने लक्ष ठेवून त्यांनी त्याची फलंदाजी पाहिली आणि पुढे सचिन आचरेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवू लागला.

वर नमूद केल्याप्रमाणे आचरेकर सरांचा प्रत्यक्ष सामन्यांवर अधिक भर होता.

शिवाजी पार्कच्या मैदानात ते सचिनला एखाद्या सामन्यात लवकर बाद झाल्यास दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात आणि परत फलंदाजी करायला सांगत.

मात्र दुसऱ्या वेळेस फलंदाजी करताना त्याला ५० पेक्षा अधिक धावा करण्यास परवानगी नव्हती. कारण आचरेकर सरांना दुसरेही खेळाडू तितकेच महत्त्वाचे होते.

यामुळे इतर मुलांचे नुकसान होणार नाही हे त्याचे कारण होते.

सचिनला अधिक वेळ फलंदाजी करता येण्यासाठी ते सचिन थकल्यावर यष्टीवर नाणे ठेवत आणि जर सचिन नाबाद राहिला तर तें नाणे सचिनला मिळत असे.

सचिनकडे आज अशी तेरा नाणी आहेत. सचिनला आजही तो एक अमूल्य ठेवा वाटतो.

क्रिकेट हा फक्त फलंदाजी आणि गोलंदाजीत इतक्यापुरताच मर्यादित असणारा खेळ नाही. यात संयम ठेवून खेळणे हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे.

सचिन या गुणामुळेच नावाजला गेला, इतका मोठा खेळाडू झाला. पण खेळाडूंच्या गुणांची मशागत आचरेकर सर कशी करून घेत हेच या प्रसिद्ध किस्स्यावरून लक्षात येते.

असेच अजून एक उदाहरण म्हणजे सचिन ज्युनिअर संघात असताना आपला सामना न खेळता सीनियर संघाला प्रोत्साहन देण्यासाठी गेला होता.

ही बाब जेव्हा आचरेकर सरांना कळली तेव्हा त्यांच्या रागाचा पारा चढला आणि “तुला टाळ्या मिळवायच्या आहेत, टाळ्या वाजवायच्या नाहीत” असे सर्वांसमोर सुनावले.

यावरून ते बारीक बारीक गोष्टींवर किती सजग असत, हे दिसून येते.

मात्र कठोर वाटणारे हेच आचरेकर सर सचिनने चांगली फलंदाजी केली की त्याला मेजवानी देखील देत. सचिनला आपल्या स्कूटरवरून मुंबई फिरायला नेत असत.

भारतीय क्रिकेटला ज्यांनी अनेक नामवंत  क्रिकेटपटू दिले त्या आचरेकर सरांना १९९० मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार, तर २०१० मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

achrekar-sir-inmarathi
CricketCountry.com

आचरेकर सरांचे निधन झाले असले तरी त्यांनी भारतीय क्रिकेटला खूप काही देऊन ठेवले आहे. लालचंद राजपूत, विक्रम पंडित यांसारखे प्रशिक्षक म्हणजे आचरेकर सरांचा वारसा आहे.

पृथ्वी शॉ सारखे नवीन खेळाडू ही या नवीन प्रशिक्षकांची सफलता आहे.

तेव्हा आचरेकर सरांनी काही खेळाडू तयार केले असं म्हणण्यापेक्षा खेळाडूंच्या पिढ्या निर्माण केल्या असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.

अखेरीस सचिन तेंडुलकर या त्यांच्या शिष्याची त्यांच्या मृत्यू वरील प्रतिक्रिया:

“आता स्वर्गातही क्रिकेटचे तेज तळपेल….  कारण माझे गुरु आता तिथेही पोहोचले आहेत.”

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?