या बहाद्दराने इंस्टाग्रामच्या अप्लिकेशनमधली चुक दाखवून २० लाख कमावलेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मिडियावर आपण दररोज आपले दिवसातले किमान ४-५ तास तरी पडीक असतो असं म्हणायला हरकत नाही. हे इंटरनेट वेड लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच लागलंय.

फेसबुकला अमाप यश मिळाल्यानंतर फेसबुक कंपनीने खास फोटो शेअरिंगसाठी एक अ‍ॅप काढलं त्याचं नाव इन्स्टाग्राम. आपण हे अ‍ॅप वापरतो, पण त्यातील त्रुटी आपल्याला माहीत नसतात.

बरेच वेळा आपण अशा बातम्या ऐकतो की, काळजी घ्या. तुमचं अकाऊंट हॅक केलं जाऊ शकतं, किंवा तुमच्या अकाऊंटमधल्या डाटाचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळं सोशल मिडिया वापरताना फारच काळजीपूर्वक त्याचा वापर करावा लागतो.

अ‍ॅप काढणार्‍या कंपन्या पण याबाबतीत काळजी घेतच असतात. शक्यतो काही गैर प्रकार होऊ नये यासाठी ते आपल्या अ‍ॅपच्या सुरक्षिततेचं चेकिंग करत असतात.

हॅकिंगमध्ये फक्त फ्रॉडच केले जातात असं नाही तर, फ्रॉड होऊ नयेत यासाठी सिस्टीमध्ये काही दोष नाही ना? हेही पाहिलं जातं. भारतीय हॅकर्स याबाबतीत जगात सर्वांत पुढे आहेत.

 

Good Hacking
Medium

अनेक टेक कंपन्यांच्या बाउंटी प्रोग्रॅमच्या अंतर्गत सिस्टिमच्या त्रुटी शोधल्या जातात. तर अशीच एक त्रुटी शोधली आहे भारताच्या एका हॅकरनं.

चेन्नईमध्ये राहणार्‍या लक्ष्मण मुथैय्या याने इन्स्टाग्राम मधील अशी एक त्रुटी शोधली आहे की, ज्यामुळं केवळ १० मिनिटांत इन्स्टाग्रामचं अकाऊंट हॅक करता येतं.

तामिळनाडूतील हॅकर लक्ष्मण मुथैय्या हा कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी आहे. लक्ष्मणने हॅकिंगचा व्हिडिओ पुरावा म्हणून दिला आहे. त्यानंतर फेसबुकनं त्याला त्रुटी दाखवून दिली म्हणून ३० हजार डॉलर म्हणजेच जवळपास २० लाख ५५ हजार रुपयांचं बक्षीस दिलं आहे.

‘चुका दाखवून बक्षीस मिळवणे’ ही संकल्पनाच किती गंमतशीर आहे ना? नाहीतर आपल्या रोजच्या जीवनात कोणाला एखादी चूक दाखवली तर ते चूक मान्य करत नाहीत किंवा हो हो म्हणत आपण सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात.

चूक सुधारणारे फारच थोडे लोक असतात, पण फेसबुकने मात्र तसं न करता उलट चूक दाखवून दिल्याबद्दल बक्षीसच दिलं.

 

Laxman
News18.com

तर इन्स्टाग्राम मध्ये पासवर्ड रिकव्हरी सिस्टिममध्ये दोष होता. यामध्ये कोणताही हॅकर पासवर्ड रिसेट करून अकाऊंट हॅक करू शकला असता.

कधीतरी होतं काय की आपण एखादं अकाउंट फेसबुक किंवा इन्स्टाग्राम किंवा अन्य कोणत्यातरी अ‍ॅपमध्ये सुरू करतो, पण कालांतराने त्याचा वापर होत नाही.

मग कधीतरी आपण जेव्हा ते परत सुरू करण्याचा विचार करतो तेव्हा पासवर्ड आठवत नाही. कारण सध्या प्रत्येक गोष्टीसाठी पासवर्ड लागतो आणि मग आपल्या लक्षातही राहात नाही की, आपण कोणता पासवर्ड कुठे वापरलाय?

नेटची पूर्ण माहिती नसणार्‍या माणसाला कुणीतरी दुसर्‍यानेच अकाऊंट काढून दिलेलं असतं त्यामुळे पासवर्डचा गोंधळ होतो. अशा वेळी तिथे एक ऑप्शन येतो. ‘तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला आहात का?

 

help
shutterstock.com

मग आपण हो म्हटलं तर पासवर्ड रिकव्हरीसाठी आपण आपला जो नंबर अ‍ॅपसाठी दिलेला असतो त्या नंबरवर एक सहा अंकी व्हेरिफिकेशन कोड पाठवला जातो. जो तिथे टाइप केल्यावर आपण आपला जुना पासवर्ड बदलू शकतो.

त्रुटी शोधून काढण्यासाठी लक्ष्मणने वेगवेगळ्या आयपी अ‍ॅड्रेसवरून एक हजार रिक्वेस्ट पाठवल्या. व्हेरिफिकेशनसाठी १० लाख कोड ट्राय केल्यानंतर कोणत्याही अकाऊंटचा पासवर्ड बदलता येतो हे सिद्ध केले.

१०० वेगवेगळ्या आयपी अ‍ॅड्रेसवरून रिक्वेस्ट पाठवून अकाऊंट हॅक करता येतं याची माहिती लक्ष्मणने फेसबुकला दिली. लक्ष्मण मुथैय्यानं ९  मे २०१९ ला ही माहिती फेसबुकला दिली होती.

त्यानंतर त्याची खात्री करून देण्यासाठी व्हिडिओ व मेल पाठवले. फेसबुकने १० जुलैला हा बग म्हणजेच ही त्रुटी दूर केली. आणि लक्ष्मणला ३०,००० डॉलर बक्षीस म्हणून दिले.

 

got award of 30,000 dollars
Z6 Mag

सायबर सुरक्षा मधील वरिष्ठ तंत्रज्ञानशसास्त्रज्ञ पॉल डकलिन यांनी सांगितलं की, ‘‘मुथैय्या यांनी शोधून काढलेली त्रुटी दूर करण्यात आली आहे. आता हे अ‍ॅप पूर्णत: सुरक्षित आहे. तरीसुद्धा वापरकर्त्यांनी त्यांच्या सोशल मिडिया खात्यांवर नियंत्रण ठेवावे. ते हॅक होऊ नये याची काळजी घ्या.’’

डकलीन म्हणतात, ‘‘जर तुमचं खातं हॅक झालं, तर ते परत कसं मिळवता येईल याची जी प्रोसेस आहे ती माहिती करून घ्या. जर तुमच्याकडे अकाउंटची हिस्ट्री किंवा काही फाईल्स असल्या तर त्याचा वापर करून तुम्ही ती प्रक्रिया करू शकता.

तेव्हा हॅक झाल्यानंतर काळजी घेण्यापेक्षा हॅक होण्याआधी काळजी घ्या.’’

मुथैय्या यांनी यापूर्वी फेसबुकवरील डेटा डिलीट करण्यातील दोष शोधला होताच, पण डेटा जाहीर करण्यातील म्हणजे डेटा डिस्कलोर बग सुद्धा शोधून काढला होता.

पहिल्या त्रुटीतून तुमचा पासवर्ड माहीत नसतानाच सगळे फोटो झॅप करू शकले असते, दुसरा म्हणजे आपल्याला निरुपद्रवी वाटणार्‍या मोबाईलमधून एखाद्या अ‍ॅपमधून आपल्या खात्यात प्रवेश न करता सगळे फेसबुक फोटो कॉपी करणे.

पण एक मात्र खरं की, फेसबुकच्या ‘बग बाऊंटी प्रोग्राम’मुळे या सर्व त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत आणि मगच त्या फेसबुकवर उघड केल्या आहेत.’ असं डकलीन म्हणाले.

तसंच त्यांनी हेही सांगितले की, ‘‘फेसबुक सार्वजनिक होण्याआधी या समस्येचे निराकरण करण्यात सक्षम झाले आहे आणि ही त्रुटी दूर करण्यापूर्वी कोणाचीही फसवणूक केली गेलेली नाही.’’

 

Facebook bug
TECH FOE

तर मंडळी आहे हे असं आहे. ही त्रुटी शोधून काढणारा भारतीय माणूस होता हे आपल्यासाठी विशेष अभिमानाचे आहे. चेन्नईतील लक्ष्मण मुथैय्या यांनी ही कामगिरी केली आणि बक्षीस मिळवले. तसेच ही अ‍ॅप वापरणार्‍या सगळ्यांना सुरक्षित केले.

जसे की, नाण्याला दोन बाजू असतात, म्हणजेच प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. एक चांगली एक वाईट. तर आपण चांगल्या बाजून विचार करून ती गोष्ट वापरली पाहिजे.

पहिल्यापासूनच आपण एक विचार करत असतो किंवा अजूनही करतो, ‘विज्ञान शाप की वरदान?’ पण या गोष्टी आपल्यावरच अवलंबून आहेत. कोणत्या गोष्टीचा तुम्ही कसा वापर करता त्यावरून ती गोष्ट तुम्हाला शाप ठरते की वरदान ठरते हे ठरतं.

मुळात प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा हवीच. आजकाल सोशल मिडिया वापरताना आपण आपल्या मर्यादेचं उल्लंघन करत आहोत. सगळ्यात जास्त सोशल मिडिया भारतात वापरला जातो.

सतत फोटो अपलोड करणे किंवा आपण कुठे आहोत, काय करत आहोत याची माहिती पोस्ट करणे हे धोकादायक ठरू शकतो.

तेव्हा कोणत्याही गोष्टीचा जपूनच वापर केला तर ते नक्कीच वरदान ठरेल.

कारण खूप चांगल्या गोष्टी पण या सोशल मिडियामध्ये आहेत. आणि लक्ष्मण मुथैय्यासारखे लोकही आहेत की जे यामध्ये काही दोष असेल तर शोधून काढतील आणि आपली अकाऊंट सुरक्षित ठेवतील.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?