' १७ वर्षाच्या मुलीने व्हिडीओ पोस्ट केला आणि अवैध वाळू उपश्यावर दणक्यात कारवाई सुरू झाली – InMarathi

१७ वर्षाच्या मुलीने व्हिडीओ पोस्ट केला आणि अवैध वाळू उपश्यावर दणक्यात कारवाई सुरू झाली

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आज सोशल मिडीया हे एक सर्वसामान्य लोकांचं व्यासपीठ म्हणून पुढे आलं आहे.

सोशल मिडीयाच्या माध्यमातून सामान्य माणूस व्यक्त होऊ लागला आहे ज्यामुळे सामान्य माणसाच्या समस्याही जगासमोर येऊ लागल्या आहेत.

मुळात किती समस्यांवर समाधान भेटलं हा मात्र वादाचा विषय असला तरी त्या माध्यमातून विषयावर चर्चा घडू येत आहेत, हे देखील सोशल मिडियाचे खुप मोठे यश आहे.

सोशल मिडीयाच्या माध्यमातून एका अश्याच गंभीर विषयाला वाचा फुटली आणि एका चळवळीला सुरुवात झाली, ज्यामुळे सरकार हादरलं आहे.

केरळच्या कोल्लाम जिल्ह्यातील अल्लापुडा याठिकाणी बारावीत असणाऱ्या काव्या एस ह्या मुलीने एक व्हिडिओ टिक टॉक याप्रसिद्ध सोशल मिडिया साईटवर शेयर केला.

 

kavya-inmarathi
indianexpress.com

आपल्या गावात चालू असलेल्या उत्खननामुळे व खाणकामामुळे आपल्या गावाचं अस्तित्व धोक्यात असल्याची माहिती देणारा दीड मिनिटाचा हा व्हिडिओ आहे.

तिला त्याचा काही प्रत्यक्ष परिणाम दिसून येईल अशी तिळमात्र अपेक्षा नव्हती. परंतु झालं तिच्या कल्पनेच्या अगदीच उलट. तिचा तो व्हिडीओ प्रसारमाध्यमावर इतका व्हायरल झाला की तिच्या गावाच्या रक्षणासाठी एक जनांदोलन उभं राहील आहे.

इतकंच नाही तर त्या आंदोलनाची दखल घेत राष्ट्रीय हरित लवादाने घेतली असून ह्या प्रकरणी चौकशीसाठी समिती नेमली आहे.

केरळच्या कोल्लाम आणि अल्लापुझा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणवर खनिज संपत्तीचे साठे ६० च्या दशकात आढळून आले होते.

त्यानंतर त्याठिकाणी केंद्र सरकारच्या इंडिया रेअर अर्थ लिमिटेड आणि राज्य सरकारच्या केरळा मिनरल्स आणि मेटल्स लिमिटेड ह्या दोन संस्थांनी उत्खनन आणि खाणकाम करायला सुरुवात केली.

ह्या खाणकामातून त्यांना काळ्या मातीचे खूप मोठे साठे मिळाले ज्यातून त्यांना इलेमेनाईट, झिक्रोन, मोनाझाईट, रुटाईल ह्या खनिजांचे साठे मिळाले जे वेगवेगळ्या प्रकरे उपयुक्त ठरणार होते.

ह्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर खाणकाम सुरु होते. याचा गंभीर परिणाम त्या भागातील भौगोलिक रचनेवर होत होता.

कोल्लम जिल्हा हा प्रामुख्याने मच्छीमार लोकांचा जिल्हा तसेच ह्या भागात असलेल्या समुद्र व राष्ट्रीय जलमार्गामुळे हा भाग सर्व बाजूने पाण्याने व्यापलेला आहे. त्या भागातील जमीन सकल नसून स्खलनशील आहे.

खाणकामामुळे ह्या भागात मातीची धूप मोठ्या प्रमाणावर झाली आहे. तसेच जमिनीचा भाग जो सकल होता तो देखील नष्ट होऊन हा भाग पोकळ बनला आहे.

इतकंच नव्हे तर पाण्याच्या प्रवाहाच्या दिशा बदलल्याने थोड्या पावसात देखील हा भूभाग जलमग्न होण्याचा मार्गावर येऊन पोहचला आहे. यामुळे तेथील स्थानिक मच्छिमार जमातीचा निवास तसेच कार्यक्षेत्र धोक्यात आल आहे.

 

alappad-inmarathi
Fenglish.mathrubhumi.com

२००४ साली आलेल्या त्सुनामीनंतर ह्या भागात मोठा विध्वंस झाला होता. ह्या भागातील तब्बल १४३ लोकांनी आपला जीव त्या त्सुनामीमध्ये गमावला होता.

तेव्हापासून हा धोका लोक ओळखून होते आणि क्षीण आवाजात या खाणकामाविरोधात लढा देत होते. पण ह्या लढयाकडे मात्र समाजमाध्यमांचं व प्रसार माध्यमांचं लक्ष गेलं नव्हत.

काव्याने तयार केलेला व्हिडिओ ज्यात तिने आपल्या भागातील सत्य परिस्थिती मांडली तो प्रचंड व्हायरल झाला. तो व्हिडिओ केरळ मधल्या अनेक सेलिब्रेटींनी शेयर केला आणि यातून पुढे खाणकाम विरोधी जनांदोलन उभं राहू शकलं.

 

kavya-s-inmarathi
thebetterindia.com

काव्याने त्या व्हिडिओत म्हटलं आहे की खाणकामामुळे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या खाणकाम हे उत्तर भागात सुरु असलं तरी कधी त्यांच्या दरवाजावर येऊन पोहचेल याची तिला भीती वाटते आहे.

ह्या खाणकामामुळे उत्तरेतील भाग आणि तिथल्या पर्यावरणाच नुकसान झालं आहे, तो भाग कधीही पाण्याखाली जाऊ शकतो.

पण जर असंच सुरु राहीलं तर ते ह्या भागातही घडू शकतं, त्यामुळे इथे राहणाऱ्या मच्छिमारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

काव्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक पर्यावरणप्रेमी संस्थांनी या प्रकरणात लक्ष घातलं, एक संघटीत स्वरूप ह्या प्रयत्नांना प्राप्त झालं.

पुढे पृथ्वीराज सुकुमारन ह्या प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्याने तिचा तो व्हिडीओ शेयर केला. मग मल्याळम मिडीयाने हा मुद्दा उचलून यावर सरकारला जाब विचारायला सुरुवात केली.

ह्या आंदोलनाप्रती सहानभूती म्हणून अनेक लोकांनी ह्या आंदोलनाला पाठींबा दिला. शेवटी एका व्हिडिओमुळे एक गंभीर प्रश्न जनतेसमोर येऊ शकला.

आज ह्या आंदोलनाला बळकटी मिळून याचा मोठा प्रभाव सरकरी व्यवस्थेवर पडला आहे. ह्या आंदोलनाची दखल राष्ट्रीय हरीत लवादाने घेतली असून त्यांनी ह्या खाणकामाविरोधात कारवाई सुरु केली आहे.

हरीत लवादाकडून आदर्शकुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली असून, त्यांनी ह्या प्रकरणात जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे.

आज समाजमाध्यमाचा वापर करत एका साधारण मुलीने आपल्या दिर्घकाळ प्रलंबित व जीवन मरणाशी संबंधित अश्या समस्येला वाचा फोडली. मोठ्या प्रमाणावर पाठींबा मिळवत तिने आपल्या समाजात चालू असलेल्या जनंदोलनाला एक दिशा मिळवून दिली आहे.

 

Kavya.-inmarathi
manoramaonline.com

समाज माध्यमे चांगली का वाईट ह्या वादात न पडता त्यांचा विधायक वापर केल्यास प्रत्यक्षात एक सकारात्मक बदल घडवणे शक्य आहे असं वेळोवेळी दिसून आलं आहे.

टिक टॉक हे आधी तरुणांचा वेळ खर्च करणारे एक निरोपयोगी समाजमाध्यम आहे, असा आरोप वेळोवेळी केला जात होता. पण आज जेव्हा टिक टॉकच्या माध्यमातून समाज उपयोगी काम घडलं आहे तेव्हा त्याप्रती एक सकारात्मक दृष्टीकोन मिळू शकणार आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?