“…पण समलैंगिक संबंध अनैसर्गिकच!” : असं मत असणाऱ्यांसाठी, खास निसर्ग-ज्ञानाचा छोटासा धडा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


समलिंगी शब्द आला की पाल झटकावी तसे आपण हा शब्द झटकून देतो. यात काहीतरी पाप आहे किंवा किळसवाणे आहे अश्या भावना अनेकांच्या मनात येतात. अश्यातच कोर्टाने निर्णय दिलाय की ‘समलिंगी संबंध ठेवण्यात कोणताही गुन्हा नाही’ त्यावरून बराच धुरळा उडतोय.

कुणी या निर्णयावरून खुश आहे तर कुणी संस्कृती बुडाली म्हणून आकांडतांडव करत आहे. सध्यातरी आपल्याला या वादात न जाता एका महत्वाच्या मुद्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे.

समलैंगिकतेचा विरोध करणाऱ्या लोकांकडे एक युक्तिवाद हमखास असतो जो त्यांना ‘बिनतोड’ वाटतो. तो म्हणजे,

“हे संबंध नैसर्गिक नाहीत. मनुष्य सोडून इतर प्राण्यांमध्ये असे संबंध आढळून येत नाहीत याचा अर्थ समलैंगीकता ही एक विकृती आहे.”

वरवर पाहता हे विधान पटण्यासारखं आहे. पण ते खरोखर सत्य आहे का? निसर्गाने फक्त मानवांनाच ही प्रकृती प्रदान केली की इतरही प्राणी यात लाभदायी आहेत? चला तर मग याचा आढावा घेऊ या…

तर अनेक शास्त्रज्ञ, निरीक्षक आणि अभ्यासकांच्या बऱ्याच वर्षांच्या अभ्यासानुसार असे आढळून आले की, समलैंगीकता हा प्रकार मनुष्य सोडून इतर प्राण्यांमध्येही आहे. समलैंगीकता अगदी नैसर्गिक असून याला विकृती म्हणता येणार नाही.

 

 

lgbt-377-inmarathi
ksro.com

पीटर ब्लॉकमन या अभ्यासकाने स्पष्टपणे असे म्हंटले आहे की, ‘होय! प्राणी नैसर्गिक संबंध तसेच समलैंगिक संबंध त्यांना आवडेल त्याच्यासोबत, आवडेल त्या वेळी संबंध ठेवू शकतात. त्यांना तुमच्या नैतिक मान्यतांविषयी काही एक देणे घेणे नसते.’


समलैंगिक संबंध पक्ष्यात आणि सस्तन प्राण्यात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. एका अभ्यासात असे दिसून आले की जवळपास पाचशे प्रजाती असे संबंध ठेवतात.

एक नोंद घेण्याची बाब अशी की, यामध्ये सेक्स केला जाईलच हे गरजेचे नाही. संबंध एकमेकांशी जवळीक करूनही ठेवले जाऊ शकतात. असे संबंध ठेवण्यामागे त्यावेळी असणारी निरनिराळी परिस्थिती कारणीभूत असू शकते.

समलिंगी संबंध ठेवणाऱ्या प्राण्यांची काही उदाहरणे आपण पाहूया…

१. जिराफ :

जिराफांमध्ये विरुद्धलिंगी सेक्स पेक्षा समलिंगी सेक्स करण्यामध्ये जास्त भर दिला जातो. एवढंच नाही तर एका अभ्यासानुसार 90 टक्के सेक्स हा समलिंगी प्रकारचा असतो.

 

jiraf-inmarathi
dw.com

यामध्ये फोरप्लेची महत्वाची भूमिका असते ज्यात जिराफ एकमेकांच्या मानेला मान घासत असतात. ही क्रिया ते थोडा वेळ किंवा तासंतास करू शकतात.

२. बॉटलनेक डॉल्फिन :

 

mating-dolphins-inmarathi
india.com

नर आणि मादी दोघांच्याही मध्ये ही प्रवृत्ती आढळून येते. डॉल्फिन एकमेकांना नाकाच्या साहाय्याने उत्तेजित करतात. यांच्यामध्ये जितके विरुद्ध लिंगाचे आकर्षण असते तितकेच समलिंगाचे सुद्धा असते.

३. सिंह :

सिंहांमध्येही समलैंगीकता ही अगदी सहज साधारण वृत्ती मानली जाते. दोन किंवा चार सिंह एकत्र येऊन समूह बनवून सेक्स करण्याची कृती करतात.

 

lion-sex-inmarathi
youtube.com

याशिवाय समूहातील नर सिंहाचे एकमेकांशी चांगले संबंध असावे यासाठी सुद्धा हे केले जाते. याला अभ्यासकांनी ‘ब्रोेमान्स’ अशी संज्ञा दिली आहे.

४. जंगली बैल :

 

bull-inmarathi
Wikipedia.com

जंगली बैलांमध्ये समलैंगीकता जास्त प्रमाणात दिसते. कारण, मादी ही वर्षातून एकदाच सेक्स साठी तयार होते पण बैलांच्या इतर वेळीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिला रस नसतो. अश्या वेळी नर बैल समूह बनवून समलैंगीकतेचा आधार घेऊन स्वतःच्या इच्छा पूर्ण करतात.

५. सिंहपुच्छ वानर :

 

monkey-sex-inmarathi
yandex.ru

वानरांच्या या प्रजाती मध्ये नर आणि मादी दोघेही समलिंगी संबंध ठेऊन असतात. विशेष बाब अशी की, नर वानर हे फक्त रात्रीच संबंध ठेवण्यासाठी इच्छूक असतात तर मादी यासाठी इतक्या उत्सुक असतात की त्या दिवसरात्र एकमेकांच्या सहवासात रत झालेले आढळून येतात. काही टोळ्यांमध्ये तर मदींसाठी समलैंगीकता हा नियम बनवल्याचे दिसते. त्यामागे इतरांपासून संरक्षण व्हावे हा हेतू असू शकतो.

६. अल्बाट्रोस पक्षी :

 

sex-birds-inmarathi
faktor.hu

हवाई बेटांवर वास्तव्य करून असणारे अल्बाट्रोस पक्षी हे समलिंगी संबंधासाठी बरेच प्रसिद्ध आहेत. यांच्यामध्ये दोन नर किंवा दोन मादी जोड्या आढळून येणे सहज शक्य आहे. यांची समलैंगिकता तात्पुरती नसून ती आयुष्यभरासाठी दिसून येते.

लहान पिल्लांचा सांभाळ करताना नरांची जोडी दिसणे नवल नाही. आणि यांच्यात शक्यतो पिल्ले ही नर अल्बाट्रोस कडूनच सांभाळली जातात.

७. बबुन्स :

बबून्स या वानरांच्या प्रजातीला मानवाच्या सर्वात जवळची म्हणजेच मानवसदृश्य प्रजाती मानले जाते. इतर प्राण्यांमध्ये जसा समागमाचा हंगाम असतो तसा यांच्यात नसतो. सेक्स साठी सदैव तयार असलेले प्राणी म्हणून यांना ओळखले जाते.

 

baboons-sex-inmarathi
WordPress.com

असे म्हणतात की बबुन्स मध्ये समलैंगिक सेक्स हा एकमेकांशी संबंध चांगले राहावे म्हणून, कुणाची खुशामद करायची म्हणून अथवा ताण तणाव कमी करण्यासाठी केला जातो. एक तृतीयांश बबुन्स समलैंगीक असलेले आढळून आले आहे.

८. हंस पक्षी :

 

swann-inmarathi
BBC.com

आपल्या सर्वांना परिचित असणारे हंस पक्षी हे सुद्धा समलैंगिक स्वभाव दाखवतात. हंसाच्या पाच जोडयांपैकी एक समलिंगी असते.

यांच्यातील एक वेगळा स्वभावगुण म्हणजे सेक्स झाल्यावर नर हंस मादीला अंडी दिल्यानंतर त्या ठिकाणावरून पळवून लावतात आणि स्वतः त्या अंड्यांना ऊब देतात. त्यानंतर पिल्लांचा सांभाळ दोन नर हंसाचा जोडा करतो.

९. वॉलरस प्राणी :

वॉलरस हे थंड बर्फाळ पाण्यात राहणारे जीव आहेत. अगदी लहानपणापासून नर वॉलरस समलिंगी संबंध प्रस्थापित करतात.

 


walrus-sex-pics-inmarathi
india.com

जेव्हा ते प्रगल्भ होतात तेव्हा मात्र मादी वॉलरस सोबत संबंध ठेवतात. मात्र ते समागम काळाच्या हंगामापुरतेच असतात. बाकी वर्षभर नर एकत्र राहून जवळीक साधतात. इतकेच नव्हे तर झोपतानाही त्यांना दुसऱ्या नराची सोबत लागते.

१०. मेंढा :

आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे! यांचा अभ्यास असे सांगतो की जवळपास आठ टक्के नरांना मादी मध्ये स्वारस्य नसते.

 

sheep-inmarathi
pixabay.com

समागमाच्या हंगामात सुद्धा आजूबाजूला मादी असूनही यांचा ओढा नराकडेच असतो. खोलवर अभ्यास केला असता असे दिसून आले की, जे समलिंगी संबंधांसाठी उत्सुक असतात त्यांच्या मेंदूची रचना इतर मेंढ्यापेक्षा थोडी वेगळी असते आणि हार्मोन्स मध्ये ही बदल असतो.

या उदाहरणांशीवाय आणखी कित्येक जीव आहेत जे विरुद्धलिंगी संभोगापेक्षा समलिंगी संभोगात जास्त उत्सुक असतात.

यामध्ये मांजर, कुत्रा, हत्ती, घोडा, कोल्हा, अस्वल असे सस्तन प्राणी, घुबड, कोंबडा, शहामृग, टर्की असे पक्षी, सालमान, चार, ब्लुफिश, ग्रेल असे मासे, सरडा, साप इत्यादी सरपटणारे प्राणी, सलामांडर, बेडूक असे उभयचर आणि कित्येक कीटकांच्या प्रजाती सुद्धा सामील आहेत.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?