ब्रिटीशकालीन भारतात स्टेज गाजवणारी, भारताची पहिली विस्मृतीत गेलेली “पॉप स्टार”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

संगीत…. आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक, आणि आता तर प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन आल्याने एका क्लिकवर हवं ते गीत, संगीत उपलब्ध आहे. शास्त्रीय पासून ते अगदी पॉप जाझ सगळे प्रकार सर्रास आपल्याला उपलब्ध आहेत. आपला भारतीयांचा मूळ वारसा शास्त्रीय संगीताचा.

कैक नावाजलेली घराणी भारतात होऊन गेली ज्यांची ख्याती सातासमुद्रापार पोचली आहे.

पण तुम्हाला माहिती आहे का की, सातासामुद्रा पलीकडचा पॉप हा प्रकारही भारतात कैक वर्षांपूर्वीच आलेला आहे आणि जिने हा संगीत प्रकार भारतात रुजवला ती एक महिला होती, तिचं नाव होत गौहर जान.

आज पाहूया भारताच्या ह्या पहिल्या ‘पॉप’ स्टार “गौहर जान ची कथा.

 

gauhar-jaan-inmarathi
Scroll.in

गौहर जान यांचा जन्म १८७९ मध्ये आझमगढमध्ये झाला जे त्यावेळी युनायटेड प्रांतात होते. तिची आज्जी हिंदू होती आणि आजोबा ब्रिटीश, वडील एमेनियन ख्रिश्चन.

त्यांचे खरे नाव इलिन अँजेलीना इव्हॉर्ड. नंतर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि आयुष्यभर इस्लामच्या पाइक बनून राहिल्या.

त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताची ओळख होती. त्या जरी मुस्लीम असल्या तरीही त्यांच्या बहुतेक रचना कृष्णभक्तीवर आधारित आहेत आणि त्यात इतरही भक्तीगीतांचा समावेश आहे.

गौहर जान जेंव्हा सहा वर्षांच्या होत्या तेंव्हा त्यांचे आईवडील वेगळे झाले, त्यानंतर त्या आपल्या आईबरोबर बनारसला राहायला गेल्या.

तेव्हा त्यांची आई, व्हिक्टोरिया येवॉर्ड यांनी इस्लाम धर्म स्वीकारला, धर्मांतरण केले आणि ‘बडी मालका जान’ असे नाव घेतले. अशाप्रकारे लहानगी इलिन बनली गौहर जान. त्यांची आई’ बडी मालका जान लोकप्रिय कथक नृत्यांगना होती.

बनारससारख्या सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असणाऱ्या शहरामध्ये राहिल्यामुळे लहानग्या गौहर जानला नृत्य साहित्य आणि संगीत ह्या सगळ्यात निपुण होण्यास मदतच झाली.

 

modi-transform-inmarathi
ndtvkhabar.com

त्यानंतर ते कलकत्त्यात स्थायिक झाले, त्यांना नवाब वाजिद अली शाहच्या दरबारात आश्रय मिळाला. नवाब वाजिद अली शाह स्वत: उत्कृष्ट संगीतकार आणि गीतकार होते. गौहर जान वयाच्या १४ व्या वर्षी आपल्या पहिल्या संगीत मैफिलीत दरभंगा राज (बिहार) च्या शाही दरबारात गायल्या.

त्यांची पहिलीच अदाकारी इतकी उत्तम होती की त्यानंतर त्यांना वारंवार अशा शाही मैफिलींसाठी आमंत्रित केले जाऊ लागले आणि त्यांची लोकप्रियता वाढत गेली आणि त्यांना सगळे ‘गौहर जान कालकत्तावाली’ ह्या नावाने ओळखू लागले.

संगीत प्रवास

त्यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध संगीत प्रवासात अनेक भाषेत गाणी गायली आणि रेकॉर्ड केली. त्यात इंग्रजी, फ्रेंच आणि पश्तोसह १० पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांनी जवळपास ६०० गाणी रेकॉर्ड केली.

ह्याव्यतिरिक्त ठुमरी, दादरा, कजरी, होरी, तराना, रवींद्र संगीत आणि भजन ह्यातही त्या निपुण होत्या. त्यांची राग भैरवी वर आधारित प्रसिद्ध ठुमरी- ‘ रसके भरे तोरे नैन’ ही प्राचीन रचना खूप गाजली इतकी ती मंत्रमुग्ध करणारी होती.

 

gauhar-inmarathi
vishleshan.com

‘ग्रामोफोन गर्ल’

१९०२ साली, एका ब्रिटिश ग्रॅमोफोन कंपनीने सहा महिन्यांसाठी स्थानिक कलाकारांची गायकी रेकॉर्ड करण्याचा प्रयोग केला.

तेव्हा अमेरिकन साउंड इंजिनियर फ्रेड गयसबर्ग यांनी गौहर जान यांना ७८ आरपीएम डिस्क रेकॉर्ड करण्याची संधी दिली आणि अशा प्रकारे ती उपमहाद्वीपातील पहिली रेकॉर्डिंग करणारी गायिका ठरली. त्यामुळे त्यांना ‘द ग्रॅमोफोन गर्ल’ ही उपाधी दिली गेली.

त्याना ७८ आरपीएम डिस्कच्या रेकॉर्डिंगसाठी तासभराचा खयाल ३ मिनिटांत सादर करायचा होता. त्यासाठी त्यांनी एक अनोखी शैली शोधली आणि आपल्या पहिल्या रेकॉर्डिंगसाठी, राग जोगिया गाण्याचा निर्णय घेतला आणि सुंदर रीतीने फुलवला.

ह्याचा परिणाम म्हणजे गायन अगदी भावस्पर्शी झाले आणि संपूर्ण रेकॉर्डिंग उत्साहात पार पडले.

अशाप्रकारे पॉपचा जन्म झाला. त्याकाळी त्यांच्या प्रत्येक रेकॉर्डिंगच्या अंती वरच्या पट्टीच्या आवाजात “माझे नाव गौहर जान आहे!” अशी लकेर घेतलेली असे, त्यामुळे रेकॉर्डचा गायक कोण हे ओळखणे सोपे होई.

 

GauharJaan-inmarathi
india.com

ख्यालसंगीतची खोली आणि विस्तार लक्षात घेता असा तीन मिनिटांचा शॉर्टकट वापरून रेकॉर्डिंग केले गेले म्हणून तेव्हाच्या प्रस्थापित गायकांनी ह्यावर सडकून टीका केली, परंतु गौहर जान ह्यानी तिकडे मुळीच लक्ष दिले नाही.

सदरीकरण उत्तम व्हावे ह्यासाठी आपली वेगळी शैली निर्माण केली.

त्यानंतर प्रसिध्द सरोद वादक उस्ताद अमजद अली खान सहित इतर अनेक संगीतकारांनी ह्याचा स्वीकार केला. गौहर जान ह्यांनी ज्या प्रकारे सर्व रागांना एकत्र बांधून सादर केले त्या त्यांच्या खास शैलीचे कौतुक ‘मास्टर्स ऑन मास्टर्स’ ह्या त्यांच्या पुस्तकात वाचायला मिळते.

त्याकाळी भारतीय शास्त्रीय संगीतात ज्यांचे वर्चस्व होते अशा पुरुषांनी संगीत क्षेत्रात रेकॉर्डिंग करणे म्हणजे कलेच्या प्रांतात तांत्रिक हस्तक्षेप मानून रेकॉर्डिंगचा तिरस्कार केला, परंतु तवायफ आणि इतर दरबारी पुढे आले आणि त्यांनी ह्या तंत्राचा खुल्या दिलाने स्वीकार केला.

“माई नेम इज गौहर” या पुस्तकाचे लेखक विक्रम संपथ ह्यांच्या मते, यामुळे न केवळ संगीत सामान्य माणसांपर्यंत पोचण्याचा मार्ग खुला झाला शिवाय महिला कलाकारांची त्यांच्या शोषण करणार्या तथाकथित संरक्षकांच्या तावडीतून सुटका झाली.

 

gauhar-inmarathi
india.com

उच्चभ्रू जीवनशैली

त्यांचा उत्साही आणि धाडसी स्वभाव त्यांना तेव्हाच्या इतर लोकांपासून वेगळं ठरवत असे. त्या नेहमी भरजरी साड्या आणि भरपूर दागिने वापरत. अशा पेहरावात त्या अगदी राणीप्रमाणे भासत. त्यांचा रुबाबाच काही और होता.

एकदा त्यांच्या मांजरीला पिल्लं झाली म्हणून त्यांनी त्याकाळी तब्बल वीस हजार रुपये खर्चून एक जोरदार पार्टी केली त्याबद्दल त्यांच्यावर खूप टीकाही झाली.

पण त्यांच्यावर ह्या टीकेचा काहीही परिणाम झाला नाही उलट त्यांच्या प्रसिद्धीला हातभारच लागला. त्याकाळी घोडागाडी चालवण्यावर कलकत्त्यात बंदी होती. तरीही गौहर जान ह्यांनी सरकारी नियमांकडे दुर्लक्ष केले आणि चार घोडे जुंपलेल्या बग्गीत बसून प्रवास केला.

त्यासाठी त्यांना व्हायसरायला दररोज १००० रुपये दंड भरावा लागला. त्या नेहमी त्यांच्या अटींवर त्यांच्या मनाप्रमाणे आयुष्य जगल्या.

त्याकाळी त्या एका रेकॉर्डिंगमागे सुमारे तीन ते चार हजार घेत असत. त्यांचे राहणीमान आणि आयुष्य असे होते की असे जगणे इतर स्त्रियांसाठी केवळ स्वप्नातच शक्य होते.

 

gauhar-jan-inmarathi
livelondonpost.com

दुर्दैवी मृत्यू

गौहर जानची उच्च राहणी आणि आणि महागडी जीवनशैली नंतर मात्र कमी होत गेली कारण, त्यांचे सेक्रेटरी अब्बास ह्यांच्याशी त्यांचा चाललेला कायदेशीर लढा.

अब्बास ह्यांनी फक्त आणि फक्त संपत्तीसाठी गौहरजान ह्यांच्याशी लग्न केले होते. ही कायदेशीर कारवाई बराच काळ चालली आणि त्यातच त्यांची संपूर्ण संपत्ती खर्च झाली. दरम्यान त्यांना लैंगिक छळाचाही सामना करावा लागला.

म्हैसूरला असताना, त्यांना शेवटचे आमंत्रण आले. राजा नालवाडी कृष्णराज वोडेयार यांनी राजकीय अतिथी आणि दरबारी संगीतकार म्हणून त्यांना आमंत्रित केले होते.

त्यानंतर त्यांची जीवनेच्छाच जणू संपली आणि १९३० मध्ये त्यांनी ह्या जगात आपला अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या जवळ कोणीही नव्हते हे मोठेच दुर्भाग्य.

आज त्या भूतकाळात हरवलेल्या आणि विसरलेल्या कलाकारांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. गेल्या काही वर्षांत विक्रम संपथ, मृणाल पांडे, चैतली रॉयसारख्या काही विद्वानांनी त्यांची विस्मृतीत गेलेला वारसा पुनरुज्जीवित करण्याचा विडा उचलला आहे पण अजूनही त्यातला बराचसा भाग दुर्लक्षित आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “ब्रिटीशकालीन भारतात स्टेज गाजवणारी, भारताची पहिली विस्मृतीत गेलेली “पॉप स्टार”

  • January 26, 2019 at 9:47 pm
    Permalink

    फारच छान माहिती

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?