आठ वर्षांच्या या चिमुरडीला चक्क कावळे देतायत छान छान ‘रिटर्न गिफ्ट्स’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपल्यापैकी प्रत्येकालाच काही ना काही छंद असतो ज्यात आपण तासनतास रमतो. कोणी तिकीटं गोळा करतो, कुणी बाटल्यांची झाकणं, तर कुणी रंगीत दगड. तासनतास खपून गोळा झालेला हा ऐवज म्हणजे आपल्यासाठी खजिन्यापेक्षा कमी नसतो.

अगदी प्राणाहून प्रिय असतो हा खजिना, त्याच्याकडे बघताना आपल्या डोळ्यात आलेली चमक आणि ओठांवरच्या हास्याला कशाचीही सर नसते.

आज बघूया अशाच एका खजिन्याची गोष्ट. पण इथे कहानीमे twist है. इथे काहीही गोळा करण्याचा छंद नाहीये, तर छंद जोपासल्याचं रिटर्न गिफ्ट म्हणून खजिना गोळा झाला आहे. आलं का लक्षात ? नाही ? तर बघूया काय आहे खरं हे गिफ्ट प्रकरण.

ही गोष्ट आहे आठ वर्षांच्या चिमुरडीची. तिचं नाव आहे गॅबी. आपण बरेचदा आपल्या अंगणात लहानग्या पक्षी मित्रांसाठी खाऊ आणि पाणी वगैरे ठेवतो, आधी कोणी तिकडे फिरकत नाही पण काही दिवसांनी मात्र तिथे मस्त पैकी प्राण्यांची सभा भरायला लागते, मागे काहीही शिल्लक राहत नाही.

 

crow-inmarathi
bbc.com

आता हा भाग वेगळा की काही जणांना ही सभा एन्जॉय करण्याच भाग्य लाभतं तर काहींना नुसतीच घाण करून ठेवलेलीे बघायला मिळते. आपली गॅबी ह्यातल्या नशीबवान मंडळीत मोडणारी आहे.

वाशिंग्टनच्या सिएटल शहरात राहणारी ही गॅबी आपल्या बागेत दररोज कावळ्यांसाठी खाऊ ठेवतेय.

गेली चार वर्षे सतत तिचा हा उपक्रम सुरु आहे आणि ह्याची पोचपावती द्यायची म्हणूनच की काय तिचे मित्र बनलेले हे कावळे तिच्या अंगणात तिच्यासाठी सतत काही न काही वस्तू आणून टाकत असतात.

गॅबी ह्या भेटवस्तू अगदी आनंदाने स्वीकारते. ती ह्या मिळालेल्या भेटवस्तू नीट पिशवीत भरून ठेवते आणी त्यावर नीट नावंही घालते. ही गिफ्ट्स साठवायला तिच्याकडे एक खास डबा आहे ज्यात ती सगळ्या वस्तू सुरक्षित ठेवते आणि का नाही ठेवणार हा डबा म्हणजे एखाद्या खाजीन्यापेक्षा कमी नाहीये गॅबीसाठी.

ती जेव्हा त्या पिशव्यांवर नावं घालते तेव्हा त्यात इतर माहिती सुद्धा तपशीलवार लिहिते. जसे की एका तुटलेल्या लाईट बल्ब वर लिहिले आहे की,“फिडर मधून मिळाले, 2:30वाजता 09 नोव्हें 2014.”

तिला आजवर लेगोचे तुकडे, मणी, बटणे,  पेपर क्लिप आणि फोमच्या तुकड्यांसह जवळ जवळ सर्वच प्रकारची अनेक गिफ्ट्स मिळालेली आहेत.

त्यातला मोतिया रंगाचा हृदयाचा आकार हे तिचे अत्यंत आवडते गिफ्ट आहे, तिला वाटतं ह्यातून त्यांना दाखवायचे आहे की, त्यांचे तिच्यावर खूप प्रेम आहे.

 

gabby-inmarathi
bbc.com

तिची कावळ्यांना खायला घालण्याची सुरुवात अपघातानेच झाली, एकदा ती लोळत पडलेली असताना एका कावळ्याच्या तोंडातून तिच्या मांडीवर एक चिकनचा तुकडा पडला तिने हे पहिले आणि ठरवले की, इथून पुढे कावळ्यांना आपण खाऊ द्यायचा.

तिने तिच्या भावाला सोबत घेऊन बस स्टॉपवरून घरी येण्याच्या रस्त्यावरअन्न टाकायला सुरुवात केली, ही गॅबी कोण आहे हे ओळखायला कावळ्यांना मुळीच वेळ लागला नाही, लवकरच ते तिला ओळखायला लागले.

कावळे दररोज गॅबी ची वाट पाहत थांबून असायचे. कावळे गॅबी आणि तिच्या भावाचा अर्धाधिक डबा संपवून टाकत आणि ह्याबद्दल त्यांच्या आईची म्हणजे लिसाची जराही तक्रार नव्हती.

उलट लिसाला ते आवडायचे, ती म्हणायची की मुलांना त्यांचा खाऊ कावळ्यांना वाटावासा वाटतो हे चांगले आहे, त्यांचे प्राण्यांवर प्रेम आहे हे जास्त महत्वाचे आहे.

हळू हळू बदल घडत गेला आणि नंतर गॅबीचे संपूर्ण कुटुंबच कावळ्यांमध्ये रुची घेऊ लागले. २०१३ पर्यंत कावळ्यांना खायला घालणे हा गॅबी आणि तिच्या आईच्या दिनचर्येचा महत्वाचा भाग बनला होता.

आता ही जोडगोळी आपली सकाळ कावळ्यांना खायला घालण्यात घालवत असत, कधी शेंगा, कधी शेंगदाणे तर कधी डॉग फूड. त्या दोघी बसल्या की कावळे त्यांच्या भोवती गोळा होऊन मोठ्मोठ्याने ओरडायचे. ह्याच रुटीन मधून पुढे गिफ्ट मिळायची सुरुवात झाली.

 

queen-of-crows-inmarathi
Konbini.com

कावळे सगळं अन्न खाऊन टाकत आणि त्याबदल्यात आपल्या फीडर मध्ये, पोलिश केलेला दगड किंवा एखाद कानातलं ठेवून जात. थोडक्यात सांगायचं तर चकाकणारी आणि कावळ्याच्या तोंडात मावेल एवढी प्रत्येक वस्तू त्यांच्या फीडरमध्ये गॅबिला सापडत असत.

त्यातल्या काही काही वस्तू तर फारच अविश्वसनीय होत्या जसे की “ best” लिहिलेला पत्र्याचा एक तुकडा. तेव्हा तर गॅबिला आणखीनच गंमत वाटली जेव्हा दुसऱ्या कावळ्याने त्याचाच एक मॅचींग भाग आणला, ज्यावर“फ्रेंड” लिहिले होते.

ह्या भेटवस्तू देण्याच्या प्रकाराबद्दल सांगताना वॉशिंग्टन विद्यापीठातील वन्यजीवन विज्ञानाचे प्राध्यापक जॉन मार्झ्लफ म्हणतात , “जर तुम्हालाही असे कौतुकाने गिफ्ट देणारे छोटे मित्र हवे असती तर तुम्हीही त्यांना त्याबदल्यात बक्षीस देण्यसाठी नेहमी तयार रहा.

 मार्झ्लाफ ह्यांनी कावळ्यांचा प्रचंड अभ्यास केलेला आहे. ह्यात त्यांना असे आढळून आले की माणूस आणि कावळे ह्यांच्यात अर्थपूर्ण संबंध आहे.

कावळे गिफ्ट्स देतीलच ह्याची खात्री नाही स्वतः मार्झ्लाफ ह्यानाही कधी कावळ्यांनी गिफ्ट दिलेले नाही पण त्यांनी इतरांना अशा वस्तूकावळ्यांकडून मिळताना पहिले आहे.

ते नेहमी चकाकणाऱ्या वस्तूच आणतात असे नाही कधी कधी ह्या वस्तू फार विचित्रही असतात. काहीना कावळ्यांनी मेलेली पिल्लही भेट म्हणून दिली आहेत.

 

crows-inmarathi
youtube.com

गॅबीला असल्या विचित्र वस्तू नाही मिळालेल्या पण एकदा तिच्या आईसाठी एक कावळा, खेकड्याचा तुटलेला हात टाकून गेला होता.

गॅबिला आवडलेलं तिसरं गिफ्ट म्हणजे एक स्क्रू, ती त्याला इतकं जपते की हातही लावत नाही तिचं मत आहे की कावळे कधीही स्क्रू उचलुन आणत नाहीत, पण तरी त्यांनी तो तिला आणून दिलाय, कदाचित त्याला घर बांधायचं असेल.

ह्या सर्वांपेक्षा अत्यंत आवडते गिफ्ट म्हणजे तिचा कॅमेरा लेन्स कॅप, जो तिच्याकडून गरुडांचा फोटो काढताना जवळच्याच परिसरात हरवला होता आणि आता ती ते शोधायला जाणारच तेवढ्यात तिला तो कॅप पक्ष्यांच्या अंघोळीच्या भांड्याच्या काठावर सापडला.

तो पक्ष्यानेच आणलाय की नाही ह्याची खात्री करण्यासाठी लिसाने आपल्या कंप्युटरमधून बर्ड कॅम मध्ये लॉगीन केले आणि त्यात तिला दिसले की तो लेन्स कॅप पक्ष्यानेच तिथे आणून टाकला होता आणि तो पक्ष्यांच्या अंघोळीच्या पाण्यात टाकून त्याला धुवत होता.

तर ही होती गॅबी च्या आगळ्या वेगळ्या छंदाची कहाणी ज्यामुळे तिला असंख्य मित्र मिळाले जे तिच्यावर भरभरून प्रेम करतात आणि तिला गिफ्ट देऊन तिचे कौतुक करतात, निखळ आनंद मिळवण्यासाठी असा एखादा छंद जोपासायला काय हरकत आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?