' मुलगी झाल्यास वडिलांना चहा, नाश्ता आणि सलून फुकट – महाराष्ट्रातील उपक्रम! – InMarathi

मुलगी झाल्यास वडिलांना चहा, नाश्ता आणि सलून फुकट – महाराष्ट्रातील उपक्रम!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

स्त्रीभ्रूण हत्या ही आपल्या संपूर्ण देशाला भेडसावणारी सर्वात मोठी समस्या आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. त्यातल्या त्यात देशातील काही राज्यांमध्ये तर स्त्रीभ्रूण हत्येचा दर इतका जास्त आहे की नक्की आपण २१ व्या शतकातचं वावरतोय न याचा पुन्हा एकदा विचार करावं लागेल. आणि या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा देखील क्रमांक आहे म्हटलं. जग कुठे चाललोय आणि आपण अजूनही मुलगी म्हणजे ‘नकुशी’ याच भ्रमात जगतोय. सरकारने स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांच्यावर आळा घालण्यासाठी अनेक कठोर कायदे केले तसेच मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून अनेक उपक्रमांची देखील घोषणा केली. पण त्याचा म्हणावा तितका प्रभाव पडला नाही आणि पुढेही होणार नाही म्हणा कारण जोवर स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी समाजप्रबोधन होणार नाही तोवर ही समस्या दिवसेंदिवस वाढीस लागणार. या समाजप्रबोधनासाठी समाजातील प्रत्येक माणसाने पुढे येऊन आपले योगदान देणे आवश्यक आहे आणि याच स्वरुपाची एक कौतुकास्पद कृती केली आहे अशोक पवार आणि भागवत थोरात नावाच्या दोन मराठमोळ्या माणसांनी !

bhrun-hatya-marathipizza00

स्रोत

बीड जिल्ह्यातील कुंबेफळ गावमध्ये राहणाऱ्या अशोक पवार यांना स्त्रीभ्रूण हत्येची भारी चीड! मुलींचा जन्मदर वाढवा म्हणून काहीतरी पाउल उचलेले पाहिजे या विचाराने त्यांनी मुलीच्या जन्मानंतर तब्बल सहा महिने तिच्या वडीलाची दाढी आणि कटिंग विनामूल्य करून त्या मुलीचे जावळही मोफत काढून देण्याची घोषणा केली आणि गावामध्ये हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे.

याच गावच्या भागवत थोरात या हॉटेल चालकाने देखील मुलीचा जन्मदर वाढावा या हेतूने आपल्या हॉटेलवर ‘बेटी बचाओ’चा फलक लावून ज्याच्या घरी मुलगी जन्माला येईल त्यांच्यासाठी चहा-नाश्ता सहा महिने मोफत देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. एवढेच नाही तर गावातल्या मुलींच्या पहिल्या वाढदिवसाचा सगळा खर्च ते करणार आहेत.

bhrun-hatya-marathipizza01

स्रोत

बीड जिल्ह्याच्या कुंबेफळचा जन्मदर मागील जनगणनेनुसार खूप कमी होता. मात्र गेल्या वर्षीपासून गावातील मुलींच्या जन्मदरात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. यातच अशोक पवार आणि भागवत थोरात यांच्या उपक्रमाची चर्चा गावभर चालू आहे. ग्रामस्थ आणि पालक या दोघांच्या उपक्रमाचं तोंडभरून कौतुक करत आहेत.

बीड जिल्ह्याला लागलेला स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसावा आणि मुलींच्या जन्माचं स्वागत व्हावं या उद्देशाने या दोन व्यक्ती पुढे आल्या आहेत. त्यांच्या लहानग्या व्यवसायात थोडं आर्थिक नुकसान जरी होत असलं तरी मुलीच्या जन्माने त्यांना समाधान मिळत आहे.

मुलीच्या जन्माचा सोहळा साजरा करण्याची आगळीवेगळी समाजसेवी शक्कल समाजातील इतर घटकांना देखील स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून आपले योगदान देण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?