परीक्षेत उत्तम मार्क्स मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा खालावलेला स्तर, हा दोष कुणाचा?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखिका : नीलिमा देशपांडे 

===

ज्ञानं परमं ध्येयम

शिक्षण हा माणसाचा मुलभूत अधिकार आहे.अधिकार कसला तो त्याचा जन्मजात गुण आहे असे म्हणायला हवे. कारण,शिकतो तो टिकतो.आणि टिकण्यासाठी शिकणे पूर्वापार चालत आले आहे.

जन्माला आल्यापासून सुरु होणारी ही प्रक्रिया मरेपर्यंत सुरूच असते.

साध्या साध्या आपण गोष्टी निरीक्षणातून शिकत असतो,हळूहळू अनुभवसंपन्न होताना,त्यात त्याच्या स्वत:च्या विचाराची त्यात भर पडत राहते आणि त्यातून तो स्वत:चे आडाखे बांधायला शिकतो.यातूनच वेगवेगळे शोध- संशोधन,प्रगती होत राहते.

 

indian school 1 inmarath
Theirworld

हा विषय डोक्यात येण्याचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांना मागच्या पंधराएक वर्षात मुलांना पडणारे मार्क्स आणि त्यामानाने मार्केटमध्ये तितके हुशार एम्प्लॉयी उपलब्ध न होणे. ही सांगड न जुळणारी आहे.

एकतर दहावी आणि बारावीला अवास्तव महत्त्व देऊन(पालक आणि संस्था आणि शैक्षणिक पद्धती) मुलांमध्ये इतर वर्गाबद्दल,अभ्यासबद्दल एक सामान्य भावना निर्माण केली.दहावीला चांगले मार्क्स मिळाले म्हणजे झालं, या मानसिकतेने नववीपर्यंत मूलं गाफील राहायला लागली.

दहावी ही एक ते नऊच्या पायावर उभी आहे याचा विचारच केला गेला नाही. पाठांतर नव्हे घोकंपट्टी केली की आपोआप मार्कांची रेसिपी जमून येते हा मंत्र कुणी दिला आणि तो कधी,कसा पसरला समजलेच नाही.

शिक्षण संस्था आणि खाजगी क्लासवाले यांच्यासाठी त्यांच्या मुलांना मिळणारे मार्क्स महत्त्वाचे होते कारण त्यावर त्यांची जाहिरात आणि पर्यायाने धंदा अवलंबून होता/आहे.

मग त्या मुलाला विषयातले नक्की किती समजले आहे किंवा त्याला समजलेल्या ज्ञानाचा वापर कसा करायचा हे त्याला कळले आहे का,एवढा विचार करायला वेळ कुणाकडे आहे? सगळ्यांना फक्त धावायचे आहे आणि पुढे जायचे आहे.

पुढे कुठे ,का ,नक्की किती काळ धावायचे असल्या गोष्टींचा विचार कोण करत बसणार? धावायचे म्हणजे शेजारच्या दोघांपेक्षा पुढे – इतकेच !!! दुर्दैवी असले तरी सत्य आहे.

आमच्या मुलांना चांगले मार्क्स मिळाले की त्यांना चांगल्या कॉलेज/युनिव्हार्सिटीमध्ये प्रवेश मिळेल आणि एकदा तिथे प्रवेश मिळाला की नोकरी मिळणारच मग लाईफ सेट, या विचारांचे पालक भेटतात तेव्हा मात्र हतबल वाटू लागते.

 

indian school 2 inmarathi
NDTV.com

नामांकित शाळेत जाणा-याला saint/sent चा फरक कळत नाही.काळाची तर ऐशीतैशी आणि हा विद्यार्थी इयत्ता आठवीतला आहे.अर्धवट मराठी आणि धेडगुजरी इंग्लिश ; लिहायचे जाऊ दे ,बोलताही येत नाही.

“सर म्हणाला” –
अरे बाळा, सर आहेत ते – “म्हणाले” असं म्हणावं.

समीकरण संतुलित करायला (equation balance) शिकवल्यावर आणि त्यानंतर तीन वेळा समजून सांगितल्यावरही न येणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकांनी चिडून – “काय रे नववीला किती मार्क्स होते विज्ञानात ??” असे विचारता त्याचे उत्तर – “नव्याण्णव” असे असेल तर हसावे की रडावे ??

मूळ मुद्दा मुलांमध्ये अभ्यासाची गोडी किंवा आवड निर्माण होण्याऐवजी तीव्र तिरस्कार किंवा कंटाळा का रुजला आहे?

“तुला हे येत नाही??” चे उत्तर – “वर्गात कुणालाच येत नाही” –
या मानसिकतेला काय करायचे? कुठून आला हा विचार – rat race आणखी काय ?!

हुशार विद्यार्थी हवेत ? मग सोपा उपाय म्हणजे शैक्षणिक पद्धत बदला, शाळेच्या हातात मार्क्स ठेवा, वाटून टाका मार्क्स ,जमतील तेवढी जास्त मुले पास करा,जमतील तेवढी उत्तर घोटून घ्या.

पण यातून निर्माण होतेय सूज  ही वजनातली वाढ नाही,ना ही हे बाळस आहे.ही सूज पुढे तुमची हानी करणार एवढ नक्की.
मार्कांची खैरात पाहता हल्ली नापास होणे अवघड झाले आहे की काय असे वाटायला लागले आहे.

आता मिळणारे मार्क्स हा आनंदाचा भाग असेलही, पण ही मुले डिग्रीपर्यंत पार ढेपाळून जातात. बालवाडी किंवा नर्सरीपासून तू कुणीतरी वेगळा आहेस असा फील, विनाकारण दिलेला फील डिग्रीपर्यंत गळून पडतो.यात नैराश्य येण्यापर्यंत मजल जाते,साहजिक आहे.

दुर्दैवाने,याचे बळी पुन्हा रुळावर येणे अवघड असते.

टाय,कोट,बूट- आपल्या हवामानाला अजिबात सूट न होणारा पोशाख आणि तितकाच विचित्र अभ्यासक्रम मार्क्सवादी !?

यामुळे,आपण पदरचे-कष्टाचे पैसे देऊन आपल्याच प्रिय मुलांचे नुकसान तर करत नाही ना ?? याचा एकदा विचार व्हायला हवा.

सरतेशेवटी डिग्री हातात घेवून बाहेर पडलेल्या मुलाकडे स्कीलसेट नसल्यामुळे नोकरी मिळणे किंवा टिकणे शक्य होत नाही. स्कीलसेट मिळवायचा तर त्यावर एकसलग कष्ट हवे.

indian school 3 inmarathi
Ardoch

इथे आम्हाला लहानपणापासून सगळे काही यायला हवे;यावर भर असतो.म्हणजे बघा ह्याला पोहायला येत,कराटे येत,संध्याकाळी स्केटिंगला जातो.शिवाय चित्रकला आणि गिटारचा क्लास लावणार आहे आता.

हल्ली तर लेखन कसे करायचे (याला क्रिएटीव्ह रायटिंग म्हणायचं) याचे पण क्लास असतात. नशीब कविता कशा करायच्या याचे क्लास अजून नाही आले बाजारात.एक ना धड भाराभर चिंध्या!

वाचन – इतिहासाचा अभ्यास,समजून घेतलेला भूगोल,दैनंदिन आयुष्यातले गणित-विज्ञान-भाषा,उमजून घेलेलेले नागरिक शास्त्र आणि आचरणात आणलेले पर्यावरणप्रेम हे अधिक महत्त्वाचे आहे.

वाईट असे हे, तथाकथित नव्वद टक्केच्या पुढच्या मुलांना आपला विचार – अभ्यासाशी संबंधित किंवा इतर विषयाशी निगडीत – शुध्द आणि स्पष्ट शब्दात मांडता येत नाही. व्यवहारज्ञान मी नव्वद टक्क्यात गणतचं नाहीच. तो विषय वेगळा आहे आणि चिंताजनकसुद्धा!

इथे शिक्षण पद्धतीला नावे ठेवण्याचा एककलमी कार्यक्रम नसून , पालकांनी जागे होण्याची अपेक्षा आहे.

आपण आपल्या मुलांसाठी सध्या देत असलेला वेळ आणि पैसा यांच प्रमाण थोडे व्यस्त करा. अर्थात,पालक म्हणून सगळे सुज्ञ असतात किंवा आहेत हे यामागे गृहीतक आहे. बरेच,पालक लाख-दोन लाख रुपये भरून जादूची अपेक्षा ठेवतात,त्यांच्याकडून पालकत्वाची कसली अपेक्षा करणार?

indian school 5 inmarathi
tentaran.com

सध्या चांगले विद्यार्थी घडण्यासाठी चांगले शिक्षक घडवणे महत्त्वाचे झाले आहे तसेच काही अंशी पालकही. पालक म्हणून जगताना, आपण रेसचे घोडे पोसत नाही ,याचे भान बाळगायला हवे.

कटू वाटेल,पण एकदा आपल्या अंतरंगात डोकावून पाहायला हरकत नाही.आपली मुले आपले प्रतिबिंब असतात,त्यांच्यावर अवाच्या सव्वा अपेक्षा लादून त्यांचे नुकसान होईल असे वागू नका. आडात असेल तर पोह-यात येणार!

यापेक्षा, त्यांच्यातील कलागुण ओळखून त्याला वाव द्या. सगळ्यांनी इंजिनियर डॉक्टर व्हायला हवे असे नाही. मी स्वतः – कितीतरी मद्दड इंजिनियर,डॉक्टर पहिले आहेत.

indian school 6 inmarath
Shutterstock

ज्यांना आपल्या क्षेत्रापलीकडे काही कळत नाही.आपल्या क्षेत्रातले त्यांना कळते असे म्हणताना मी फक्त त्यांची कमाई लक्षात घेतली आहे.बँकेची स्लीप भरता न येणारे आणि किचन ट्रोलीचे चाक निखळले तर ते बसवता न येणारे शिक्षण काय कामाचे?

अर्थात,यावर मी एकट्याने काय करायचे,आणि त्याचा उपयोग तरी काय ? हा प्रश्न साहजिकपणे मनात येतो.

मला वाटते- समाजाची चिंता किंवा काळजी आपण करायची गरज नाही. आपण प्रत्येकाने आपल्यापुरता प्रश्न सोडवला तरी आपोआप बदल दिसून येईल.

दुसरे म्हणजे शिक्षण हा साचा नाही, विशिष्ठ औषधाने सगळ्यांना बरे वाटणार आहे असा.हे प्रत्येकाच्या प्रकृतीवर आहे.शाळा,कॉलेज,क्लास हा एक साचा आवश्यक आहेच कारण तो पायाभूत आहे.पण, त्यानंतरची घडणावळ ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे,जी पैसे भरून टाळता येणारी नाही.

indian school 7 inmarathi
Happy Kids International Kindergarten

मध्यंतरी एक वाचलेला विचार आठवला , वयाच्या सहाव्या महिन्यापासून मुलांना शाळेत घालायला सुरु केले आणि चालण्याचे ट्रेनिंग पण शाळेतच मिळू लागले तर एका पिढीत आपले लोक, आपल्याला न शिकवता,आपापलं चालायला येऊ शकत, हे विसरून जातील.

अतिशय मार्मिक टिप्पणी करणारा हा विचार शैक्षणिक क्षेत्रात सगळीकडे लागू होतोय- विचार करा.

मराठी माध्यम की इंग्रजी, SSC/CBSC/IB/ICSE हे प्रश्न माझ्यामते गौण आहेत. कोणतेही माध्यम किंवा बोर्ड तुमच्या मुलाची प्रगती करू शकत नाही.त्यासाठी,त्या मुलाचे आकलन आणि अभ्यासाची इच्छा महत्त्वाची ठरते. UPSC/MPSC साठी ssc पेक्षा इतर बोर्डज चांगली असे अजिबात नाही.

मुळात एखादी गोष्ट शिकायची कशी,समजून कशी घ्यायची आणि आकलनानंतर त्याचा वापर कसा करायचा हे कळले महत्त्वाचे आहे.
शिवाय, मराठीतून लवकर कळते (मातृभाषेतून) हे बरोबर असले तरी, इंग्रजी माध्यमांमुळे नुकसान होते असे नाही.बरेचदा,पालक त्यांना इंग्रजीचे खाद्य द्यायला कमी पडतात.

दहावीला इंग्रजी माध्यमातून आलेल्या किती मुलांनी शेक्सपियर, जेन ऑस्टिन किंवा चार्ल्स डिकन्स वाचलेला असतो ? तसेच, मराठी दहावी झालेल्या किती जणांनी पु लं किंवा जी ए किंवा निरंजन घाटे वाचलेले असतात??

मुद्दा ज्ञानाचा आहे भाषेचा नाही.

indian school 8 inmarathi
India, Madhya Pradesh, Bhopal, boy studying at school

थोडक्यात इतकेच की मुलांना जगू द्या, शाळा ,क्लास,एक्स्ट्रा क्लास, सर्वगुणसंपन्न बनवायच्या (हाच शब्द बरोबर आहे) नादात त्याचे शिकणे राहून जाणार नाही याची काळजी घ्या तो शिकेल तर तो जगेल आणि ते जगणे म्हणजे एक आनंदयात्रा असू देत.

जीवनातील सगळ्या गोष्टींचा आनंद त्याला घेता आला पाहिजे. घाण्याच्या बैलासारखा आपण त्याला शिक्षण पद्धतीत जुंपला तर जन्मभर त्याला घाण्याचा बैल म्हणून जगावे लागेल आणि यात दोष कुणाचा ???

भर्तृहरीनी आपल्या नीतीशतकात जे लिहिले आहे ते याबाबतीत अगदी योग्य ठरते.

साहित्यसङ्गीतकलाविहीनः
साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः ।

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?