या शहरात तब्बल २८ वर्षानंतर मुलाचा जन्म झाला!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखाचं शीर्षक वाचून बरेच जण बुचकळ्यात पडले असतील. तुमचं देखील बरोबर आहे, कारण २८ वर्षे एखाद्या ठिकाणी मुलं जन्मलच नाही या गोष्टीवर विश्वास बसणे कठीण! अहो पण विश्वास ठेवा ही गोष्ट खरी आहे आणि तुम्ही हे नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेतलंच पाहिजे.
ओसटाना हे उत्तर इटलीमधील एक छोटंसं शहर. या शहरातील तुरिन हॉस्पिटलमध्ये एक मूल जन्माला आलं आणि जणू चमत्कारचं झाला, कारण या शहरासाठी ही साधी घटना नव्हती. इथे तब्बल २८ वर्षांनी म्हणजे १९८७ सालानंतर पहिल्यांदाच मूल जन्माला आलं आहे.

ostana-italy-marathipizza01
wikimedia.org

पाब्लो असं या मुलाचं नाव आहे. याच्या जन्मानंतर अख्ख्या ओसटाना शहरात जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. एखाद्या सण-उत्सवासारखं या मुलाचा जन्म साजरा केला गेला. शहराच्या प्रवेशद्वारावर करकोचा पक्षाची प्रतिकृती तयार करुन लावण्यात आली होती. पाईडमांटच्या डोंगररांगांमध्ये ओसटाना शहर वसलं आहे. या शहराचे महापौर गियाकॉमा लॉमबारडोही पाब्लोच्या जन्मानंतर प्रचंड आनंदी झाले होते. डोंगररांगांमधील या छोट्याशा शहरात या मुलाचा जन्म म्हणजे एखाद्या स्वप्नासारखं आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या.

गेल्या शतकभरापासून ओसटाना शहराची लोकसंख्या कमालीची घटत चालली आहे. पाब्लोच्या जन्मानंतर या शहराची संख्या ८५ वर पोहोचली आहे. या लोकसंख्येतीलही अर्धीच लोकसंख्या कायमस्वरुपी ओसटानामध्ये राहते.

ostana-italy-marathipizza02
babycenter.com

१९ व्या शतकच्या सुरुवातीला ओसटाना शहर एकूण एक हजार लोकसंख्येची वस्ती होती. दुसऱ्या महायुद्धानंतर ओसटानामधील जन्मदर कमी होत गेला. १९७५ नतंर ओसटानातील जन्मदर कमालीचा कमी झाला. १९७६ ते १९८७ या वर्षांदरम्यान १७ मुलांचा जन्म झाला. त्यानंतर तब्बल २८ वर्षांनी म्हणजे २०१६ साली पाब्लोचा जन्म झाला आहे.

लोकसंख्येशी लढण्यासाठी ओसटानाने नव-नव्या योजना आणल्या. मात्र, त्यांचा फारसा परिणाम झालेला दिसला नाही. पाब्लो ज्यांच्या घरी जन्माला आला, तेही पाच वर्षांपूर्वी परदेशात जाण्याच्या विचारात होते. मात्र, जवळच्या डोंगरांमध्ये राहण्याची सुविधा मिळाली आणि ते तिथेच थांबले. द नेशनल यूनियन ऑफ माऊंटेन टॉउन्स अँड कॉम्युनिटिजचे मारको बसॉने यांनी सांगितले,

पाब्लो ज्यांच्या घरात जन्माला आला, त्या घराचं भविष्य उज्ज्वल आहे. त्याचा जन्म हे याच गोष्टीचे संकेत आहेत.

ostana-italy-marathipizza03
bestourism.com

ओसटाना हे एकमेव शहर नाही, इटलीमध्ये अशी अनेक शहरं आहेत, जिथे कमी लोकसंख्या आहे. येथील अधिकाधिक तरुणवर्ग नोकरीच्या निमित्ताने मोठ्या शहरांकडे स्थलांतरित होऊ लागला आहे. स्थलांतराला रोखण्यासाठी मोफत घरं देण्यासही येथील अनेक लोक तयार आहेत. मात्र, स्थलांतर थांबता थांबत नाही आणि पर्यायाने कमी लोकसंख्येचा मुद्दा भेडसावत आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?