माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या महाराष्ट्राच्या पहिल्या पोलिसाची चित्तथरारक कथा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. हिमालयातील ह्या पर्वताची उंची सुमारे ८८४८ मीटर म्हणजेच जवळपास २९०२९ फूट इतकी आहे. हे नेपाळ आणि चीन (तिबेट ) यांच्या सीमेरेषेवर आहे. नेपाळमध्ये या शिखराला सगरमाथा म्हणून ओळखतात, तर तिबेटमध्ये याला चोमो लुंग्मा असे म्हटले जाते.
सन १८५६ मध्ये ब्रिटिश राज्यामधील भारतीय सर्वेक्षण विभागाने घेतलेल्या त्रिमितीय सर्वेक्षणामध्ये ह्या शिखराची उंची २९,०२९ फूट इतकी निश्चित करण्यात आली होती.

माउंट एव्हरेस्टची चढाई करणे खूपच कठीण आहे. जगातील काही मोजकेच लोक या माउंट एव्हरेस्टच्या शिखरापर्यंत पोहोचलेले आहेत. माउंट एव्हरेस्टवर चढाई करताना कितीतरी संकटाना सामोरे जावे लागते. कधी – कधी तर काही गिर्यारोहक अर्ध्या वाटेतूनच माघारी परततात.
माउंट एव्हरेस्ट हे ८००० मीटरपेक्षा जास्त उंच असूनही आतापर्यंत या शिखरावर खूप जणांनी चढाया केलेल्या आहेत.
तसेच, अतिउंचीच्या त्रासामुळे आणि खराब हवामानामुळे येथे कितीतरी गिर्यारोहक मृत्युमुखी देखील पडतात. जे लोक याची चढाई यशस्वीपणे पूर्ण करतात, त्यांची प्रशंसा देखील तेवढीच केली जाते.
आपण अशाच एका गिर्यारोहकाविषयी जाणून घेणार आहोत, ज्याने हे जगातील सर्वात उंच शिखर सर केले आहे आणि एक इतिहास घडवला आहे.
हा मनुष्य महाराष्ट्र पोलीस खात्यातील हे शिखर सर करणारा पहिला पोलीस ठरला. या पोलिसाचे नाव रफिक शेख आहे.
हा महाराष्ट्राच्या औरंगाबादच्या ग्रामीण भागातील ३१ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबल आहे. पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये अपयशी झाल्यानंतर शेवटी रफिक शेख याने हे जगातील सर्वात उंच शिखर सर केलेच . २०१६ मध्ये त्याने हा पराक्रम करून दाखवला होता.

औरंगाबाद पोलिसांच्या सांगण्याप्रमाणे, रफिक शेख याला गिर्यारोहण करण्याची इच्छा पाहिल्यापासूनच होती. त्याने माउंट एव्हरेस्ट सर करण्याच्या पहिल्या प्रयत्नापूर्वी मूलभूत, आणि बचावात्मक माउंटनिंग ट्रेनिंग घेतली होती. याच्या आधी रफिकने हिमालयाची छोटी सात शिखरे जसे की सितीधर, तामटी, धौलदार, कंचनजंगा ही आणि यांच्यासारखी शिखरे सर केली आहेत .
शेख याने २०१६ मध्ये माउंट एव्हरेस्ट सर करण्याच्या आधी २०१४ आणि २०१५ मध्ये देखील माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला होता.
पण मध्येच हवामान खराब झाल्यामुळे त्याला माउंट एव्हरेस्ट सर करता आला नव्हता आणि त्याला परत मागे परतावे लागले होते. तथापि, पुढच्या मोहिमेसाठी त्याने परत एकदा आपला विचार ठाम केला. शेख हा ३० एप्रिल रोजी औरंगाबादहून मुंबईला आला आणि ५ मे रोजी मुंबईमधून काठमांडूला ५ मे २०१६ रोजी पोहोचला.

माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पोहोचल्यानंतर १५ मे रोजी त्याने माउंट एव्हरेस्टकडे कूच केली. एका प्रसंगी तो आणि त्याच्या टीमला खराब हवामानामुळे स्वतःच्या ठरवून घेतलेल्या वेळेत १५ तासांची वाढ करावी लागली. त्यानंतर हवामान खात्याकडून पुढे जाण्याची मंजुरी मिळाल्यानंतर त्यांनी पुढे वाटचाल करण्यास सुरुवात केली आणि माउंट एव्हरेस्टच्या शिखर गाठले. त्यांनी तिथे तिरंगा आणि महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज फडकावला.
जेव्हा त्याने ८,८४८ मीटरची ही उंची यशस्वीपणे गाठली, तेव्हा त्याचे कुटुंबीयांनी आणि औरंगाबाद पोलिसांनी याबद्दल मनसोक्त सेलिब्रेशन केले. त्याच्या यशस्वीपणे माउंट एव्हरेस्ट सर करण्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले होते. फडणवीस ट्विटमध्ये म्हटले की,
“हा एक गर्वाचा क्षण आहे! आमच्या औरंगाबादचे पोलीस कॉन्स्टेबल हे माउंट एव्हरेस्ट सर करणारे महाराष्ट्राचे पहिले पोलीस ठरले. कॉन्स्टेबल रफिक शेखने आज माउंट एव्हरेस्टवर महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा फडकावला. मी लवकरच प्रत्यक्षात त्यांची भेट घेणार आहे.”

रफिक शेखचा भाऊ अश्फाक याने अभिमानाने सांगितले होते की,
“रफिक शेख याने महाराष्ट्रातील प्रत्येक शिखर पालथे घातलेले आहे. त्याने यासाठी स्वतःच स्वतःला ट्रेनिंग दिली होती. तो दर दिवशी घरापासून दौलताबाद किल्ल्यापर्यंत सायकलने जायचा. जो आमच्या येथून जवळपास ११ किमी लांब आहे आणि तेथे जाऊन तो २५ किलो वजन असलेली सॅक घालून गड सर करायचा.”
त्यावेळेचे औरंगाबादचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील कॉन्स्टेबल रफिक शेखच्या या कामगिरीवर प्रचंड खुश होते. त्यांनी त्याला त्याबद्दल खूप शुभेच्छा दिल्या आणि त्याचे कौतुक देखील केले.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
अभिमानास्पद.