' “दलित” म्हणून हिणवलेला, पण ब्रिटिशांना “आव्हान देणारा ” हिंदू क्रिकेट संघाचा कर्णधार – InMarathi

“दलित” म्हणून हिणवलेला, पण ब्रिटिशांना “आव्हान देणारा ” हिंदू क्रिकेट संघाचा कर्णधार

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

क्रिकेट हा जेंटलमेन्स गेम समजला जातो. हा खेळ ब्रिटिश लोक आपल्याबरोबर भारतात घेऊन आले. जेंटलमेन्स गेम खेळणारे हे ब्रिटिश लोक भारतीय लोकांबरोबर मात्र जेंटलमेन सारखे वागत नव्हते.

त्यातल्या त्यात दलितांना तर माणुसकीची वागणूक सुद्धा मिळत नव्हती.

याच काळात देशात अस्पृश्यतेमुळे दलितांना अनेक गोष्टींपासून वंचित ठेवण्यात आले होते. त्यांना साधे क्रिकेट सुद्धा खेळू दिले जात नसे.

पण पालवनकर बालू या व्यक्तिमत्त्वाने परिस्थीतीशी लढा देऊन थेट इंग्रजांबरोबर क्रिकेट खेळण्यात यश मिळवले.

 

baloo-palwankar-inmarathi
youthkiawaaz.com

ते एक उत्तम लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनर होते. ते बॉलला दोन्ही बाजूंनी वळवू शकत असत. क्रिकेट संघात स्थान मिळवून खेळणारे ते पहिले दलित क्रिकेटपटू आहेत.

दलित असल्याने उत्तम खेळाडू असून देखील त्यांना कर्णधार होण्याची संधी देण्यात आली नाही. मात्र त्यांचे भाऊ पालवनकर विठ्ठल मात्र हिंदू जिमखाना क्लबच्या हिंदू संघाचे कर्णधार झाले.

पालवनकर बालू ह्यांचा जन्म १८७६ साली धारवाड येथे झाला. त्यांचे वडील ब्रिटिशांच्या सैन्यात शिपाई पदावर कार्यरत होते. त्यांचे आडनाव पालवनकर हे त्यांच्या मूळ गावावरून म्हणजेच पालवन वरून त्यांना मिळाले होते.

त्याकाळी अस्पृश्यता पाळली जात होती. बालू ह्यांनाही दलित कुटुंबात जन्माला आल्याने अस्पृश्यतेची झळ बसली. परंतु अविरत कष्ट, चिकाटी आणि टॅलेंट ह्यांच्या जोरावर त्यांनी त्यांना प्रचंड विरोध असतानाही यश मिळवून दाखवले.

म्हणूनच दलित लोकांसाठी ते स्पोर्ट आयकॉन पेक्षा हिरोच आहेत. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा मानत असत.

बालू पालवनकर हे चौघा भावांत सर्वात थोरले होते. त्यांचे कुटुंब चामड्याचे काम करत असत. परंतु त्यांचे वडील मात्र ब्रिटिश इंडियन आर्मीच्या ११२व्या इन्फन्ट्री रेजिमेंट मध्ये असल्याने त्यांची परिस्थिती तुलनेने ठीक होती.

ब्रिटिश आर्मीमध्ये काम करणाऱ्या लोकांना अस्पृश्यतेची झळ तुलनेने कमी बसत असल्याने तसेच उपजीविका चांगल्या प्रकारे होत असल्याने अनेक लोक सैन्यात भरती होत असत.

लहानपणापासूनच बालू व त्यांचे भाऊ शिवराम हे पुण्यातील ब्रिटिश अधिकारी विसरून गेलेल्या किंवा टाकून दिलेल्या साहित्याने क्रिकेट खेळत असत.

तेव्हा भारतात क्रिकेट हे विविध धर्मांच्या संघात आपापसात खेळले जात असे. बॉम्बे ट्रँग्यूलर टूर्नामेंटमध्ये हिंदू, ब्रिटिश व पारशी लोकांचे संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळत असत.

तेव्हा एकदिवसीय सामने खेळण्याची पद्धत नव्हती तर तीन दिवसांचा एक सामना असे.

१९१२ साली ह्या टूर्नामेंटमध्ये मुस्लिम संघाला खेळण्याचे आमंत्रण देण्यात आले.

बालू ह्यांना क्रिकेट खेळण्याची अतिशय आवड होती व ते उत्तम क्रिकेट खेळत असत. त्यांनी डेक्कन जिमखान्याच्या संघातील लोकांना ब्रिटिश पूना जिमखान्याविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी संघात घेण्याची विनंती केली.

काही वर्षांनी ते पूना जिमखाना ह्या संघात निवडले गेले. त्यानंतर ते बॉम्बे हिंदू जिमखान्याच्या संघाकडून सुद्धा खेळले.

बालूंचे इतर भाऊ शिवराम, गणपत व विठ्ठल ह्यांनी सुद्धा ह्या बॉम्बे जिमखान्याच्या संघात स्थान मिळवले.

 

palwankar-inmarathi
spoertskeeda.com

१९२३ साली विठ्ठल पालवनकर ह्यांनी उत्तम खेळी करून संघाला विजय मिळवून दिला व ही क्वाड्रंग्युलर टूर्नामेंट जिंकवून दिली.

ह्यानंतर त्यांच्या उच्चवर्णीय हिंदू संघ सहकाऱ्यांनी त्यांना अतिशय मानाने खांद्यावर उचलून घेऊन हा विजय साजरा केला.

हा प्रसंग क्रिकेटचे इतिहासकार बोरिया मजुमदार ह्यांनी वर्णन केला आहे.

बालू पालवनकर ह्यांनी संघात स्थान मिळवण्यासाठी अतिशय कष्ट केले.

ते पुण्यातील पारसी संघासाठी ग्राउंड्समन म्हणून काम करत असत. त्यांना तीन रुपये इतके मानधन मिळत असे.

त्यानंतर १८९२ साली सतरा वर्षीय बालूंना पूना क्लबने चार रूपये इतक्या मानधनावर नोकरी दिली.

त्यांचे काम नेट लावणे, पीच रोल व मार्क करणे हे होते. ह्या ग्राउंडवर ब्रिटिश लोक प्रॅक्टिस करत असत. लवकरच ब्रिटिशांना बालू ह्यांची प्रतिभा दिसली व त्यांनी बालूंना त्यांच्या नेट प्रॅक्टिससाठी बॉलिंग करण्याची संधी दिली.

जे जी ग्रेग नावाचा ब्रिटिश क्रिकेटपटू त्याला बालूंनी आउट केल्यानंतर प्रत्येक वेळी त्यांना आठ आणे बक्षीस देत असे.

ह्याच काळात बालूंनी त्यांची स्पिन बॉलिंग चांगली परजून घेतली. दुर्दैवाने ब्रिटिश लोक त्यांना बॅटिंग करू देत नसत.

ह्याने ते अस्वस्थ होत असत. कारण बॅटिंगची संधी केवळ ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी राखीव होती. बालू ह्यांची प्रतिभा हळूहळू प्रसिद्ध होऊ लागली आणि हिंदू लोक त्यांना आपल्या संघात घेण्याचा विचार करू लागले.

बालू हे अतिशय उत्तम बॉलर असले तरीही हिंदू लोक त्यांना संघात घेण्याचा फक्त विचारच करत होते.

कारण त्यांना संघात घेण्यासाठी हिंदू लोकांना जातीव्यवस्था मोडावी लागणार होती.

अखेर त्यांनी बालूंची संघात निवड केलीच.

हिंदू संघातील लोकांना हा निर्णय घेतल्याचा अतिशय आनंद झाला कारण बालू ह्यांच्या संघात येण्याने कमजोर असलेला हिंदू संघ ब्रिटिश संघाला हरवण्यात यशस्वी झाला.

बालूंच्या टॅलेंटची चर्चा लवकरच बॉम्बेपर्यंत पोचली. १८९६ साली त्यांची नवीनच तयार झालेल्या परमानंदास जीवनदास हिंदू जिमखान्याच्या संघात निवड झाली.

हा संघ बॉम्बे ट्रँग्यूलर टूर्नामेंटमध्ये खेळत असे.

या संघात निवड झाल्यानंतर पालवनकर आपल्या कुटुंबासह बॉम्बेला स्थायिक झाले. कारण याच काळात पुण्यात प्लेग पसरला होता.

बॉम्बेला स्थायिक होण्याचा निर्णय पालवनकर यांच्यासाठी चांगला होता कारण बॉम्बेमध्ये त्यांना क्रिकेटसाठी उत्तम संधी मिळाली.

त्यांनी काही काळासाठी बॉम्बेच्या सैन्यात देखील काम केले. नंतर ते सेंट्रल इंडियन रेल्वेमध्ये रुजू झाले. ह्यामुळे त्यांना रेल्वेच्या संघासाठी व जिमखान्याच्या संघासाठीही खेळण्याची संधी मिळाली.

ते उत्तम क्रिकेटपटू असून देखील त्यांना अस्पृश्यतेची झळ बसलीच. सामन्याच्या मध्यंतरात त्यांना वेगळ्या डिस्पोझेबल कपातून चहा देण्यात येत असे.

तसेच त्यांची बसण्याची व्यवस्था सुद्धा पॅव्हिलियन पासून लांब असे.

त्यांना हात-पाय धुण्यासाठी वेगळा दलित अटेन्डन्ट देण्यात येत असे जो त्यांच्यासाठी पाणी आणत असे. त्यांना जेवणासाठी सुद्धा वेगळ्या ताटलीत व आपल्या संघ सहकाऱ्यांबरोबर नव्हे तर वेगळ्या टेबलवर बसावे लागत असे.

आपल्या खेळामुळे त्यांनी संघ सहकाऱ्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले असले तरीही ही परिस्थिती पूर्णपणे बदलण्यासाठी १९०६ साल उजाडावे लागले.

१९०६ साली बॉम्बे ट्रँग्यूलर टूर्नामेंटची फायनल मॅच हिंदू व ब्रिटिश संघांमध्ये झाली.

हिंदू संघाने प्रथम फलंदाजी करून २४२ धावा केल्या व ब्रिटिश संघाला १९१ धावांवर रोखले. दुसऱ्या इनिंगमध्ये हिंदूंनी १६० धावा केल्या व ब्रिटिश संघापुढे २१२ धावांचे आव्हान उभे केले.

दुसऱ्या इनिंग मध्ये बालूंनी उत्तम बॉलिंगचा नमुना दाखवत पाच बळी घेतले आणि ब्रिटिशांना १०२ धावांवर समाधान मानावे लागले.

बालूंच्या बॉलिंगमुळे हिंदू संघाचा विजय झाला. भारतीय स्वातंत्र्यलढा जोमाने सुरु असताना ब्रिटिशांविरुद्धचा हा विजय हिंदू संघासाठी व देशासाठीही अतिशय महत्वाचा ठरला.

अखेर काही वर्षांनी बॉम्बे हिंदू जिमखान्याच्या लोकांनी पालवनकर बालूंबरोबर एकत्र जेवणे सुरु केले.

ह्या परिवर्तनामुळे पालवनकरांच्या भावाचा म्हणजेच शिवराम ह्यांच्या संघात प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला.

ह्याचे क्रेडिट हिंदू जिमखान्यातील लोकांनाही जाते ज्यांनी परिवर्तनाला सुरुवात केली. 

हिंदू लोकांच्या मनात अनिष्ट रूढी व परंपरांविषयी जागृती निर्माण होण्याची ही आणखी एक पायरी होती.

१९११ साली भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला. तिथे १२ मॅचेसची सिरीज व युनिव्हर्सिटीच्या संघाबरोबर सुद्धा सामने खेळले जाणार होते. ह्या सिरीज मध्ये भारतीय संघाला दारुण पराभव सहन करावा लागला.

१२ पैकी १० सामने आपल्या संघाने गमावले पण पालवनकरांची प्रतिभा सर्वांना बघायला मिळाली.

 

india-team-first-tour-inmarathi
medium.com

त्यांनी या संपूर्ण सिरीज मध्ये ८७ बळी घेतले व ३७६ धावा केल्या. दौऱ्याहून परत येताना पालवनकर संपूर्ण देशासाठी व गांजलेल्या समाजासाठी सुद्धा हिरो झाले होते.

सर्वांना आनंद झाला होता. कारण, पालवनकरांनी ब्रिटिशांविरुद्ध अतिशय चमकदार कामगिरी करून दाखवली.

एका कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिले भाषण केले होते. या भाषणात त्यांनी पालवनकरांचे कौतुक केले व त्यांचे या यशानंतर भारतात स्वागत केले.

यानंतर पालवनकरांना इंग्लंडमध्ये राहून इंग्लिश काऊंटी खेळण्यासाठी अनेक ऑफर्स आल्या पण त्यांनी त्या नम्रपणे नाकारल्या.

इतिहासकार धनंजय कीर त्यांच्या डॉक्टर आंबेडकर : लाईफ अँड मिशन ह्या पुस्तकात लिहितात की,

“बॉम्बेच्या सिडनहॅम कॉलेजात शिकवत असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी पालवनकरांच्या सन्मानार्थ अनेक कार्यक्रम आयोजित केले. तसेच मुंबई महानगरपालिकेत त्यांच्या पदोन्नतीसाठी सुद्धा प्रयत्न केले. आंबेडकरांना पालवनकर हे हिरो वाटत असत. ते पालवनकरांना स्वतःचे तसेच दलितांचे प्रेरणास्थान मानत असत.”

पालवनकर अतिशय उत्तम क्रिकेटपटू असून देखील त्यांना हिंदू संघाचे कर्णधारपद देण्यात आले नाही. १९१० पासून ते १९२० पर्यंत प्रत्येक वर्षी त्यांना कर्णधारपद मिळावे म्हणून अनेकांनी प्रयत्न केले परंतु त्यांना यश आले नाही.

इतकेच नव्हे तर, १९१३ साली स्वतः कर्णधार असलेल्या एम डी पै ह्यांनी म्हटले होते की,

“कर्णधारपदाचा बहुमान माझे मित्र मिस्टर बालूंना मिळायला हवा.”

१९२० साली संघाची निवड करणाऱ्यांनी डी बी देवधर ह्यांना कर्णधारपद देण्यासाठी पालवनकरांच्या बंधूंना म्हणजेच विठ्ठल ह्यांना कर्णधारपद नाकारले व पालवनकरांना संघात घेतले नाही.

या घटनेचा निषेध म्हणून पालवनकर बालू व त्यांचे बंधू विठ्ठल व शिवराम ह्यांनी संघात सामील होण्यास नकार दिला.

“एखाद्याची सामाजिक व आर्थिक परिस्थिती हा निकष खेळाच्या निवडीसाठी असू शकत नाही. क्रिकेट खेळण्यासाठी एखाद्याची जात विचारात घेतली जाते ह्या चुकीच्या गोष्टीपुढें शांतपणे हार मानणे आम्हाला जमणार नाही. “

असे पालवनकर बंधू एका पत्रात लिहितात. अखेर पालवंकर व त्यांच्या बंधूंच्या कष्टाला फळ आले व पालवनकरांना उप कर्णधार म्हणून संघात घेण्यात आले.

विठ्ठल पालवनकरांना कर्णधारपद मिळाल्यानंतर त्यांनी चार वर्षात तीन वेळा संघाला कप जिंकून दिला. ह्या काळात दलित समाजातील अनेक लोक समान हक्कांसाठी लढा देत होते.

विठ्ठल पालवंकरांची संघनायक म्हणून निवड होणे हा एक मोठा सकारात्मक बदल ठरला.

 

vithal-palwankar-inmarathi
alchetron.com

ह्याच काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यतेविरुद्ध लढा देत होते आणि महात्मा गांधी सुद्धा अस्पृश्यतेच्या विरोधात उघडपणे बोलत होते.

प्रतिकूल परिस्थितीत जेव्हा कुठलीही आशा व सपोर्ट नव्हता, अशावेळी पालवनकरांनी व्यवस्थेला छेद देऊन, चिकाटीने प्रयत्न करून इतिहास रचला.

आपल्या समाजातील गांजलेल्या लोकांना त्यांनी आशेचा एक किरण दाखवला.

त्यांना अभिमान वाटेल असे कार्य करून दाखवले. बदलाची सुरुवात करून दाखवली. त्यांच्या क्रिकेटने जातीभेदावर विजय मिळवला. पालवनकर बालूंच्या ह्या कर्तृत्वाला सलाम!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?