' खरेखोटे साक्षीपुरावे वगैरे : भाऊ तोरसेकर – InMarathi

खरेखोटे साक्षीपुरावे वगैरे : भाऊ तोरसेकर

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

झुंडीतली माणसं   (लेखांक नववा)

लेखांक आठवा: कुचकामी द्वेषाचे परिणाम : भाऊ तोरसेकर

===

गेल्याच आठवड्यातली महाराष्ट्रातली गाजलेली बातमी वा घटना म्हणजे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेली राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांची खास महामुलाखत. आठवडाभर आधीपासून तिचा डंका पिटला जात होता आणि पुढला आठवडाभर त्यावर भाष्य व प्रतिक्रीया उमटत होत्या. माझ्या एका समकालीन पत्रकार मित्राची प्रतिक्रीया श्रीदेवीच्या निधनानंतरची आहे.

तिच्या मृत्यूला दहा तास होत असताना त्याचा फ़ोन आला आणि म्हणाला, ‘बरं झालं ती श्रीदेवी गेली. मराठी वाहिन्यांना महामुलाखतीतून बाहेर पडायची सवड मिळाली.’

असो, तर अशा गाजलेल्या महामुलाखतीमध्ये शरदरावांनी एक खुप जुनी आठवण अगत्याने सांगितली. जेव्हा मुंबईत गिरणी कामगारांचा बेमुदत संप डॉ. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली चालू होता, तेव्हा गिरणगाव संपायचे संकट ओढवले होते. आणि गिरणगाव संपले तर मुंबई मराठी उरणार नाही, अशी भिती होती. ते थोपवण्यासाठी व गिरणगाव जगवण्यासाठी आम्ही तिघे एका व्यासपीठावर एकत्र आलो होतो.

ही १९८० च्या द्शकातली गोष्ट आहे. गिरणी संप आवरून गिरण्या जगवण्यासाठी वा सामंतांच्या तावडीतून कामगारासह गिरणगावाला सोडवण्यासाठी शरद पवार आणि जॉर्ज फ़र्नांडीस हे शिवसेनेच्या व्यासपीठावर शिवाजीपार्कला एकत्र आलेले होते.

हे सत्य व निखळ सत्य आहे. त्याविषयी मिमांसा करण्याची गरज नाही. पण याच सत्याचा सातत्याने किती अपलाप झाला आहे, त्याची कोणी चौकशी वा विचारपूस कधी केली आहे काय? शिवसेनेला डिवचताना या तीन दशकात सातत्याने मुंबईच्या गिरणी कामगारासाठी शिवसेनेने काय केले, असे प्रश्न विचारले गेले.

 

girni-kamgar-inmarathi
shekhar.cc

पण त्या गिरण्या व कामगाराला बुडवणार्‍या सामंतांच्या संपावर कोणी प्रश्नचिन्ह लावले नाही. कारण सामंत यांचा संप म्हणजे त्या काळात पुकारलेला ‘पुरोगामी एल्गार’ होता ना? झुंडीतल्या लोकांना सत्याचे किती वावडे असते त्याचा हा नमूना!

सत्य असे होते, की मुंबईतला गिरणीधंदा तेव्हा डबघाईला आलेला होता आणि संपाने तो संपलाच असता. सामंतांच्या संपापुर्वी शिवसेनेच्या संघटनेनेही तितकाच यशस्वी दोन दिवसांचा गिरण्याबंद करून दाखवला होता. मात्र तो अधिक न ताणता सरकारच्या मध्यस्थीने तडजोड घडवून आणूया, असे आवाहन बाळासाहेब ठाकरे यांनी केले.

तर ‘एल्गार’ने भारावलेला गिरणी कामगार सामंतांच्या मागे धावत गेला आणि बेमुदत संपाने मालकवर्गाची इच्छा पुर्ण करण्यास त्यानेही हातभार लावता झाला. हे सत्य कधी सांगितले गेले नाही.

सामंतांच्या आडमुठ्या संपाने मालकांचे इप्सित पुर्ण झाले आणि कामगार देशोधडीला लागल्यावर त्याचे सातत्याने समर्थन करणारे मात्र शिवसेनेला मराठी गिरणी कामगारासाठी काय केले असले, प्रश्न विचारू लागले. अर्थात त्यात तथ्य नव्हते. पण ज्यांना सत्यापेक्षाही मनातले खोटेनाटे ऐकून समाधानी व्हायचे असते, त्यांच्यासाठी असेच तर्क हवे असतात. त्या तर्कांना खतपाणी घालणारे बोगस संदर्भही हवेच असतात. त्यांच्या मनात असते त्याचे खोटेनाटे पुरावे त्यांना आनंदीत करीत असतात.

बहुतेक सामाजिक राजकीय संघर्षात आपापल्या पाठीराख्यांना असे बिनबुडाचे संदर्भ व इतिहास हवा असतो आणि तो मिळाला, मग त्यावर उड्या पडतात.

ते स्विकारणारे अडाणी मुर्ख असतात असेही मानायचे कारण नाही. अतिशय सुशिक्षीत व बुद्धीमान माणसेही वैचारीक भूमिकांच्या झुंडीत सहभागी झालेली असली, मग त्याचा बिनतक्रार स्विकार करीत असतात. किंबहूना त्या बिनबुडाच्या खोट्या संदर्भाला विद्यापीठीय अभ्यासातही स्थान दिले जाऊ शकते. पवारांनी जो घटना संदर्भ उपरोक्त मुलाखतीमध्ये दिलेला आहे, त्याचा कल्पनेपलिकडला विपर्यास पुणे विद्यापीठाच्या दोघा राज्यशास्त्राच्या प्राध्यापकांनी केला. त्यांचे असे विपर्यस्त पुस्तक त्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासातही लावलेले होते.

ग्रंथालीने प्रकाशित केलेले ‘महाराष्ट्रातील सत्तांतर’ नावाचे पुस्तक प्रा. राजेंद्र व्होरा व प्रा. सुहास पळशीकर यांनी लिहीलेले होते. त्यात पवारांनी कथन केलेल्या घटनेचा भयंकर विपर्यास आलेला आहे. यात पवारच सांगतात, की

“गिरणगाव उध्वस्त होऊ नये म्हणून ठाकरे, फ़र्नांडिस व आपण एका व्यासपीठावर आलो. त्याचा उल्लेख या संदर्भ ग्रंथात पळशीकर व्होरांनी कसा केलेला असावा? ‘१९८५ च्या राजीववस्त्र विरोधी आंदोलनाच्या निमीत्ताने अल्पकाळ, शरद जोशी, दत्ता सामंत आणि बाळ ठाकरे एकत्र आले.’ (पृष्ठ १९) ह्या उल्लेखासह त्या पुस्तकातील अनेक चुकीच्या व खोट्या संदर्भाविषयी मी लेखक व प्रकाशकांकडे लक्ष पत्र लिहून लक्ष वेधलेले होते. पण त्यात कुठलीही सुधारणा झाली नाही, की त्याबद्दल वाचकाची माफ़ीही मागितली गेली नाही. पण पुस्तक अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना सक्तीचे करण्यात आलेले होते.”

 

sharad pawar marathipizza

यातला फ़रक वा गफ़लत लक्षात घेण्यासारखी आहे. पवार म्हणतात, तोच हा संदर्भ आहे. राज्यातील तीन नेते एकत्र आले, ते कारण पुस्तकात चुकीचे आहेच. पण त्या तीन नेत्यांची नावेही चुकीची आहेत. पण ते खोटे दडपून नेण्यात आले. कुठल्याही कुशाग्र बुद्धीच्या पुरोगामी वा़चक वा अभ्यासकाला ते खटकले नाही, की त्यामध्ये सुधारणा करण्याची गरज वाटली नाही. कारण त्यापैकी कोणालाही सत्याशी मतलब नव्हता.

पुरोगामी झुंडीला ठाकरे नावाचे वावडे असल्यावर कुठलाही आरोप त्यांच्या माथी मारला, मग ते आपोआप सत्य असते. त्याची छाननी आवश्यक नसते आणि तसेच मग ती टकले यांनी लिहीलेल्या ‘कारवान’ नियतकालिकाच्या लेखाविषयीही घडलेले दिसून येते. त्यातले दुबळे वा खोटे दुवे प्रकाश बाळ या ज्येष्ठ पुरोगामी पत्रकारानेच दाखवण्याच प्रयत्न केला. तर तमाम पुरोगामी अभ्यासक बाळ यांच्यावर तुटून पडले. उलट प्रतिगामी वा विरोधी गोटातले लोक मात्र टकलेंच्या खोटेपणावर तुटून पडले.

दोन्हीकडल्या गटात झुंडीच असतात. फ़रक असा असतो, की झुंड पशूंची मानली जाते. इथे सामान्य नव्हे तर बुद्धीमान लोकांच्या झुंडी असतात. त्या इकडल्या असोत व तिकडल्या असोत. त्यांना आपल्या मनातले सांगणारा वा त्यासाठी खोटेनाटे पुरावे देणारा कोणी तरी साक्षीदार हवा असतो.

त्यांची बाजू मजबूत करणारा पुरावा हवा, इतकेच. आता दुसर्‍या बाजूची गोष्ट घेऊया. मागल्या महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी एक विधान केले. सैनिकांची सज्जता व्हायला सहा महिन्यांचा काळ लागतो. तशी आवश्यकता असेल व संविधान मुभा देत असेल; तर संघाचे स्वयंसेवकही सैनिकांचे कर्तव्य बजावण्यास तीन दिवसात पुढे येऊ शकतात. यात त्यांना स्वयंसेवक शिस्तबद्ध असतो आणि कायम देशसेवेसाठी सज्ज असतो, असे स्पष्ट करायचे होते. सैनिक भरती व प्रशिक्षणाला काही महिने खर्ची पडतात, असाच त्यातला आशय होता. पण त्याचा विपर्यास करण्याची पुरोगामी स्पर्धा सुरू झाली.

ते निमीत्त साधून मी एक वादग्रस्त फ़ोटो सोशल मीडियात मुद्दाम टाकला. १९६३ सालात प्रजासत्ताक दिनाच्या दिल्लीतील सोहळ्यात सैनिकी पथकाप्रमाणे स्वयंसेवकांनी संचलन केले व त्याला पंतप्रधान नेहरूंनीच आमंत्रण दिले होते, अशा आशयाची माझी पोस्ट होती. तात्काळ त्यावर संघप्रेमींची व तथाकथित प्रतिगाम्यांची उडी पडली.

भागवतांना झोडणार्‍या पुरोगाम्यांची तोंडे बंद करायला हा मी पुढे केलेला पुरावा, अशा संघ समर्थकांसाठी पुरेसा होता. तो खरा असण्याची त्यांना काडीचीही गरज वाटली नाही.

 

rss-inmarathi
www.quora.com

पळशीकर वा टकलेंचा खोटारडेपणा आणि फ़ेसबुक या सोशल मीडीयात मी प्रसृत केलेल्या फ़ोटोमध्ये तसूभर फ़रक नाही. पण प्रतिक्रिया नेमक्या परस्पर विरोधी आहेत. ज्या झुंडीला आवडणारा पुरावा किंवा विधान असते, त्यांची बुद्धी गुंडाळून कशी प्रतिक्रीया येते, त्याचा हा दाखला आहे.

फ़रक इतकाच आहे, की मी जाणिवपुर्वक खात्री नसलेला फ़ो्टो मोक्याच्या क्षणी टाकला होता आणि त्यावर उलटसुलट प्रतिक्रीया आल्यावर त्यातला फ़ोलपणाही कबूल करायला वेळ लावला नाही. मग अनेक पुरोगामी शहाण्यांनी मी मुद्दाम खोटेपणा केला नसून, पकडला गेल्यावर सारवासारव करीत असल्याची मल्लीनाथीही केली. पण यातले सत्य मलाच ठाऊक आहे. पण मग टकले वा पळशीकरांचे काय? त्यांचा खोटेपणा उघडकीस आणल्यावर त्यांनी निदान खोटेपणा कबूल करण्याचे सौजन्य तरी दाखवले आहे काय?

माझे सोडा, प्रकाश बाळ पुरोगामी गोतावळ्यातले आहेत. त्यांच्या सवालांना तरी उत्तर देण्याचे धाडस टकले दाखवू शकले आहेत काय? इंडीयन एक्सप्रेस या दैनिकाने टकलेंचा ‘संघ संदर्भ’ पुरता नागडा केला. न्या. लोयांच्या मृतदेहासोबत आलेली व्यक्ती संघाची असल्याचे धडधडीत खोटे त्यांनी लिहीली होते. ती व्यक्ती थेट कॉग्रेसशी संबंधित होती. त्याचा खुलासा कधी कोणी मागितला काय? माझ्या एका फ़ोटोविषयी कांगावा करणार्‍यांना कधी आपल्या खरेपणाचे पुरावे देण्याची गरज वाटली नाही. वाटणारही नाही. मग मी तो फ़ोटो कशासाठी टाकला होता?

तर सोशल मीडियात जे नरम पडलेले संघाच्या गोटातले लोक होते, त्यांना हत्यार म्हणूनच मी तो फ़ोटो व पोस्ट पुरवली होती आणि तिला तुफ़ान प्रतिसाद मिळाला. तेवढाच तर त्यामागचा हेतू होता.

टकले वा पळशीकरांना त्यांच्या ग्राहकांना खोटे भरवायचे असेल, तर इतरांना तो अधिकार का असू नये? अर्थात हा फ़ोटो शंकास्पद असल्याचे मला सहा वर्षापुर्वीच कळलेले होते. तेव्हा मला इंटरनेटवर हा फ़ोटो मिळालेला होता आणि त्याची छाननी करण्यासाठी मी ओळखीच्या अनेक ज्येष्ठ संघवाल्यांशी बोललो होतो. पण तशा प्रसंग समारंभाची खातरजमा कोणीच केली नाही. म्हणून आजवर कधी तो विषय माझ्या लिहीण्य़ात आलेला नव्हता. यावेळी मुद्दाम खोटेपणा केला.

दाभोळ्करांच्या हत्येला आता साडेचार वर्षे तर पानसरेंच्या हत्येला तीन वर्षे उलटून गेली आहेत. त्यात सातत्याने हिंदू संघटनांवर बिनबुडाचे आरोप सरसकट करण्यातच धन्यता मानली गेली. त्याचा निवडणूक प्रचाराच्या राजकारणात सढळ वापर झाला. पण अजून पुरावा म्हणून सिद्ध होईल, असा एकही धागादोरा पुढे आलेला नाही. मात्र तथाकथित शहाण्या पुरोगाम्यांनी कधी तशा अफ़वा पिकवणार्‍यांकडे सज्जड पुरावा मागितला आहे काय?

 

dabholkar-inmarathi
www.livemint.com

जितक्या सहजतेने मी टाकलेला एक संचलनाचा फ़ोटो संघाच्या समर्थकांनी स्विकारला व उचलून धरला, त्यापेक्षा पुरोगामी बुद्धीवादी किंचीतही वेगळे नसतात. कारण एकदा तुम्ही कुठली तरी वैचारिक धारा स्विकारली, मग तुम्हाला आपल्या विवेकबुद्धीला गुंडाळून ठेवणे अपरिहार्य असते. त्या विचारधारेची जी झुंड असते तिला आवडणारे सांगावे लागते, पुरावावे लागते. त्यापासून किंचीतही वेगळे वा भिन्न काही स्विकारण्याची त्या झुंडीची कुवत नसते. तत्क्षणी तुमच्यावर तीच झुंड तुटून पडते.

किंबहूना तशी पुरोगामी झुंड समोर आणणे, हाच त्या फ़ोटोला प्रसिद्धी देण्यामागचा हेतू होता. काही प्रसंगी अशी लबाडी आवश्यक असते. तरूण तेजपाल याला बिळातून बाहेर काढण्यासाठी २०१३ सालात गोवा पोलिसांनी नेमके हेच केले होते. त्याने त्या मुलीशी लिफ़्टमध्ये वाह्यातपणा केल्याचे सीसीटीव्ही फ़ुटेज असल्याचा पोलिसांचा दावा होता. ते ऐकून तेजपाल लगेच समोर आला आणि आपण निर्दोष असल्याचे सांगू लागला. कारण त्याने लिफ़्टमध्ये काही केलेच नसल्याची त्याला खात्री होती.

मात्र तो ताब्यात आल्यावर पोलिसांनी स्पष्ट केले, की लिफ़्टमध्ये कॅमेराच नाही. पण लॉबीमधले चित्रण आपल्यापाशी आहे. ते आधीच जाहिर केले असते तर तेजपाल बिळातून बाहेर आला नसता. विविध खोटेपणावर मौनव्रत धारण करून बसलेल्या हिंदूविरोधी पुरोगाम्यांना बिळातून बाहेर काढण्याचे काम त्या फ़ोटोने माझ्यासाठी केले.

पण मुद्दा पुरोगामी खोटेपणाचा नसून झुंडीतल्या लोकांच्या मानसिकतेचा आहे. तिथे सुशिक्षीत वा अडाणी असा काहीही फ़रक नसतो. म्हणून तर औरंगाबाद वा अन्यत्र कुठे मुस्लिम समुदायाला खुश करताना शरद पवारच कुराणाचा हवाला देत काय म्हणाले होते? कुराण हा अल्लाचा शब्द आहे आणि त्यात कोणालाही हस्तक्षेप करायचा अधिकार नाही. ते तलाक संबंधी बोलत होते आणि सुप्रिम कोर्टानेच छाननी करून तलाकचा कुराणात कुठेही संबंध नाही, असा ठाम निर्वाळा दिला आहे.

पवारांना त्याचे भान नसेल असे अजिबात नाही. आपण धडधाडीत खोटे बोलतोय, याची पवारांनाही खात्री होती.

पण समोरच्या जमावाला तरी सत्याशी काय कर्तव्य होते? त्यांनाही मन गुंगवून टाकेल वा मनाला हवे असलेलेच ऐकायचे होते ना? मग पवारांनी तेच सांगितले आणि टाळ्या मिळवल्या. कदाचित त्यातून पुढे मतेही मिळायची बेगमी करून ठेवली. इतिहास, पुरावे, युक्तीवाद हा सगळा भंपकपणा असतो. शेवटी झुंडशाहीच चालत असते आणि जी झुंड मोठी वा आक्रमक असते, तिचे बोलणे सत्य ठरवले जात असते. ज्यांना अशा झुंडी जिकून घ्यायच्या असतात, त्यांना झुंडीला हवे असलेले द्यावे लागते.

 

simpsons-mob-inmarathi
assets.pando.com

टकले वा पळशीकर पुरोगामी झुंडीला खाद्य पुरवित असतात आणि अन्य काही प्रतिगामी झुंडीला न्याहारी देत असतात. या वादात कोण खोटा वा कोण खरा, याला फ़ारसा अर्थ नसतो. पाकिस्तानला कितीही पुरावे भारताने वा अमेरिकेने दिले, म्हणून तिथल्या कोर्टाने तरी सईद हाफ़ीजचे गुन्हे स्विकारले आहेत काय? उत्तर सोपे आहे. जो कडवा मुस्लिम आहे, तो गुन्हा करूच शकत नाही आणि शरियत अनुसार बिगर मुस्लिम तर साक्षिदार म्हणून ग्राह्य धरता येत नाही. तेच पुरोगामी सत्य आहे.

त्यात पुरोगामी गोटातला नसेल, त्याची कुठलीही गोष्ट विश्वासार्ह नसते. मग तो मतदान घेऊन लागलेला निकाल का असेना? मतदान यंत्रेही विश्वासार्ह नसतील, तर माणसाचे काय घेऊन बसलात?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Bhau Torsekar

लेखक वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.

bhau-torsekar has 26 posts and counting.See all posts by bhau-torsekar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?