भारतीयांच्या सहिष्णुतेची ही उदाहरणं “असहिष्णुतेची तक्रार” करणाऱ्या प्रत्येकाला वाचून दाखवायला हवीत
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
आपण एखादी वाईट गोष्टं सहन करतो, किंवा दुर्गंध सहन करतो. पण भारत देश विविध संस्कृती केवळ सहनच करत नाही तर त्या वैविध्यपूर्ण संस्कृतींचा आदर करतो, सन्मान करतो आणि त्या साजऱ्या देखील करतो.
बाकीच्या देशांच्या तुलनेत भारत अधिक सहिष्णू कसा ठरतो हे कळायला हवं असेल तर इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशाचा निधर्मीपणा मांडायला हवा. त्याचाच हा एक प्रयत्न.
१. वेस्टर्न युरोपप्रमाणे आपला निधर्मीपणा म्हणजे कलाकारांच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावणे नव्हे. हिंदू एखाद्या धर्मगुरूचं चित्र मानवी बॉम्ब म्हणून काढत नाहीत.
आम्ही ‘असहनशील’ भारतीय हिंदू , सर्वधर्मसमभाव मानतो. सगळ्यांच्या धर्मांना आपल्या स्वतःच्या धर्माप्रमाणे सन्मान देतो. तसेच केवळ बहुसंख्य आहोत म्हणून दुसऱ्यांना दुखवायला जात नाही.

जेव्हा आमीर खान आणि एम एफ हुसैन कलेच्या नावाखाली हिंदु देवतांचा अपमान करतात तेव्हा आम्हाला केवळ हिंदू म्हणून नाही तर एक असा भारतीय म्हणून दुःख होते जो कोणत्याच धर्माचा किंवा संस्कृतीचा कधीही अपमान करत नाही.
२. आमचे अधिकारी केवळ तुम्ही मुस्लिम आहात किंवा खान आडनाव लावता म्हणून तुम्हाला अडवत नाहीत. भारतातील शाहरुख खान आणि अब्दुल कलामांसारख्या नामवंत व्यक्तिमत्त्वांना भारताबाहेरील विमानतळावर मानहानीकारक वागणूक देण्यात आली आहे.
भारतातील तमाम जनतेने शाहरुख खान याला देण्यात आलेल्या वागणुकीबद्दल आपला राग व्यक्त केला होता. तसेच अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी भारताच्या ex-president ना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल त्यांना माफी मागायला लागली होती.

भारतीय शासनानेच यातल्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घातलं होतं. उद्या आमीर खानला त्याच्या धर्मावरून बाहेर कोणी अपमानास्पद बोललं तर भारत त्याविरुद्ध सुद्धा आवाज उठवेल, कारण तो आमचा आहे असं आम्ही मानतो.
त्याने भारताचा कितीही तिरस्कार केला तरी भारतीय जनता त्याच्यावर प्रेमच करत राहील आणि तरीही आम्ही असहिष्णू ठरतो.
३. आम्ही तुमच्या धर्माने तुम्हाला बुरखा घालायला सांगितला असेल तर त्यापासून अडवत नाही. तुमच्या धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करत नाही. फ्रान्समध्ये तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास मनाई आहे. भारतात तुम्ही तुमचा धर्म हवा त्या प्रकारे पाळू शकता.
तुमच्या हिजाब किंवा बुरख्यामुळे तुम्हाला आम्ही वेगळं मानत नाही. तुम्हाला त्यावरून अपमानास्पद वागणूक दिली जात नाही. इतकंच नाही तर आम्ही प्रत्येक धर्माने त्या धर्माच्या उपासकांना घालून दिलेले नियम पाळण्यापासून त्यांना अडवत नाही. त्यांच्या धर्माच्या कायद्यांनीच त्यांच्यावरील खटल्याची सुनावणी होते.
४. भारतात जेव्हा जेव्हा दहशतवादी हल्ले झाले आणि त्यामागे मुस्लिमांचा हात होता तेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियन जनतेसारखी मुस्लिमविरोधी आंदोलने केली नाहीत. इस्लामफोबिया ही संकल्पनाच आम्हाला ठाऊक नाही.
आमच्यावर शेकडो दहशतवादी हल्ले झाले पण आम्ही धर्माशी दहशतवाद्यांचा संबंध जोडला नाही. आम्ही त्यांना धर्मातील विघातक प्रवृत्ती मानलं. पण त्यावरून संपूर्ण धर्माला नावे ठेवली नाहीत.

५. अमेरिकेत ओबामा यांना, त्यांच्या वडिलांचे नाव हुसैन हे मुस्लिम असल्याने ते स्वतः ख्रिश्चन असून सुद्धा कमीपणाची वागणूक देण्यात आली. याउलट भारतात पाहायचं झालं तर अब्दुल कलामांसारखी महान व्यक्ती याच देशात जन्मली आणि मृत्यू पावली. पण त्याचं मुस्लिम असणं कधी हिंदूंनादेखील खटकलं नाही.
ते मुस्लिम असूनही आम्ही त्यांना फक्त राष्ट्रपती म्हणून स्वीकारलेच नाही तर आम्ही त्यांचा गौरवदेखील केला. कारण आमची भूमी ही गुणवंतांचा आदर करणारी भूमी आहे.
६. कित्येक युरोपियन देशातील मुस्लिमांची आकडेवारी भारतातील मुस्लिमांशी तुल्यबळ आहे. पण त्यांच्यापैकी किती नॅशनल आयकॉन्स म्हणून उदयास आले हा खरा प्रश्न आहे. त्यांच्या देशात कोणी ए आर रेहमान, शाहरुख खान, आमिर खान, किंवा अब्दुल कलाम यांच्यासारखी व्यक्तिमत्त्व घडली का?
ती इथे घडली कारण इथल्या वातावरणात त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला गेला नाही. जरी भारतात ८०% लोकसंख्या हिंदू असली तरी त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली.
त्यांनी यशाची शिखरे गाठली. कोणी आर्मी जनरल पदावर पोहोचले तर कोणी मुख्यमंत्री झाले. कोणी न्यायदानाच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले तर कोणी आणखी काही. आणि हे सर्व गेल्या काही दशकांमध्येच.
इतर कोणत्याही देशांमध्ये अल्पसंख्यांकांना दिली जाणारी वागणूक आणि आपल्याकडे गुणवत्तेनुसार त्यांनाही दिला जाणारा सन्मान याची बरोबरी कशी होणार?

७. स्पेन आणि पोर्तुगाल हे एके काळी मुस्लिम देश होते. त्यानंतर स्पॅनिश लोकांनी त्यांच्यावर आक्रमण केल्यावर त्यांना अत्यंत अमानुषपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तिथे आधी इस्लामिक जनता राहायची असं सांगून कोणाला खरं वाटणार नाही इतक्या वाईट पद्धतीने त्यांना देशाबाहेर हकलण्यात आलं. मात्र आपण असं केलं नाही.
परकीय आक्रमणं हा इतिहासाचा एक भाग मानून पुढे गेलो. त्यांच्या काळातील ऐतिहासिक दस्तऐवज देखील जतन केले.
8. भारतातील ख्रिश्चनांचे प्रमाण हे अमेरिका किंवा युके मधील हिंदूंच्या प्रमाणापेक्षा फार जास्त नाही. असे असूनसुद्धा बुद्ध पौर्णिमेइतकाच ख्रिसमस सुद्धा आपल्या देशात जल्लोषात साजरा केला जातो आणि तो देखील सर्वधर्मीयांकडून.
एवढेच नाही तर बकरी ईद आणि ख्रिसमस सारखे सण हे महत्त्वाचे शासकीय सुट्ट्यांचे दिवस आहेत.
पण दिवाळीला थायलंड किंवा युके मध्ये मात्र सुट्टी नसते. आम्ही इतर धर्माच्या लोकांचे सणदेखील तेवढ्याच उत्साहाने साजरे करतो आणि त्यांच्या देवतांबद्दल, धार्मिक स्थळांबद्दल सुद्धा आदर बाळगतो.

९. भारत हा अनेक स्थलांतरित जमातींसाठी त्यांचं घर बनला आहे. त्याने Judaism, Zoroastrianism, तिबेटन बुद्धिस्ट यांना आपल्या पंखांखाली घेऊन आश्रय दिला आहे. हिंदूंनी फक्त सगळ्या जातीधर्माच्या लोकांना समावूनच घेतलं नाही तर काही काळापुरत्या विस्थापित झालेल्या अशा विस्थापित जमातींना सुद्धा इतर धर्मांचा आदर करण्याचीच शिकवण दिली आहे.
ही खरी भारत देशाची संकल्पना आहे. त्यामुळेच अल्पसंख्यांकांना सामावून घेणं हा कधी प्रश्नच नव्हता, पण बळजबरीने करण्यात येणाऱ्या धर्मांतराला मात्र प्रखर विरोध होता.
१०. फक्त धार्मिक स्वातंत्र्यच नव्हे आम्ही सांस्कृतिक विभिन्नता देखील जतन करून ठेवली आहे. एका डझनाहून जास्त भाषा आम्ही आमच्या कामकाजात वापरतो.
आम्ही अजूनही आमच्या वनवासी बांधवांची संस्कृती जोपासतो आहोत. मग ते अंदमान निकोबार बेटांवरील आदिवासी असोत किंवा पूर्वांचालतील जमाती.
हा आहे भारतातील सहिष्णू परंपरेचा लेखाजोखा. एवढे असूनही भारत आणि भारतातील लोक असहिष्णू असल्याची तक्रार करणाऱ्या सर्वांनी या गोष्टी एकदा नजरेखालून घातल्या पाहिजेत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.