“मै शपथ लेता हू..” : मोदींच्या आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधीबद्दल १० खास गोष्टी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

येणार तर मोदीच म्हणता म्हणता खरंच ह्या निवडणुकीत परत एकदा भाजपाला लोकांनी बहुमताने पसंती दिली आणि परत नरेंद्र मोदी ह्यांची पंतप्रधानपदासाठी एकमताने निवड झाली.

आता आज ३० मे २०१९ रोजी संध्याकाळी सात वाजता नरेंद्र मोदी परत एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या मंत्रिमंडळाचा देखील शपथविधी पार पडेल.

ह्या शपथविधी सोहळ्याशी निगडित काही रंजक बाबी जाणून घेऊया.

१. क्योंकी सिब्बल भी कभी एचआरडी मिनिस्टर थे

ह्यावेळी राहुल गांधींचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात दणदणीत पराभव करण्याचा विक्रम करून दाखवणाऱ्या स्मृती इराणी ह्या २००४ साली पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढल्या.

त्या प्रत्यक्ष कपिल सिब्बल ह्यांच्याविरूद्ध चांदणी चौकातून उभ्या राहिल्या होत्या. दुर्दैवाने तेव्हा त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

 

smruti inmarathi
livehindustan.com

 

त्यानंतर बरोबर दहा वर्षांनी स्मृती इराणी ह्या मंत्रिमंडळात तर समाविष्ट झाल्याच, शिवाय त्यांना मानव संसाधन विकास मंत्रालयाची जबाबदारी सुद्धा मिळाली जी २००९ ते २०१२ पर्यंत कपिल सिब्बल ह्यांच्याकडे होती. काळ फिरतो तो असा!

मागच्या शपथविधी सोहळ्याला स्मृती इराणी योगायोगाने कमळाचे डिझाईन असलेली साडी परिधान करून आल्या होत्या त्यांच्या साडीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

२. जेव्हा मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण एका चहावाल्याला मिळते तेव्हा!

मागच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींची चहावाला अशी हेटाळणी करण्यात विरोधकांनी कुठलीही कसर ठेवली नव्हती. त्यानंतर अशी काही मोदी लाट आली की त्यात भले भले वाहून गेले.

२०१४ च्या शपथविधी सोहळ्याचे सर्वांनाच आकर्षण होते आणि प्रत्येकाला असे वाटत होते की आपण ह्याची देही ह्याची डोळा हा सोहळा बघावा!

ह्या सोहळ्याचे प्रत्यक्षदर्शन होणे इतके सोपे नाही. मात्र शाहझाद इब्राहिमी ह्या उच्चशिक्षित चहावाल्याच्या नशिबात ही संधी होती. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवलेला शाहझाद त्याच कॅम्पसमध्ये एक ढाबा चालवतो.

 

ibrahim inmarathi
Sakshi.com

RSLP बिहारच्या एका नेत्याने नरेंद्र मोदींना जेव्हा शाहझादची प्रोफाइल दाखवली तेव्हा मोदींनी त्याला शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केले.

“एक चहावाला पंतप्रधान झाला आहे आणि त्यांनी एका सामान्य चहावाल्याला न विसरता ह्या सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे. मला खूप आनंद झाला आहे. मी ह्याचे शंब्दांत वर्णन करू शकत नाही.”

अश्या शब्दांत शाहझादने त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

३. भाजपचे नेते कामाला सुरुवात करण्याआधी ज्येष्ठ नेत्याला नमस्कार करतात तेव्हा!

आपल्या भारतीय संस्कृतीत कुठल्याही मोठ्या आणि महत्वाच्या कामाला सुरूवात करण्याआधी आपण आपल्या घरातील ज्येष्ठांचे ,गुरुजनांचे आशीर्वाद घेतो. त्यांना वाकून नमस्कार करतो. हीच प्रथा भाजपाच्या नेत्यांनी सुद्धा २०१४ साली पाळली.

 

advani_modi_emotional_inmarathi
indiatoday.com

आपले सगळे मतभेद आणि मनभेद बाजूला ठेवत कामाला सुरुवात करण्याआधी रवी शंकर प्रसाद, अनंत कुमार, स्व. गोपीनाथ मुंडे , शिवराज सिंग चौहान आणि नितीन गडकरी ह्या भाजप नेत्यांनी लालकृष्ण अडवाणी ह्यांची भेट घेऊन त्यांना वाकून नमस्कार करत त्यांचा आशीर्वाद घेऊन कामाला सुरुवात केली.

४. प्रत्येक मंत्र्याने ईश्वराला साक्षी ठेवून शपथ घेतली

 

sworn in inmarathi
indiatvnews.com

२०१४ साली जेव्हा रालोआच्या नेत्यांचा शपथविधी झाला तेव्हा प्रत्येक मंत्र्याने ईश्वराला साक्षी मानत आपापल्या मंत्रिपदाची शपथ घेतली.

कुठलाही मंत्री हिंदुविरोधी किंवा नास्तिक नाही असे ह्यातून दिसून आले. प्रत्येक मंत्री हा विविध पंथाचा असला तरी त्याने तिने ईश्वराला साक्षी ठेवून शपथ घेतली.

५. देशोदेशीच्या अतिमहत्वाच्या व्यक्ती आमंत्रित

देशाच्या पंतप्रधानांच्या शपथविधीला आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप महत्व असते. त्यामुळे या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अनेक मित्र देशांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्याची पद्धत आहे.

या पद्धतीचा भाग म्हणून मागच्या शपथविधीला मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह अनेक देशांच्या प्रमुखांना निमंत्रित केले होते.

 

modi-sharif-inmarathi
deccanchronicle.com

यावर्षीची विशेष बाब म्हणजे पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलेले नाही.

परंतु इतर अनेक देशांचे प्रमुख या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल हमीद यांच्यासह श्रीलंका, म्यानमार, मॉरिशस, नेपाळ, भूतान या देशांचे प्रमुख शपथविधीला उपस्थित राहतील.

६. इंग्लिशमधून शपथ

व्यंकय्या नायडू शपथविधीसाठी येईपर्यंत जवळजवळ सगळ्याच मंत्र्यांनी हिंदी भाषेतून शपथ घेणे पसंत केले.

 

vyankaiyyah inmarathi
BTVi.in

व्यंकय्या नायडू ह्यांनी मात्र इंग्लिशमधूनच शपथ घेतली. त्यांच्यानंतर सदानंद गौडा, नजमा हेपतुल्ला, मनेका गांधी, अशोक गजपथी राजू, हरस्मिरत कौर, सर्बानंद सोनवाल आणि निर्मला सीतारामन ह्यांनी सुद्धा साहेबांच्या भाषेत आपापली शपथ घेतली.

७. मोठ्या हस्तींची उपस्थिती

मागच्या शपथविधीच्या सोहळ्याला बॉलिवूडच्या ताऱ्यांनी सुद्धा हजेरी लावली होती. सलीम खान आणि जावेद अख्तर हे एकेकाळचे जानी दोस्त ह्या सोहळ्याला लांब लांब बसलेले होते.

हेमा मालिनी आपल्या पतीबरोबर म्हणजेच धर्मेंद्र बरोबर बसल्या होत्या. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन ह्या सोहळ्याला आलेच नव्हते. तर विनोद खन्ना, अनुपम खेर, पूनम धिल्लन, मधुर भांडारकर आणि विवेक ओबेरॉय मात्र सोहळ्याला उपस्थित होते.

 

celebs inmarathi
Chitramala.com

किरण खेर आणि सलमान खान सुद्धा प्रेक्षकांमध्ये बसलेले होते. ह्यांसह अंबानी बंधू- मुकेश व अनिल अंबानी आपापल्या कुटुंबासह आले होते पण त्यांनी एकत्र न बसता वेगवेगळ्या ठिकाणी बसून सोहळा बघणे पसंत केले.

तसेच गौतम अदानी सुद्धा आवर्जून हा सोहळा बघण्यासाठी आले होते.

८. गंगाकिनारी संसदभवन

२०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा वाराणसीच्या लोकांनी त्यांचा हा विजय गंगा नदीच्या किनाऱ्यावर संसद भवनाची प्रतिकृती तयार करून साजरा केला.

 

delhi-sansad-inmarathi
hi.naradanews.com

भाजप कार्यकर्ते आणि समर्थक ह्यांनी गंगाघाटावर आनंदतोत्सव साजरा केला. जे जे लोक त्या दिवशी गंगेत स्नान करण्यासाठी आले त्या सर्वांना मिठाई वाटून त्यांनी हा आनंद साजरा केला.

तसेच गंगानदीच्या दशअश्वमेध घाटावर गंगानदीला दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच भाजपाला करणारी भारतीय आवाम पार्टी (मुस्लिम स्त्रियांचा पक्ष) ह्यांनी सुद्धा पिलिकोठी भागातील भोलेशाह दिवान ह्यांच्या मझारवर चादर चढवून हा आनंद साजरा केला होता.

९. काँग्रेस नेत्यांची अनुपस्थिती

२०१४ साली भाजपाला प्रचंड बहुमत मिळाल्याने काँग्रेसला मोठाच धक्का बसला. अनेक काँग्रेसचे नेते हा धक्का आणि पराभव पचवू शकले नाहीत. आणि त्यांनी नाराज होऊन शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवली असे दिसते.

 

कारण काँग्रेसच्या नेत्यांपैकी अगदी थोडेच लोक सोहळ्याला उपस्थित होते.

ए अहमद, रेणुका चौधरी, अभिषेक मनु सिंघवी, जयराम रमेश, पी जे कुरियन आणि पी चिदंबरम हे नेते ह्या सोहळ्याला उपस्थित होते. इतरांना मात्र पराभव सहन झाला नाही असेच आपण म्हणू शकतो.

१०. ऐकावे ने नवलच!

असामी चित्रकार गौतम बर्धन भाजपा व मोदींच्या विजयाने इतके खुश झाले की त्यांनी चक्क आपल्या रक्ताने मोदींचे चित्र काढले.

 

gautam inmarathi
bharat rakshak

ह्या ३५ इंची चित्रात मोदींबरोबर स्वामी विवेकानंद सुद्धा आहेत तसेच आपला तिरंगा व शांततेचे प्रतीक असलेले पांढरे कबुतर सुद्धा काढलेले आहे.

आजच्या शपथविधी सोहळ्यात काय काय मनोरंजक बाबी घडतात ते आता बघूया.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?