' सरकारच्या मराठी आकड्यांच्या निर्णयावर विनोद पुरे – वाचा तज्ज्ञांचं विचारात पाडणारं निरीक्षण – InMarathi

सरकारच्या मराठी आकड्यांच्या निर्णयावर विनोद पुरे – वाचा तज्ज्ञांचं विचारात पाडणारं निरीक्षण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखिका : अंबुजा साळगावकर 

दुसरीच्या गणिताच्या नव्या पुस्तकात संख्या वाचू-लिहूया सदरात एकवीस ते शंभर संख्यांचे अक्षरी लेखन पारंपरिक मराठी संख्यावाचन पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने दिले आहे.

एकवीस ऐवजी वीस एक, बावीस ऐवजी वीस दोन असे वाचावे म्हणजे सत्त्याण्णव ऐवजी नव्वद सात असे येईल. या पद्धतीने वाचल्याने बरीचशी जोडाक्षरे गळतात, वाचन सुलभ होते असा मुख्य दावा आहे.

“जोडाक्षरे असणारे अनेक शब्द हे मुलांच्या मनात गणिताची नावड किंवा भीती निर्माण होण्याचे एक कारण आहे ते काढून टाकू. मात्र विद्यार्थ्यांकडून १ ते ५० एवढ्याच संख्यांचे लेखन अपेक्षित आहे हे लक्षात घ्यावे” अशी पुस्ती जोडली आहे.

नव्या पद्धतीत बोलणे आणि लिहिणे यांचा क्रम सारखाच राहतो. तसेच इंग्रजी व्यतिरिक्त कानडी, तेलुगु, मल्याळी आणि तमीळ या दक्षिण भारतीय भाषांमध्ये देखील संख्यावाचन याप्रकारे केले जाते व ते विद्यार्थ्यांना सोपे जाते, असे पुढे आणखी दोन दावे आहेत.

यापैकी एकही दावा मला तरी नि:संदेह मान्य करता आलेला नाही.

 

education blunder inmarathi

 

या संदर्भात गणिताची विद्यार्थिनी, संगणन-शिक्षिका आणि भाषेची अभ्यासक म्हणून मला स्वत:ला अनेक प्रश्न पडले. आम्ही अनेक सहकार्‍यांनी चर्चा करून त्यांची उत्तरे शोधली ती आणि सोबतच आमची कैफीयत इथे मांडत आहोत.

या प्रकरणाची सुरूवात झाली रविवारी सकाळी सकाळी माझ्या एका मित्राने पाठवलेल्या मेसेजने.

चांगला भौतिकशास्त्राचा पदवीधर, संगणकशास्त्रात पदव्युत्तर पदवी असलेला, मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांतून प्रोजेक्ट लीड पदावर देशविदेशात काम करून कौतुक कमावलेला हा पन्नाशीतला प्राणी, बायको पुण्यातल्या नामांकित महाविद्यालयातील गणिताची प्राध्यापिका असलेली, मुलीचे संगोपन हा प्राधान्यक्रम ठरवून दोघांनी जॉबला टाटा केला.

जर तो दुसरीतल्या कन्येला गणित शिकवण्यात, “हे नवीन आपल्याला झेपत नाही आणि शाळेत असं शिकविल्याने मुलं घरात आपलं ऐकत नाहीत” असे हताश उद्गार काढत असेल तर प्रकरण लक्ष घालायलाच हवे इतके गंभीर असणार हे मला जाणवले.

सरकार म्हणते ते सगळे झेपवण्याचा आपण प्रयत्न करू असे त्याला आश्वस्त करून मी नवी संख्यावाचन पद्धती काय आहे ते समजून घेतले.

या पूर्ण उपद्व्यापाचे उद्दीष्ट्य आपल्या भवतालच्या विद्यार्थी, पालक व शिक्षकांना नव्या धोरणाचे साध्य साध्य करण्यात मदत करण्यासाठी त्याचे बारकावे समजून घेणे हेच होते, आहे, राहील.

दुर्दैवाने आम्हाला तरी या पद्धतीत अनेक उणीवा आढळल्या. तसेच टेलिव्हिजन आणि वृत्तपत्रीय चर्चेतही नवी पद्धत स्वीकारण्याच्या निष्कर्षाप्रत येण्यात अभ्यासमंडळाने एखादी शास्त्रीय पद्धत अवलंबल्याचे व्यक्त झालेले नाही.

त्यामुळे आमच्यासारख्यांच्या मनातला गोंधळ संपविण्याचा मार्ग म्हणून प्रत्यक्ष मंत्रालयास पत्र लिहून खुलासा मागविणे हा मार्ग अवलंबत आहोत.

आपण क्रमश: एकेक दाव्यावर विवेचन करूया.

दावा क्रमांक १ :- नव्या पद्धतीत बरीचशी जोडाक्षरे गळतात.

सतावीस, अठावीस, बातीस, पंचतीस, छतीस, तेचाळीस, तेपन, एकसठ, बासठ, तेसठ, … एकाहतर, बाहतर, … , एकैंशी, बाऐंशी, … एकाणव, बाणव, तेणव, सताणव, अठाणव अशी रूपे मान्य केली की पन्नास, सत्तर आणि नव्वद वगळता एकाही संख्येत जोडाक्षर येत नाही.

 

math text book inmarathi

 

सुलभीकरणासाठी एकुण ऐवजी नऊ म्हणता येईल. म्हणजे अठावीस नंतर नौवीस, तीस असे. नव्या पद्धतीत पन्नास, सत्तर आणि नव्वद वर येणार्‍या प्रत्येकी नऊ अंकांची मिळून ऐंशीपैकी सत्तावीस म्हणजे किमान चौतीस टक्के अंकांची जोडाक्षराशिवाय सुटका नाही.

मी सुचवलेल्या बदलांसोबत आहे त्या पद्धतीत पनास, सतर आणि नवद अशी रुपे आणली तर संख्यावाचन शंभर टक्के जोडाक्षरमुक्त होईल त्यासाठी प्रचलित संख्यावाचनविधी बदलण्याची गरज नाही.

पण… मुलांना पाढ्याच्या तासाला पन्नास, सत्तर, नव्वद हे अंक आणि त्यापुढचे अंक म्हणताना जोडाक्षरामुळे एक उर्मी चढते त्या उर्मीस मात्र आपण मुकले असू…

संख्यावाचनातील जोडाक्षरे ही पाढे म्हणताना मुलांना उत्साह पुरवणारी स्थानं आहेत आणि त्यामुळे ती रूढ झालेली आहेत हे आज चाळीशीत किंवा त्यावर वय असलेले मराठी माध्यमात शिकलेले कुणीही आपले लहानपण आठवून नक्की सांगेल.

विषय निघालाच आहे म्हणून हे ही सांगून टाकते की संख्यावाचन हे शिक्षणाच्या आरंभीच्या काळात तरी संख्यांचा क्रम लक्षात राहण्यासाठी असते.

प्रचलित पद्धतीने क्रम म्हणताना प्रत्येक संख्येचे शेवटचे अक्षर सारखे येण्याने एक ताल मिळतो, म्हणून पहा, एकवीस, बावीस, तेवीस… तीसऽ, हा ताल नव्या पद्धतीत हरवला आहे. संख्यावाचनात होती ती ही यमकाची गंमत नव्या पद्धतीत हद्दपार झालीय हे नक्की.

जोडाक्षरांमुळे मुलांना अंकांची भीती वाटते हा एखाद्या सर्व्हेक्षणाचा निष्कर्ष असल्यास कृपया ते सर्व्हेक्षण जाहीर करावे, त्याची शहानिशा करणे आवश्यक वाटते. गणितातील जोडाक्षरे काढून मुलांना गणित आवडायला लागतेच असे धरून चालू.

भाषेचे काय? मुलांना फक्त गणितातील जोडाक्षरांची भीती वाटते असे नसणार. जोडाक्षर येणारे शब्दच प्रचारातून काढून टाकायचे ठरवले आहे का? की आवडो गणित आम्हा नावडो भाषा असे काही?

जोडाक्षरविना संख्यावाचन करून घेता येईल तसेच मग भाषेतून जोडाकषर या संकलपनेचीच हाकालपटी करायची नि सगळं सोपं झालं महणून टाळया वाजवायचया.

 

marathi numbers funny inmarathi
Pinterest

 

सर्व शब्दांची अशी जोडाक्षरविना नवी रूपे प्रमाणित करून जोडाक्षरमुक्त भाषाही आणता येईल. सुलभीकरण होणार का?

दीड अक्षराऐवजी दोन अक्षरे आली की अगदी सोप्या संभाषणातही आपल्याकडे १५-२०% जोडाक्षरे येतात त्या हिशोबाने सामान्य संभाषणातील वाक्यांची अक्षरसंख्या ६-७% तरी वाढेल. हा बदल स्वागतार्ह आहे का हे तपासून पहावे लागेल.

मराठी वर्णमालेत क्ष, त्र आणि ज्ञ ही तीन जोडाक्षरे चक्क मुळाक्षरांच्या तक्त्यांमध्ये स्थान पटकावून बसली आहेत ते उगाच असेल का?

गणितातील जोडाक्षरे काढून टाकून आपण भाषा शिकण्याच्या वयात अवघड गोष्टींच्या सरावाच्या काही सहज संधी संपवतो आहोत असे नाही का?

मात्र विद्यार्थ्यांकडून १ ते ५० एवढ्याच संख्यांचे लेखन अपेक्षित आहे हे लक्षात घ्यावे याचा अर्थ कळला नाही.

मोठ्या संख्या वाचता वा अक्षरी लिहिता येण्याची दुसरीत गरज नाही असा अर्थ लावला. पुढे व्यवहारात त्या लागतीलच. तेव्हा नव्या पद्धतीचे काय होते पहा. प्रत्येक दोन अंकी संख्येसाठी जिथे आपण प्रचलित पद्धतीत एक शब्द लिहिला असता तिथे दोन शब्द.

उदाहरणार्थ तेवीस लाख पंचेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर (२३४५६७८) ही संख्या वीस तीन लाख तीस चार हजार सहाशे सत्तर आठ अशी लिहावी लागेल. सहा ऐवजी नऊ शब्द म्हणजे लेखनाची लांबी दिडपट वाढली!

परवडणार का? साधे चेक लिहायचे घ्या, अक्षरी संख्या लिहिण्यास जागा आताच्या दिडपट पुरवावी लागेल. लिहीण्याचा वेळ आणि इतर संसाधनांचा व्यय त्या प्रमाणात होणार हे ओघानेच आले.

दावा क्रमांक २ :- नव्या पद्धतीत बोलणे आणि लिहिणे यांचा क्रम सारखाच राहतो.

मान्य. योग्य आहे का? आठवा, विसाशे (१२०), दहागेदोन (२१०), पंधरोदरसे (११५)… हे जुने वळण. त्याचे आपण एकशेवीस, दोनशेदहा, एकशेपंधरा असे सुलभीकरण स्वीकारलेच आहे.

 

childrens studying inmarathi
Jaago Re

संख्या उजवीकडून डावीकडे घडते हे समजावण्यास किमान एक अंकीची दोन अंकी कशी होते हे सांगणे आवश्यक आहे. म्हणून कदाचित आपण दोन अंकी संख्यांचे वाचन जुन्या वळणाचेच ठेवले होते.

नव्या पद्धतीच्या आगमनाने मराठीत मजकुराचे वाचन डावीकडून उजवीकडे होत असले तरी संख्येची घडण उजवीकडून डावीकडे होते हे समजावण्याचा शेवटचा खुंटा निखळून गेला…

दावा क्रमांक ३ :- इंग्रजी व्यतिरिक्त कानडी, तेलुगु, मल्याळी आणि तमीळ या दक्षिण भारतीय भाषांमध्ये देखील संख्यावाचन याप्रकारे केले जाते.

हो, पण त्या भाषांमध्ये सुरूवातीपासून ते तसे आहे. कालांतराने आणलेले नाही. शब्द घडताना ते उच्चारणसुलभ होण्यास घासून घेण्याची प्रक्रिया त्यांची त्या पद्धतीनुसार झालेली आहे ती आता आपल्याकडे कशी करणार?

 

tamil numbers inmarathi
Know Your Heritage

उदाहरणार्थ, हत्तु या दहा या अर्थाच्या शब्दापुढे वंदु हा एक या अर्थाचा शब्द येतो तेव्हा हन्नंद हा अकरा या अर्थाचा शब्द कानडीत बनतो.

पुढे हन्न्यर्ड, हन्नुर, हन्नाक, हन्नैद, हन्नार, हन्न्योळ, हन्योंट, हत्तंबत्त, असे हत्तु पुढे यरडू, मुरू, नाल्कु, ऐदु, आरू, योळू, योंटू, ओंबत्तु असे जोडून शब्दागणिक जोडाक्षर आणि त्यानंतर इपत्तु, इपतवंद, इपत्यरड… असे.

त्यांनी दोन शब्दांचे संधीशब्द बनवलेत ना… नव्या पद्धतीत सुचवल्याप्रमाणे दोन शब्द म्हणत नाहीत ते. तिथे संधीशब्द शक्य होण्याचं एक कारण मुरू आणि नाल्कु सोडून कानडीत उरलेले एकांक हे स्वर वा अर्धस्वरापासून सुरू होतात.

आपल्याकडे एक आणि आठ सोडून सगळे व्यंजनाने सुरू होतात त्यामुळे संधीशब्द पटकन बनणार नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे.

मराठीत प्रत्येक दशकानंतर एक आणि आठ या स्थानचे अंक मात्र संधीशब्द बनवू नका म्हटले तरी थांबायचे नाहीत. एक प्रयोग करूया. वीस एक, तीस एक, चाळीस एक… म्हणता म्हणता कोणती भावना होते? वीसेक, तीसेक, चाळीसेक…?

ज्यांचा अर्थ अंदाजे किंवा जवळपास वीस, तीस, चाळीस असा होतो. एकवीस, एकतीस आणि एकेचाळीस हा अर्थ त्यावर संगणकीय परिभाषेत बोलायचं तर ओव्हरलोड होणार. तीच गत पन्नास आठ ची. त्याचे पन्नासाठ म्हणजे पन्नास-साठ असे ऐकू येणार…

हे गोंधळ टाळण्यासाठी उच्चारांतील सूक्ष्म भेद शिकवणे हे जोखमीचे नाही असे कोणी भाषाविदाने सांगावे.

दक्षिणी मुलांना काय सोपे जाते, किती सोपे जाते, संधीशब्दाचे त्या सोपे जाण्यात योगदान किती असे काही संशोधन झालेय का? त्यावरून आपल्या अपेक्षित सुलभीकरणासंदर्भात काही संख्यात्मक अंदाज वर्तवता येतील का?

आपला सुलभीकरणाचा नवे संख्यावाचन हा प्रयोग समजून घेऊन खानदानी शिक्षकाचा पिंड असलेल्या माझ्या एका सखीने विचारले तुझ्यासारखे छप्पन बघितलेत हे आता काय तुझ्यासारखे पन्नास सहा बघितलेत असे म्हणायचे का?

 

teachers inmrathi
thebetterindia.com

माझे उत्तर अर्थातच हो असे होते. त्यात तो पंच कसा आणायचा? म्हणजे दक्षिणी भाषेत तो कसा आणतात असे तिने विचारले. इथे संधीशब्दाचे महत्त्व नजरेआड करून चालणार नाही हे कळते.

कानडीत मूळ ऐवत्तु + आरू चे ऐवत्तारू आणि त्याचे पुढे बोलताना ऐवतार असे ग्राह्यरूप आहे.

आणि निवेदनात ”इंग्रजी व्यतिरिक्त” हा शब्दप्रयोग केलाय खरा पण त्यात काही खास दम दिसत नाही. कारण वर दाखवल्याप्रमाणे कानडीत ही पद्धत दहानंतरच चालू होते. आपण का अकरा, बारा म्हणतो आहोत?

दहा एक, दहा दोन का नाही? दहा नंतर बदल होणे स्वाभाविक आहे. विसानंतरचा बदल हा टीन्ससोडून आणखी कोणत्या पायावर अवलंबून सुचवला आहे हे कळवावे.

अकरा ते अठरा या संख्यांचे वाचन कसे बनले याचा विचार केला तर लक्षात येईल की मुळात या एकदहा, बादहा, तेदहा, चौदहा, पंचदहा, सदहा, सतदहा, अठदहा अशाच असणार.

नव्या पद्धतीत संख्या घडणीची प्रक्रिया शिकवण्याचा शेवटचा खुंटा गेला असे मी वर म्हटले पण अकरा ते वीसच्या वाचनाला धक्का न लागल्याने बहुतेक चुकूनच पण खुंट्याचे कुस तरी राहिलेय हे समजून हुऽऽश्श्य झाले. बुडत्याला काडीचा आधार…

आता पुढे जाऊ. प्रचलित पद्धत ज्यांना रुचते त्यांनी ती ठेवायला हरकत नाही असे म्हटले आहे. जुन्या वळणात वीस सात म्हणजे १४० होतात. आता नव्या-जुन्यांचे संभाषण कसे जुळायचे?

 

marathi multiplication inmarathi
YouTube

जुन्या पद्धतीने शिकलेल्या दुकानदारांसोबत ही नव्या पद्धतीत शिकलेली मुले आत्मविश्वासाने हिशोब-व्यवहार करू शकतील का? की त्यांचे आपल्यापेक्षा वेगळे आहे म्हणून मूक होतील?

व्यवहारात वीस सात नव्हे, वीस आणि सात किंवा विसावर सात असे म्हणण्याची गरज अशीही अधोरेखित होते. आणि हे मान्य केले तर नवीन संख्यावाचनात नाविन्य राहात नाही. पारंपरिक पाढे पाठ म्हणण्याच्या पद्धतीतच मुळी कसे काढायचे सतावीस? वीसवर सात सत्तावीस.

कसे काढायचे अठ्ठावीस? वीसवर आठ अठ्ठावीस असे अगदी गाणं किंवा परवचा म्हटल्यासारखे सुरात सगळे ओळीने म्हणायचेच असते! ते कुणाला अवघड वाटल्याचे मी तरी कधी ऐकले नाहीये. उलट पाढे म्हणण्याचा शाळकरी मुलांचा उत्साह खूपदा खूप जवळून अनुभवलाय.

आठवलेच म्हणून सांगते, आमच्या दुसरी-तिसरीच्या वर्गात मधल्या जेवणाच्या सुट्टीनंतर पहिला पाठ पाढे म्हणणे हा असे. कोणाला झोप बिप येत असली तर उडून जाईल इतक्या दणक्यात हा पाठ चाले.

कसे काढायचे नव्याण्णव? नव्वदावर नऊ नव्याण्णव म्हणून झाल्यावर कसे काढायचे शंभर? दहावर पूज्य (शून्य) शंभर हे इतक्या जोसात म्हटले जायचे की वर्गाचे छप्पर उडेल एक दिवस असा प्रेमळ कौतुकवजा इशारा बाई किंवा गुरूजीकडून रोजच ऐकायला मिळायचा आणि आम्ही खुषीत पुढचे शिकायला तयार व्हायचो.

पाढ्याच्या पाठात अ पुढे ऐ येऊन संधी झाला तर य मध्येच घुसतो हे जिव्हामार्गे मेंदूपर्यंत पोहोचून नोंदवले जायचे. जोडाक्षर आले म्हणून कोणी मागे सरकण्याचा प्रश्नच नाही. ते असे आपलेच होऊन गेले आणि पुढेही कामी आले.

 

jodshabda inmarathi
FlipHTML5

शेवटी नियमनाने सुलभीकरणाचा नारा असणार्‍यांसाठी मी इथे एक आठवण करून देणार आहे.

गणितातील फक्त संख्यावाचनच कशाला, सर्वच संज्ञासुद्धा जोडाक्षरविरहित करून घेणे शक्य आहे आणि ते तसे कोणत्याही शास्त्रासाठी शक्य आहे कारण शास्त्रीय संकल्पना या कल्पनांसारख्या अगणित आणि व्यक्तिसापेक्ष नसतात.

मानवी भाषेतील शब्दांचा / रचनांचा एक छोटा उपसंच शास्त्रीय मांडणीसाठी पुरेसा असतो.

सामान्यत: प्रोग्रामिंग लॅंग्वेजमध्ये आवश्यक कळीच्या शब्दांची आणि मान्यताप्राप्त रचनांची संख्या काही शेकड्यात असते आणि तिच्या आधारे आपण कितीतरी जटील समस्यांची उकल करणार्‍या मोठमोठ्या प्रणाली लिहीत असतो. हा प्रयोग भारताला खरे तर नवा नाही.

नव्यन्याय (इंडीयन लॉजिक) या भारतीय दर्शनामध्ये शास्त्रीय संकल्पनांच्या अचूक मांडणीसाठी तत्कालीन प्रचलित अशा संस्कृत भाषेचा एक अगदी छोटासा उपसंच विद्वानांना पुरला.

मात्र त्या उपसंचातील शब्दांचे शास्त्रीय परिभाषेतील एकास-एक या धर्तीवरचे अर्थ हे बोली संस्कृतमधील त्यांच्या अर्थांशी जुळते असले तरी बोली संस्कृतचे प्रवाहीपण तिथे अपेक्षित नसल्याने सामान्यांना नव्यन्याय ही भाषा गाणितासारखीच वाटते.

आज घडीला नव्यन्यायभाषा अवगत असणार्‍यांची तुलना संस्कृत अवगत असणार्‍यांच्या तुलनेत चक्क नगण्य आहे. प्रोग्रामिंग लॅंग्वेज किंवा सिंबॉलिक लॉजिकमध्ये आपल्या विचारांची मांडणी करू शकणारेही मोजकेच असतात.

त्यांजजवळ उत्तम भाषाकौशल्य असते असेही नाही. किंबहुना गणित, प्रोग्रामिंग हे विषय ऐकून अनुकरण करण्यास मर्यादा असणार्‍या मूक-कर्णबधीरांसाठी कदाचित वरदान ठरू शकतील असाही एक प्रवाह आहे.

 

fadanvis_inmarathi
indianexpress.com/

आज आधीच मराठी आणि मराठी माध्यमाच्या शाळेतील शिक्षक-विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल साशंकता असताना जोडाक्षर या मराठीचा अविभाज्य भाग असलेल्या संकल्पनेचा बाऊ करून एका अभ्यासविषयातून तो वगळण्याचा असफल प्रयत्न,

अक्षरश: द्राविडी प्राणायाम, यास परिणामांचा विचार करता रोगापेक्षा इलाज भयंकर यापेक्षा उक्ती सुचत नाही. अभ्यासमंडळाने उपरोल्लेखित सर्व शंकांचे शास्त्रीय कसोटीवर तपासून पाहता येईल असे निराकरण जनहितार्थ जाहीर करावे.

त्यातून इष्ट बदलाला अतिशय उत्साहाने सामोरे जाणारे अनेक व्यासंगी शासनाबरोबर राहून अपेक्षित बदल रूळवण्यात हातभार लावतील, बदल यशस्वी होईल असे वाटते.

( लेखिका मुंबई विद्यापीठाच्या कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहेत )

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?