' एव्हरेस्ट विजेत्या तेनसिंगच्या प्रत्यक्ष भेटीचा असाही अनुभव! – InMarathi

एव्हरेस्ट विजेत्या तेनसिंगच्या प्रत्यक्ष भेटीचा असाही अनुभव!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखिका : वासंती खांडेकर – घैसास

===

२९ मे १९५३… सकाळी ११.३०…जगाच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण…  सर्वोच्च ‘माऊंट एव्हरेस्ट’ जिंकलं सर एडमंड हिलरी व तेनसिंग नोर्गे यांनी…  पर्यटनाचं पाहिलंच वर्ष…एक सुवर्णयोग…’तेनसिंग’ च्या घरी…’दार्जिलिंग’ला…

ऑक्टोबर,१९८१.आमचा शालेय जीवनातील हिरो,एव्हरेस्ट विजेता तेनसिंग च्या घरी “चहा”ला जाण्याचा योग आला.निमित्त होतं इचलकरंजीच्या ‘फाय फाउंडेशन’ तर्फे तेनसिंगला देण्यात येणा-या पुरस्कार समारंभाचं आमंत्रणपत्र देण्याचं.कसा असेल हा हिमशिखरांचा राजा ? काय बोलेल? काय बोलावं ? थरारक तंद्रीत दार्जिलिंग मधील टेकडीवजा उंचवटयावरील तेनसिगच्या “घांगला” (म्हणजे कूळ) या देखण्या निवासस्थानाबाहेर दाखल झालो.

भल्या मोठया जंगली कुत्र्यांपासून ते छोटया ‘पपीज’ पर्यंतच्या अनेक कुत्र्यांनी जोरदार भुंकून स्वागत सलामी अन पाहुणे आल्याची वर्दी दिली. तेनसिंगचं श्वानप्रेम सर्वश्रुत होतं.त्याचा एक कुत्रा त्याच्याबरोबर हिमालयातील एका मोहिमेतही सहभागी होता.

 

tensing1-inmarathi
facebook.com

एवढया मोठया श्वान फौजेतून आत कसं जावं,विवंचनेत असताना पारंपरीक पोशाखातील एका गौरवर्णीय मध्यमवयीन बाईंनी कुत्र्यांना आवरत धावत येऊन फाटक उघडलं; अन हसतमुखाने स्वागत करून आत्मियतेने किमती गालिच्यांनी सजवलेल्या छोटेखानी दिवाणखान्यात आणून बसवलं. ती होती स्वतः निष्णात ट्रेकर असलेली तेनसिंगची पत्नी “डाकू तेनसिंग”. एव्हरेस्ट विजयानंतर मिळालेल्या नानाविध भेटवस्तू, गौरव, स्मृतीचिन्हे; पं.जवाहरलाल नेहरू,सर एडमंड हिलरी यांच्याबरोबरची वेधक छायाचित्रे; यांनी दालन झळाळून गेलं होतं.

तेथील ऐश्वर्य पाहून डोळे दिपून गेले असले तरी डोळे लागले होते ते एव्हरेस्ट विजेत्याच्या आगमनाकडे.

तेवढयात हिमालयन हास्य करत उंचापुरा, रापलेल्या गो-या रंगाचा, रुंद बांध्याचा तेनसिंग झटकन बाहेर आला. डोळ्यावर काळा चष्मा, अंगात लाल जर्किन. प्रत्येकाशी हस्तांदोलन करत त्याने मुलांसह सर्वांची एवढया आपुलकीने विचारपूस केली की आम्ही जणू त्यांचे अनेक वर्षांपासूनचे स्नेही होतो. प्रभावी व्यक्तित्वाचा “तो आला,त्याला पाहिलं,आणि त्याने जिंकलं” अशी भारावलेली अवस्था.

‘फाय फाउंडेशन’ च्या सत्कार समारंभाचं निमंत्रणपत्र देताच,उघडूनही न बघता त्याने ते पत्नीच्या हातात दिलं.आपल्या बायकोला तो देत असलेला ‘मान’ पाहून खरं तर तिचा हेवाच वाटला.

पर्यंत दूरचित्रवाणीवरही न बघितलेला ‘तेनसिंग’ साक्षात समोर बसलेला असूनही भारावलेपणामुळे तोंडातून शब्द फुटेना. अखेर मदतीला आला नेहमीचा प्रश्न… “एव्हरेस्ट गाठल्याचा अत्युच्य क्षणी प्रथम कोणाची आठवण आली? देव,देश की घर-कुटुंब ?” हा प्रश्न अपेक्षित असल्याने की काय, उत्तर लगोलग आलं.

“इतक्या वर्षांचं स्वप्न साकार झाल्याने मी इतका भारावून गेलो होतो की तत्क्षणी कोणीच आठवले नाही. अर्थात देव तर पाठीशी नेहमी असतोच”.

बायकोची आठवण आली नाही ? बायको कडूनही काहीच प्रतिक्रिया नाही ? संभ्रमावस्थेतील प्रश्नांकित चेहरे बघून त्यांनीच खुलासा केला. “एव्हरेस्ट सर केलं तेव्हा होती ती माझी पहिली पत्नी. तिच्या दुर्दैवी मृत्यूनंतर मी तिच्या लहान बहिणीशी लग्न केलं; ती ही आत्ताची पत्नी.”

sherpa-tenzing-inmarathi

संभाषणाच्या ओघवत्या धारेतून पुढे समजलं की तेनसिंगला इंग्रजी लिहायला, वाचायला येत नाही; मात्र सरावाने तो उत्तम इंग्लिश बोलू शकतो. त्यामुळे ‘टयूब पेटली’, त्याने ते इंग्रजीतील पात्र ताबडतोब बायकोच्या हाती का ठेवलं ते. सुशिक्षित डाकू तेनसिंग त्याच्या सेक्रेटरीचंही काम करत असावी. १९५३ मधील यशस्वी एव्हरेस्ट मोहिम ही शेर्पा तेनसिंग यांची काही पहिली एव्हरेस्ट चढाई नव्हती. १९३५ पासून त्यांनी तब्बल सात अयशस्वी एव्हरेस्ट मोहिमांत भाग घेतला होता. एकदा तर खराब हवामाना मुळे त्यांना काही फुटांवरून माघार घेणं भाग पडलं होतं.

अपयशाने खचून न जाता त्यांनी जिद्दीने प्रयत्न चालूच ठेवले. अखेर सर एडमंड हिलरी यांच्या नेतृत्वा खालील मोहिमेत २९ मे, १९५३ रोजी एव्हरेस्ट पादाक्रांत करण्यात यश मिळालं. त्यानंतर मात्र त्यांनी एकाही एव्हरेस्ट चढाईत भाग घेतला नाही.

एव्हरेस्टवर प्रथम पाऊल ठेवणारा म्हणून तेनसिंगचा जगभर गौरव झाला. हिमालयातील लहानशा खेडयात जन्मलेल्या या अशिक्षित गरीब शेर्पावर चहूकडून कीर्ति,संपत्तीचा वर्षाव झाला.

ओसंडून जाणा-या ऐश्वर्याच्या खुणा दार्जिलिंग मधील त्याच्या आलिशान घरात पदोपदी नजरेस पडत होत्या. त्यांत माझ्या मुलाला “शू” लागल्याने आतपर्यंतच्या वैभवसंपन्नतेचा नजराणा दृष्टिस पडला. नोकर-चाकर दिमतीला असणा-या तेनसिंगची दोन मुलं ‘पब्लिक स्कुल’ मध्ये, तर मुलगी अमेरिकेत शिकत होती.

 

tenzing-inmarathi
itv.com

गिर्यारोहणप्रेमी पंडित नेहरूंनी तेनसिंगवर अतोनात प्रेम केलं. त्यांच्याच प्रेरणा, पुढाकाराने दार्जिलिंग मध्ये हिमालयन माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात येऊन ‘तेनसिंग नोर्गे’ यांची संस्थेचा पहिला ‘फिल्ड ट्रेनिंग डायरेक्टर’ म्हणून नेमणूक करण्यात आली. या सन्मानित पदामुळे त्यांना जगभरात पर्वतारोहण करता आलं.

न्यूझीलंडच्या सर एडमंड हिलरी यांनी त्याला काही काळ ‘स्वित्झर्लंड’मध्ये ट्रेनिंग देण्यासाठी आमंत्रित केलं होतं.

गप्पाष्टक संपता संपत नव्हतं म्हणण्यापेक्षा संपवत नव्हतं.काय काय अन किती किती विचारावं असं होऊन गेलं.बोलावलं होतं “चहा”ला;पण इतक्या प्रकारांची बंगाली मिठाई, स्वादिष्ट पदार्थ होते की जेवणंच झालं.दार्जिलींगला बाहेर हॉटेलात कुठे न मिळाणा-या अस्सल ‘दार्जिलिंग टी’ नंतर पाय निघत नसला तरी उठणं,निघणं क्रमप्राप्त होतं.तेनसिंग स्वतः बाहेरच्या दरवाजा पर्यंत निरोप द्यायला आले याचं विशेष कौतुक वाटलं.

आज इतक्या वर्षांनंतरही हे भेट दृष्य नजरेसमोर जसंच्या तसं तरळतंय…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?