' योग्य वेळी संपलेली प्रेमकथा.. तुला पाहते रे ! – InMarathi

योग्य वेळी संपलेली प्रेमकथा.. तुला पाहते रे !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

लेखक : वैभव तुपे

===

डेली सोप्स म्हटलं की डोळ्यासमोर अनेक मालिका आणि त्यांची अफलातून पात्रं डोळ्यासमोर येतात. साधारण नव्वदच्या दशकाच्या सुरूवातीला दूरदर्शन हा एकमेव पर्याय असतांना सुद्धा मालिका होत्याच, पण त्यांचे “डेली सोप्स” मध्ये रूपांतर झालेलं नव्हतं.

आठवड्यातून एक दिवस मालिकेचा फक्त एकच भाग पाहायला मिळायचा. दुसर्‍या दिवशी दुसरी मालिका, असं आठवडाभर सुरू असायचं आणि त्यामुळेच त्यांची संख्या सुद्धा मर्यादित होती.

त्यातही धार्मिक, पौराणिक, फँटसी, आणि थोड्याफार डिटेक्टिव्हगिरी करणार्‍या जासुस लोकांच्या कामगिरीच्या कथा असं साधारण मालिकांचं स्वरूप होतं.

(आठवा जरा.. महाभारत, चंद्रकांता, अलीफ लैला, व्योमकेश बक्षी, रमेश भाटकरांचा इन्स्पेक्टर धनंजय… अजूनही बरीच नावं!) हळूहळू झी, सोनी यांसारख्या खाजगी वाहिन्या सुरू झाल्या.

 

doordarshan1
AbhiSays.com

सुरूवातीला चांगलं मनोरंजन मूल्य असलेल्या कितीतरी मालिका या वाहिन्यांवर चालू होत्या. आठवड्यातून एक दिवस दाखवल्या जाणार्‍या या मालिका नंतर हळूहळू डेली सोप्स मध्ये कधी बदलल्या हे प्रेक्षकांनाही कळलं नाही!

मराठी पुरतं बोलायचं झालं तर मराठीत याची सुरुवात झाली अल्फा मराठी नावाच्या वाहिनीने, हीच अल्फा पुढे “झी मराठी” झाली. नंतर इतरही अनेक मराठी वाहिन्या आल्या ज्या आजही इमानेइतबारे या डेली सोप्सचा रतीब घालत आहेत.

असो.. नमनालाच घडाभर पेक्षा जास्त तेल घालून झालंय, आता मुद्द्यावर येऊया!

डेली सोप्स म्हटलं की अगदी आपल्याला माहीतही नसतील इतक्या असंख्य मालिका सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर पेक्षकांचं मनोरंजन (!) करत आहेत. आजचा आपला विषय आहे “तुला पाहते रे..” ही झी मराठीची मालिका!

शनिवारी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला आणि मालिका संपली. साधारण वर्षभरापूर्वी चालू झालेली ही मालिका इतर मालिकांच्या पठडीतली असेल असं सुरूवातीला वाटलं होतं.

जसंजसं कथानक पुढे सरकत गेलं तसंतसं ही सासू सून छाप मालिका नसल्याचं लक्षात येत गेलं.

 

tula-pahate-re
Zee Marathi

एक सर्वसामान्य घरातली मुलगी इशा तिच्यापेक्षा वयाने बर्‍यापैकी मोठ्या असणार्‍या विक्रांत या करोडपती माणसाच्या प्रेमात पडते आणि मग त्याच्याशी लग्न सुद्धा करते नंतर त्यांच्या आयुष्यात जे जे काही घडत जातं ते या मालिकेचं कथानक!

ती पहिल्या जन्मातसुद्धा त्याची पत्नी असल्याचं काही घटनांमधून समोर येतं, हा त्यातला त्यात एक ट्विस्ट, इतक्या सामान्य आणि अजिबात नावीन्य नसलेल्या कथानकावर आधारलेली ही मालिका!

पण तरीही तिच्या वेगळेपणाचा एक ठसा प्रेक्षकांच्या मनात उमटवण्यात यशस्वी झाली असंच म्हणावं लागेल.

“शेवट सगळं गोड” या पारंपरिक अपेक्षेला काहीसा तडा देत शेवटच्या क्षणी मालिकेचा नायक असणारा विक्रांत त्याने ज्या ठिकाणी राजनंदिनीला मारलं त्याच ठिकाणी स्वतः आत्महत्या करतो आणि कथानक संपतं!

सुबोध भावे सारखा कसलेला अभिनेता नायक असला तरी त्याच्या मानाने नवखी असलेली गायत्री दातार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल की नाही याची शंका यायला मालिकेच्या सुरूवातीला बराच वाव होता.

मध्यंतरी सोशल मीडियात गायत्री दातारला बर्‍यापैकी ट्रोल सुद्धा करण्यात आलं. पण कथानक पुढे सरकत गेलं आणि इशामधली नायिका प्रेक्षकांना भावत गेली. पुनर्जन्माचा घासून घासून गुळगुळीत झालेला फॉर्म्युला असूनही मालिका लोकप्रिय झाली याचं श्रेय सुबोध आणि इतर सगळ्या कास्टला आहे.

 

Tula Pahte re cast
Maharashtra Times

त्याचबरोबर ते मालिका योग्य वेळी थांबवणार्‍या कथानकाला सुद्धा आहे.

मालिका जसजशी लोकप्रिय होत जाते तसतसं कथानक लांबवत नेणं ही आजकालच्या मालिकांची खासियत आहे.

(खरं तर खासियत नसून ती “गरज” आहे!) टीआरपी वाढवायचा, किमान तो घसरू न देता आहे तितका टिकवून ठेवायचा यासाठी लांबत गेलेल्या मालिका पाहिल्या की गिर्‍हाईक वाढलं म्हणून दुधात पाणी वाढवणारे दूधवाले आठवतात.

तुपारे (हा सुद्धा प्रेक्षकांनीच शोधलेला शॉर्टफॉर्म!) ही त्या पठडीत अडकून पडली नाही म्हणूनच यशस्वी झाली असं खरं तर म्हटलं पाहिजे. कथानक खुलवायच्या नादात कथा नको इतकी लांबवत न नेता योग्य त्या वळणावर संपली म्हणूनच प्रेक्षकांच्या लक्षात सुद्धा राहील नक्की!

नाहीतर वर्षानुवर्षे सुरू असणार्‍या मालिका पाहिल्या की मालिका सुरू होतांनाची पात्रं कथानक, आणि नंतर काही दिवसांनी दिसणारी पात्रं आणि कथानक यात थोडेसे सुद्धा मिळते-जुळते काही दिसत नाही.

 

Char-Divas-Sasuche-Etv-marathi-Serial-Ends
MarathiStars.com

शिवाय मालिकांच्या नावांचा कथानकाशी नक्की काय संबंध असतो हा सुद्धा संशोधनाचा विशी आहे सध्या, यात सुद्धा तुपारे बर्‍यापैकी लॉजिकल वाटते.

मध्यंतरी पूर्वजन्मीची राजनंदिनी, तिचं घर, दादासाहेब (तिचे वडील) मालिकेत अवतरली होती, ती सुद्धा अगदी परफेक्ट अशीच वाटली. नाहीतर काही वेळा सध्याचा जन्म संपायला येतो तरी पुनर्जन्माचं कथानक संपायचं नाव घेत नाही.

विक्रांतवर एकतर्फी प्रेम करणारी, इशा त्याच्या आयुष्यात आल्यावर अस्वस्थ झालेली, सुरूवातीला सतत इशाला पाण्यात पाहणारी, मात्र सत्य काय आहे ते समोर आल्यावर तितक्याच विश्वासाने इशाला साथ देणारी मायरा.

विक्रांतचं सतत भलं पाहणारा आणि त्यासाठी विक्रांतचीच हातून मरण पत्करणारा त्याचा पूर्वीपासूनचा मित्र जिवलग विलास झेंडे, जयदीप, त्याची सो कॉल्ड हायक्लास बायको, आईसाहेब, मध्येच अवतरलेला विक्रांतचा जुना दुश्मन जालिंदर.

परफेक्ट मध्यमवर्गीय पात्रं असणारे इशाचे आईबाबा, मित्र-मैत्रिणी, चाळकरी, छोटीशी पण महत्वाची भूमिका असणारे टिल्लू कुटुंबिय सगळी पात्रं अगदी जितकी हवीत तितकीच मोजून मापून आलेली!

कुठेही आतिषयोक्ती नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजिबात न भरकटलेलं कथानक! विक्रांतची भूमिका दमदार वठवणारा सुबोध आणि त्याची नायिका इशा साकारणारी गायत्री, तिची मध्यमवर्गीय आई साकारणार्‍या गार्गी फुले.

 

cast
Times of India

मुलीचा मध्यमवर्गीय बाप परफेक्ट साकारणारे मोहिनीराज गटणे या सगळ्या कलाकारांना या मालिकेच्या यशाचं श्रेय निर्विवादपणे जातं. अर्थात पडद्याच्या मागेही अनेक राबते हात यात अंतर्भूत असतातच, पण एक सामान्य प्रेक्षक म्हणून पाहिलं तर पडद्यामागच्या कलाकारांपेक्षा पडद्यावर दिसणारे कलाकार नक्कीच जास्त लक्षात राहतात.

अगदी एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर “योग्य वेळी संपलेली प्रेमकथा” असंच मालिकेचं वर्णन करता येईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?