हस्तिदंताच्या तस्करीचे रक्तरंजित सत्य – मानवी क्रूरतेची हद्द!
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
हत्ती हा एक अत्यंत शांत स्वभावाचा प्राणी आहे. जर आपण त्याला उकसवले नाही तर तो माणसाला कुठलीही इजा पोहचवत नाही, पण नेहमीप्रमाणे माणूस स्वार्थी वृत्तीच दर्शन घडवतो. हस्तिदंत हा एक अनमोल असा अवयव आहे. ज्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यासाठी हजारो हत्तीची शिकार केली जाते. त्यामुळे हत्तींच्या अस्तित्वाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

अफ्रिकेत दर पंधरा मिनिटाला एका हत्तीची हत्या शिकऱ्यांकडून केली जाते, २००७ पासून २०१४ पर्यंत तब्बल १ लाख ४० हजार हत्तींची हत्या अवैधरित्या करण्यात आली आहे. त्यांच्या रक्तबंबाळ शरीराला कुठे तरी फेकून देण्यात येते. या प्रश्नावर अनेक देशांनी पुढाकार घेऊन हत्ती संरक्षणासाठी उपाययोजना चालू केल्या आहेत .
१९८९ पासून आंतरराष्ट्रीय हस्तिदंत तस्करीवर बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील अमेरिका, चीन, इंग्लंड या देशात हस्तिदंताचा अवैध व्यापार मोठ्या प्रमाणावर होतो. जर असंच सुरू राहिलं, तर हत्तींचे हत्यासत्र सुरूच राहील आणि हा उमदा असा विशालकाय प्राणी विनाशाच्या दरवाज्यात उभा राहील.

आता चीन व अमेरिकेने ह्या संदर्भात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. चीन हे जगातील हस्तिदंताची सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि चीनने स्थानिक हस्तिदंत तस्करीवर २०१७ पर्यंत बंदी आणण्याची घोषणा केली होती. जर इंग्लंड आणि अमेरिकेने अशी पावलं उचलली तर हा खुनी व्यापार थांबवण्यात निश्चितच खूप मोठी मदत होणार आहे.
हत्ती संरक्षणासाठी पुढाकार घेत संयुक्त राष्ट्र संघाने हस्तिदंताची तस्करी रोखण्यासाठी, हत्ती संवर्धनासाठी ‘१२ ऑगस्ट’ हा जागतिक हत्ती दिवस म्हणून घोषित केला आहे. ह्या बरोबरच अनेक प्राणी संरक्षण संस्था, विविध देशांच्या वन संरक्षक संस्था यांनी पुढाकार घेऊन हत्तींच्या संरक्षणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले असून, हस्तिदंतासाठी होणाऱ्या हत्या रोखण्यात ते काही प्रमाणात यशस्वी देखील झाले आहेत.
हस्तिदंताचा वापर प्रामुख्याने आभूषणे बनवण्यासाठी केला जातो, या आभूषणांची किंमत आज कोट्यावधींच्या घरात आहे. हस्तिदंताचा वापर शिल्प व सजावटीच्या वस्तू बनवण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर केला जातो. हस्तिदंत ही एक पवित्र गोष्ट मानली जाते व ती घरात राहिल्याने समृद्धी येते असा देखील अनेक देशातील लोकांचा समज आहे. चीन व इतर दक्षिण आशियाई देशात हस्तिदंत औषध बनवण्यासाठी वापरले जातात. ही पारंपरिक औषधं हाडांचे विकार दुरुस्त करतात असे येथील लोक मानतात. हे सत्य आहे अथवा नाही याची शाश्वती मात्र कोणीच द्यायला तयार नसतं!
१९ व्या शतकात ज्यावेळी युरोपियन साम्राज्य आफ्रिकेवर पसरलं, त्यावेळी एकेकाळी २६ दशलक्ष एवढी असलेली हत्तींची संख्या निम्म्याहून कमी होऊन १० दशलक्षावर आली आणि हे सर्व फक्त एक शतकात घडले. यावरून आपण विचार करू शकता की, हत्तींची हत्या केवढ्या मोठ्या प्रमाणावर करण्यात आली असेल. २०व्या शतकाच्या सुरुवातीला ही संख्या १.३ दशलक्ष इथपर्यंत खाली आली. याचं मुख्य कारण होतं युरोप कडून होणारी बेसुमार मागणी.

१९५०-६० च्या काळात स्वतंत्र झालेल्या आफ्रिकन राष्ट्रांनी नंतर वन्यजीव संरक्षण कायदे बनवले आणि हत्ती संरक्षण करण्यासाठी अभयारण्य निर्माण केले. एवढं सर्व करून देखील ह्या हत्या थांबल्या नाहीत. त्या सुरूच राहिल्या. १९८० सालापर्यंत २५० हत्तींची प्रति दिवस हत्या केली जात होती. दशकाच्या शेवटी ६ लाखापेक्षा कमी हत्तींंचे अस्तित्व उरले. एकट्या केनियात ८९% इतकी घट हत्तीच्या संख्येत झाली. यामुळे आफ्रिकन हत्तींची प्रजाती विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे.
आफ्रिकेतल्या हत्तींंप्रमाणेच आशियाई हत्तींंची देखील मोठ्या प्रमाणावर शिकार करण्यात आली. त्यांच्या हस्तिदंतांची तस्करी करण्यात आली. आशिया खंडातील १३ देशात आशियाई हत्तींंचे अस्तित्व आहे. प्रचंड शिकारी व हत्यासत्रांमुळे त्यांची संख्या जगभर ४० हजार इतकी कमी झाली. ही आफ्रिकन हत्तींच्या दहापट कमी आहे. यासाठी केवळ हस्तिदंत तस्करिच जबाबदार नसून आशियातील वाढत जाणारी लोकसंख्या, त्यानुरूप वाढत जाणारंं शहरीकरण व कमी होत जाणारं हत्तींंचं निवास क्षेत्र, यामुळे हत्तींची संख्या फार रोडावली आहे. त्यांचे फिरस्तीचे व मायग्रेशनचे मार्ग बदलले गेल्यामुळे त्यांचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याबरोबरच रबरच्या झाडांची व कॉफीची वाढत जाणारी शेती त्यांचे निवास व भ्रमण क्षेत्र नष्ट करत आहेत. त्यामुळे हत्तीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

हत्तीला पुराणकालीन महत्व आहे, गणपती बाप्पाचंं दर्शन आपल्याला हत्तीमध्ये होत असते. हत्ती सदैव मानवी मित्र ठरला आहे. असा हा सुंदर विशालकाय प्राणी आज माणसाच्या अतिरेकी हव्यासापायी विनाशाच्या दिशेने चालला आहे. त्यामुळे आज हत्तींंचे संरक्षण गरजेचे आहे व त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहेत. जर असे झाले नाही तर एकदिवस असा येईल की, पुढच्या पिढीला हा विशाल जीव फक्त चित्रातच बघावा लागेल!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.