या एका “छोट्याश्या” सवयीमुळे तुमच्या मुलाला कितीतरी गंभीर विकार होऊ शकतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===  


मुलांना मिळणाऱ्या इंटरनेट सारख्या सुविधा, एकटेपणा, सोबत इतर घरगुती, शाळा-कॉलेजातील ताणतणाव यातून थोडा विरंगुळा म्हणून मुले व्हिडीओ गेमचा मार्ग शोधतात. बाहेर जाऊन उंदडण्यापेक्षा घरी बसतोय ना, मग असुदे! असं म्हणत आपणही त्याची सवय करून घेतो.

पण, व्हिडीओ गेम्सची हीच सवय पुढे जाऊन तुमच्यासाठी डोकेदुखी तर ठरणार नाही ना? हे वेळीच ओळखा.

व्हिडीओ गेम्सचे अनेक प्रकार असतात. एकट्यानी खेळण्याचे किंवा अनोळखी ऑनलाईन मित्रांसोबत मिळून खेळण्याचे. या दोन्हीपैकी कोणत्याही गेम्सचे रुपांतर हळूहळू व्यसनात होऊ शकते.

इतर व्यसनांप्रमाणेच याच्या आहारी गेलेली व्यक्ती देखील आजूबाजूच्या वास्तव जगाचे भान हरपून बसते. याचेही शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर घातक परिणाम दिसून येतात.

 

game addicted inmarathi
pnas.org

अलीकडेच पब्जी हा व्हिडीओ गेम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अर्थातच त्याच्याशी निगडीत नकारात्मक घटनांमुळेच. पब्जी खेळण्यास वडिलांचा विरोध होता म्हणून कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील एका २५ वर्षीय तरुणाने वडिलांचीच हत्या केली.

तर महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका मुलाने १९ वर्षीय भावाची हत्या केली, कारण काय तर, हा मोठा भाऊ त्याला पब्जी खेळण्यासाठी त्याचा मोबाईल देत नसे म्हणून.

व्हिडीओ गेमच्या आहारी जाऊन अशा प्रकारे किळसवाणे कृत्य करणारी, हिंसा करण्यास प्रवृत्त होणारी तरुण मुले ही नेहमीच बातमीचा विषय ठरतात. पण, यांची ही लक्षणे वेळीच ओळखून त्यावर वेळीच उपाय किंवा प्रतिबंध केला असता, तर पुढील अनर्थ निश्चितच टाळला असता.

व्हिडीओ गेम्सचे कोणकोणते विपरीत परिणाम होऊ शकतात आणि त्यापासून स्वतःला किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीला कसे परावृत्त करता येईल, हे समजून घेण्यासाठी संपूर्ण लेख जरूर वाचा.


 

pubg inmarathi
tosshub.com

व्हिडीओ गेम्सचे शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे दुष्परिणाम जाणवतात. व्यक्तीची बौद्धिक क्षमता, नजर आणि स्मृतीवर देखील व्हिडीओ गेम्सचे विपरीत परिणाम होतात.

अतिप्रमाणात व्हिडीओ गेम्स खेळल्याने मेंदूतील हिप्पोकॅम्पस भागातील पेशींना इजा पोहोचू शकते. यामुळे निद्रानाशासारखी गंभीर समस्या उद्भवू शकते. मेंदूतील हिप्पोकॅम्पस भागाला इजा पोहोचलयास अल्झायमर्स किंवा तीव्र डिप्रेशनच्या आहारी जाण्याची दाट शक्यता असते.

मुलांच्या वर्तणुकीवर देखील याचे दुष्परिणाम दिसून येतात. सातत्याने अग्रेसिव्ह गेम खेळणाऱ्या मुलांचे वागणे देखील आक्रमक होते. त्यांच्या मनात इतरांबद्दल असणारी सहानुभूतीची भावना कमी होते.

व्हायोलंट गेम्स खेळल्याने मुलांमधील संवेदना पूर्णतः नाहीशा होतात. त्यामुळे ही मुले अनेकदा स्वतःला किंवा इतरांना इजा पोचवण्यास देखील मागे पुढे पाहत नाहीत.

 

game addicted inmarathi
cloudfront.net

दिवसातून एक तास किंवा त्यापेक्षा कमी वेळ व्हिडीओ गेम्स खेळल्यास त्याचे फार दुष्परिणाम जाणवत नाहीत.

पण, जर तुमचे मुल एका तासापेक्षा जास्त वेळ व्हिडीओ गेम खेळण्यात घालवत असेल तर ही नक्कीच चिंतेची बाब आहे. सलग दोन-तीन तास व्हिडीओ गेम खेळत राहिल्याने आरोग्याच्या इतर समस्या तर निर्माण होतातच पण, याचा सर्वात जास्त परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर होतो.

दोन-तीन तास व्हिडीओ गेम खेळत राहिल्याने डोळे दुखणे, एकाच ठिकाणी नजर स्थिर न राहणे आणि तीव्र डोकेदुखी असा त्रास उद्भवू शकतो.

व्हायोलंट व्हिडीओ गेम खेळत राहणाऱ्या मुलांमध्ये तणावाचे प्रमाण वाढते असे अभ्यासांती सिध्द झाले आहे. कोणत्याही तणावपूर्व स्थितीत “लढा किंवा पळा” अशी शरीराची साधारण प्रतिक्रिया असते.

परंतु, शुटींग सारख्या गेम मध्ये खेळणाऱ्याला ना लढता येतं ना पळता येतं अशावेळी तणाव वाढतो, याचा परिणाम आरोग्यावर आणि मानसिकतेवर देखील होतो.

 

game addicted inmarathi
medicalnewstoday.com

सातत्याने अशा तणावपूर्ण मानसिकतेत राहिल्याने वर्तणुकीत देखील बिघाड निर्माण होतो. व्हिडीओ गेम खेळणाऱ्या मुलांमध्ये आक्रमकता वाढते, सतत भीतीखाली किंवा काळजीच्या सावटाखाली अशी मुले वावरत असतात.

व्हिडीओ गेम खेळणाऱ्या मुलांना रात्रीची गाढ झोप मिळणे देखील मुश्कील होते. या गेम्सचा परिणाम त्यांच्या झोपेच्या सवयीवर देखील होतो. रात्री झोपण्यापूर्वी जर मुलांनी गेम खेळला तर, त्यांना गाढ झोप लागत नाही. यातूनच पुढे निद्रानाशासारखी समस्या निर्माण होऊ शकते.

दारूचे व्यसन किंवा ड्रगच्या व्यसनाप्रमाणेच हे व्हिडीओ गेम्सचे व्यसन हे त्या व्यक्तीप्रमाणेच तिच्या संपर्कातील व्यक्तींसाठी देखील घातक ठरू शकते.

या लोकांना सतत आभासी जगात वावरण्याची सवय लागते त्यामुळे वास्तव जीवनापासून हे लोक दूर राहण्याचा किंवा वास्तवातील प्रश्नांपासून पळ काढण्याचा प्रयत्न करतात.

व्हिडीओ गेम्सचे व्यसन लागले असेल तर, सतत थकवा जाणवणे, स्वतःच्या आरोग्याची, वैयक्तिक स्वच्छतेची पर्वा नसणे, सतत उद्भवणारी डोकेदुखी, सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना होणे, हे परिणाम दिसून येतात.

अर्थात वेगळ्यावेगळ्या गेमर मध्ये वेगवेगळी लक्षणे दिसून येतात पण, त्यातील ही काही सामान्यतः आढळून येणारी लक्षणे आहेत. ही झाली शारीरिक लक्षणे. अशाच प्रकारे काही मानसिक लक्षणे देखील आढळून येतात.

 

game addicted inmarathi
techaddiction.ca

ज्यामध्ये खेळायला न मिळाल्याने राग येणे किंवा निराशा येणे, मन सतत व्हिडीओ गेमवर केंद्रित झाल्याने अभ्यास किंवा इतर काम करण्यावर फोकस राहत नाही. खेळण्यासाठी भरपूर वेळ मिळावा म्हणून काही ना काही कारण सांगून घराबाहेर जायचे टाळणे, अशी लक्षणे दिसून येतात.


यामुळे त्या व्यक्तीचा इतर नातेवाईकांशी असणारा संपर्क तुटतो किंवा नात्यामध्ये कटुता निर्माण होते, याचा परिणाम म्हणून ती व्यक्ती पुन्हा व्हिडीओ गेमकडे ओढली जाते. इतर व्यासानांप्रमाणेच हे दुष्टचक्र फिरत राहते.

तुमच्या जवळच्या व्यक्तीमध्ये जर ही किंवा अशाप्रकारची लक्षणे आढळत असतील तर, यावर वेळीच उपाय करून त्याला या दुष्टचक्रातून बाहेर काढणे आवश्यक आहे.

इतर व्यसनांवर उपलब्ध आहेत त्याप्रमाणे या व्यसनावर कोणताही औषधोपचार उपलब्ध नाही.

तर यासाठी कॉग्निटीव्ह बिहेविअरल थेरपीच उपयोगी पडते. या उपचार पद्धतीत त्या व्यक्तीला पहिल्यांदा जाणीव करून दिली जाते, की तो या प्रकारच्या व्यसनाच्या आहारी जात आहे आणि यातून बाहेर पडणे त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबियांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.

 

cbt inmarathi
wsj.net

त्यामुळे इथे त्या व्यक्तीला स्वतः त्या आभासी जगापासून आपले लक्ष विचलित करून वास्तव जगात ते कसे रमेल यासाठी स्वतःच प्रयत्न करावे लागतात. यासाठी ते आपले मित्र, नातेवाईक, कुटुंबातील सदस्य किंवा समुपदेशकांची मदत घेऊ शकतात.

सुरुवातीला हे थोडे अशक्य वाटले तरी, हळूहळू टप्प्याटप्प्याने खेळासाठी दिला जाणारा वेळ कमीकमी करत आणता येतो. याऐवजी स्वतःला एखाद्या दुसऱ्या एखाद्या क्रिएटीव्ह कामात गुंतवून ठेवता येते.

म्हणून व्हिडीओ गेमकडे वळणारी आपल्या मुलाची पावले नेमक्या कुठल्या दिशेला जात आहेत हे वेळीच ओळखा. पुढील संभाव्य धोक्यापासून स्वतःला आणि आपल्या मुलाला देखील वाचवण्याची हीच योग्य वेळ आहे.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?