लडाखच्या कडाक्याच्या थंडीत निरंतर वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या या डॉक्टरांची चिकाटी पाहून उर भरून येतो

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

सेवा निष्ठेची अनेक उदाहरणं या देशाच्या इतिहासात आपणास पाहायला भेटतील आणि त्यात वैद्यकीय सेवांसाठी उच्चशिक्षण घेऊनही आपले सर्वस्व त्या वैद्यकीय सेवेमध्ये वाहून घेणारे अनेक त्यागी आपल्या देशाला एक थोर परंपरा देऊन गेलेले आहेत.

आपण एका आशा वैद्यकीय समाजसेवका बद्दल वाचणार आहोत जो गेली अनेक वर्षे लडाखला निस्पृहपणे वैद्यकीय सेवा देण्यासाठी अविरत झटत आहे.

जाणून घेऊया त्यांच्याबद्दल या लेखामध्ये.

खऱ्या आयुष्यातही हिरोंना सन्मान देण्यासाठी आपल्याला अनेक वर्षांची प्रतीक्षा बघावी लागते, हेच आपलं दुर्दैव म्हणावे लागेल.

डॉक्टर तेसरींग नोरबु यांना लडाखमधील पहिलं वैद्यकीय समाजसेवक म्हणून ओळखलं जातं. त्यांना नुकताच भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला आहे.

 

Dr-Tsering-Norboo-inmarathi
thebetterindia.com

गेली पन्नास वर्ष ते अविरत सेवेसाठी झटत आहेत. जिथे वैद्यकीय सेवा देण्यासाठी खूपच अत्यल्प अशा प्रकारच्या व्यवस्था उपलब्ध आहेत आणि एवढा उच्चशिक्षण घेऊनही, अनेक प्रकारची आमिषे नजरेसमोर असताना, लडाख सोडून अनेक मोठ्या शहरांमध्ये जाण्याची संधी असतानाही ही व्यक्ती गेली पन्नास वर्षे लडाखच्या सेवेमध्ये उपस्थित आहे.

त्यामुळेच त्यांना भारतातील प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले आहे.

त्यांचा जन्म १६ एप्रिल १९९४ रोजी पिक्टूरस्क्यू या गावामध्ये झाला. हे गाव लेह या जिल्ह्यात येते. डॉक्टर नोरबु यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून लडाखमधील ग्रामीण भागामध्ये त्यांचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होण्याच्या आधी सेवा दिलेली आहे.

नंतर १९८० मध्ये त्यांनी त्यांचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आणि “सोनम नोरबु मेमोरियल हॉस्पिटल” मध्ये नोकरी स्वीकारली.

हॉस्पिटल त्याकाळी पूर्ण जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी सोयी उपलब्ध असणारे एकमेव हॉस्पिटल होतं.

याविषयी बोलताना डॉक्टर नोरबु म्हणाले की मी जे काही आज गेल्या पन्नास वर्षांमध्ये मिळवलेल आहे ते या जिल्ह्यातील लोकांनी माझ्यावर दाखवलेल्या निस्पृह प्रेम आणि विश्वासामुळेच मिळवलेले आहे.

 

norbu-inmarathi
youtube.com

माझ्यासाठी येथे वैद्यकीय सोयी-सुविधा पुरवणे म्हणजेच समाजसेवा होय. लेहमध्ये अशा प्रकारच्या वैद्यकीय सेवा सुरुवातीच्या काळामध्ये पुरविण्यात येत नव्हत्या.

त्या काळातील वैद्यकीय सेवांची कल्पनाच केलेली बरी अशी परिस्थिती होती.

जेव्हा डॉक्टर नोरबु यांनी सुरुवात केली त्यावेळी जिल्हास्तरीय रुग्णालयातही मोजून फक्त वीसच खाट उपलब्ध असत आणि तिथे कोणी तज्ञ व्यक्तीही उपस्थित नसत. तज्ञांचा पहिला गट जेव्हा काश्मीरमधुन लेहमध्ये आला, तोपर्यंत येथील स्थानिक लोकांनी वैद्यकीय सोयी सुविधांचा अभाव आहे म्हणून स्थलांतर चालू केले होते.

या सर्व परिस्थिती बाबत बोलताना ते म्हणतात की उशिरा म्हणजे १९७०, ८०, ९० च्या दशकामध्ये आमच्याकडे काही चांगल्या तज्ञांचा ताफा सरकारमार्फत येऊ लागला.

या सर्व तज्ञांनी वैद्यकीय समाजसेवेचा एक आदर्श घालून दिला, पण इथे मूलभूत सुविधांचा फारच मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असे.

उदाहरणार्थ इथे २४ तास पाणी उपलब्ध होत नसे, इथे विद्युत सेवा ही आवश्यक प्रमाणात उपलब्ध होत नसे.
सर्व त्या तज्ञांच्या प्रयत्नांचाच परिणाम आहेत की आज सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत. त्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीमधे अशक्य अशा वातावरणामध्ये आपलं समाजसेवेचे व्रत पूर्ण केलं.

कालांतराने येथील तज्ञांनी आणि काही समाजसेवकांनी सरकारकडे अनेक शिफारसी करून त्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या आणि इथे मूलभूत सेवा पुरविण्यात याव्यात अशी विनंती केली. २०१० नंतर मात्र गोष्टी फारच झपाट्याने बदलल्या पण तरीही समाजसेवेचा फार मोठा मार्ग अजून पूर्ण करायचा राहिलेला आहे.

 

Ladakh-inmarathi
tibbat.com

डॉक्टर नोरबु यांच्या वरील कैफियतीच सर्वात मोठे उदाहरण सांगायच झालं तर सोनम नोरबु मेमोरियल हॉस्पिटलमध्ये डायलिसीसच मशिन आत्ता काही दिवसांपूर्वी उपलब्ध झाले आहे. नोरबु यांच्या शासकीय सेवे दरम्यान त्यांना काही मोलाचे सल्ले आणि सहाय्य त्यांच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले ज्याचा फायदा नोरबु यांना जीवनात अनेक ठिकाणी झाला.

अनेक खडतर प्रसंगांना तोंड दिल्यानंतर नोरबु हे आज जगविख्यात आहेत.

जेव्हा डॉक्टर नोरबु यांनी सुरुवातीला वैद्यकीय व्यवसाय चालू केला त्यावेळी त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली ती अशी की अनेक वयस्कर माणसं हार्ट अटॅक ने मरत होती. त्याचा अजून अभ्यास केल्यावर त्यांना असं कळलं या भागातील ९० टक्के माणसं हे नियमितपणे धूम्रपान करतात.

असे लक्षात आल्यावर आणि त्यांच्या काही सहकार्‍यांना मिळून “लडाख ॲक्शन ऑन स्मोकिंग अंड हेअल्थ” अशा एका स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली.

त्यामार्फत त्यांनी जनजागृती आणि प्रबोधन करण्यास सुरुवात केली. १९८८ ला स्थापन झालेल्या या संस्थेने या भागामध्ये लक्षणीय कामगिरी केली. नोरबु यांचा या सर्व कामांमध्ये सिंहाचा वाटा नेहमीच राहिलेला आहे.

१९८८ ला जेव्हा त्यांनी संस्था स्थापन केली त्यावेळी येथील पुरुषांमधील धूम्रपानाचे प्रमाण ४२ टक्के एवढे होतं. २०१० मध्ये हेच प्रमाण ८ टक्के एवढे खाली घसरलेलं आपल्याला दिसून येईल.

शहरी भागामध्ये तर नोरबु आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रबोधनाचा परिणाम म्हणून धूम्रपान शहरी भागात जवळपास बंदच झाले होते.

 

smoking-marathipizza

नोरबु यांच्या या कार्याचा जसा प्रसार आणि प्रचार होऊ लागला तसं अनेक प्रकारच्या संस्थांनी नोरबु यांच्या धुम्रपान मुक्त लडाख या स्वप्नाला पाठिंबा देण्यासाठी मदतीचा हात देण्यास सुरुवात केली. या संस्थांमध्ये ऑल इंडिया रेडिओ तसेच अनेक शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना, अनेक स्वयंसेवी संस्था तसेच या समाजसेवी प्रामाणिक प्रयत्नाला पोलिसांनी आणि जिल्हा प्रशासनानेही हवी ती मदत देऊ केली.

या सर्व प्रयत्नांना अपेक्षित फळ प्राप्त झाले आणि या भागातून धूम्रपानाची समस्या बऱ्यापैकी हद्दपार करण्यात डॉक्टर नोरबु आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यश मिळाले.

एवढेच नव्हे तर या तंबाखूमुक्त लडाखच्या स्वप्नपूर्ती नंतर त्यांच्या लक्षात आलेली एक गोष्ट अशी की येथील लोकांना एक विशिष्ट श्वसनाचाही आजार मोठ्या प्रमाणात उद्भवलेला आहे. याबाबत बोलताना ते म्हटले की,

“मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे येथील एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के लोक कुठल्यातरी विशिष्ट श्वसनाच्या आजाराला बळी पडलेले आहेत. विशेषतः जी लोकं दऱ्याखोऱ्यांमध्ये जीवन जगत आहेत, त्यांना ट्यूबर्क्युलोसिस म्हणजेच टीबी चे निदान होत आहे.

त्यांच्या एक्स-रे रिपोर्ट मध्ये या गोष्टी बाहेर येत आहेत आणि एवढ्या प्रमाणात होऊनही येथील लोकांमध्ये त्या आजाराबाबत कुठल्याही प्रकारचं प्रबोधन झालेलं दिसून येत नाहीये. यामुळेच की काय हा आजार त्याच प्रमाणात या दऱ्याखोऱ्यांमध्ये अस्तित्वात असल्याचे दिसून येते.”

या वरही अनेक दिवसांच्या संशोधनानंतर डॉक्टर नोरबु यांच्या असे निदर्शनास आले की हा आजार टीबी नसून हा वेगळाच कुठल्यातरी आजार आहे. आणि मग त्यांनी लडाखमधील दऱ्याखोऱ्यांमध्ये काही दिवस व्यतीत केले आणि त्यांच्या लक्षात आले की येथील सभोवतालच्या वातावरणामध्ये अनेक प्रकारचे धूलिकण मिसळले गेलेले आहेत.

हे धूलिकण श्वसनाद्वारे येथील नागरिकांच्या श्वसन प्रक्रियेमधुन शरीरात जाताे आणि यामुळे काही वर्षांनी त्यांना श्वसनाचा भीषण त्रास जाणवू लागतो.

एवढेच नव्हे तर या आजाराला कारणीभूत अशी अजून एक गोष्ट त्यांच्या नजरेस पडली, ती म्हणजे दैनंदिन स्वयंपाकासाठी येथील स्त्रिया चुलीचा वापर करत असत. या चुलीमधून मानवी शरीरासाठी हानिकारक असणारे काही घटक येथील वातावरणात मिसळले जातात.

असे भेसळ युक्त घटक ज्यावेळी श्वसन प्रक्रियेद्वारे मानवी शरीरामध्ये दाखल होतात त्यावेळी माणूस अधिक आजारी पडतो.

 

Chulha-inmarathi
firstpost.com

त्यांच्या या संशोधनाला जागतिक मान्यता मिळू लागली. यावरील त्यांचं संशोधन १९९० च्या दशकामध्ये अनेक प्रसिद्ध जर्नल्स मध्ये छापलं गेलं होतं. ही जर्नल्स संपूर्ण जगामध्ये संशोधनात्मक अभ्यासासाठी वापरली जातात.

डॉक्टर नोरबु यांच्या अभ्यासाचा दर्जा एवढा उच्च होता की, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (आय एल ओ)च्याही लक्षात आले की फक्त औद्योगिक क्षेत्रामध्येच अशा प्रकारचे आजार होत नाहीत, तर अनऔद्योगिक क्षेत्रामध्ये ही अशा प्रकारचे श्वसनाचे आजार विविध कारणांमुळे आढळून येऊ शकतात.

हे त्यांच्या कामातील सर्वात मोठे यश मानले जाऊ लागले आणि यामुळेच सर्वसामान्यांना शुद्ध हवा आणि स्वच्छ वातावरणाचे महत्त्व कळू लागले.

रिटायर झाल्यानंतर, २००२ मध्ये डॉक्टर नोरबु यांनी परत एका समाजसेवी संस्थेची स्थापना केली तसंच तिचं नाव होतं “लडाख इंस्टिट्यूट फॉर प्रिव्हेन्शन” (एल आय पी). या संस्थेचा उद्देश्य साफ होता.

उंचीवरील दऱ्याखोऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना होणारे विविध श्वसनाच्या आजारांबाबत जागृत करणे आणि त्यांच्या समस्या निराकरण करून प्रबोधन करणे.

डॉक्टर नोरबु आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा या सर्व सामान्य जनमाणसाच्या दारापर्यंत नेण्याचं फार मोठं काम केलं.

ते अत्यंत दुर्गम भागामध्ये वैद्यकीय सेवा पोहोचवण्यासाठी विविध प्रकारची शिबिरे घेत असत, या शिबिरांमध्ये अत्याधुनिक अशा प्रकारची यंत्रणा उदाहरणार्थ ईसीजी, अल्ट्रासोनिक मशीन इत्यादी यंत्रणा दुर्गम भागामध्ये वैद्यकीय सेवा देण्यासाठी घेऊन जात असत.

या अनुभवाबद्दल बोलताना डॉक्टर नोरबु म्हणतात की,

“आम्ही २९०० मीटर ते ४९०० मीटर पर्यंत उंचीच्या पर्वतरांगांमध्ये आणि दऱ्याखोऱ्यांमध्ये हे वैद्यकीय सेवांची शिबीरे घेतो आहोत. या सर्व दऱ्याखोऱ्यांमध्ये अशाही काही जागा आहेत ज्या सहा सहा महिने पावसामुळे किंवा बर्फामुळे भारतापासून तुटलेली असतात.

आम्ही अशाच ठिकाणी जाऊन, जिथे सुविधांची वानवा आहे तिथे आम्ही आरोग्य शिबिरे घेत असतो.”

 

healthcamp-inmarathi
tibbat.com

डॉक्टर नोरबु यांनी सांगितल्याप्रमाणे झंस्कार ही अशी जागा आहे, जिथे बर्फामुळे सहा महिने कसल्याही प्रकारचा संपर्क होऊ शकत नाही. तिथे डॉक्टर नोरबु यांची टीम २०१० पासून दरवर्षी वैद्यकीय सेवांची शिबिर घेत असते. त्यांचा हा गट दरवर्षी प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन वैद्यकीय सेवा पुरवितो.

ते या शिबिरामध्ये त्यांची उंची, वजन,रक्तगट तसेच रक्त तपासणी यासारख्या अनेक वैद्यकीय सुविधा पुरवितात. ते रक्ताचे नमुने घेऊन त्यांना शुगर, कावीळ यासारखे आजार आहेत का याची तपासणी करून निदान करतात.

त्यांचा हा समाजसेवी गट विविध प्रकारच्या प्रश्नावलीही त्यांच्याकडं भरून घेतात, आणि त्यावरून त्या भागामध्ये असणाऱ्या अनेक घटकांबाबत ते प्रबोधन करतात.

उदाहरणार्थ एखाद्या भागामध्ये मद्यपान आणि धूम्रपान याचे प्रमाण जर त्यांना प्रश्नावली मध्ये जास्त आढळलं तर ते त्या भागामध्ये व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन करत राहतात.

शिबिराच्या समाप्तीच्या आधी या सर्व शिबिरार्थींना औषधगोळ्यांसोबतच घ्यायची काळजी आणि इतर गोष्टी एका कागदावर लिहून दिल्या जातात. सर्वात शेवटी त्यांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी माहिती देणारी एक छोटीशी पुस्तिका भेट म्हणून देण्यात येते.

डॉक्टर नोरबु आणि त्यांच्या गटाणे आजपर्यंत हजारो लोकांना असाध्य अशा श्वसन रोगातून मुक्त करण्यासाठी मदत केलेली आहे. एका चिकित्सेतून असे पुढे आले आहे की आज पर्यंत त्यांनी पाच हजार लोकांच्या कावीळ या रोगावर उपचार केलेले आहेत.

अनेक प्रकारची लसीकरणही या शिबिरामध्ये केली जातात. आणि जर या शिबिरामध्ये काही गंभीर अशा प्रकारचे परिस्थिती असणारे रुग्ण आढळले तर सामाजिक भान राखत त्यांना लेहमधील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. लेहमधील रुग्णालयातही त्यांच्यावर अत्यंत कमी दरामध्ये उपचार केले जातात.

 

hospital-inmarathi
aorticdissection.com

काही दिवसांपूर्वी डॉक्टर नोरबु यांनी त्यांची ही समाजसेवा फक्त लेह पुरतीच मर्यादित न ठेवता संपूर्ण भारतामध्ये अशी सेवा करण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. अशा प्रकारचे अनेक सेवा प्रकल्प त्यांनी जागोजागी लेह आणि लडाखमध्ये उभी केलेली आहेत.

काही दिवसांपूर्वी सैन्यातील आजारी आणि जखमी सैनिकांच्या उपचाराची जबाबदारीही डॉक्टर नोरबु यांच्यावर देण्यात आलेली होती.

आज डॉक्टर नोरबु यांची तब्येत त्यांना त्यांच्या सेवेसाठी सोबत देत नाहीये, पण ते थांबले नाहीत.

आजही समाजसेवेचे व्रत घेऊन ते लडाखमधील दुर्गम भागांमध्ये आरोग्य शिबिर आयोजित करतच आहेत त्यांच्या या निस्पृह सेवेला सलाम आणि अशीच अनेक आरोग्य शिबिर घेण्याची ताकद त्यांना परमेश्वर देवो हीच अपेक्षा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “लडाखच्या कडाक्याच्या थंडीत निरंतर वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या या डॉक्टरांची चिकाटी पाहून उर भरून येतो

  • February 9, 2019 at 9:26 pm
    Permalink

    डाॕ. साहेबांची जन्म साल चूकीचे print झाले आहे .

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?