' मुख्यमंत्री असूनही स्कूटरवर फिरणाऱ्या या कार्यमग्न जनसेवकाकडून भारतीयांनी आदर्श घ्यायला हवा.. – InMarathi

मुख्यमंत्री असूनही स्कूटरवर फिरणाऱ्या या कार्यमग्न जनसेवकाकडून भारतीयांनी आदर्श घ्यायला हवा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (वय ६३) यांचे रविवारी, दिनांक १७ मार्च रोजी स्वादुपिंडाच्या कर्करोगाने निधन झाले. मनोहर पर्रिकर यांच्यावर त्यांच्या राहत्या घरीच उपचार सुरू होते. २०१८ मध्ये त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले.

काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीतअचानक बिघाड झाल्याने त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा दिसून न आल्याने त्यांना परत राहत्या घरी आणण्यात आले.

मनोहर पर्रीकर हे गोव्यात तसेच देशात लोकप्रिय नेते होते. त्यांच्या निधनाने अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे.

 

Manohar-Parrikar-inmarathi12
newsnation.com

जीवनपट

मनोहर पर्रिकर यांचा जन्म १३ डिसेंबर १९५५ रोजी म्हापसा येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मडगाव येथील लोयोला हायस्कूल येथे मराठी भाषेतून झाले. १९७८ मध्ये मुंबई आयआयटीतून त्यांनी धातु अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली.

इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि आधार संकल्पनेचे जनक नंदन निलकेणी हे त्यांचे वर्गमित्र होत. तरूण वयापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले होते. संघातही त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पडल्या.

उत्तर गोव्यात ते संघाचे काम करत असत. आयआयटीतून पदवीधर झाल्यानंतर ही त्यांनी म्हापसा या आपल्या जन्मगावी संघाचे काम सुरू केले. वयाच्या २६ व्या वर्षी ते संघचालक होते. आपण संघ स्वयंसेवक असल्याचा त्यांना सार्थ अभिमान होता.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असल्यामुळेच आपण शिस्त, राष्ट्रवाद आणि समाजाविषयीची आपली जबाबदारी या गोष्टी शिकल्याचे त्यांनी अनेकदा नमूद केले आहे.

 

manohar-parrikar-rss-inmarathi
khulasaanews.com

संघाच्या माध्यमातूनच पुढे त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्यांची राजकीय कारकीर्द आणि लाभलेली लोकप्रियता पाहिली तर त्यांचा आलेख सतत चढताच होता.

मात्र कौटुंबिक जीवनात त्यांना बराच संघर्ष करावा लागला. २००१ मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी आपली दोन मुले उत्पल आणि अभिजात यांना सांभाळले. त्यांच्या पत्नीचे निधन झाले त्यादरम्यान ते गोव्याचे मुख्यमंत्री होते. तसेच राजकीय क्षेत्रात असल्याने त्यांना सतत धावपळ करावी लागत असे.

मात्र असे असतानाही त्यांनी राजकीय आणि कौटुंबिक अशा दोन्ही आघाड्या सांभाळत आपली जबाबदारी निभावली.

गोव्यामध्ये त्यांना मोठी लोकप्रियता लाभली. जनतेच्या प्रेमामुळेच आपल्या वैयक्तिक दुःखावर त्यांना मात करता आली असे ते नेहमी सांगत. गोव्यातील मातीशी ते इतके जोडले गेले होते की २०१४ मध्ये ते दिल्लीत जाण्यास उत्सुक नव्हते.

मात्र पक्षनेतृत्वाचा आदेश मानत त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली. असे असतानाही त्यांचे मन गोव्यातच होते. अखेर गोव्यात  परतण्याचा योग त्यांना २०१७ मध्ये आलाच आणि पुन्हा एकदा ते गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

 

parrikar inmarathi
india.com

राजकीय कारकीर्द

मनोहर पर्रिकर यांची राजकीय कारकीर्द संघाच्या माध्यमातून सुरू झाली. १९९० -९१ यादरम्यान राम जन्मभूमी आंदोलनाने चांगलाच जोर पकडला होता. त्यावेळी मनोहर पर्रिकर संघटक म्हणून जबाबदारी पार पाडत होते.

१९९० पर्यंत गोव्यामध्ये भारतीय जनता पक्ष रुजला नव्हता. तेव्हा काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हे दोन प्रमुख पक्ष होते. त्यांना मात देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मनोहर पर्रिकर यांचा चेहरा पुढे आणत भाजपाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.

मनोहर पर्रिकर हे आक्रमक भूमिका आणि आपल्या भूमिकेवर ठाम असणारे नेते होते. त्यामुळेच लवकरच गोव्यातील जनतेवर त्यांचा प्रभाव पडायला सुरुवात झाली.

१९९४ मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. सुरुवातीपासूनच आपल्याला या क्षेत्रात मोठा पल्ला गाठायचा आहे याची जाण त्यांना होती.

म्हणूनच की काय त्यांनी आमदारकीच्या पहिल्या खेपेस  हे पक्के केले होते की यावेळेस आपल्याला प्रतिमा निर्मिती वर अधिक भर द्यायचा. आज आपल्याला माहित असलेले मनोहर पर्रिकर यांची प्रतिमा ही त्याचाच परिपाक आहे.

 

Manohar-Parrikar-inmarathi09
ndtv.com

गोवा हे तसे राजकीयदृष्ट्या अस्थिर राज्य आहे. त्यामुळे सत्तेची समीकरणे ही नेहमीच बदलत असतात. असे असतानाही त्यांनी अखेरपर्यंत गोव्यावर आपली राजकीय पकड कायम ठेवली. जून ते नोव्हेंबर १९९९ दरम्यान ते गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.

२४ ऑक्टोबर २००० रोजी ते पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र, त्यांचे सरकार फेब्रुवारी २००२ पर्यंतच टिकू शकले.

जून २००२ मध्ये ते पुन्हा विधानसभेचे सदस्य बनले आणि ५ जून २००२ रोजी पुन्हा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. भाजपला गोव्यात सत्ता मिळवण्याचे श्रेय हे पर्रिकरांकडेच जाते.

२०१२  मध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी बसण्याची त्यांना संधी मिळाली. २०१४  मध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार केंद्रात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मनोहर पर्रिकर यांना केंद्रात काम करण्याची विनंती केली.

मनाने ते दिल्लीत जाण्यास फारसे उत्सुक नव्हते मात्र आपल्या पक्षाचा आदेश अंतिम मानत त्यांनी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. केंद्रात त्यांच्याकडे संरक्षणमंत्री म्हणून जबाबदारीचे पद देण्यात आले.

त्यांची संरक्षणमंत्री म्हणून असलेली  कारकीर्द अडीच वर्षाची आहे. मात्र या काळातही त्यांनी आपल्या कार्यशैलीची झलक येथे दाखवून दिली. राफेल या लढाऊ विमानाचा सौदा असो अथवा S ४०० या क्षेपणास्त्राची खरेदीसाठीची निर्णय प्रक्रिया ही त्यांच्याच काळात पार पडली.

 

defence.com

त्यांच्या कामाचा आवाका खूप मोठा होता. वन रँक वन पेंशन असेल अथवा संरक्षण मंत्रालयातील अनेक प्रलंबित प्रश्न त्यांनी मार्गी लावण्याचे काम केले. त्यांच्या कारकिर्दीत उरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान मध्ये लपलेल्या दहशतवाद्यांवर सीमेपार लक्ष्यभेदी कारवाई करण्यात आली.

या निर्णय प्रक्रियेत संरक्षण मंत्री म्हणून त्यांची भूमिका मोलाची होती.

त्यांची कारकीर्द या उंचीवर असताना देखील २०१७ मध्ये गोव्यामध्ये निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन पक्षहितासाठी त्यांनी गोव्यात परतण्याचा निर्णय घेतला.

गोवा लहान राज्य आहे असे असतानाही केंद्रातील संरक्षण मंत्री पद सोडून मनोहर पर्रिकर यांनी गोव्यात परतण्याचा निर्णय का घेतला? याचे कुतूहल अनेकांना होते. मात्र ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

त्यांची स्वतः गोव्यात परतण्याची इच्छा आणि पक्षासाठी ते गोव्यात परतले आणि पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २०१८  मध्ये त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याचे निदान झाल्यानंतर देखील त्यांनी अजिबात न डळमळता आपले मुख्यमंत्री पद सांभाळले.

गोव्यात असणारी राजकीय अस्थिरता काही नवीन नाही मात्र असे असतानाही त्यांनी कौशल्याने राजकीय स्थिरता निर्माण केली. ते सामान्यांचे मुख्यमंत्री म्हणूनच ओळखले गेले.

साधा माणूस

 

Manohar-Parrikar-inmarathi08
indianexpress.com

मनोहर पर्रिकर यांची राजकीय कारकीर्द त्यांची स्वच्छ प्रतिमा आणि शिस्तशीर कारभार यासाठी गाजली. मात्र त्यांच्या नावाची अधिक चर्चा झाली असेल तर ती त्यांच्या साधेपणासाठी. राजकीय क्षेत्र हे तसे गुंतागुंतीचे!

इथे तुमच्यात असणारा प्रत्येक गुण हा दाखवण्यासाठीच असतो अशी राजकीय नेत्यांची श्रद्धा असते. मात्र मनोहर पर्रिकर त्याला अपवाद होते.

ते इतके साधे होते आणि हा साधेपणा त्यांच्या अंगी इतका मुरलेला होता की तो त्यांना कधी दाखवण्याची गरज पडली नाही. त्यांच्या साधेपणाचे किस्से नेहमीच चर्चेत असतात.

मुख्यमंत्री असताना देखील आपल्या स्कूटरवर फिरणे असो, महालक्ष्मीच्या मंदिरात अगदी साधेपणाने  दर्शनासाठी जाणे असो किंवा सामान्यांशी संवाद साधणे हा त्यांचा नेहमीचा शिरस्ता होता.

संरक्षणमंत्री असताना देखील त्यांनी आपले साधेपण जपले. ठराविक कपडे, पायात चप्पल अशा वेशातच ते सगळीकडे वावरले. पक्षनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा आणि साधेपणा असे तीनही गुण राजकीय नेत्यांमध्ये आढळणे तसे दुर्मिळच असते.

मात्र मनोहर पर्रीकरांच्या रूपाने असा नेता होऊन गेला.

 

indianexpress.com

गोव्यात भारतीय जनता पक्षाचा चेहरा, लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांचे जाणे भाजप आणि गोवेकरांसाठी दुःखदायक आहेच. मात्र ही पोकळी इतक्या पुरताच मर्यादित नाही.

देशात स्वच्छ प्रतिमा असणारे, ज्यांना एक आदर्श म्हणून पाहिले जात होते असे जे काही राजकीय नेते आहेत त्यापैकी मनोहर पर्रिकर एक होते. त्यांच्या जाण्याने देशाने एक चांगला नेता गमावला आहे. गतात्म्यास सद्गती लाभो!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?