मोदींचं भाषण – ३१ डिसेम्बरचा पोपट

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

शेवटी मोदी बोलले. मोदींनी “५० दिवसांनंतर आणखी एक धमाका करेन!” अशी गर्जना केलेली असल्याने आजच्या भाषणाची मोठीच उत्सुकता लागलेली होती. सोशलमिडीया अनेक विनोदांनी आणि शक्यतांच्या तर्कांनी ओथंबून वाहात होती. परंतु मोदी जे बोलले, ते अपेक्षेच्या अगदीच विपरीत निघाले.

InMarathi Android App

विरोधकांचं तोंड बंद करणं नरेंद्र मोदींपेक्षा अधिक कुणालाही जमत नाही. त्यामुळे मोदी विरोध नं करता, निष्पक्षपणे आजच्या भाषणाचं परीक्षण व्हायला हवं. ह्या भाषणाच्या जमेच्या बाजू – सामान्यातल्या सामान्य मोदी चाहत्यासाठी बजेटच मांडलं गेलं. मग ती, ९ लाखांच्या गृह कर्जावर ४% सूट किंवा १२ लाखांवर ३% सूट असो, शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर ६० दिवसाचं व्याज माफ असो किंवा किसान कार्डला रूपे कार्डमध्ये बदलण्याची घोषणा असो – अश्या घोषणा किंवा गर्भवती महिलांसाठी उत्तम आर्थिक योजना. ह्या गोष्टी देशाच्या बजेटमध्येही मांडता आल्या असत्या.

modi-speech-marathipizza

८ नोव्हेम्बरला पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचार आणि काळ्या धनाबरोबर अर्थव्यवस्थेवरही काही भाष्य केलं होतं. गेल्या ५३ दिवसांत, सामान्य माणसांच्या दैनंदिन आयुष्यामधे जे काही घडलं त्याचा डेटा कुठेतरी किमान कच्च्या स्वरूपात यायला हवा होता. अर्थव्यवस्थेवर होणारा किंवा झालेला चांगला-वाईट परिणाम समोर यायला हवा होता. त्या दृष्टीने किमान काही आकडेवारी समोर यायला हवी होती. पण ती आली नाही.

बजेट म्हणजे निव्वळ केंद्र सरकारचा खर्च असतो. आणि हे मांडायला फेब्रुवारी पुरेसा असतो. ३१ डिसेम्बरला ह्याचं प्रयोजन समजलं नाही. मोदी विरोधक उद्या ह्या भाषणाला जखमेवरची मलमपट्टी म्हणतील, हे निश्चित.

demonetisation-in-india-in-1978-marathipizza03

तटस्थ दृष्ट्या विचार केला तर – फेब्रुवारी महिन्याच्या बजेटला ह्या घोषणा केल्या असत्या, तर उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी उशीर झाला असता, म्हणून हे भाषण – असं काहीसं भासत आहे. म्हणूनच –

५३ दिवसांत, जे काही घडलं त्यावर फुंकर घालायचा प्रयत्न – एवढीच ह्या भाषणाची फलश्रुती मांडता येईल.

भ्रष्टाचार आणि काळा पैसा ह्यावर कायम अधिकार वाणीने बोलणारे नरेंद्र मोदी आजही छातीठोकपणे बोलून गेले. भ्रष्टाचाराविरुद्ध जनता उभी राहिली असा दावा मांडून कौतुकाची थापही देऊन गेले – हे उत्तमच. परंतु, गेल्या आठ आठवड्यांमधे जर ही भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई असेल किंवा मोदींच्याच शब्दात “महायज्ञ” असेल तर अजून किती आहुती पडणार हे तरी किमान समजायला हवं होतं.

 

ही लढाई कोणत्या टप्प्यात आली आहे – निर्णायक टप्प्यात आहे की नुकतीच सुरू झाली आहे, ह्याबद्दल भाष्य व्हायला हवं होतं असं वाटतं. म्हणजे, ८ आठवडे जो भोग लोकांच्या नशिबी आला, त्यातून काही चांगलं निघालं असतं तर लोकांना समाधान तरी मिळालं असतं. जे अजूनही मिळालेलं नाही.

sbi-que-marathipizza

गेलाबाजार, एखाद योजना मोदींनी भ्रष्टाचाराविरोधात आणली असती तरी चांगलं झालं असतं. जवळपास ९०% नोटा बँकेत जमा झाल्या, त्यात सगळाच पैसा पांढरा आहे – असं शेंबडं पोरही म्हणणार नाही. मग, हा पैसे काळा-पांढरा असा वेगवेगळा करायला एव्हाना सरकारची योजना तयार असायला हवी होती आणि ती समोर यायलाच हवी होती. ५३ दिवस त्यासाठी पुरेसे होते.

राजकीय पक्ष आणि भ्रष्टाचार ह्यावर मोदी बोलायला लागले तेव्हा, विराट कोहली ९९ वर खेळत असल्यासारखे सगळेच उभे राहिले. राजकीय पक्षांना माहितीच्या अधिकाराखाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचं वचन जरी मोदींनी दिली असतं तर बरं झालं असतं. कारण मोदींचा तेवढा अधिकार आहे.

एकंदर सुरू झालेलं हे अभियान, किंवा ह्या यज्ञात लागलेली आग कुठेही पसरो – परंतु ती नियंत्रणात मात्र मोदींच्याच राहो. सगळंच भस्म झालेलं परवडणार नाही.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Sourabh Ganpatye

लेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.

sourabh has 42 posts and counting.See all posts by sourabh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *