“फोर स्ट्रोक” आणि “टू स्ट्रोक” इंजिनमधील हे फरक प्रत्येक वाहन-चालकास माहिती असावेत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

तुम्ही वाहन चालवता? मग तुमच्या वाहनात कोणत्या प्रकारचे इंजिन आहे हे तुम्हाला अर्थातच माहीत असेल. आणि ते टू स्ट्रोक आहे की फोर स्ट्रोक हे सुद्धा माहीतच असणार. बरोबर ना? बरं, आता सांगा, या दोन्हीतील फरक तुम्हाला माहीत आहे का?

माहीत नाही? हरकत नाही… आम्ही आहोत ना! या लेखात आपण टू स्ट्रोक इंजिन आणि फोर स्ट्रोक इंजिन म्हणजे काय, त्यांच्यात फरक काय आणि त्यांचे फायदे तोटे काय याचा सविस्तर आढावा घेणार आहोत.

हा लेख वाचून तुम्ही अभिमानाने सांगू शकाल, “भावा… माझ्या गाडीच्या प्रत्येक भागाची ओळख मला आहे”

तसे पाहता आपली गाडी म्हणजे आपला जीव की प्राण असते. आधुनिक विज्ञानाने जे शोध लावले त्यात स्वयंचलित वाहनाचा शोध फार वरच्या क्रमांकावर आहे.

 

techflourish.com


आज आपण वाहनाविना जगण्याची कल्पनाही करू शकत नाही.वाहतूक, दळणवळण, प्रवास सुखकर करणारी वाहने आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनली आहेत.

आता वळूया मुख्य विषयाकडे. मानवी शरीरात जे महत्व हृदयाचे आहे तेच महत्व वाहनांमध्ये इंजिनाचे आहे. चारचाकी गाड्यांची इंजिने अनेक प्रकारची असली तरी पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकी गाड्यांमध्ये मुख्यतः टू स्ट्रोक आणि फोर स्ट्रोक हे दोन प्रकार वापरले जातात.

पूर्वी फक्त टू स्ट्रोक इंजिन बनायची. आठवा, एम 80, बजाज स्कुटर, कायनेटिक, लुना इत्यादी गाड्या.

भारतात पहिली फोर स्ट्रोक गाडी ‘रॉयल एनफिल्ड’ ने आणली… ती म्हणजे बुलेट! पण बुलेट ही सामान्य माणसाच्या आवाक्यात नव्हती, आताही नाहीच म्हणा. कारण बुलेट 350cc आणि 500cc अश्या दोनच मॉडेलमध्ये उपलब्ध आहे.

फोर स्ट्रोक इंजिन लोकप्रिय करण्याचे खरे श्रेय जाते ‘हिरो होंडा’ कंपनीकडे.

१९८९ साली लाँच केलेल्या सीडी 100 मॉडेलमध्ये हे इंजिन बसवले होते. त्या मॉडेलला मिळालेल्या अफाट यशानंतर फोर स्ट्रोकचे दिवस आले आणि टू स्ट्रोक अर्थातच मागे पडले. प्रत्येक कंपनी आपल्या दुचाकी मध्ये फोर स्ट्रोक इंजिन बसवू लागली.

आता जाणून घेऊया यांचे कार्य कसे चालते.

इंजिनची रचना बरीच गुंतागुंतीची असते. इंजिनमधला मुख्य भाग म्हणजे पिस्टन आणि क्रांकशाफ्ट. हा पिस्टन एका उभ्या दांड्यासारखा असतो जो इंजिन सुरू असताना कायम वर खाली हालचाल करतो आणि सोबत क्रांकशाफ्टला फिरवतो. या दोन्हीच्या दबावामुळे इंधनाचे रूपांतर ऊर्जेत होते आणि गाडीला गतिमानता प्राप्त होते.

टू स्ट्रोक इंजिनमध्ये शाफ्ट दोन वेळा फिरल्यास एक ऊर्जेचा स्ट्रोक मिळतो आणि फोर स्ट्रोक इंजिनमध्ये शाफ्टच्या एका वेळी फिरण्याने ऊर्जा मिळते.

 

2-stroke-vs-4-stroke-engine-inmarathi
engineering-insider.com

दोन्हींमधील फरक अश्या प्रकारे आहेत –

१. टू स्ट्रोक इंजिनमध्ये शाफ्ट एक चक्र पूर्ण करण्यासाठी दोन वेळा फिरते तर फोर स्ट्रोक इंजिनमध्ये एक चक्र पूर्ण करण्यासाठी एक वेळ फिरते.
२. पिस्टनने चार स्ट्रोक दिल्यावर एकदा ऊर्जेची निर्मिती फोर स्ट्रोक इंजिनमध्ये होते तर पिस्टनच्या दोन स्ट्रोक मध्ये एकदा ऊर्जा निर्माण टू स्ट्रोक इंजिन मध्ये होते.
३. फोर स्ट्रोक इंजिनची रचना टू स्ट्रोक इंजिनच्या मानाने बरीच जटिल असते.
४. फोर स्ट्रोक इंजिन मध्ये इंधनासोबत ऑईल वापरणे गरजेचे नाही पण टू स्ट्रोक गाड्यांना इंधनासोबत ऑईल मिसळणे गरजेचे आहे.
५. फोर स्ट्रोक मध्ये पिस्टनची वरील बाजू सपाट असते तर टू स्ट्रोक मध्ये ती अर्धगोलाकार असते.
६. वजनाचा विचार केला तर फोर स्ट्रोक इंजिन टू स्ट्रोकच्या तुलनेत जड असतात.
७. फोर स्ट्रोक इंजिनचा आवाज टू स्ट्रोक पेक्षा कमी असतो.
८. फोर स्ट्रोक इंजिन लवकर गरम होत नाही तर टू स्ट्रोक इंजिन त्यामानाने लवकर गरम होते.
९. फोर स्ट्रोक इंजिनासाठी जागा जास्त लागते तर टू स्ट्रोक इंजिन कमी जागेत मावू शकते.

फोर स्ट्रोक इंजिनाचे फायदे –

१. टू स्ट्रोक इंजिनच्या तुलनेत कमी आरपीएम (Revolutions per minute) मध्ये अधिक टॉर्क मिळतो.
२. यात चार स्ट्रोक मागे एकदाच इंधन वापरले जात असल्याने कमी इंधन लागते आणि इंधनाची बचत होते.
३. चार स्ट्रोक मध्ये एकदा ऊर्जा निर्माण होत असल्याने आणि इंधनामध्ये ऑईल वापरले जात नसल्याने प्रदूषण सुद्धा कमी होते.
४. आपल्याला माहीत आहेच, जर इंजिनाचा जास्त वापर केला तर त्याची लवकर झिज होते. पण फोर स्ट्रोक इंजिन कमी आरपीएम मध्ये जास्त ऊर्जा देत असतात म्हणून टू स्ट्रोकच्या तुलनेत जास्त दिवस टिकून राहू शकतात.
५. इंजिनाच्या विशिष्ट रचनेमुळे यात इंधनात ऑईल मिसळण्याची गरज पडत नाही. मात्र फिरणाऱ्या, घर्षण होणाऱ्या भागांना त्याची आवश्यकता असतेच.

 

bike-engine-iinmarathi
tomganger.com

फोर स्ट्रोक इंजिनाचे तोटे –

१.यामध्ये व्हॉल्व्ह वापरलेले असतात. तसेच गिअर आणि चेन सुद्धा असते. या गुंतागुंतीच्या रचनेमुळे फोर स्ट्रोक इंजिन तयार करण्यात आणि प्रसंगी दुरुस्त करण्यात अडचणी येतात आणि जास्त वेळ लागतो.
२.टू स्ट्रोकच्या मानाने कमी ऊर्जा मिळते. कारण तिथे दोन स्ट्रोक मध्ये एकदा ऊर्जा निर्माण होते तर इथे चार स्ट्रोक मध्ये एकदा ऊर्जा निर्माण होते.
४. या इंजिन मध्ये अनेक लहान मोठे भाग वापरावे लागतात. सगळ्या भागांचे एकत्रीकरण करणे कठीण जाते आणि जास्त सामुग्री वापरल्याने किंमत सुद्धा महाग होते.

टू स्ट्रोक इंजिनाचे फायदे –

१. यात व्हॉल्व नसल्याने निर्मितीसाठी आणि दुरुस्त करण्यासाठी सोपी रचना असते.
२. फोर स्ट्रोकच्या मानाने टू स्ट्रोक इंजिनमध्ये अधिक ऊर्जेची निर्मिती होते.
४. ऑईलचा वापर होत असल्याने कुठल्याही वातावरणात काम करण्याची क्षमता असते.

टू स्ट्रोक इंजिनाचे तोटे –

१. अधिक ऊर्जा निर्माण केली जात असल्याने जास्त इंधनाचा वापर.
२. इंधनासोबत ऑईल टाकावे लागत असल्याने किंमतीत वाढ.
३. जास्त इंधनाचा वापर केला जात असल्याने प्रदूषण सुद्धा जास्त होते.
४. पूर्ण इंधनाचा वापर होत नाही. बरेच इंधन वाया जाण्याची शक्यता असते.
५. बाहेर टाकले जाणारे वायू कधी कधी चेंबरमध्ये अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे इंजिनाचे काम सुरळीत चालू शकत नाही.

तर मित्रहो, ही माहिती आपल्याला आवडली असल्यास कमेंटमध्ये आम्हाला कळवायला विसरू नका.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on ““फोर स्ट्रोक” आणि “टू स्ट्रोक” इंजिनमधील हे फरक प्रत्येक वाहन-चालकास माहिती असावेत

  • October 4, 2018 at 8:43 am
    Permalink

    nice information

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *