' लोकशाही वरील संकट: राजकीय पक्षातील वाढती परिवारशाही – InMarathi

लोकशाही वरील संकट: राजकीय पक्षातील वाढती परिवारशाही

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

फैजपूर काँग्रेस अधिवेशनावेळी डावा-उजवा वाद पुन्हा उफाळून आला होता. अध्यक्षपदासाठी काँग्रेस सदस्यांनी नेहरू आणि सरदार पटेल यांची नावे सुचविली होती. ‘पण माझा सोशॅलिस्ट तत्वज्ञानावर आणि कार्यक्रमावर विश्वास आहे हे काँग्रेस सदस्यांनी लक्षात  ठेवावं’ असं नेहरूंनी निवडणुकीपूर्वीच जाहीर करून टाकले होते. या भावनिक घोषणाबाजीवर सरदारांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. देशासाठी नेहरू हेच चांगले उमेदवार आहेत असं सांगत पटेलांनी अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून माघार घेतली. सरदारांनी ही भूमिका  स्वातंत्र्य लढ्यासाठी आणि काँग्रेस पक्षाच्या भवितव्यासाठी घेतली होती. पण त्याचवेळी ते म्हणाले,

मी नेहरूंसाठी माघार घेतलेली असली तरी त्यांची सगळी मते मला मान्य आहेत असा त्याचा अर्थ घेऊ नये. अनेक महत्वाच्या मुद्द्यावर माझे नेहरूंशी मतभेद आहेत. वर्गयुद्ध अपरिहार्य आहे यावर माझा विश्वास नाही. भांडवलशाहीवर ही माझा विश्वास नाही. भांडवलशाहीत श्रीमंत व गरीब यांच्यात प्रचंड असमानता निर्माण होते हे मला मान्यच आहे, पण ती प्रयत्नांनी कमी करता येते. जेव्हा जनता जागृत होईल तेव्हा तीच भांडवलशाहीशी मुकाबला करेन. सगळी जमीन व सगळी संपत्ती सर्वांची आहे हे तत्व मला मान्य आहे. पण मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे चप्पल नेमकी कुठे चावते हे मला नेमकेपणाने समजतं.

 

family-friendly-agenda-of-political-parties-marathipizza01

स्रोत

नेहरूंची भूमिका वैचारिक होती तर पटेलांची शेतकऱ्याचा पुत्र आणि शेतकऱ्याचा नेता यामधून जन्मलेली!

वरील उतारा हा बलवीर कृष्णा यांनी लिहलेल्या सरदारांच्या आत्मचरित्रातील आहे.

नेहरूंवर सोशॅलिस्ट विचारांचा असलेला प्रभाव आणि जर त्याला वेळीच रोखले नाही तर त्याचे होणारे परिणाम भयावह असतील याचा अचूक अंदाज गांधी आणि सरदार यांना आलेला होता, कारण नेहरू हे जनतेच्या आवडीचे नेते होते. ते बरेचसे स्वप्नाळू आणि आदर्शवादी भूमिका घेणारे होते. याच आपल्या वैचारिक भूमिकेतून भारतामध्ये वर्गयुद्ध अपरिहार्य आहे अशी त्यांची समजूत होती. याउलट गांधी व सरदार यांना अहिंसक आणि वर्गयुद्ध न करताही भारतात सत्ता व स्वातंत्र्य मिळविता येऊ शकेल याची खात्री होती.

याचमुळे त्यांनी त्या काळात नेहरूंनी मांडलेले बरेचसे ठराव काँग्रेस कार्यकारणीत संमत होऊ दिले नव्हते. जनतेवर नेहरूंची प्रचंड मोहिनी होती. त्यामुळे ते व्यासपीठ सांभाळत असत, तर सरदार मागे राहून पक्षाची बांधणी करत असत. यामुळे लोकांवर नेहरूंचा प्रभाव असला तरी काँग्रेस कार्यकारणीत सरदार यांचा जास्त प्रभाव होता. याचमुळे पुढे पंतप्रधान पदाविषयी काँग्रेस पदाधिकारी यांचे वजन सरदार यांच्या पारड्यात पडले होते. काँग्रेस कार्यकारणीतील सदस्यांची वागणूक बघून नेहरू प्रचंड निराश झाले होते. ‘हजारो लोक माझ्या मागे आहेत पण काँग्रेस कार्यकारणीत मात्र माझा एकही समर्थक नाही ‘ असं नेहरू म्हणाले होते.

family-friendly-agenda-of-politicafamily-friendly-agenda-of-political-parties-marathipizza02family-friendly-agenda-of-political-parties-marathipizza02l-parties-marathipizza02स्रोत

हा सर्व इतिहास कथन करण्याचे कारण आज वर्तमानातील आपल्या  राजकीय पक्षांची अवस्था हे होय. आज भारतात कुठल्याही राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही अस्तित्वात नाही. परिवारांनी आपली खाजगी मालमत्ता समजून त्यावर पिढ्यानंपिढ्या कब्जा केलेला आहे. आज भारतात व्यक्तीवादी राजकारण मजबूत होतंय/झालंय. यापाठीमागे राजकीय पक्षांनी आपल्या अंतर्गत लोकशाही व्यवस्थेस दिलेली मुठमाती हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे. कुठल्याही संघटनेला तोपर्यंतच  जनमाणसात स्थान मिळते जोपर्यंत तिचे नेते जनमानसातून येतात. लादलेले किंवा ठराविक कूंटूबातील लोक पक्षाला एकत्रित ठेवू शकतात पण जनमाणसात पक्षाला प्रभावी स्थान मिळवून देऊ शकत नाहीत. याबाबतीत काँग्रेसचे उदाहरण देता येईल.

जोपर्यंत काँग्रेस मध्ये अंतर्गत लोकशाही व संघटनात्मक व्यवस्था मजबूत होती तोपर्यंतच काँग्रेस सामान्य लोकांचा आवाज होती, पण इंदिरा गांधी यांनी जेव्हा काँग्रेसला आपल्या प्रभावाखाली घेतले तेव्हापासूनच भारतात पक्षीय राजकारण कमजोर व व्यक्तीवादी राजकारण मजबूत झालेले आहे. यानंतर जणू याबाबतीत आपल्या राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धाच सुरू झाली. पहिल्या पिढीने संघर्ष करून जनतेच्या मनात नेतेपद मिळवायचे आणि मग त्यांनी आपला वारसदार म्हणून आपल्या परिवारातील आपल्या मुलांना  नेमायचे असे चित्र भारतात सध्या सर्रास बघायला मिळत आहे.

family-friendly-agenda-of-political-parties-marathipizza04

स्रोत

लालू प्रसाद यादव, मुलायम सिंह यादव, महाराष्ट्रात ठाकरे व पवार कूटूंबीय, खाली दक्षिणेकडे करूणानिधी यांनी आपला राजकीय वारसा हा आपल्याच घरातील लोकांकडे सोपविलेला आहे. यापैकी कुणालाही आपल्या सहकाऱ्यांची आठवण आलेली नाही. भारताच्या राजकारणातील यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांना जनतेचे भरभरून प्रेमही मिळाले आहे आणि आजही लोकांच्या काही गटांना ते आपले उद्धारकर्ते वाटतात पण याचबरोबर या लोकांनी भारतीय लोकशाहीत संधी असूनही संस्थागत प्रक्रियांना मजबूत न करता व्यक्तीवाद मजबूत केलेला आहे. याचा परिणाम म्हणून आपली राजकीय व्यवस्था कमजोर होत आहे. लोकांच्या आवाजाची सुनवाई होत नाही.

family-friendly-agenda-of-political-parties-marathipizza03स्रोत

या व्यवस्थेमधून राजकीय विचार -विमर्श ही प्रक्रिया कमजोर होऊन व्यक्तीगत महत्वकांक्षा व इच्छा मजबूत आणि महत्वाच्या होतात. याबाबतीत भाजप इतर राजकीय पक्षांपेक्षा आगळावेगळा होता पण आज रोजी त्यांच्या पक्षात मोदीनामाचा सुरू असलेला गजर ऐकून यांची वाटचालही संस्थाकेंद्रित पक्षाकडून व्यक्तीकेंद्रीत पक्षाकडे होताना दिसते आहे. या व्यवस्थेत व्यक्ती अतिशय मजबूत होत असता, इतक्या की त्या व्यवस्थेलाच धोका निर्माण करतात. याचा अनुभव आपण इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीच्या  स्वरूपात एकदा अनुभवलेला आहे.

family-friendly-agenda-of-political-parties-marathipizza05

स्रोत

आज भारतातील राजकीय पक्षांना परिवारवादाच्या या विळख्यातून मुक्त करण्याची तर गरज आहेच. त्याचबरोबर गरज त्यांच्यात अंतर्गत लोकशाही व्यवस्था मजबूत करण्याची पण आहे. ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे हे मला माहिती आहे. पण भारतीय लोकांनी आपला व्यक्तुपूजक स्वभाव सोडून दिल्यास हे अशक्यही नाही. व्यक्तीनंपेक्षा मुद्दे यावर चर्चा करत राहून व्यवस्था मजबूत करण्याची धडपड बुद्धीजीवी, माध्यमे आणि समाजातील सुशिक्षित लोकांनी केली तर हे नक्कीच अस्तित्वात येईल.

आता वेळ भारतातील राजकीय पक्षांना परिवारमुक्त करण्यासाठी चळवळ सुरू करण्याची आहे !

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

 

Shivraj Dattagonde

लेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.

shivraj has 25 posts and counting.See all posts by shivraj

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?