जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर नेणारा “क्युबन मिसाईल क्रायसिस”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

“I know not with what weapons World War III will be fought, but World War IV will be fought with sticks and stones.”

“मला माहित नाही की, तिसऱ्या महायुद्धात कोणती शस्त्रे वापरली जाऊ शकतील, पण चौथ्या युद्धात माणसाला दगड धोंड्यानेच लढावं लागेल हे नक्की! आणि माणूस पुन्हा स्टोन एज कडे वळेल!”
-अल्बर्ट आइन्स्टाइन.

न्यूक्लीअर वॉर ची धोक्याची घंटा या शास्त्रज्ञाच्या मनात आधीच वाजली होती. आजपासून बरोबर ५६ वर्षांपूर्वी जगावर तिसऱ्या महायुद्धाचे गडद ढग पसरलेले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन चा आंतरिक शीतयुद्धाचा भला मोठा काळ यास कारणीभूत होता.

१९६२ चे वर्ष आणि सोव्हिएतचे चार सबमरीन अटलांटिक महासागरातून क्युबा या अमेरिकी खंडातील बेटावर पोहोचण्याच्या तयारीत होती, सोबत होती ती भलीमोठी न्यूक्लीअर टोरपिडो मिसाइल्स… सलग तीन आठवड्यांपेक्षा जास्त लांबच्या प्रवासामुळे बेजार झालेला सबमरीन क्रू आणि अमेरिकेच्या नजरेपासून स्वतःला वाचविण्यासाठी खोल सागरातुन केलेला प्रवास, यामुळे संपत चाललेली सबमरिन्सची बॅटरी या सगळ्याला तोंड देत सोव्हिएतच्या चार सबमरिन्स क्युबाकडे मार्गस्थ होत होत्या.

 

russia-america-inmarathi

 

पण ३०-३५ टक्के बॅटरीवर पुढे जाणे महाकठीण झालेले होते, त्यात अमेरिकेची हेरगिरी करणारे एअरक्राफ्ट आकाशात घिरट्या घालत होते आणि पाण्यावर तैनात असलेल्या नेव्हल फोर्सेसना चुकविणे जवळपास अशक्य झाले होते. सर्वच सोव्हिएत सबमरिन्सचा आणि मॉस्कोचा संपर्क तुटला होता. उरल्या सुरल्या बॅटरीवर आता फक्त सहा तासच तग धरू शकणे शक्य होते.

तिकडे अमेरिकेत खळबळ माजविणारी मोठी बातमी रेडिओवरून टेलिकास्ट झाली, “सोव्हिएत सबमरिन्सचा पत्ता अमेरिकेच्या एअर फोर्सेसला लागला आहे.”

सोनार ट्रॅकिंग, पाण्यावर टाकलेले बॉम्ब, संपत चाललेली बॅटरी, मॉस्कोशी संपूर्णपणे तुटलेला संपर्क अश्या अनेक समस्यांनी सबमरीन B-59 चा क्रू भांबावलेला होता त्यात त्यांना वाटले की युद्ध सुरू झाले आणि कॅप्टनने “स्पेशल वेपन” लोड करण्याचा आदेश धाडला!! होय, स्पेशल वेपन म्हणजेच ‘न्यूक्लीअर टोरपिडो’.

एका न्यूक्लीअर टोरपिडोची शक्ती जबरदस्त होती, म्हणजे हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या बॉम्ब एवढा शक्तिशाली!

न्यूक्लीअर वॉर आता जगाच्या वेशीवर येऊन पोहोचले होते. B-59 च्या तीन ऑफिसर्सच्या हातात जगातले तिसरे व आतापर्यंतचे महाभयानक न्यूक्लीअर वॉर सुरू करण्याची जबाबदारी होती. कॅप्टन आणि राजकीय युद्धनीती अधिकाऱ्याने टोरपिडो लाँच करण्याचे आदेश दिले परंतु तिसऱ्या आणि तेवढ्याच महत्वाच्या अधिकाऱ्याने याला नकार दिला. तो होता वासिली आर्किपोव्ह, सोव्हिएतच्या चारही सबमरिन्सचा फ्लिट कमांडर.

 

 

त्याने दिवस वाचवला अर्थात जग वाचविले आणि एका दमात जगाला गिळंकृत करणारा, वेशीवर आलेला न्यूक्लीअर वॉर नावाचा राक्षस मागे फिरला.

पार्श्वभूमी :

दुसऱ्या महायुद्धाच्या आधीपासूनच पाश्चिमात्य जगाने सोव्हिएत युनियनचा साम्यवादी प्रसार रोखण्यासाठी तिच्यावर प्रचंड निर्बंध घालणं, नाटो स्थापन करून मोठं संघटन उभं करणं, वगैरे प्रकार अमेरिकेने केले होते. साहजिकच, पूर्वीपासूनच पाश्चिमात्य जगाच्या दबावाला झुगारून देऊन आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याची, तसंच ते टिकवून ठेवण्यासाठी सोव्हिएत युनियनची धडपड सुरू होती. त्यासाठी सगळ्याच क्षेत्रांमध्ये सोव्हिएत युनियनचे प्रयत्न सुरू होते.

त्यातल्या त्यात संरक्षणासंदर्भात असलेल्या गोष्टींवर सोव्हिएत युनियनचा अधिक भर होता.

त्यात अमेरिकेन पाश्चिमात्य जगावरच्या आपल्या वर्चस्वाचा फायदा उठवून अनेक युरोपीय देश तसंच टर्कीसारखे देश यांचा वापर करून, राशियापर्यंत पोहोचतील अशी अण्वस्त्र सज्ज करून ठेवली होती. इटली आणि टर्कीची मदत घेऊन अमेरिकेने स्वतःचे मिलिटरी बेस त्याठिकाणी वसविले होते, जेणेकरून सोळा मिनीटात मॉस्कोसारख्या शहराला धोका निर्माण होईल.

याला उत्तर म्हणून सोव्हिएतकडे हुकुमी एक्का असं काहीच नव्हतं, त्यात सोव्हिएतला आठवण झाली ती फिडेल कॅस्ट्रोची आणि अमेरिकेच्याच गर्भातल्या क्युबाच्या बंडाची!

अमेरिकेपासून जेमतेम नव्वद मैल अंतरावर असलेल्या आणि एकदा अमेरिकेने पुरस्कृत केलेला हल्ला अनपेक्षितपणे परतवून लावलेल्या क्युबामध्ये आपण अण्वस्त्र उभी करू शकलो तर त्यातून अमेरिकेला चांगली जरब बसेल, असं सोव्हिएत युनियनच्या त्यावेळच्या प्रीमियर निकिता ख्रुश्चेव्हला वाटायला लागलं. त्याशिवाय याचे इतर अनेक फायदे होऊ शकतील असं ख्रुश्चेव्हचं मत बनलं.

 

 

एकतर साम्यवादाचा वाटेवर असलेल्या क्युबावर हल्ला करताना अमेरिका बरेचदा विचार करेल, दुसरं म्हणजे, सोव्हिएत युनियनच्या ताब्यात असलेल्या पूर्व जर्मनीच्या विरोधात सूरु असलेल्या अनेकांच्या कारवायांनासुद्धा आळा घालता येईल. यानंतर अचानकपणे सोव्हिएत युनियनच्या कॅस्ट्रोविषयीच्या मतांमध्ये फरक पडल्याचं दिसायला लागलं, तिथल्या वृत्तपत्रांमध्ये कॅस्ट्रोची स्तुती सुरू झाली.

‘बे ऑफ पिग्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेचा क्युबावरच्या अयशस्वी हल्ल्याचा सारांश उचलून धरण्यात आला. यानंतर काही काळ उलटून गेल्यावर, ख्रुश्चेव्हने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याना कॅस्ट्रोशी बोलणी करण्यास धाडलं.

आपण इतकी वर्षे ज्या प्रकारची सुरक्षितता मिळवण्यासाठी धडपडत होतो ती आता आपल्याला मिळू शकते हे कॅस्ट्रोच्या लक्षात आलं, कारण एकदा आपल्या भूमीवर अत्यंत विनाशकारी आणि धोकादायक अशी न्यूक्लीअर वेपन्स आहेत म्हणल्यावर आपल्यावर हल्ला झाला तर सोव्हिएत नक्कीच आपल्या बचावासाठी धावून येईल अशी कॅस्ट्रोला खात्री पटली. दुसरं म्हणजे, या कराराचा भाग म्हणून क्युबाच्या लष्कराला सोव्हिएत युनियनने अत्याधुनिक शस्त्र आणि विमान वगैरे देण्याचं कबूल केलं, आणि तिसर म्हणजे जगावरची अमेरिकेची पकड ढिली पडेल अशी आशा वाटली.

१९६२ साली मे महिन्यात यावर काम क्युबामध्ये चालू झालं, नंतर राऊल कॅस्ट्रोने रशियाला भेट दिली, त्यापाठोपाठ चे सुद्धा तिथे जाऊन आला. यासगळ्या कामाविषयी प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती. परंतु अमेरिकेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त अश्या कावेबाज गुप्तचर संस्था सीआयएला याचा थांगपत्ता लागला नाही असे होणे शक्यच नव्हते.

ऑक्टोबर १९६२ रोजी क्युबाच्या भूमीवर घिरट्या घालणाऱ्या अमेरिकेच्या U2 या टेहळणी करणाऱ्या विमानाने क्युबाच्या भूमीवर काही लष्करी हालचाली टिपल्या आणि ताबडतोब अमेरिकेच्या ओव्हल ऑफिसपर्यंत ही खळबळजनक बातमी पोहोचली.

 

 

साहजिकच अमेरिकेन यासंदर्भात हालचाल करावी यासाठी उजव्या विचारसरणीच्या लोकांनी तत्कालीन राष्ट्रपती जॉन केनेडीवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. यासंदर्भात आणखी माहिती मिळविण्यासाठी केनेडीने प्रयत्न सुरू केले. ११०० मैल अंतरापर्यंत बॉम्ब पाठवू शकणारी क्षेपणास्त्रे क्युबामध्ये बसवली गेली असून, आता अमेरिकेच्या दूरपर्यंत पोहोचू शकतील अशी, २२०० मैल पर्यंत पोहोच असलेल्या बलेस्टिक मिसाईल बसविण्याची तयारी सुरू असल्याचे केनेडीला समजलं.

तसे पुरावे देणारे फोटोज ऑक्टोबर १७ ला राष्ट्रपती भवनात पाठविण्यात आले.

आता हालचाल करणे भाग होते हे लक्षात येताच, केनेडीने अत्यंत महत्वाचे लष्करी अधिकारी, सल्लागार समिती आणि इतर राजकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली, त्याला एक्झिक्युटिव्ह कमिटी (Ex-comm) म्हणत. अमेरिकेच्या वायुदलाच्या प्रमुखाने तर सगळ्या गोष्टींची आखणी करायला सुरुवात केली.

पण ‘बे ऑफ पिग्स’ च्या अनुभवातून शहाणपण शिकलेल्या केनेडीला या प्रकरणात घाईने कोणताही निर्णय घ्यायचा नव्हता. क्युबावर हवाई मार्गाने हल्ला न करता क्युबाला आयसोलेट करून सोव्हिएत कडून येणारी मदत आणि यंत्रणा यांच्यात खंड पडण्याचा डाव आखला आणि १९ ऑक्टोबर १९६२ रोजी या बैठकीचा निर्णय झाला.

अमेरिकेने नेव्हल शिप्स क्युबाच्या दिशेने पाठविण्यासाठी आदेश दिले. याबाबतीत कमालीची ‘शाब्दिक सौम्यता’ बाळगण्यात आली होती त्याला अमेरिकी सरकार ‘quarantine’ म्हणजेच क्युबाला आयसोलेट करणे म्हणले जाऊ लागले कारण आंतरराष्ट्रीय सागरात ब्लॉकेड करणे म्हणजे एक ‘ऍक्ट ऑफ वॉर’ च होते.

२० ऑक्टोम्बर १९६२ या दिवशी क्युबावर नौदल तैनात करण्याची तयारी सुरू झाली.

 

us-inmarath

 

ऑक्टोम्बर २२ रोजी केनेडीने अमेरिकी जनतेसमोर आणि उर्वरित जगासमोर सद्य परिस्थितीचा आढावा देणारे आणि येणाऱ्या महायुद्धाचे भीषण संकेत देणारे असे ऐतिहासिक भाषण दिले. यानंतर तिकडे सोव्हिएत युनियनच्या प्रायमर ख्रुश्चेव्हने क्युबामध्ये आधीच ठेवलेल्या मिसाइल्स काढण्यास नकार दर्शविला आणि केनेडीवर आरोप केले की,

“असे एखाद्या देशाला आंतरराष्ट्रीय महासागरात ब्लॉकेड करणे ‘ऍक्ट ऑफ वॉर’ धरले जाऊ शकते, असे करून केनेडीने जगाला न्यूक्लीअर वॉरच्या उंबऱ्यावर आणले आहे”.

यावर कॅस्ट्रोचं म्हणणं असं होतं की,

“अमेरिकेने इंग्लंड, इटली, टर्की आणि इतर अनेक देशांमध्ये त्या-त्या देशांच्या सहमतीने आपली मिसाइल्स व यंत्रणा उभी केली होती, त्याच धर्तीवर सोव्हिएत युनियन आपल्या संमतीने आपल्या देशात तिची क्षेपणास्त्रे उभी करत असेल तर त्यात अमेरिकेला आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही”.

सगळ्या जगाला या रस्सीखेचीतुन मोठा धोका निर्माण झाला. केनेडी आणि ख्रुश्चेव्ह यांच्यात युद्धपुर्व वाटाघाटी सुरू झाल्या. यातून एक मध्यम मार्ग काढण्यात आला. सगळ्या जगासमोर आलेल्या धोक्यामुळे सोव्हिएत युनियनने निदान काही काळासाठी तरी क्युबाला केली जाणारी मदत थांबवावी असं ठरलं. तात्पुरता जगाने सुटकेचा निःश्वास सोडला असला तरी लवकरच परत एक प्रकरण तापलं.

अमेरिकेची युद्धासाठीची विमानं क्युबाच्या भूमीवर घिरट्या घालत परत अमेरिकेकडे जायची. त्यातील एका U2 विमानाला सोव्हिएतच्या क्युबामध्ये उपस्थित लष्करी यंत्रणेने उध्वस्त केले. २७ ऑक्टोम्बरला घडलेल्या या घटनेत त्या वैमानिक रुडॉल्फ अँडरसनचा मृत्यू झाला.

 

cuba-missiles-inmarathi
nsarchive.gwu.edu

आता या शीतयुद्धाचे तापमान वाढून एका सशस्त्र महायुद्धात रूपांतरण चालू झालेले होते.

“Cold War was about to become Hot!!”

केनेडीने अमेरिकेच्या मिलिटरीला DEFCON 2 च्या पातळीवर आणायचे आदेश दिले. DEFCON म्हणजेच ‘डिफेन्स रेडीनेस कंडिशन’. इतिहासात प्रथमच अमेरिकेने हे पाऊल उचलले होते, आणि DEFCON2 म्हणजे आता फक्त एका पायरीचा फरक उरला होता न्यूक्लीअर युद्ध घोषित होण्यासाठी.. शेकडो सशस्त्र वेपन्स शत्रूवर नेम धरून तयार करण्यात आली.

इकडे वॉशिंग्टन डी.सी. मध्ये अॅटर्नी जनरल रॉबर्ट केनेडी(जॉन केनेडीचे बंधू) आणि सोव्हिएत युनियनचे राजदूत अॅनाटॉली डोब्रीनिन यांची एक अत्यंत गुप्त बैठक पार पडली. याची माहिती अमेरिकी एअरफोर्सला नव्हती. बरीच घासाघीस केल्यानंतर दोन्ही राष्ट्रांत एक करार मंजूर झाला आणि त्यावर या दोघांच्या सह्या झाल्या.

करारानुसार, क्युबामधून आपली मिसाइल्स आणि इतर यंत्रणा यूएन अर्थात संयुक्त राष्ट्रसंघाच्या देखरेखीखाली काढून घेण्यास सोव्हिएतने तयारी दर्शवली.

 

cuban_missile crisis protests InMarathi

याबदल्यात, क्युबावर आपण भविष्यात आक्रमण करणार नाही असं आश्वासन अमेरिकेन दिलं तसंच टर्की व इटलीमधील आपली अण्वस्त्र डागण्याची क्षमता असलेली यंत्रणा अमेरिकेने काढून घेण्याच ठरलं. परंतु आधीच सोव्हिएतच्या चार सबमरिन्स अटलांटिक महासागरात वाट पाहत होते ते मॉस्कोतून येणाऱ्या आदेशाची.

हजारो मैल दूर असल्यामुळे आणि काही दिवसांपूर्वी येऊन गेलेल्या सागरी वादळामुळे संपर्क होणे जिकिरीचे झाले होते, त्यात सबमरिन्सची डिझेल यंत्रणा आणि बॅटरी कमकुवत अवस्थेत होती, सगळ्याच बाजूने आलेल्या संकटांना तोंड देताना फक्त एका माणसाने सबुरीने परिस्थिती हाताळली आणि जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या भयंकर संकटापासून वाचवले.

“The Man Who saved The World”..

 

 

आजही या माणसाला संपूर्ण जगाने धन्यवाद म्हणले पाहिजे. वासिली आर्किपोव्हचा मृत्यू १९ ऑगस्ट १९९८ रोजी रेडिएशन मुळे जडलेल्या कॅन्सरने झाला. शेवटी एकच म्हणावसं वाटतं,

केनेडी आणि ख्रुश्चेव्हची राजनैतिकदृष्ट्या संकट निराकरण करण्याची क्षमता मानली पाहिजे आणि त्या बहादूर सोव्हिएत अधिकाऱ्याच्या संयमाला सलाम केला पाहिजे!!

Kenedy Khrushchev InMarathi

खरंच माणसाचं राजकारण हे ठिसूळ साच्यावर उभं आहे. मानव भयानकरित्या एखाद्या राक्षसरूपी ताकदीला (न्यूक्लीअर पॉवर) जगासमोर प्रस्तुत करू शकतो आणि विनाशाची परिसीमा गाठू शकतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर नेणारा “क्युबन मिसाईल क्रायसिस”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?