समाजवादाच्या हट्टापोटी व्हेनेझुएलाची भयंकर आर्थिक दैना: भारतीय समाजवादी ह्यातून शिकतील?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===  

बर्नी सँँडर्स  आणि जेरेमी कोर्बीन यांच्यासारख्या जगभरातील समाजवाद्यांचा आदर्श नि आवडता समाजवादी देश व्हेनेझुएला. ज्याची स्तुतीसुमने गात हे समाजवादी नेते जगभर हिंडत असतात. आज त्याच समाजवादाचा व्हेनेझुएला बळी गेलेला अजून एक देश ठरला आहे.

व्हेनेझुएला आर्थिक संकटात सापडला आहे.

पश्चिम गोलार्धातील देशांचा आजपर्यंतच्या इतिहासातील हे सर्वात भयंकर असे आर्थिक संकट आहे. अमेरिकेत १९३० मध्ये आलेल्या Great Depression पेक्षाही जास्त भयंकर अशी व्हेनेझुएलातील ही मंदी आहे.

५० च्या दशकातील जगातील चौथी तर लैटिन अमेरिकेतील सर्वात मोठी श्रीमंत अर्थव्यवस्था आज भिकेला लागली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनीधी संस्थेच्या माहितीनुसार व्हेनेझुएलात महागाईचा दर १०,००० % पर्यंत या वर्षाअखेर पोहचेल. आपल्या देशात महागाईचा दर १०% वर गेला तरी आपलं वैयक्तीक बजेट कोलमडून पडतं. निती निर्मात्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण होतं.


 

venezuela-inmarathi
thetimes.com

 

व्हेनेझुएलात लोक आज अन्नावाचून मरत आहेत. गरीबी, बेरोजगारी, महागाई, उपासमार, हिंसा, आंदोलने यांनी तो देश त्रस्त आहे.

व्हेनेझुएलातही Humanitarian Crisis निर्माण झाला आहे. एकुण गरीब कुटुंबांची संख्या ८०% च्या वर गेली आहे. बेरोजगारीचा दर ३०% पर्यंत पोहचला आहे. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था ठप्प आहे. सरकारी कर्मचारी, सर्वसामान्य नागरीक सरकार विरोधात हिंसक विरोध प्रदर्शने करत आहेत. ज्यांची ऐपत आहे ते तो देश सोडून पळ काढत आहेत.

आजपर्यंत व्हेनेझुएला सोडून चांगल्या संधींच्या शोधात इतर देशांमध्ये स्थायिक झालेल्यांची संख्या ४० लाखांपेक्षा जास्त झाली आहे.

व्हेनेझुएलात जीवनावश्यक वस्तूंचा,औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी दुकानांची लुट केली जात आहे, एकमेकांच्या हत्या केल्या जात आहेत, दंगली होत आहेत, दुकानांच्या बाहेर मोठमोठ्या रांगा लागत आहेत. दिवसभर रांगेत उभं राहूनही गरजेचा वस्तू मिळतील याची काही गॅरंटी तरीदेखील नसते.


काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचण्यात आली. या अशाच दुकानासमोरचा रांगेत मोबाईलवर बोलणार्‍या एका व्यक्तीचा मोबाईल बंदुकीचा धाकावर हिसकावून घेण्याचा प्रयत्न एका लुटारूने केला. मोबाईल नं दिल्याने त्याच्या छाताडात गोळी घालून तो चोर पळाला. जखमी व्यक्ती तसाच रांगेशेजारी रक्तबंबाळ अवस्थेत तडफडून मेला. रांग सोडून कुणीही त्याचा मदतीला जाऊ शकल नाही.

आपण रांग सोडली तर अन्नाविना आपण व आपल कुटुंबही उपाशी मरेल ही भिती प्रत्येकाच्या मनात! याप्रकारचा हत्या अन्न जीवनावश्यक वस्तूंचा लुटीसाठी होन आता व्हेनेझुएलात कॉमन झालं आहे.

व्हेनेझुएला बरबाद झाला आहे. कारण समाजवाद आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील अनेक समस्यांचं कारण देखील हा समाजवादच आहे. लवकरच याच प्रकारचा बातम्या व्हेनेझुएलाचा शेजारी निकारागुआ या समाजवादी देशातूनही यायला सुरूवात होतील.

 

venezuela-crisis-inmarathi
bpr.berkeley.edu

पण ठरल्याप्रमाणे समाजवादी फॅन व्हेनेझुएलाच्या आर्थिक संकटाला समाजवादच जबाबदार आहे हे मान्य करण्यास तयार नाहीत. हे तेच समाजवादी आहेत जे एकीकडे व्हेनेझुएला हा आदर्श समाजवादी देश म्हणून त्याच गुणगान गात आहेत तर तो आता आर्थिक संकटात आडकला असतानाही तो समाजवादामुळेच आडकला आहे हे मान्य करायला तयार नाहीत.

या आर्थिक संकटाला काही समाजवादी खोटा प्रचार मानत आहेत तर काही अमेरिकेच्या त्या देशावर असलेल्या निर्बंधांना जबाबदार धरत आहेत.

खरेतर वैयक्तीक निर्बंध म्हणजे व्हेनेझुएलन सरकारशी जवळीक संबंध असणाऱ्या व्यक्तींवरचे निर्बंध सोडले तर आर्थिक असे कोणतेही निर्बंध आमेरिकेने लादले नाहीत तर काही तेलाचा पडलेल्या किंमतीला तर काही महान आत्मे दुष्काळालाही जबाबदार धरत आहेत.

पण सत्य हे आहे की व्हेनेझुएलाचा आर्थिक संकटाला पूर्णतः समाजवादच जबाबदार आहे. या समाजवादाची बीजं ८० चा दशकातच पुरली गेली होती. ह्युगो चावेज या सुप्रसिद्ध समाजवादी नेत्याने मार्क्सच्या स्वप्नातला समाजवादी देश निर्माण करण्याचा खरा प्रयोग १९९८ मध्ये तो सत्तेत आल्यानंतरच सुरू केला.

चावेजने तेलाच्या उद्योगांचं, शेतीचं राष्ट्रीयकरण केलं. तेलाचं राष्ट्रीयकरण करत असताना जून्या कुशल नी अनुभवी आशा १८००० पेक्षा जास्त कामगारांची सरकारी तेलकंपनी PDVSA मधून हकालपट्टी केली नी त्या जागी आपल्या मर्जीतील लोकांची नेमणूक केली. (जसं आपल्या देशात भाजप सरकारने संबित पात्राला ONGC कंपनीत महत्त्वाच स्थानावर नेमलं).


चावेजने तेलाच राष्ट्रीयकरण केल्यानंतर विदेशी गुंतवणूकीस बंदी घातली.

तेलाच्या विक्रीतून मिळालेला नफा पुन्हा आपल्या तेल कंपनीची कार्यक्षमता वाढविण्यात गुंतवण्याऐवजी त्या पैशाची उधळपट्टी केली. PDVSA कंपनीचा वापर आपल्या जनानुरंजक राजकारणासाठी केला. याचाच परिणाम म्हणून १९९९ ते २०१३ या काळात तेलाच्या उत्पन्नात २५% गिरावट नोंदवली गेली.

 

hugo_chavez_inmarathi
pri.org

चावेजने Domestic Consumption साठी सबसिडी दिल्याने तेलाचा देशांतर्गत उपभोग जास्त वाढला परिणामी तेल निर्यातसुद्धा घटली. या सगळ्यांचा परिणाम तेलातून मिळणाऱ्या सरकारी उत्पन्नात घट झाली.

त्याचप्रमाणे कोळसा, खाण, सिमेंट, वीज निर्मिती, वाहतुक, स्टील, टेलिकॉम, बँक, सुपर मार्केट यासारखे महत्वाचे खाजगी उद्योग आपल्या तेलाचा पैशातून विकत घेऊन त्यांच राष्ट्रीयकरण केलं.

आशाप्रकारे सरकारने देशातील अर्थव्यवस्थेवर आपल पुर्ण नियंत्रण मिळवलं. सरकार एकप्रकारचे “आर्थिक हुकूमशाह” म्हणून काम करू लागलं. मुठभर सरकारी नितीनिर्माते केंद्रातून व्हेनेझुएलन जनतेने काय करावं नि काय करू नये याचे फतवे काढू लागले. जनेतेची खाजगी मालकी संपुष्टात आणून त्यांची संपत्ती जप्त करून त्यांचावर खटले भरण्यात आले.


किंमत नियंत्रण करण्यासाठी व्यापाऱ्यांवर दडपशाही करण्यात आली. याच सर्व समाजवादी नितींचा दुष्परिणाम म्हणजे व्हेनेझुएलात आलेलं आर्थिक संकट!

विज, तेल नी शेतीचं राष्ट्रीयकरण केल्याने तिथे सरकारी हस्तक्षेपामुळे भ्रष्टाचार नि अकार्यक्षमता वाढली. तेलाचं, शेतीचं नी विजेचं उत्पन्न घटू लागलं. भारनियम वाढू लागलं. अन्नधान्यांचा तुटवडा निर्माण होऊ लागला.

त्याचप्रमाणे बाजारात किंमत नियंत्रण करण्यासाठी मोठी नोकरशाही देखील निर्माण झाली होती. तीचा खर्च तर वाढत होताच पण उत्पादक आणि व्यापारी हे देखील किंमत नियंत्रणामुळे तोटा सहन करण्याऐवजी आपले उद्योगधंदे बंद करू लागले किंवा विदेशात हलवू लागले. देशात आर्थिक स्वातंत्र्य न उरल्याने विदेशी कंपन्यांची देशी गुंतवणूक घटू लागली.

Ease of Doing Business, Index of Economic Freedom यासारख्या निर्देशांकात व्हेनेझुएला शेवटुन चौथा पाचवा नंबर मिळवू लागला. १९५० ते ८० या तीस वर्षांच्या काळात Immigrants लोकांना आकर्षित करणार्‍या देशातूनच आज लोक उत्तम संधींचा शोधासाठी इतरत्र पळ काढत आहेत.

परिणामी एकुणच देशांतर्गत उत्पादनात घट झाल्याने एकेकाळीचा अन्नधान्यांचा नी वस्तूंचा निर्यातदार असलेला देश फक्त आयात करू लागला. चावेज सत्तेत आला तेंव्हा एकूण निर्यातीत तेलाचा वाटा ७०% होता जो २०११ पर्यंत ९६% झाला. याचा अर्थ तेलाच्या उत्पन्नाशिवाय इतर वस्तू देशात निर्माण होणे बंद झाल्या.


 

oil-inmarathi
youtube.com

जीवनावश्यक वस्तूंची आयात, जनकल्याणाचे Populist कार्यक्रम, आकारमानाने मोठी असणारी भ्रष्ट अकार्यक्षम नोकरशाही या सर्वांवर सरकारी खर्च प्रचंड वाढत होता. तेलाच्या किंमती आंतराष्ट्रीय बाजारात पडल्याने सरकारी उत्पन्न घटू लागले. पण सरकारी खर्च उत्पन्नापेक्षा जास्त वाढू लागल्याने वित्तीय तुट निर्माण झाली.

ती भरून काढण्यासाठी पून्हा बाजारातून कर्जे उचलण्यात येऊ लागली. नोटा छापण्यात येऊ लागल्या तर दुसरीकडे बाजारपेठेतील सरकारी नियंत्रणामुळे देशांतर्गत उत्पादनात देखील घट होत होती.

या सगळ्यांचाच दुष्परिणाम म्हणजे एकीकडे अर्थव्यवस्था मंदीत अडकली तर दुसरीकडे भयावह असा महागाईचा दर वाढला.

व्हेनेझुएलाला आर्थिक संकटात ढकलणारा हा “समाजवादच” आहे. समाजवाद आजपर्यंत पृथ्वीवर जिथे जिथे राबविण्याचा प्रयत्न करण्यात आला तिथे तिथे त्या त्या समाजाच फार प्रचंड नुकसान झालं आहे. Austrian School of Economics चे उदारमतवादी अर्थशास्त्री आणि विचारवंत ल्युडवीग वॉन मिसेस यांनी म्हंटल्या प्रमाणे


“समाजवाद हा बेसिक अर्थशास्त्राच्या विरोधी विचार असल्याने त्याचा प्रयोग कुठेही केला गेला तरी तो असाच फेल जाणार!”

१९९० पर्यंत आपला भारत देश हा सुद्धा याच समाजवादचा शिकार ठरला होता नी भिकेला लागला होता. पण आपल्या राज्यकर्त्यांना उशीरा का होईना पण जाग आली नी उदारमतवादाचा, जागतिकीकरणाचा नी खाजगीकरणाचा आपण स्वीकार केला.

तरी देखील आजही भारतीय जनमानसाच्या आणि शासनयंत्रणेच्या मनावरील समाजवादाची भुरळ कमी झाली नाही. भारतात आजही आर्थिक स्वातंत्र्य जनेतेला हवं तसं मिळत नाही म्हणूनच Ease of Doing Business या निर्देशांकात उदारमतवादाचा स्वीकार करूनही आपला १३० वा नंबर लागतो तर विकसित स्कानडिनेवियन, पश्चिमेकडील देश, पूर्वेकडचे द.कोरिया, सिंगापूर यासारखे देश तर आफ्रिकेतील बोट्सवाना सारखे देश यांचा नंबर पहिल्या ५० मध्ये लागतो.

म्हणूनच ते देश आपल्या देशापेक्षा जास्त प्रगत नी श्रीमंत आहेत. कारण त्या देशातील लोकांना भारतीय लोकांनापेक्षा जास्त आर्थिक स्वातंत्र्य आहे.

नोबेल विजेते अर्थशास्त्री मिल्टन फ्रिडमन यांनी म्हटल्याप्रमाणे “कोणत्याही समाजाचा विकास हा आर्थिक स्वातंत्र्यशिवाय होत नसतो आणि ज्या समाजाला आर्थिक स्वातंत्र्य मिळत नाही त्या समाजाचं राजकीय नी समाजिक स्वातंत्र्यसुद्धा नकारल जात.” समाजवाद लोकांच हेच आर्थिक स्वातंत्र्य काढून घेतो, परिणामी व्हेनेझुएला सारखी भायावह परिस्थिती निर्माण होते आणि हाच तो “समाजवादाचा” आजपर्यंतचा इतिहास आहे.

===


आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?