लॉकडाऊन : खेड्यातील दाम्पत्याने आरंभलेला “हा” प्रकल्प पाहून त्यांच्या दूरदृष्टीची दाद द्यायलाच हवी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कोरोना, लॉक डाऊन हे सध्या परवलीचे शब्द झालेले आहेत. लोकांना सध्या घरात बसून प्रचंड कंटाळा आलेला आहे. वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा प्रत्येकालाच नाही.

परत घरातून काम केलं तरी बाहेर जाता येतेच नाही. अनेक लोक असे आहेत ज्यांना कामावरही जाता येत नाही आणि घरातही करण्यासारखं फार काही काम नाही.

काहीजण व्हाट्सअपवरची कोडी सोडवून वैतागले आहे. टीव्हीवरील कोरोना च्या बातम्या बघून, वाचून लोकांचं डोकं उठलं आहे. बऱ्याच जणांचा सिनेमा पाहण्याचा स्टॉक देखील संपला आहे.

 

watching tv inmarathi
livemint

 

सुरुवातीला घरातच सगळं घरकाम करायचं असल्यामुळे हौसेने लोकांनी वेगवेगळ्या डिशेस बनवल्या; पण आता त्याचाही कंटाळा लोकांना आलेला आहे.

टीव्ही, मोबाईल, घरगुती गेम खेळणे किती काळ करणार!! म्हणूनच कोरोना आणि लॉक डाऊन हे दोन्ही शब्द आता माणसाच्या आयुष्यातून कायम जाऊ देत यासाठी लोक प्रार्थना करत आहे.

त्यांच्यापासून पिच्छा सुटण्याची वाट पाहत आहेत. तरीही काही काही लोक हे असे आहेत की जे आता हा मिळालेला वेळ सत्कारणी कसा लावता येईल याचा विचार करीत आहेत.

लॉक डाऊन सुरू झाल्यापासूनच त्यांनी आपल्या वेळेचं नियोजन केलेलं दिसतंय आणि त्यानुसार कामही केलेले दिसते आहे. असाच प्रयत्न एक जोडप्याने केला आहे.

 

gajanan pakhmode inmarathi 1
navbharat times

 

या मिळालेल्या सुट्टीचा, वेळेचा पुढच्या आयुष्याच्या बेगमीसाठी खूप छान वापर त्यांनी केलेला आहे आणि आपल्या पिण्याचा पाण्याच्या प्रश्न सोडवलेला आहे.

वाशिम जिल्ह्यातील करखेडा गावातील रहिवासी असलेले गजानन पाखमोडे आणि त्यांच्या पत्नी पुष्पा यांनी या काळात घराच्या समोर विहीर खणून स्वतःच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला आहे.

भारतात जेव्हा लॉक डाऊन सुरु झालं त्यानंतर बाहेर काम करायला जाता येणार नव्हतं. आता हे दिवस कसे काढायचे? असा प्रश्न या दांपत्याच्या समोर पडला.

याबद्दल सांगताना गजानन म्हणतात, की घराच्या बाहेर जायचं नाही असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. काय करता येईल हा विचार करत होतो.

गजानन हे गवंडी काम करतात म्हणून मग त्यांनी आपल्या पत्नीशी पुष्पा पाखमोडे यांच्याशी चर्चा करून विहीर खणायला घ्यावी का यावर चर्चा केली. कारण आता उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो.

बरेचदा नळाला पाणी येत नाही. कोरड्याठाक पडलेल्या नळाकडे बघत बसण्यापेक्षा विहीर खणावी असा विचार गजानन पाखमोडे यांनी केला आणि त्यांच्या या कामासाठी पत्नीने देखील संमती दर्शवली.

 

gajanan pakhmode inmarathi 2
india times post

 

विहीर खणायची विशेष कोणतीही उपकरणे नसताना त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या साधनांसहित विहीर खणायला सुरुवात केली, आणि शिस्तबद्ध काम सुरू केलं.

शेजारपाजारचे लोक त्यांच्यावर हसत होते. कारण एकट्याने विहीर खणून होईल का?आणि विहिरीला पाणी लागेल का? असं त्यांना वाटत होतं. परंतु पाखमोडे दाम्पत्याने याचा कोणताही विचार न करता आपलं काम सुरू ठेवलं.

त्यांना त्यांची मुलं देखील साथ करत होती.

लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर गजानन यांनी आपल्या पत्नीला सकाळी आपल्या घरासमोर पूजा करायला सांगितले. त्यांच्या पत्नीने विहीर खणण्याच्या कामाच्या ठिकाणी पूजा केली.

त्यानंतर या जोडप्याने तिथे खणायला सुरुवात केली. न थकता ते विहीर खणायचं काम करत होते. त्यांची मुलं त्यांना चिअरअप करत होती.

आणि हे करत असतानाच एकविसाव्या दिवशी त्यांनी घेतलेल्या मेहनतीला फळ आलं. त्यादिवशी त्यांच्या विहिरीला पाणी लागलं. त्यांनी ती विहीर खणत खणत २५ फूट खाली नेली होती.

 

gajanan pakhmode inmarathi
india tv

 

आणि आता त्यांना २५ फुटांवर पाणी लागलेलं आहे. त्यामुळे पाखमोडे दाम्पत्य खुश आहे. त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला असून वेळही सत्कारणी लागला असं त्यांचं म्हणणं आहे.

आता त्यांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही. म्हणजे जे जे लोक त्यांच्यावर हसले त्यांनाही हा चांगलाच धडा मिळालेला आहे, की प्रयन्त केल्यावर यश मिळतंच.

लॉकडाऊनच्या काळाकडे त्यांनी संधी म्हणून पाहिलं. घरात बसून काय करायचं? किती वैताग करायचा? कसा वेळ घालवायचा याचा विचार न करता त्यांनी हे काम केलं.

कोणतीही, चिडचिड त्रागा न करता त्यांनी हे काम केलं.

अशा अनेक सकारात्मक गोष्टी या लॉक डाउनच्या काळात पहायला मिळतात. आपल्याला अवतीभोवती लॉक डाउनमुळे वैतागलेली लोकं दिसतात, तसेच यातूनही चांगलं काहीतरी करता येईल असा विचार करणारी माणसही आपल्या सभोवती आहेत.

 

social help inmarathi 2
theprint

 

कोण परराज्यातल्या अडकलेल्या लोकांसाठी, गरीब जनतेसाठी देवदूत बनून अन्नधान्य, जेवण पुरवत आहे. तर कोण वृद्ध लोकांसाठी त्यांना औषध पाणी आणि काही जीवनावश्यक लागणाऱ्या वस्तू नेऊन देत आहे.

अगदी रस्त्यावर फिरणाऱ्या बेवारस प्राण्यांसाठी देखील लोक खाणं देत आहेत. म्हणजेच या कोरोनाने आणि निसर्गाने आपल्या सगळ्यांनाच एकमेकांची साथ देऊन जगायला शिकवलं आहे.

फक्त या सगळ्याकडे आपण कोणता दृष्टिकोन समोर ठेऊन बघतो हे महत्वाचे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?