कणीस पाडतंय हेल्थचा भुगा : तुमच्या आवडत्या “कॉर्न” चे होणारे “महाभयंकर” दुष्परिणाम
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक : डॉ. पुष्कर पुरुषोत्तम वाघ
एम.डी. (आयुर्वेद)
===
गोष्ट अमेरिकेतली आहे पण आपल्या सर्वांना बरंच काही शिकवणारी आहे.
कोणे एके काळची नाही फक्त १० वर्षांपूर्वी घडलेली. कॉलेजचं शिक्षण संपवून पुढील आयुष्याची सोनेरी स्वप्ने बघणाऱ्या इयान चीनी आणि कर्टीस एलिस दोन युवकांच्या कानावर बातमी येते की
“त्यांची पिढी ही अमेरिकेच्या इतिहासातील एकमेव अशी पिढी असणार आहे की ज्यांचे आयुष्यमान त्यांच्या आईवडीलांपेक्षा कमी असेल आणि याचे कारण ते खात असलेल्या आहारात दडलेले आहे.”
अस्वस्थ झालेली ही मुलं बातमीतील सत्यता जाणून घेण्यासाठी एका शास्रज्ञाकडे जातात. तो त्या दोघांच्या केसांचे सॅम्पल तपासून सांगतो की त्यांचे केस मक्यापासून बनलेले आहेत.
त्यांना या गोष्टीचे आश्चर्य वाटते. ते म्हणतात आम्ही कुठं एवढा मका खातो ? त्यानंतर ते त्यांच्या केसात हा मका आला कुठून ? याचा शोध घ्यायला सुरुवात करतात. त्यासाठी ते स्वतः एक एकर शेतात मका उगवायचे ठरवतात.
त्यांच्या या शोधयात्रेवर आधारित डॉक्युमेंट्री म्हणजे “किंग कॉर्न”.
सुमारे सव्वा तासाची ही डॉक्युमेंट्री आपल्याला कोपरखळ्या मारत हसवते, टोकदार प्रश्न विचारते आणि शेवटी विषण्ण करून सोडते. २००७ मध्ये आलेल्या या डॉक्युमेंट्रीने अमेरिकेत खळबळ उडवून दिली.
पुढील गोष्ट जाणून घेण्यासाठी ही डॉक्युमेंट्री प्रत्यक्ष पहावी.
मका घ्या मका
तुम्ही म्हणाल की अमेरिकतल्या या गोष्टीचा आपल्याशी काय संबंध? आता थोडी आकडेवारी बघू. मका पिकवणाऱ्या देशांत भारत जगात दहाव्या क्रमांकावर आहे.
गेल्या दशकात मका भारतातील तांदूळ आणि गव्हानंतर तिसऱ्या क्रमांकाचे पीक आहे. लक्षात घ्या की ज्वारी आणि बाजरीचे उत्पादन मक्यापेक्षा कमी आहे.
लवकरच मका हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे पीक बनेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. भारतात मक्याचे उत्पादन इतर कोणत्याही धान्यापेक्षा अधिक वेगाने वाढत आहे.
तुम्ही म्हणाल, आम्ही तर कधीतरी पावसाळ्यात भुट्टा खातो त्यापलीकडे आमचा आणि मक्याचा संबध काय ?
भारतात पिकवल्या जाणाऱ्या मक्यापैकी ४९% कोंबड्यांचे खाद्य तयार करण्यासाठी वापरला जातो. १२ % पशुखाद्य बनवण्यासाठी, १३ % स्टार्च बनवण्यासाठी आणि २५ % खाण्यासाठी वापरले जाते.
खाल्ला जाणारा मकासुद्धा बहुतांश ‘प्रोसेस्ड फूड’ बनवण्यासाठी वापरला जातो.
सर्वात मका सर्वेश्वरा
आपण फक्त कधीतरी मका खातो असं वाटणाऱ्यांनी खालील यादी जरा नीट बघावी.
बेबी कॉर्न, स्वीट कॉर्न सूप, मक्याचे पॅटिस, कॉर्न फ्लेक्स, मसाला कॉर्न, मक्के की रोटी, कॉर्न पुलाव, कॉर्न चीझ बॉल्स, कॉर्न चाट, कॉर्न सॅण्डवीच, कॉर्न कबाब, कॉर्न चीझ टोस्ट, कॉर्न शेझवान फ्राईड राईस, स्वीट कॉर्न खीर आणि सगळ्यांना आवडणारे पॉप कॉर्न.

कोणत्याही छोट्या शहरातील रेस्टॉरंटचे मेन्यू कार्ड बघा तुम्हाला या डिशेस आढळतील. हल्लीची तरूण पिढी आठवड्यातून दोनदा तरी यातलं काहीतरी खाते. हे झालं मक्याच दृश्य रूप.
अदृश्य रूपाविषयी ऐकलं तर तुम्हाला मक्याचे खरे ‘विश्वरूपदर्शन’ घडेल.
घरोघरी रोज खाल्ले जाणारे ब्रेड, बिस्किट्स, कुकीज, केक, टोमॅटो सॉस, रेडी टू इट सूप्स, लहान मुलांचे आवडते जॅम, जेली, न्युट्रीशन बार, आईसक्रिम, फ्लेवर्ड योगर्ट, सॅलाड ड्रेसिंग, पिझ्झा बेस या सर्वांमध्ये कॉर्न फ्लोअर (मक्याचे पीठ) किंवा हाय फ्रुक्टोज कॉर्न शुगर (HFCS) (मक्यापासून बनवलेली साखर) असते.
HFCS – मीठा जहर
एरीयेटेड कोल्ड ड्रिंक, एनर्जी ड्रिंक, हेल्दी म्हणून प्यायले जाणारे पॅकबंद नॅचरल फळांचे रस या सर्वात स्वीटनर म्हणून साखरेऐवजी HFCS वापरले जाते.
गेल्या ३० वर्षांत अमेरिकेतल्या लोकांचे साखर खाण्याचे प्रमाण कमी झाले आहे आणि त्याची जागा HFCS ने घेतली आहे. तरीसुद्धा अमेरिकेत गेल्या ३० वर्षात लठ्ठपणा, डायबेटीस, हृदयरोग, लिव्हरचे रोग यांचे प्रमाण वाढत आहे.
अनेक शास्रज्ञांच्या मते याचे कारण HFCS आहे. खरी गोष्ट ही आहे की HFCS हे साखरेपेक्षाही अधिक घातक आहे. तरीही फूड इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात HFCS वापरते कारण ते साखरेपेक्षा स्वस्त आहे.
HFCS मध्ये मोठ्या प्रमाणात असणाऱ्या फ्रुक्टोजमुळे पोट पूर्ण भरले नाही अशी भावना निर्माण होते त्यामुळे अधिक खाल्ले जाते. त्यातून स्थौल्य आणि डायबेटीस वाढतो.
शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात गेलेले फ्रुक्टोज वापरले गेले नाही तर त्यामुळे फॅटी लिव्हर निर्माण होते.
काही शास्रज्ञांच्या मते अधिक HFCS खाल्ल्याने पॅनक्रियाचा कॅन्सर होतो. म्हणूनच अमेरिकेत आता ठराविक प्रमाणातच HFCS खावे असा प्रचार केला जातोय.

कॉर्न फ्लेक्स – हेल्दी ब्रेकफास्ट ?
मुळात ब्रेकफास्ट ही संकल्पना भारतीय नाही. आयुर्वेदात थंडीचे दिवस वगळता इतर ऋतूत न्याहरीचा आग्रह धरलेला नाही. साधारण ९० च्या दशकापासून आपल्याकडे हेल्दी ब्रेकफास्टच्या नावाखाली कॉर्न फ्लेक्सचा प्रचार सुरु झाला.
मुळात अमेरिकेत मका गाय आणि डुकरांचे वजन लवकर वाढावे म्हणून खायला देण्यात येतो.
जो मका खाऊन डुकराचे वजन वाढते तो खाऊन माणसांचे वजन कसे कमी होईल? पण टी.व्ही.वर एखाद्या हिरोईनने अॅड केली की आपण लगेच त्याच्यावर उड्या टाकतो.
कॉर्न फ्लेक्समध्ये मोठ्या प्रमाणात HFCS असते. एखादा पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर किती वाढते हे ठरवणाऱ्या एककाला “ग्लायसेमिक इंडेक्स” म्हणतात.
तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स ६० आहे म्हणून भाताने डायबेटीस होतो असा प्रचार केला जातो. पण कॉर्न फ्लेक्सचा ग्लायसेमिक इंडेक्स तब्बल ८१ आहे. पण तरीही तो हेल्दी ब्रेकफास्ट हे कसे काय?
शिवाय एका बाऊल कॉर्न फ्लेक्समध्ये एका पॅकेट वेफर्सपेक्षा जास्त मीठ असते. कॉर्न फ्लेक्स दुधातून खाल्ले जातात दुध आणि मीठ असलेला पदार्थ एकत्र खाऊ नये असे आयुर्वेद सांगतो.

लवकर वाढा नष्ट व्हा
भारतात निर्माण होणाऱ्या मक्यापैकी ४९ % कोंबड्यांचे खाद्य बनवण्यासाठी तर १२ % पशुखाद्य बनवण्यासाठी वापरले जाते हे आपण पाहिले. मक्यापासून बनवलेले पशुखाद्य खाल्ल्याने त्यांचे वजन लवकर वाढते व प्राण्यांमध्ये लठ्ठपणा निर्माण होतो.
या लठ्ठपणामुळे हे प्राणी आजारी पडू नयेत म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणात अॅण्टिबायोटिक द्यावे लागतात. तरीही हे पशू जास्त काळ जगू शकत नाहीत म्हणून त्यांना कोवळ्या वयात मारून टाकले जाते.
चरून गवत खाणाऱ्या गायीच्या रक्तात १.५ % सॅचुरेटेड फॅट असते तर मक्यापासून बनवलेले पशुखाद्य खाणाऱ्या गायीच्या रक्तात ९ % सॅचुरेटेड फॅट असते.
अशा प्रकारे मका खाऊन वाढलेल्या कोंबड्या आणि इतर पशुंचे मांस खाऊन आपली अवस्था काय होणार ?
स्वदेशी चळवळ
इतके दुष्परिणाम पाहिल्यावर आता मक्यातील पोषणमुल्यांची चर्चा करू. १०० ग्रॅम मक्यातून ३४२ Kcal इतकी उर्जा १० mg कॅल्शियम आणि २.३ mg आयर्न मिळते.
त्याचवेळी १०० ग्रॅम ज्वारीतून ३४९ Kcal इतकी उर्जा २५ mg कॅल्शियम आणि ४.१ mg आयर्न मिळते. तर १०० ग्रॅम बाजरीतून ३६१ Kcal इतकी उर्जा ४२ mg कॅल्शियम आणि ८ mg आयर्न मिळते.
तर १०० ग्रॅम नाचणीतून तब्बल ३४४ mg म्हणजे मक्याच्या ३४ पट कॅल्शियम मिळते याचा अर्थ पोषणाच्या बाबतीत आपली देशी धान्य मक्याच्या कितीतरी पुढे आहेत.
ही माहिती भारत सरकारच्या “नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रीशन, हैद्राबाद” च्या वेबसाईट वरून मिळवली आहे.
याचा अर्थ देशी धान्यांचे पोषणमुल्य सरकारला व्यवस्थित माहित आहे तरीही अमेरिकेच्या मागे लागून मक्याची लागवड वाढवण्यामागे काय अर्थ?
‘बुद्धिमान माणसासाठी सर्व जग शिक्षक असते’ असे आयुर्वेद सांगतो. पण कुणाकडून काय शिकायचे हे मात्र आपल्याला ठरवावे लागते.
अमेरिकेकडून मक्याचा वसा घेण्याऐवजी कोणताही प्रश्न मुळापासून समजावून घेण्याची वृत्ती, त्यासाठी अफाट मेहनत करण्याची तयारी हे गुण स्विकारले तर नक्कीच आपले भले होईल.
नाहीतर एक दिवस हा मका आपल्या शरीरातल्या पेशी पेशीमध्ये रुतून बसेल आणि “भुट्टा होगा तेरा बाप” अशी नवीन म्हण अस्तित्वात येईल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.