नेताजींचा मृत्यु ते मानवाचं चंद्रावरील पाउल: सत्याला आव्हान देणाऱ्या धक्कादायक “कॉन्स्पिरेसी थेअरीज”
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
व्यक्तीच्या जीवनात कधी काळी एक अशी वेळ येते जेव्हा आजवर शिकलेलं सर्व ज्ञान हे फोल वाटू लागतं. जेव्हा त्याच्या ज्ञानावर एक प्रश्नचिन्ह उभं राहत. शाळा, कॉलेजातून आजवर आपण इतिहासाबाबत अनेक गोष्टी शिकल्या, त्यामुळे आपणा सर्वांना जगाशी निगडीत असे प्रसिद्ध तथ्य तर माहितच आहेत, ते तथ्य अधिकांश लोक स्वीकारतात देखील.
पण आपल्यातच काही असे लोक देखील आहेत जे ह्या तथ्यांना “कॉन्सपिरेसी थेअरी” म्हणतात.
आज आपण ज्या ऐतिहासिक आणि वैज्ञानिक तथ्यांबाबत जाणून घेणार आहोत त्याच्या स्वीकार्यतेवर ह्या विचारवंतांनी प्रश्नचिन्ह उभं करून त्याला खरं मानायचं की खोटं अशी दुविधा उभी केली आहे. जाणून घेऊया कुठल्या आहेत त्या कॉन्सपिरेसी थेअरी..
नील आर्मस्ट्रॉंग हा कधी चंद्रावर उतरलाच नाही…
२० जुलै १९६९ हा दिवस वैज्ञानिक दृष्टीकोनातून मानवी इतिहासातील सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो. कारण ह्या दिवशी कधी नव्हे त्या चंद्रावर पहिली व्यक्ती उतरली होती. नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर पहिल्यांदा पाउल ठेवलं होतं आणि त्यासोबतच तो चंद्रावर पाउल ठेवणारा पहिला माणूस ठरला होता.
वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघितले तर ही एक खूप मोठी घटना होती कारण ह्यानंतर आकाशविज्ञानात प्रगती व्हायला सुरवात झाली.
पण काही लोक आजही असे मानतात की, नील आर्मस्ट्रॉंग कधी चंद्रावर गेलाच नाही, ते निव्वळ एक षड्यंत्र होतं.

म्हणजे १९६९ ला चंद्रावर कोणी उतरलंच नाही. काही विशेषज्ञ नील आर्मस्ट्रॉंगच्या चंद्रावर जाण्याची बाब आजही नाकारतात. कारण अमेरिकेच्या आधी रशियाने माणसाला अंतराळात पाठविले होते.
त्यामुळे स्वतःला सर्वात महान दाखविण्यासाठी अमेरिकेने माणसाला चंद्रावर उतरविण्याचे षड्यंत्र रंगविले.
सुभाषचंद्र बोस ह्यांचा मृत्यु
आपल्या देशाचे क्रांतिकारक सुभाषचंद्र बोस ज्यांना आपण नेताजी म्हणतो, त्यांच्याबाबत देखील एक कॉन्सपिरेसी थेअरी प्रचलित आहे. त्यांच्या मृत्यूबाबत आजवर एकमत नाही, सर्वांच ह्याबाबत आपलं वेगवेगळ मत आहे.

काही इतिहासकारांच्या मते १९४५ साली एका विमान दुर्घटनेत नेताजी सुभाषचंद बोस ह्यांचा मृत्यू नाही झाला तर त्यांनी ब्रिटीश सरकारला फसविण्यासाठी स्वतः आपल्या मृत्यूची बातमी पसरविली होती.
तेजो महालय
जगाच्या सात आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहाल, जो भारताच्या शिरपेचात मनाचा तुरा आहे, ह्या भव्य स्मारकाची सुंदरता भारतापुरती नसून संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे, जगभरातील पर्यटक ह्या ताजमहालाला भेट देण्यासाठी येतात.
पण ह्याबाबतच्या कॉन्सपिरेसी थेअरीनुसार ताज महाल हा कुठला महाल नसून एक हिंदू मंदिर आहे, ज्याचं नाव तेजो महालय आहे.
ह्या कॉन्सपिरेसीनुसार तेजो महालय म्हणजेच ताजमहालचा निर्माण हा शहाजहानच्या शासनकाळच्या ३०० वर्षांपूर्वीचा आहे. रिसर्चमध्ये ताजमहाल येथील एका लाकडाच्या दरवाज्याच्या तुकड्याची कार्बन डेटिंगवरून असे कळाले की हा दरवाजा शहाजहानच्या शासनकाळाच्या ३०० वर्षांपूर्वीचा आहे.

तसेच पुरुषोत्तम नागेश ओक यांनी त्यांच्या “ताजमहल मंदिर नहीं भवन है” ह्या पुस्तकात सांगितलं की, महाल हा कुठला उर्दू शब्द नाही तर हा एक संस्कृत शब्द आहे. त्यासोबतच हे देखील खोटं आहे की, मुमताज महाल ह्यांच्या नावावरून ताजमहालाच नाव पडलं. कारण मुमताज महाल ह्याचं खरं नाव हे ममता उल जमली होतं.
तसेच आपल्या देशातील हिंदूत्ववादी संघटना ह्या बाबीला आजही स्वीकारत नाही की, ताजमहाल शहाजहानने बनवला होता.
त्यांच्या मते ताजमहाल एका हिंदू राजाने बनविला होता, तेही एका शिवालयाच्या स्वरुपात. पण मुघल शासकांनी ह्या स्मारकावर कब्जा केला.
पृथ्वी गोल नाही
पृथ्वीचा आकार गोल आहे, आजवर आपण हेच मानतो. पण अनेक विशेषज्ञ ही बाब नाकारतात. त्यांच्यामते पृथ्वी ही सपाट आहे गोल नाही.

ह्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनी आपली एक वेगळी सोसायटी बनविली आहे. ह्याला सिद्ध करण्यासाठी हे लोक त्यांचे तर्क देखील सदर करतात.
९/११ची घटना
९/११ ला अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर जो हल्ला झाला त्याचा संपूर्ण अमेरिका साक्षीदार बनला. जो वर्ल्ड ट्रेड सेंटर अमेरिकेची शान होता, तो पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासळला.
९/११ ला आतंकवाद्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला आणि अमेरिकेची ही सर्वात उंच इमारत निस्तानाबूत झाली. अतिरेक्यांनी विमानाच्या सहाय्याने ह्या इमारतीला धडक दिली आणि ही इमारत ढासळली.

पण अनेक लोक ह्या घटनेला अमेरिकेने केलेली फसवणूक मानतात. ह्या थेअरीला मानणाऱ्या लोकांच्या मते वर्ल्ड ट्रेड सेंटर विमानाच्या धडकमुळे नाही तर बॉम्बस्फोटांमुळे पडला.
मदर टेरेसा
मदर टेरेसा ह्यांच्याबाबत तर आपणा सर्वांनाच माहिती आहे. पण मदर टेरेसा ह्यांच्याबाबत देखील एक कॉन्सपिरेसी थ्योरी आहे, मदर टेरेसा ह्या एक रोमन कॅथलिक धार्मिक सिस्टर होत्या तसेच त्या एक धर्म प्रचारक देखील होत्या. त्यांचं खरं नाव इग्निस गुंजा असे होते.
त्यांनी आपले अधिकांश जीवन हे समाजाच्या सेवेसाठी आणि धर्म प्रचाराच्या कार्यासाठी जुंपले.

पण मदर टेरेसा ह्यांच्या मृत्युनंतर काही असे कागदपत्र आढळून आले आहेत, ज्यामध्ये मदर टेरेसा ह्यांच्या जीवनातील काही विवादास्पद बाबी समोर आल्या आहेत. ज्या बाबी त्यांच्या जीवनातील दुसरी बाजू समोर आणतात.
मदर टेरेसा ह्यांनी लिहिल्या एका पत्रात त्यांनी लिहिले आहे की, त्या ज्याला ईश्वर मानत आहेत तो ईश्वर आहे की नाही आणि आता त्यांना ईश्वर असण्यावर संशय आहे.
ह्या पत्रावरून असं दिसून येतं की, मदर टेरेसा ह्या ५० वर्षाआधीच देवावरून आपला विश्वास गमावून बसल्या होत्या.
ह्या कॉन्सपिरेसी थ्योरीवर विश्वास ठेवणाऱ्यांच्या मते मदर टेरेसा ह्यांच्या संस्थेला मोठ्या प्रमाणात दान स्वरुपात पैसा यायचा. तसेच त्यांच्या भारतातील ट्रस्ट हा सर्वात अमीर ट्रस्ट पैकी एक होता. तरीदेखील त्यांच्या संस्थेने भारतात आलेल्या कुठल्याही आपत्तीत पीडितांची मदत केली नाही.
पण कितीही तर्क वितर्क लावले तरी ह्या कॉन्सपिरेसी थ्योरी आहेत, त्यामुळे ह्यावर किती विश्वास ठेवायला हवा हा देखील एक मोठा प्रश्न आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.