शून्य आणि ‘अक्कलशून्य’! – भारतीयांचं स्वत्व मारून टाकण्याचा कुटील डाव

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

आपण सोशल मीडियाच्या युगात राहतोय. पूर्वी जसे डायनोसोरचे वगैरे युग होते म्हणतात; तसे हे सोशल मीडियाचे युग. इथे प्रत्येकजण प्रत्येक विषयात तज्ज्ञ असतो. केवळ तज्ज्ञ असतो असे नव्हे; तर ‘आपण तज्ज्ञ आहोत’ हे आवर्जून प्रदर्शित करण्याची खुमखुमी देखील असतेच. याशिवाय काही ‘विद्रोही’वादी देखील इथे असतात.

जे जे भारतीय; ते ते वाईट, बुरसटलेले, टाकाऊ अशीच या लोकांची एकंदर धारणा असते. येन केन प्रकाराने भारतीय संस्कृती वा इतिहास यांची खिल्ली कशी उडवता येईल याकडेच त्यांचे लक्ष लागून राहिलेले असते.

अशा लोकांचे अधूनमधून प्रसारित होणारे दोन संदेश आणि त्यावरची आमची प्रत्युत्तरे;

अ. मूळ संदेश:

असा प्रचार केला जातो की शुन्याचा शोध आर्यभट्ट याने लावला. आर्यभट्ट चा जन्म इ.स ४७६ मधे झाला.म्हणजे आर्यभट्टा च्या आधी शुन्य माहीत नव्हता. रामायणामधे रावण १० तोंडाचा होता आणि महाभारतात १०० कौरव होते. मग या अंकातील शून्य कोठून आणले होते ?? आता आव्हान आहे की शून्य न घेता १०० आणि १० हे अंकात लिहून दाखवा. म्हणजे रामायण व महाभारत खोटे आहे. कींवा आर्यभट्टाने शुन्य शोधला हे तरी खोटे असेल. आता ठरवा तुम्हीच!

उत्तर:

१. मुळात आर्यभट्टाने शून्याचा शोध लावला असे कोणी सांगितले? हा गैरसमज स्वतःच पसरवायचा आणि त्याचे खंडण केल्याचा आव आणायचा असे हे साळसूद धोरण आहे. शून्य सिद्धांताचा शोध आहे ब्रह्मगुप्ताचा. त्यांच्या ब्रम्हस्फुट सूत्रांतला. फेकाफेक करताना किमान योग्य संदर्भ तरी वापरा!

 

1.bp.blogspot.com
1.bp.blogspot.com

२. ब्रह्मगुप्तांचा काल हा महाभारतानंतरचा आहे हे मान्य. पण इथे आलेले शून्य हे आकडा म्हणून नव्हे तर सिद्धांत वा नियम म्हणून मांडलेले आहे. आकडा म्हणून शून्याचा वापर त्याआधीपासूनच चालू होता. आधी आकडा आणि मग सिद्धांत. आधी अंडे मग कोंबडी. (हे आम्ही सांगत नाही; विज्ञानानेच सिद्ध केलेले आहे.)

३. आकडा आणि सिद्धांत यांत काय फरक आहे?

‘शून्याचा सिद्धांत’ म्हणजे शुन्यासह गुणाकार-भागाकार क्रिया केल्यावर येणारे उत्तर होय. शिवाय एक या संख्येआधी शून्य असते असा एकंदरीत सिद्धांत. आकडा आधीपासूनच ज्ञात होता.

स्वाभाविकपणे; सिद्धांत नंतर आला. तक्षशिला येथील सापडलेल्या बखशाली हस्तलिखिताचे कार्बन डेटिंग याच वर्षी पार पडले असून त्याचे वय ३-४ थे शतक असल्याचे निश्चित झाले आहे.

सदर हस्तलिखित हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी लायब्ररी येथे होते. याच हस्तलिखितासंबंधी देण्यात आलेल्या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की; ‘किमान ३/४ थ्या शतकापासून भारतात १०,१००,१००० असे आकडे दाखवण्यास शून्याचा उपयोग होत होता. त्यानंतर जन्मलेल्या ब्रह्मगुप्ताच्या ग्रंथानंतर शून्याचा आजमितीला केला जातो तसा गणितीय सिद्धांत म्हणून उपयोग होवू लागला.

 

youtube.com

थोड्क्यात; शून्याच्या शोधात भारतीयांचं पितृत्व ऑक्सफर्ड देखील मान्य करतंय. सदर हस्तलिखित १९०२ पासून ऑक्सफर्ड कडे होते.

खरे तर शून्य हा आकडा आणि ‘शून्याचा सिद्धांत’ हा फरक ज्याला माहिती नाही अशा ‘अक्कलशून्यांना’ इयत्ता दुसरीत बसवायला हवे. पण त्यापूर्वी हे लोक रामायण-महाभारत इत्यादि कधीपासून मानायला लागले हे पण विचारा!!!

ब. मूळ संदेश:

माझ्याकडे काम करणाऱ्या एका व्यक्तीने मला ‘आम्ही इंग्रजी वर्ष मानत नाही, आमचे नवीन वर्ष गुढी पाडव्यालाच’ अशा आशयाचा लांबलचक मेसेज माझ्या व्हाट्सअँप वर पाठवला.मी त्याला ‘पौष शुद्ध १३ शके १९३९’ अशी तारीख आणि ‘पंच सहस्त्र रुप्याणी’ अशी रक्कम घालून पगाराचा चेक दिला. घेतच नाही राव , काय करू?

उत्तर:

त्या माणसाने तुझं गचाळ संस्कृत बघून धनादेश (चेकला काय म्हणतात ते बहुतेक माहीत नसेल तुला) नाकारला असावा. संस्कृतमध्ये ‘पञ्चसहस्ररुप्यकाणि’ असा शब्द लिहितात रे बावळ्या. ‘पंच सहस्त्र रुप्याणी’ असं आपल्याला हवं तसं लिहीत नाहीत. संस्कृतमध्ये धनादेश लिहिला म्हणून बँक तो नाकारू शकत नाही. तसा स्पष्ट आदेश आहे रिझर्व्ह बँक चा.

केवळ अनाठायी अवघड संस्कृत शब्द लिहू नयेत अशी रास्त आणि माफक अपेक्षा आहे त्यांची.

 

youtube.com

दिनांक म्हणून तू घातलेलं शक संवतदेखील बँक नाकारत नाही. रिझर्व्ह बँकने तसे स्पष्ट निर्देश दिले असून ते त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यातही अधिक सोपेपणा यावा यासाठी भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका उपयोगात आणली जाते. या दिनदर्शिकेत शालिवाहन शकाचा उपयोग केला जातो.

ही केवळ वानगीदाखल दोन उदाहरणे नमूद केली. खरे तर अशा अपप्रचाराला प्रत्येक वेळेस प्रत्युत्तर देणे वेळेअभावी शक्य नसते. मात्र त्यामुळेच कित्येकदा या संदेशांचे जनक अधिक सोकावतात आणि अधिक रेटून खोटं बोलायला सुरुवात करतात.

भारतीय इतिहास, संस्कृती यांची मस्करी करणे हा जणूकाही जन्मसिद्ध अधिकार असल्याच्या थाटात असले अभ्यासहीन संदेश प्रसवले आणि पसरवले जातात तेव्हा शहरी नक्षलवादाच्या विषवल्लीची ही फळं बघून खरंतर अस्वस्थ व्हायला होते.

भारतीयांचं स्वत्व या ना त्या मार्गाने कसं मारता येईल याचे जे प्रयत्न गेली कित्येक वर्षे सातत्याने सुरु आहेत त्यांचीची ही निष्पत्ती आहे.

 

breaking-india-inmarathi
youtube.com

आपणच आपल्या गोष्टींची थट्टा करायची आणि स्वतःच दात विचकून त्यावर हसायचं; ही कोण दुर्बुद्धी! रामसेतूबाबतही एके काळी अशीच खिल्ली उडवली गेली.

मागील वर्षी सायन्स चॅनलने जेव्हा भारत-श्रीलंकेच्या मधील ही भौगोलिक रचना निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहे असे सांगितले तेव्हा मात्र हे कुचाळक्या करणारे लोक कुठल्या बिळात लपून बसले काही कळलेच नाही.

कदाचित उद्या या सेतूचा कालखंड रामायणा इतकाच जुना असल्याचेही परदेशी संशोधक सिद्ध करतील तेव्हा कुठे आमच्याकडचे हे खिल्ली उडवणारे लोक ते मत स्वीकारतील.

आजही आमच्या कडच्या कित्येकांना गोऱ्या साहेबांकडून आलेली गोष्टच सत्य वाटत असते. न्यूनगंड नसानसांत ठासून भरला असला की हेच होणार म्हणा; त्यात नवल ते काय?!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?