कुचकामी द्वेषाचे परिणाम : भाऊ तोरसेकर

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

झुंडीतली माणसं   (लेखांक आठवा)

लेखांक सातवा: अर्णबच्या रिपब्लिकची टीआरपी: भाऊ तोरसेकर

===

प्रेमात सोबत्याची साथ नको असते. सोबत्याची तेव्हा अडचण होते. ते आगंतुक ठरतात. कदाचित प्रतिस्पर्धी सुद्धा वाटतात. उलट वैर करताना सोबत्यावाचून चालत नाही. सह्कारी मित्रांवाचून चालत नाही. प्रेमात सहकार्याची गरज पडत नाही. वैरात सहकार्याची गरज भासते, असा त्याचा अर्थ. रास्त तक्रारीच्या प्रसंगी आणि अन्यायाचा प्रतिकार करताना आम्ही आमच्या मित्रांच्या मदतीची अपेक्षा केली तर ते समजण्यासारखे आहे. परंतु रास्त कारणावाचून आम्ही जेव्हा द्वेष करू पहातो, आमचा संताप जेव्हा समर्थनीय नसतो, तेव्हाच साथ देणार्‍यांची गरज आम्हाला अत्यंत निकडीने वाटते.

हे एक कोडे आहे. सकारण द्वेष करताना इतरांच्या साथीची गरज आम्हाला भासत नाही, पण अकारण द्वेष करताना त्यांच्याशी संधान बांधावे, त्यांच्याशी एकजीव व्हावे, असे आम्हाला वाटते. सारांश कारण नसताना केला जाणारा द्वेष हा अशाप्रकारे माणसे संघटित करणारा एक महत्वाचा घटक आहे.

आता असा प्रश्न आहे की हे बेहिशोबी आणि बेसमजूतदारपणाचे द्वेष येतात तरी कोठून, आणि त्यांच्या प्रभावाखाली असताना माणसे संघटित तरी का व्हावीत? या प्रश्नाचे उत्तर हे की स्वत:च्या कुचकामीपणाची, नालायकपणाची आणि अन्य उणिवांची जाणिव दडपून टाकण्यासाठी जो आटोकाट प्रयत्न केला जातो त्याचा दृष्य परिणाम म्हणजे हा अकारण द्वेष होय. आत्मतिरस्काराचे रुपांतर येथे परद्वेषात घडून आलेले असते. मात्र परद्वेष हे आत्मद्वेषाचेच दुसरे रुप आहे ही गोष्ट स्वत:पासून लपवून ठेवण्यासाठी अत्यंत चिकाटीचे आणि निग्रहाचे प्रयत्न केले जातात.

 

hate-inmarathi
countercurrents.org

अर्थात हे साध्य करण्याचा एक उत्तम आणि प्रभावी मार्ग म्हणजे स्वत:सारख्या अन्य लोकांना जोडीस घेणे. परद्वेषाने पछाडलेल्या जास्तीत जास्त लोकांची संगत शोधणे. अन्य कुठे नाही इतकी एकवाक्यतेची गरज आम्हाला भासते. धर्मांतरे घडवून आणण्यासाठी जे लोक जीवाचा आटापीटा करतात त्यांच्या वागण्याचा अर्थ शोधला तर हे सहज ध्यानात येईल. वरवर पहाता एखाद्याला असे वाटेल की ज्या श्रद्धेने आपण पावन झालो, ती्च श्रद्धा इतरांच्या ठिकाणी उत्पन्न व्हावी म्हणून धर्मप्रसार करू पहाणारी मंडळी प्रयत्न करीत आहेत. प्रत्यक्षात मात्र ज्या विशिष्ट द्वेषाची ती बळी असतात तो द्वेष इतरांच्या गळी उतरवण्यासाठी ती मंडळी धडपडत असतात. (‘झुंडीचे मानसशास्त्र’ पृष्ठ १६७)

उपरोक्त उतारा वरवर वा़चला तर त्यातली गुंतागुंत लक्षात येण्यास त्रास होईल. पण मागल्या चार वर्षात ज्याप्रकारे मोदी विरोधातले राजकारण व अन्य चळवळींची प्रतिक्रीया येत असते, त्यातून नेमकी याचीच प्रचिती येते. अगदी गेल्या आठवड्यात उघडकीस आलेल्या नीरव मोदी बॅन्क घोटाळ्यात मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी आपल्या बुद्धीकौशल्याच्या कसरती करणार्‍या विविध गटांचा पुर्वेतिहासही त्यासाठी तपासून बघता येईल.

असा आर्थिक वा बॅन्केचा घोटाळा भारतामध्ये प्रथमच घडलेला नाही. त्याचा इतिहास देशाच्या स्वातंत्र्यकालीन सात दशकातला सलग आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याही कारकिर्दीत अशाप्रकारचे घोटाळे गाजलेले आहेत आणि त्यावरून इतर सोडा खुद्द त्यांच्या जावयानेच झोड उठवलेली होती.

मात्र आजचे कॉग्रेसचे अध्यक्ष व नेहरूंचे पणतु राहुल गांधी यांनी उथळपणे नीरव मोदी व नरेंद्र मोदी यांच्यातले नामसाम्य शोधून तोफ़ डागण्याचा पोरकटपणा केलेला आहे. कारण त्यांना बहुधा आपल्या पणजोबांचा इतिहास ठाऊक नाही किंवा आजोबांचाही इतिहास कोणी सांगितलेला नसावा. आणि ठाऊक असूनही उपयोग नव्हता. कारण त्यांच्यासह अनेकजण मोदी विरोधातले राजकारण करीत नसून आपल्या कुचकामीपणाला झाकण्यासाठी द्वेषमूलक आरोपांच्या फ़ैरी झडत असतात.

 

RahulGandhi-inmarathi
newindianexpress.com

त्यापैकी कोणाला चोरी पकडली जाणे, अफ़रातफ़री शोधणे वा गुन्हेगार पकडले जाण्याशी काही कर्तव्य नाही. आपण सत्ता गमावली किंवा मोदींसारख्या नकोश्या माणसाने सत्ता मिळवली, याच्या असुयेने त्यांना पछाडलेले आहे. मग ते सत्य नाकारण्यासाठी कुठल्याही थराला जाऊन आरोप करणे वा अफ़वांचे पीक काढण्याची स्पर्धा चालू होते. त्यात मग फ़िरोज गांधी वा नेहरूंचा इतिहास वा वारसा कामाचा नसतो. किंबहूना राहुलच्या खांद्याला खांदा लावून उभे ठाकलेल्यांनाही वास्तवाशी कुठले कर्तव्य असू शकत नाही.

नितीशकुमार यांचा वारसा समाजवादी परिवारातून म्हणजे लोहियावादी विचारप्रणालीतून आलेला आहे. डॉ. लोहियांनी आयुष्यभर कॉग्रेसविरोध केला आणि कॉग्रेसमुक्त भारताचे स्वप्न रंगवणारा पहिला भारतीय नेता, असे त्यांचे वर्णन सर्वथा नेमके ठरावे. नितीशकुमार यांचे जनता दलात पटले नाही आणि लालुप्रसाद यांच्याही लढत देता येईना, म्हणून त्यांनी समाजवादी वारशाला फ़ाटा देऊन भाजपाशी संगनमत केले.

लालुद्वेषाच्या आहारी जाऊन भाजपाशी सोबत केली. पुन्हा जेव्हा लालुंना एकट्याने हाताळणे शक्य राहिले नाही, तेव्हा द्वेषाच्याच आहारी जात भाजपाशी सलगी केली. थोडक्यात आपण स्वबळावर काही करू शकत नसताना समान द्वेषाच्या आधारे मित्र शोधले गेले.

लालुंचा इतिहासही वेगळा नाही. कॉग्रेस विरोधात लालू प्रथम भाजपाचाच हात पकडून मुख्यमंत्री झाले आणि पुढे भाजपाशी वैर सुरू झाल्यावर कॉग्रेसशी हातमिळवणी करून बसले. भाजपाची कहाणी सुद्धा वेगळी मांडता येणार नाही. कॉग्रेसविरोधी राजकारणात भाजपानेही अशा विविध पक्षांची कॉग्रेसद्वेषाच्या भूमिकेतूनच मदत घेतलेली आहे. पण या सर्व कालखंडात भाजपा नव्याने आकार घेत होता आणि आपले पक्षबळ उभारण्यात गर्क होता. सहा दशकात भाजपाने आपले बळ संपादन करून एकहाती लढण्यापर्यंत मजल मारली.

 

bjp-inmarathi
thesouthasiantimes.info

तर दुसरीकडे अस्तंगत होत चाललेल्या कॉग्रेस पक्षाला आता भाजपाचा द्वेष करणार्‍यांची सोबत संगत हवीशी वाटू लागलेली आहे. आजच्या कॉग्रेससाठी जो कोणी कुठल्याही कारणास्तव भाजपाचा व प्रामुख्याने मोदी वा व्यक्तीचा द्वेष करीत असेल, तो मित्र वाटत असतो. पुरोगामी म्हणवणार्‍या बिगर राजकीय लोकांचाही कल तसाच दिसतो. त्यांना आपल्या वैचारिक भूमिका व तत्व यांच्यापेक्षा मोदी द्वेषाचे पछाडलेले आहे. तो आत्मद्वेषाचा अविष्कार असतो.

गुजरातमध्ये मोदींनी लागोपाठ विधानसभा निवडणुका जिंकल्या आणि त्यांच्या त्या यशाचा द्वेष करताना अनेक पक्ष आपले मुळचे धोरण वा ओळख विसरून बसले. त्याचे कारण सोपे आणि सुटसुटीत आहे. आपण राजकीय लढाई आपल्या बळावर जिंकण्याचा आत्मविश्वास हे लोक गमावून बसलेले आहेत आणि तशी इच्छाशक्तीही त्यांच्यात राहिलेली नाही.

मोदींच्या विजयाला आपला कुचकामीपणा व नाकर्तेपणा जबाबदार असल्याची त्यापैकी प्रत्येकाला खात्री आहे. मात्र ते उघड कबुल करण्याची हिंमत त्यापैकी कोणामध्ये नाही. सहाजिकच ते वैफ़ल्य लपवण्यासाठी त्यांना मोदीद्वेष हे सुत्र अंगिकारावे लागलेले आहे.

त्यातून असे निराश लोक आघाडी अथवा गोतावळा म्हणून एकजुट होताना दिसतात. त्यांचे परस्परांशी कुठलेही सख्य नाही किंवा आपसात प्रेम वा समान विचारांचाही धागा आढळणार नाही. मोदीद्वेष त्यांना जोडणारे वा जवळ आणणारे एकमात्र सुत्र आहे. राजकीय यश संपादन करण्यासाठी त्यांच्या अशा एकजुटीची अजिबात गरज नाही.

त्यांनी आपल्या क्षेत्रात कर्तबगारी दाखवली वा सिद्ध केली, तरी मोदी पराभूत होऊ शकतात. पण आपल्या कर्तॄत्वाविषयीच आत्मविश्वास नसेल तर लढायची हिंमत कुठून येणार आणि लढाई जिंकणार तरी कशी?

मग आपले अपयश वा पराभव लपवण्यासाठी विविध युक्तीवाद केले जातात. त्यातूनच मग मतदान यंत्रातील गफ़लत किंवा निवडणूक आयोगावर आरोप करण्यापर्यंतही मजल जाते. त्याची एकमेव प्रेरणा द्वेषभावना हीच असते. म्हणून मग अशा लढाईत समान विचाराचे लोक एकत्र येताना दिसत नाहीत, तर द्वेषानेच भारावलेल्यांचा जमाव तयार होताना दिसतो. कांगावा त्यांची भाषा होते आणि तत्वशून्य जोडीदार जमा होताना दिसतात. असे लोक अधिकाधिक अपयशाकडे ढकलले जात असतात. कारण त्यांच्याकडून कुठले सकारात्मक कार्य होण्याची बिलकुल शक्यता नसते.

 

opposition-leaders-inmarathi
static.dnaindia.com

हा विषय फ़क्त भाजपा वा मोदीद्वेषाचाच नसतो. बंगालमध्ये डावी आघाडी व मार्क्सवादी पक्ष दिर्घकाळ यशस्वी पक्ष होता. पण त्याला आव्हान देताना अशाच प्रकाराने ममता बानर्जी यांनी द्वेषाने भारावलेले राजकारण केले. त्यात कधी भाजपाशी हातमिळवणी केली तर कधी कॉग्रेसची सोबत केली. पण या प्रयत्नात ममतांनी आपलेही बस्तान बसवण्याची काळजी घेतली होती.

जिथे मार्क्सवादी नेस्तनाबुत करण्याचा हेतू सिद्ध झाला, त्यानंतर ममतांनी कॉग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि स्वतंत्रपणे उभ्या राहिल्या.

आज त्यांना बंगालमध्ये कोणाच्या नाकदुर्‍या काढाव्या लागत नाहीत. पण दिर्घकाळ कॉग्रेसला नामोहरम करण्याचेच राजकारण केलेल्या मार्क्सवाद्यांची किती दयनीय अवस्था आहे? ममतांना पराभूत करण्यासाठी चंग बांधण्यापेक्षा त्यांनी ममता द्वेषाचा आधार घेतला. मागल्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी कॉग्रेसशी हातमिळवणी केली, तिचा तात्विक आधार काय होता? ममता विरोध वा द्वेष नाहीतर काय होते?

दुबळ्या कॉग्रेसला डाव्यांनी १९७७ पासून कधी बंगामध्ये डोके वर काढू दिलेले नव्हते. तेच मार्क्सवादी २०१६ मध्ये कॉग्रेसच्या वळचणीला गेले आणि आणखी खच्ची झाले. त्यांच्या अस्ताचा आरंभ २००४ सालातच झालेला होता. केंद्रात भाजपाच्या सत्तेला रोखण्यासाठी त्यांनी प्रथमच कॉग्रेसला पाठींबा दिला आणि त्यांचा आत्मविश्वास नेस्तनाबुत होत गेला.

 

congressmodi-inmarathi
images.firstpost.com

भाजपा द्वेषापलिकडे त्यामागे कुठले तत्वज्ञान होते? कुठला पवित्र हेतू होता? नकारात्मक पराभूत मनोवृत्तीचे ते लक्षण होते. पुर्वी कॉग्रेसला विरोध करताना मोजक्या राज्यात तरी मार्क्सवादी पक्षाला उभे करू शकलेले होते. २००४ नंतर द्वेषाच्या आहारी जाताना त्यांनी आपल्या कुचकामीपणाला लपवत आत्मनाश ओढवून घेतला. डावे असोत की कॉग्रेस असो, त्या पक्षात कोणी आत्मघातकी द्वेषमूलक पवित्र्याला विरोध करू शकला नाही. कारण ज्याला ते पक्ष संघटना समजतात, त्या व्यवहारात माना डोलवणार्‍या झुंडी आहेत.

पण इथे एक गोष्ट जरूर लक्षात घेतली पाहिजे. झुंडी निर्माण करण्यासाठी कुणाचा तरी द्वेष व तिरस्कार आवश्यक असतो. कारण द्वेषातून लोक लौकर एकत्र यायची प्रकीया सुरू होत असते.

प्रेमाने वा विचाराने लोकांना एकजूट करायला खुप मेहनत करावी लागते. पण कशाचा वा कोणाचा तरी विरोध करण्यासाठी लोक लौकर एकत्र येऊ शकतात. त्या द्वेषाचा उपयोग हा गर्दी वा जमाव जमवण्यापुरताच करायचा असतो. जसजशी गर्दी जमू लागते तसा त्या जमावाला संघटित करण्यासाठी काही वैचारिक वा तात्विक धागा निर्माण करावा लागतो. त्यातून रचनात्मक सकारात्मक काही उभारण्याचे उद्दीष्ट समोर ठेवून त्याला बांधून घेण्याला महत्व असते.

तसे नसले मग जमलेली गर्दी विस्कळीत होऊन जाते. कारण द्वेष हा मानसिक विकार आहे आणि तो आवेशात असण्यापुरता मर्यादित असतो.

आवेश वा अवसान गळले की गर्दीची महत्ता संपलेली असते. तिची ताकद क्षीण होऊन जाते. म्हणूनच द्वेषाच्या आधारे जमा केलेल्या गर्दीला सकारात्मक उद्दीष्टाला गुंफ़ण्यातून संघटना उभारणीला प्राधान्य असावे लागते. मतलबासाठी एकत्र आलेले विविध जमाव किंवा घटक एकजीव संघटनेत रुपांतरीत होत नाहीत. त्यांना द्वेषाला प्रवृत्त करणारा मुद्दा वा धागा विसविशीत झाला, मग जमावाची शक्ती नष्ट होऊन जाते.

कुठल्याही मोठ्या संख्येला दिर्घकाळ द्वेषाने प्रेरीत करून ठेवता येत नाही. तिला अन्य कामात गुंतवण्याची कला अवगत असली पाहिजे. भाजपा व संघाचा संघटनात्मक ढाचा हाताशी असलेल्या नरेंद्र मोदींनी कॉग्रेस विरोध वा द्वेषाचा सुनियोजित वापर २०१४ सालात करून घेतला. पण पुढल्या काळात त्याच गर्दी वा जमावाला संघटित करण्याचे कौशल्य अमित शहांनी दाखवले, ही बाब विसरून चालणार नाही.

भ्रष्टाचार, अराजक, कॉग्रेसी अनागोंदी अशा विविध कारणाने लोक रागावलेले होते, त्यांच्या द्वेषभावनेला खतपाणी घालूनच मोदींनी २०१४ ची निवडणूक मोहिम यशस्वी केलेली होती. पण नुसत्या द्वेषावर ते विसंबून नव्हते. पर्यायी व्यवस्थेची लालूच त्यांनी लोकांना दाखवलेली होती. कॉग्रेस व पुरोगामी राजकारणाचा तिरस्कार करणार्‍यांना गोळा करण्यातून सत्ता संपादन केली. तर कारभार कसा करायचा त्याची पुर्ण सज्जता राखलेली होती. त्यासाठी जो आत्मविश्वास आवश्यक असतो, त्याचा विरोधकात आज अभाव आहे.

 

modivscongress-inmarathi
www.newsx.com

आज मोदी विरोधात एकत्र येणार्‍यांनी मोदीद्वेषाचा धागा पकडलेला असला तरी त्यांना मोदीनंतर काय, याचे उत्तर लोकांसमोर ठेवता आलेले दिसत नाही. त्यामुळेच अशा विरोधकांच्या धसमुसळेपणाचा जो तिरस्कार कायम आहे, तेच मोदींसाठी बलस्थान ठरते.

आजही मोदी लोकप्रियता टिकवून असल्याचे दावे अनेक राजकीय विश्लेषक करतात, ते फ़सवे निदान आहे. मोदींपेक्षा या विरोधकांच्या नाकर्तेपणाचा तिरस्कार लोकांमध्ये अधिक प्रभावी आहे. त्याच द्वेषभावनेचा कौशल्याने उपयोग करून घेण्यात मोदी आजही यशस्वी होत असतात. ती मतांच्या मोजमापात लोकप्रियता समजली जाते. प्रत्यक्षात काय नको त्यावर सामान्य लोकांना निवड करावी लागत असल्याचा तो परिपाक आहे. समाज कितीही पुढारला वा सुधारल्याचे दावे केले, तरी सामुहिक विचार झुंडीप्रमाणेच होत असतो.

उत्तम पर्याय समोर आला तर झुंडी सहजगत्या प्रस्थापिताला उध्वस्त करून टाकायला उतावळ्या होतात. पण त्याची उलटी बाजू अशी, की विश्वासार्ह पर्याय म्हणजे आधार नसला तर नाकर्त्याच्या शब्दाला टाळ्या वाजवणारेही जमाव कुठल्या बदलाला तयार होत नाहीत. नुसता द्वेष म्हणूनच कामाचा नसतो. त्यातून झुंड निर्माण करता येते. पण त्या झुंडीतून संघटना उभारण्याचे कौशल्य नसेल तर झुंडी विस्काटून जातात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Bhau Torsekar

लेखक वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.

  bhau-torsekar has 29 posts and counting.See all posts by bhau-torsekar

  One thought on “कुचकामी द्वेषाचे परिणाम : भाऊ तोरसेकर

  • February 19, 2018 at 3:01 pm
   Permalink

   अगदी योग्य विश्लेषण

   Reply

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *

  error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?