डास पुराण: जातीयवाद ते चावण्याच्या सवयीचा पॅटर्न: हा विनोदी लेख चुकूनही चुकवू नका….!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : राजेश कुलकर्णी

===

डासांना मारण्याच्या विजेवर चालणार्‍या बॅटचा जनक कोण असेल? म्हटले तर तो एक फार महत्त्वाचा शोध आहे.

डासांचे वर्तनही विचित्र असते. आपल्यापैकी एकाचा या बॅटमध्ये धूर झाला आहे, तेव्हा आपण तिकडे जाऊ नये हे समजण्याची कुवत त्यांच्याकडे नसते. त्यामुळे या बॅटचा चटचट असा आवाज होत असूनही पुन्हा दुसरा शिलेदार जवळ येऊन दाखल होतोच. चटचट होण्यासाठी.

शमा कहे परवाने से परे चला जा
मेरी तरहा जल जायेगा यहां नहीं आ
वो नहीं सुनता उस को जल जाना होता है…

हे जर कोणी डास आणि डासांची बॅट या संदर्भात लिहिले व गायले, तर कोणाकडून वाहवा मिळण्याची सुतराम शक्यता नाही.

 

mosquito 1 inmarathi
UIhere

 

नर डासाचे आयुष्य जेमतेम दहा दिवसांचे असते असे वाचले. त्यामुळे त्यांच्यात बालगुन्हेगार वगैरे प्रकार बहुधा नसावेत. कदाचित जन्मल्यानंतरचे काही तास यात धरत असावेत.

महिला डास मात्र यांच्या पाचपट-सहापट जगतात. त्यामुळे आपल्या कानांशी होणारी गुणगुण बव्हंशी कोणाची असेल याचा अंदाज नक्की बांधता येऊ शकेल आणि इकडे जन्मल्या-जन्मल्या निरवानिरवीची भाषा सुरू करावी लागणारे पुरूष डास मात्र उगाचच बदनाम होत असतात.

शास्त्रीयदृष्ट्या पहावे तर डासांमध्येही रक्तप्राशन करणार्‍या महिलाच असतात हा काही फार वेगळा योगायोग नव्हे!

अहेवपणे मरण यावे अशी इच्छा महिला डास बाळगत असण्याची शक्यता जवळजवळ नसणारच. पुरूष डासांच्या आयुष्याचा काळ पाहता केवळ दहा दिवसांसाठी डोळे वगैरे मिळणे, म्हणजे माणसाला फारच एेष वाटली तर वावगे ठरायला नको. या दहा दिवसांमध्ये डोळ्यात मोतीबिंदू किंवा काचबिंदू वगैरे प्रकार जवळजवळ होत नसावेतच.

क्वचित दृष्टीदोषामुळे एखादा कोणी वाजवलेल्या टाळीतही अपघाताने आपसूक सापडत असेल, पण डास मारण्यासाठी टाळी वाजवताना हलणार्‍या हवेमुळेच डास फेकला जाऊन सापडत नाही ही एक फार मोठी शक्यता वाटते.

त्यामुळे डासाचा वेग आणि टाळी वाजवण्याचा वेग यांच्यात काय संबंध असावा यावर कोणी संशोधन केल्याचे पाहण्यात नाही.

मागे टारझनच्या गोष्टीत वाचले होते की, त्याची आई तिच्या नरापासून त्याला वाचवत असते. कारण याचे म्हणणे असे की, हे माणसाचे पोर आपल्या पोरापेक्षा फार हळुहळु शिकते. आपले पोर झाडावर उड्या मारू लागले तरी हे अजून रांगतही नाही.

त्या मानाने शिशु डासाची प्रगती थक्क करणारी असते. जन्मल्या जन्मल्या रक्त शोषण्यास शिकणे, एवढेच नव्हे तर सेक्स करायला शिकणे आणि विशेष म्हणजे हवेतल्या हवेत करायला शिकणे ही प्रगती खरोखर विशेषच म्हणायला हवी. बरे तेही हवेतल्या हवेत करायचे तर पंख हलवणे विसरायला नको. अन्यथा धपकन जमिनीवर यायचा.

या सगळ्याचा सराव ते केव्हा करत असतील कोणास ठाऊक आणि पारंगत व्हायची वेळ आली की लगेचच मरण समोर. त्यातही गंमत अशी की नरापेक्षा पाचपट-सहापट असे ‘दीर्घ’ आयुष्य मिळूनही जवळजवळ प्रत्येक मादी फक्त एकदाच सेक्समध्ये भाग घेते.

 

mosquito 2 inmarathi

 

नरोबा मात्र जणू काही रक्त शोषण्याबरोबर आयुष्याचे ते एक सहध्येय असल्यासारखे त्याबाबतीतही हावरटपणा करत असतात. त्या मानाने संयम बाळगणार्‍या मादी डासाचे की डाशीचे आत्मचरित्र अनेकांना प्रेरक ठरू शकेल.

डासांच्या डोळ्याच्या भिंगाचा वाइड अँगल आणि फोकस किती आहे हे न समजल्यामुळे डास तंजावरचे बृहदीश्वर मंदिर म्हणा किंवा वेरूळची शिल्पे एकडोळा पाहू शकत असतील असे वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या पर्यटनाचा उद्योग फारच माफक प्रमाणात असावा.

 

mosquito 3 inmarathi

 

शिवाय  शंभरएक अंड्यांमधून बाहेर पडलेल्यांना पिल्लू म्हणता म्हणताच त्यांचे इतर उद्योग चालू होण्याने निखळ पर्यटनाला त्यांच्यात स्थान नसावे. त्यामुळे तुम्हाला जन्माला घालण्याचे आमचे काम आम्ही केले; आता तुमचे तुम्ही काय ते पहा, असे मुलांना सांगण्याकडे डासपालकांचा कल असावा.

आजवर ‘हनि आय श्रंक द किड्स’सारख्या चित्रपटांमधून किड्या-मुंग्यांना दाखवत असले तरी डासांना मात्र खड्यासारखे वगळळेले दिसते. त्यांचे बरेचसे उद्योग प्रौढांसाठी या सदरात मोडणारे असल्यामुळे कदाचित असे होत असेल.

डासांमध्ये जातीभेद नसतो हाही मोठा गैरसमज आहे. जन्माला आल्यानंतर केवळ सेक्स करणे व रक्त शोषणे याशिवाय अमुक याने काही केले नाही हो, हे यांच्या गुणगुणीतून अगदी स्पष्टपणे ऐकू येते.

तमुकने मात्र मृत्यु समोर दिसत असतानाही डेंगी, चिकन गुनिया नाही तरी गेला बाजार मलेरियाचा तरी प्रसार करून आपल्या आयुष्याचे सार्थक केले, असेही म्हणत असतात.

त्यातही इतर जातींचे डास अद्याप झोपेतून जागे झालेले नसताना काहीजण स्वच्छ पाण्यातून जनन झालेले असूनही डेंगीसारखी देणगी सकाळी सकाळी अखिल मानवजातीला देतात म्हणून त्यांचे कौतुक करणारे व दुषणे देणारे असे दोन गट त्यांच्यात आहेत असे ऐकण्यात येते.

शिवाय आपण गढूळ किंवा घाण पाण्यातले असलो किंवा आणि स्वच्छ पाण्यातले असलो, तरी आपण वेगवेगळ्या रोगांना कारणीभूत ठरतो; म्हणजे आपल्या आयुष्याचे ध्येय एकच आहे, अशी सहमती त्यांच्यात होत असेल.

डास इतर प्राण्यांपैकी आणखी कोणाला चावतात का हे माहित नाही. शिवाय काही जणांना डास अधिक प्रमाणात चावतात ते स्वत:ला स्वभावाने गोड रक्ताचे समजत असले तरी डासांचा याबाबत काय निकष असतो हे कळायला मार्ग नाही.

 

mosquito inmarathi
comicskingdom

 

समोरची व्यक्ती कोणी गरीब असो की कोणी सेलेब्रिटी, डास त्यांच्या भेदभाव करत नाहीत हे मात्र नक्की. एवढेच नव्हे तर ते ज्या यजमानांच्या घरात रहात असतात, तेथेही ते यजमान व पाहुणे असा भेद करत नाहीत. आपल्याला हटवण्यासाठी ही माणसे अधिकाधिक उग्र उपायांचा वापर करत आपल्याचे मुलाबाळांचे आरोग्य धोक्यात आणण्याइतके निर्बुद्ध असतात याची डासांना जाणीव असते.

याची जाणीव असलेला एक डास माणसाच्या बाळाच्या काळजीपोटी त्याच्या मातेला हे सांगायला गेला आणि तिच्या टाळीचा बळी झाला. त्याच्या हौतात्म्याची गोष्ट डासांच्या कित्येक पिढ्यांनंतर आजही सांगितली जाते. तेव्हापासून आता कोणी डास या बेजबाबदार पालकांना समजवण्याच्या फंदात पडत नाहीत.

प्रत्यक्षात असे होते की, ते उपाय आपल्यासाठी नाहीतच असे समजून डास त्या मॅटभोवती किंवा उदबत्तीच्या धुराचा आनंद लुटत तेथेच अधिकाधिक वेळ घालवतात. माणसाच्या काही मुलांना जसे आयोडेक्स खाऊन धुंदी मिळवण्याचे व्यसन लागते, तसे डासांमध्येही त्यांच्या नव्या पिढीला या धुराचे किंवा वासाचे व्यसन लागण्यावरून काळजी व्यक्त केली जाते.

शिवाय माणसे नवनवीन प्रकारचे कापड वापरतात त्यावरचा उपाय म्हणून संशोधन हाती घ्यावे म्हटले तरी हे फार दिवस जगत नसल्यामुळे आपल्या संशोधनाचे निष्कर्ष पुढच्या पिढीकडे हँडओव्हर करता येत नाहीत अशी त्यांची तक्रार आहे.

माणसे मात्र यांच्यावर निश्चितपणे संशोधन करतात हे मला पक्के माहित आहे.

मागे कॉलेजमध्ये असताना एकदा टाटा संशोधन संस्थेच्या एक बाई ट्रेनमध्ये शेजारी बसल्या होत्या त्या डासांवर संशोधन करत असल्याचे त्यांनी सांगितले.  तोपर्यंत पुणेकर झालो नसलो तरी त्यावर “डासांवर काय संशोधन करायचे!” असा धन्य प्रश्न मी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी मुंबई येईपर्यंत खिडकीकडून लक्ष हलवलेच नाही.

तर आता पुन्हा डासांच्या बॅटकडे येतो. डासांच्या बॅटचा शोध लागल्यानंतर डासांची बैठक झाली असेल का? त्यांनी त्यावर काही उपाय शोधला की हतबल असल्याची भावना व्यक्त केली हे कळायला मार्ग नाही.

कदाचित यावरचा उपाय म्हणून आपली संख्या वाढवण्याशिवाय दुसरा उपाय नाही हे कळून एकावेळी शंभरऐवजी हजार तरी अंडी घालावीत असा निर्णय झालेला असू शकतो. हे बॅट हलवून हलवून दमतील; आपण आपल्या संख्येने यांना हरवू अशी यामागची भावना असावी.

अर्थात काही संवेदनशील माणसेही असतात. एखाद्य़ा डासाची विमानासारखी भरारी पहात रहावी अशी असते. अगदी त्या सॅव्हेज हारवेस्ट चित्रपटामध्ये तो शिकारी अगदी बंदुकीच्या पट्ट्यात येईल अशा पद्धतीने बसलेल्या नरभक्षक सिंहाचा रूबाबदारपणा पाहून त्याला मारण्यासाठी खटका दाबत नाही.

अशी व्यक्ति मग टाळी वाजवण्याऐवजी ती भरारी पहात बसली नाही तरच नवल. एकूणच डासांनी स्वत:ला डेंगी-मलेरिया-चिकून गुन्या इत्यादिंपासून मुक्त करून घेतले तरी मानव-डास मैत्रीचे पर्व सुरू होईल व डासांचाही भूतदयेच्या यादीत समावेश करेल.

मात्र तोपर्यंत माणूस जेव्हा डासांच्या वस्तीत जातो त्यावेळी कोणती पू्र्वतयारी करून जाऊ शकेल? पाहुणे आपल्या हातावर बसलेल्या डासाला मारू लागले किंवा डासांना पायांच्या रूपात खजिना सापडल्यावर पायांची चुळबूळ सुरू झाली तर मग गप्पा रंगणे शक्य होत नाही.

 

mosquito 4 inmarathi

 

पाहुण्यांना उदबत्तीचा धूर सहन होईलच असेही नसते. अशा वेळी स्वत:च “फार डास झालेत हो सध्या!” असे पाहुण्यांना म्हणून भागत नाही. कारण एखादे पुणेकर पाहुणे “तुम्हाला अर्धा तास भेटायला काय आलो आणि तुम्ही तर डेंगी-मलेरियाचे रिटर्न गिफ्ट देऊ लागलात असे एेकवायला कमी करणार नाहीत”. मग त्यांच्या स्वत:च्या घरातच डाससंवर्धनाचा प्रकल्प पूर्ण जोमात का चालू असेना!

अशा वेळी एखाद्या कार्यक्रमाचे निमंत्रण देताना तेथे दर माणसामागे किती डास असू शकतील याचा अंदाज सांगता येईल. एक ते पाच या पातळीवर माणशी शून्य ते पन्नास डास असे प्रमाण ठरवता येईल.

त्याप्रमाणे माणसे कोणता पोशाख करायचा हे ठरवू शकतील. कदाचित ही पातळी पाच असेल तर मग पूर्ण बाह्यांचे शर्टपँट-हातमोजे-बूट-याखेरीज चेहरा व मान या डासांच्या आवडत्या भागांसाठी मच्छरदाणीसदृश्य जाळी असा काहीसा हा पोशाख असेल; जेणेकरून आ केला तर डासांनी मुखप्रवेश करू नये.

बाकी डुकरांशी लढाई करण्याच्या फंदात पडू नये. कारण त्यासाठी तुम्हालाही चिखलात उतरावे लागते असे म्हणतात. तुमच्या किंवा इतर कोणाच्या रक्ताने टम्म फुगलेला डास मारतानाही असाच विचार करावा लागतो. त्यातही गडद रंगाचे कपडे नसतील तर ही काळजी घ्यावी लागते.

अखेर आपलेच रक्त खरोखर त्याच्यात असले तरी त्या क्षणापुरतेदेखील अापले त्याच्याशी रक्ताचे नाते आहे असे म्हणता येत नाही असा हा विलक्षण प्रकार. यावर कोणी एखादी चारोळीतरी नक्की करू शकते. होऊन जाऊ दे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?