' मोदी सरकारचा “असा ही” बदल…! मेरा देश “खरंच” बदल रहा है वाटतं! – InMarathi

मोदी सरकारचा “असा ही” बदल…! मेरा देश “खरंच” बदल रहा है वाटतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

“सरकारी काम आणि सहा महिने थांब” ही आपल्या नेहमीच्या परिचयाची म्हण. सामान्य माणूस स्वतःची कामे करून घेण्यासाठी जेव्हा सरकारी कचेऱ्या, कार्यालयात जातो तेव्हा अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो हे काही नवीन नाही.

अनेकदा सरकारी कार्यालयात माराव्या लागणाऱ्या फेऱ्यांना कंटाळून लोक प्रयत्न सोडून देतात. इतकी वाईट परिस्थिती आपल्याकडे आहे.

पण सध्या लोकांना अनेक अनुभव याच्या अगदीच विरुध्द येत आहेत. पत्रकार नितीन साळुंखे यांनी त्यांचा स्वतःचा अनिभाव फेस्बुक्वरून पोस्ट केला आहे.

नितीन साळुंखे हे सध्या महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटसाठी मुंबई व उपनगरांतील प्राचिन काळपासून ते आजतागायत सुरु असलेल्या यात्रा आणि जत्रा या विषयाचं फोटोसहीत लिखाणाचं काम सुरु आहे. त्यांची फेसबुक पोस्ट इनमराठीच्या वाचकांसाठी देत आहोत.

===

गेले चार दिवस मी देशाची राजधानी दिल्लीत आहे. असं नाही, की मी दिल्लीत प्रथमच गेलोय. गेल्या चार वर्षात मी सातत्याने दिल्लीत जातोय, पण ते जाणं आणि आताचं जाणं यात मोठा फरक आहे. गेली काही वर्ष मी दिल्लीत जात होतो, ते पर्यटनासाठी आणि ते ही सहकुटुंब. आता जाणं झालंय, ते केवळ व्यवसाय या विषयासाठी..

माझ्या काही मित्रांनी भारत सरकारच्या ‘स्टार्ट अप योजने’त एक अनोखा व्यवसाय सुरु केलाय. सरकारच्या माध्यमातून त्यांना अत्यंत वाजवी भाड्यात व्यवसायासाठी जागाही दिली गेलीय.

या व्यवसायाचं पुढचं पाऊल म्हणून दिल्ली स्थित संबंधीत मंत्री, मंत्रालयातले सचिव व विविध ज्येष्ठ अधिकाऱ्यांना भेटणं आवश्यक होतं.

माझ्या व्यवसाय सुरु करण्याच्या उद्देशाने धडपड करणाऱ्या तरुण मित्रांना काही मदत करावी यासाठी मी त्यांच्यासोबत दिल्लीला आलो आहे. थोडक्यात या वेळची माझी दिल्लीवारी केवळ सरकार दरबारी अनेकांच्या भेटी घेणं यासाठी होती.

 

delhi-sansad-inmarathi
hi.naradanews.com

वास्तविक सरकार आणि सरकारची जगडव्याळ आणि स्वस्थ यंत्रणा याबद्दल मी स्वत: उदासीन आहे. ही यंत्रणा झडझडून काम करण्यापेक्षा काम झटकून देण्याचाच विचार करत असते, हा माझा अनुभवसिद्ध समज होता. शब्दांचे खेळ आणि फायलींची आस्ते कदम चाल ही शासन आणि प्रशासनाची माझ्या मनातली ओळख होती.

शासन भाजपचं असो वा काॅंग्रेसचं किंवा आणखी कोणतंही, ते नेहेमीच माझ्या चेष्टेचा विषय राहिलं आहे.

पण या चार दिवसात माझा पहिला अनुभव मला बदलावा लागतोय की काय असे नवीन अनुभव आले. केंद्रीय सरकारातील श्री. सुरेश प्रभू आणि श्री. गिरिराज सिंह या दोन बड्या मंत्री महोदयांची भेट झाली.

त्यातील श्री. गिरिराज सिंह यांनी तर त्यांच्या खाजगी सचिवांमार्फत, ‘आप बाहर से आयें हो, तो आप तुरंत आईये’ असा चक्क निरोप देऊन भेटायला बोलावलं होतं. हा आम्हाला, विशेषत: मला आश्चर्याचा मोठा धक्का होता.

या दोन्ही मंत्र्यांची भेट एकाच दिवशी दोन तासांच्या अंतराने ठरली होती. दुपारी २ वाजता श्री. गिरिराज सिंह आणि ३.३० वाजता श्री. सुरेश प्रभू. या दोन्ही मंत्र्यांची कार्यालयं एकाच इमारतीत दोन वेगवेगळ्या मजल्यांवर आहेत.

श्री. गिरिराज सिंह यांची त्यांना आमच्या अगोदर ठरवलेल्या व्यक्तींसोबतची मिटींग लांबल्यामुळे, आमची वेळ येईपर्यंत ३ वाजले. आम्हाला ३.३०च्या श्री. सुरेश प्रभूंसोबतच्या मिटींगलाही जाणं आवश्यक होतं.

शेवटी श्री. गिरिराज सिंहांबरोबर आपली मिटीग काही होत नाही असा विचार करुन आम्ही श्री. गिरिराज सिंहांच्या सचिवाला सांगून श्री. सुरेश प्रभूंच्या आॅफिसला गेलो..

 

suresh-prabhu-inmarathi
theindianrailways.com

दुपारी ३.३० ला आमची श्री. सुरेश प्रभूंची भेट झाली. आमचं म्हणणं त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतलं व संबंधीत सचिवांना बोलावून, यांचं काम व्यवस्थित ऐकून घ्या व यांना सर्वप्रकारची मदत करा अशा सुचना दिल्या व आम्हाला लगेच त्या सचिवांबरोबर जाण्यास सांगितलं.

सचिवांनी त्यांच्या सर्व कार्यकारी टिमबरोबर आमची भेट घडवली आणि आमचं म्हणणं ऐकून घेतलं व त्वरीत संबंधीत आयुक्कांबरेब आमची मिटींग लावून दिली (जी आज, म्हणजे दुसऱ्यादिवशी अतिशय फलदायी झाली.)

श्री. सुरेश प्रभूंच्या आयएएस अधिकाऱ्यांसोबत आमची मिटींग सुरू असतानाच श्री. गिरिराज सिंहांच्या कार्यालयातून त्यांच्या सचिवाचा फोन आला, ‘मंत्रीजी आपकी राह देख रहे है, आप तुरंत आईये’ म्हणून. हा तर मोठ्या रिश्टर स्केलचा धक्काच होता.

सामान्य माणसं मंत्र्यांची वाट पाहात तासंतास ताटकळत असतात, हा आपला नेहेमीचा अनुभव. इथे तर केंद्रीय मंत्री आमची वाट पाहात होते.

आम्ही त्यांना आमची परिस्थिती समजावून सांगितली, तर ‘आपका प्रभूसाहब के वहाॅं का काम हो जाये तब आना’ असं त्या सचिवांनी सांगितलं. असं असलं तरी आम्हाला श्री. गिरिराज सिंहांच्या कार्यालयात लवकर जाणं भागच होतं. आमच्याशी होणाऱ्या मिटीगसाठी ते थांबणं योग्य नव्हतं आणि हातातलं काम अर्धवट सोडून जाताही येत नव्हतं. इकडे आड तिकडे विहिर अशी काहीशी आमची अवस्था होती.

शेवटी श्री. सुरेश प्रभूंकडचं काम पूर्ण करु आणि श्री. गिरिराज सिंहांची माफी मागून त्यांना नंतर कधीतरी भेटू असा विचार केला आणि श्री. प्रभूसाहेबांच्या मंत्रालयासोबतचं काम पूर्ण करण्याचं ठरवलं.

श्री. सुरेश प्रभूंच्या मंत्रायलातल्या अनेक अधिकाऱ्यांसोबतचं आमचं काम समाधानकारकरित्या संपेपर्यंत संध्याकाळचे पांच वाजले आणि पुन्हा श्री. गिरिराज सिंहांच्या कार्यालयातून फोन आला, की लवकर या मंत्रीजी आमची वाट पाहात आहेत.

 

giriraj-singh-inmarathi
india.com

आता मात्र आम्ही धावत त्यांच्या कार्यालयात पोहोचलो. श्री. गिरिराज सिंह आमची वाटच पाहात होते. आता मात्र आश्चर्याला पारावारच उरला नाहीं.

“आप इतने दूर से आये हो और देश की प्रगती मे आपका कुछ योगदान देना चाहते हो, तो आपसे मिलना हमारा कर्तव्य बनता है”

हे त्यांना मिटींगच्या सुरुवातीलीच स्पष्च केलं व पुढे १०-१५ मिनिटं आमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. आमच्या कामाचं महत्व त्यांच्या चटकन लक्षात आलं आणि पुढे त्यांना त्यांच्या संबंधित सचिव-अधिकाऱ्यांना पटापट सुचना देऊन आम्हाला सर्व प्रकारची मदत करायच्या सुचना दिल्या व “आप पुन्ह: आईये, हमे आपसे और भी कुछ उम्मीदे है. आप की कल्पना मे हमें रुची है” असं सांगून निरोप दिला.

या चार दिवसातला दिल्लीच्या मा. पंतप्रधान मोदी सरकारच्या दरबारातला अनुभव अत्यंत सुखद होता.

केंद्रीय मंत्रालयातल्या गेट वरच्या सीआयएसएफच्या गार्ड पासून ते खुद्द मंत्री महोदय व संबंधीत आयएएस अधिकारीपर्यंतच्या सर्व व्यक्ती हसतमुखाने आणि अत्यंत अदबीने पेश होत होत्या, आमचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकत होत्या आणि त्यावर अॅक्शनही घेत होत्या.

ते ही आम्ही कोणा व्हिआयपीच्या ओळखीने गेलो नसतानाही. हा अनुभव आमचा उत्साह वाढवणारा होता..

जे चांगलं आहे त्याचं कौतुक करायलाच हवं, मग ते कुणाचंही असो. दिल्लीत मोदींनी सर्वांना कामाला लावलंय हे ऐकलं होतं, ते प्रत्यक्ष अनुभवलं.

मला माझा शासन आणि प्रशासान यांच्याबद्दलचा या चार दिवसातला अनुभव, मला माझा पूर्वग्रह बदलण्यास भाग पाडणारा होता. ‘मेरा देश बदल रहा है’ ही फक्त घोषणा नाही याचा अनुभव मी घेतला होता.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?