शेटजी-भटजींच्या हातून सुटत चाललेलं राजकारण! – थँक्स टू सोशल मीडिया!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

पारंपरिकरित्या काँग्रेस हा शेटजी-भटजींचा पक्ष राहिला आहे. तोंडी लावायला लोणचं असतं तसं ताटाखालचे मांजर असणारे एक-दोन मुस्लिम, बहुजन नेते सोडले तर अख्खी हायकमांड ही उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय अशीच राहिली आहे. नेहरूंच्या काळापासून ते अगदी सीताराम केसरींच्या काळात तळागाळाला जाईपर्यंत काँग्रेसची चाल, चरित्र आणि चेहरा हे शेटजी-भटजीच होते. 50-60 च्या दशकात ब्राम्हण-बनिया असणारे समीकरण आणीबाणीच्या नंतर ब्राम्हण-क्षत्रिय-बनिया असं झालं. पण, बहुजन हा काँग्रेसने नेहमीच सत्तेच्या केंद्रापासून दूर अगदी परिघाबाहेर ठेवला. काँग्रेसच्या सगळ्या योजना या फक्त नावाला गरिबांसाठी होत्या, पण त्याने घरं फक्त उच्चवर्णीय व उच्चवर्गीय लोकांची भरली जात होती. काँग्रेसला बहुजनांशी कसलंही सोयरसुतक नव्हते.

 

congress historical leaders marathipizza
inc.in

बरं हे सगळे करताना काँग्रेसला विरोधक होते का? बिलकुल होते.

सामान्य राजकीय पक्ष विरोधकांचे मुद्दे खोडून काढतात, मूर्ख राजकीय पक्ष विरोधकांनाच नामशेष करतात आणि काँग्रेससारखे अतिचाणाक्ष पक्ष स्वतःच्या सोयीचे विरोधक उभे करतात.


1947 ते 1998 ही 51 वर्ष देशात आणि केंद्रात फक्त काँग्रेसचीच सत्ता होती. मोरारजी देसाई, चरण सिंग, व्ही.पी.सिंग, चंद्रशेखर, देवेगौडा, गुजराल हे सगळे गैरकाँग्रेसी PM सुद्धा मूळ काँग्रेसीच होते. ममता बॅनर्जी, शरद पवारांपासून ते अगदी जयप्रकाश नारायण यांच्या सारखे दिग्गज सुद्धा काँग्रेसच्याच वेलीची फळे. आडनावे टाकून दिली की डिकास्ट होता येतं हे समजणारे भंपक समाजवादी, कास्ट बद्दल काहीच न बोलणे म्हणजे डिकास्ट झालो हे समजणारे उचचवर्णीय डावे, भाषीय/प्रांतीय अस्मितांना फुंकर घालणारे द्रविड/शिवसेना या सगळ्यांच्या मुळांशी खतसुद्धा टाकलं कुणी तर काँग्रेसने! हीच काँग्रेसची चाणाक्ष राजकीय खेळी होती – आपला विरोधक सुद्धा आपणच उभा करायची, आणि बहुजनाला राजकीय ओळख नाकारण्याची!

राजकारणात खरी सत्ता भोगायला गरज असते ती न्यायव्यवस्था, नोकरशाही आणि प्रसारमाध्यमे यांत आपली माणसे ठेवायची. काँग्रेसच्या काळात ह्यात सगळीचकडे काँग्रेसिंचा भरणा होता. मा. म. देशमुखांनी त्यांच्या एका पुस्तकात 1970-80 च्या आसपासची संसदेतील खासदार आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यांची जातवार संख्या दिलीय, ती स्तिमित करणारी आहे. बहुजन त्यात दुरदूरपर्यंत कुठेही दिसत नाहीे. आणि मीडिया मधली शेटजी-भटजींची सत्ता तर आपण आजही पाहतोच आहोत.

कुठल्याही चर्चेसाठी मुद्दा ठरवणारे हेच, एखादया मुद्द्याच्या बाजूने बोलणारे हेच, विरोधात बोलणारे हेच, अँकर हेच, संपादक हेच, पक्षप्रवक्ते हेच, स्तंभलेखक हेच, टीकाकार हेच, समीक्षक हेच, भाष्यकार हेच आणि इतिहासकारही हेच! प्रिंटमीडिया आमचा, TV मीडिया आमचा आणि झालंच तर आताशा सोशल मीडिया सुद्धा आमचाच! आम्ही दाखवू ते मुकाट्याने पाहायचं आणि आमच्यातल्या सुमारपणाला सुद्धा तुम्ही टॅलेंट म्हणून डोक्यावर घेऊन नाचायच!

काँग्रेसच्या या नुरा कुस्तीतून सुटलेला “हिंदुत्व” नावाचा एक काडीपैलवान विचार पुढे वेगवेगळी नावे धारण करत शेवटी भाजप या नावाने थोडा स्थिरावला. काँग्रेसने सुरुवातीच्या काळात त्यालाही थोडे पाणी घालून मोठे केले; कारण स्वतःचा नसलेला सेक्युलॅरिझम दाखवायला भाजपचा बागुलबुवा सोयीस्कर होता. बाबरी मशीद पाडायची तयारी होत असताना, रथ यात्रा निघत असताना आणि प्रत्यक्ष ती पाडताना काँग्रेसच्या PM ना ते माहीत नव्हतं हे समजणे म्हणजे राजकीय दूधखुळेपणा आहे. संघाची विषवल्ली पोसायला, त्यावर भाजपचे फळ धरायला आणि त्यांनतर त्या कट्टर उच्चवर्णीय हिंदुत्ववादी मासिकतेच्या भाजपला मोठे करायला काँग्रेसने शक्य तितका हातभार लावलेला आहे. प्रत्येक सुपरहिरोला मोठे व्हायला एक सुपरव्हिलन लागतो, जो शेवटी त्याच्याकडून हरला जातो. काँग्रेसने भाजपला हरणारा सुपरव्हिलन म्हणून तयार केले होते, स्वतःच भंपक पुरोगामीत्व आणि सेक्युलॅरिझम ठसठशीत बनवायला.

 

bjp-marathipizza
indianexpress.com

1998 नंतर प्रथमत: या देशात वाजपेयींच्या रूपाने खऱ्या अर्थाने बिगरकाँग्रेसी सरकार आले. 2004 ला भाजपचा पाडाव करत परत काँगेस सत्तारूढ झाली. भारतातली जातीय समीकरणे पूर्णत: माहीत नसणाऱ्या सोनिया गांधींनी डॉ.मनमोहन सिंग यांना रबरस्टॅम्प समजून PM पदी बसवले. पण डॉ. सिंग यांनी दहा वर्षात वायफळ बडबड न करता, स्वतःच्या धोरणांनी या देशातल्या बहुसंख्य बहुजनवर्गाला आर्थिकदृष्टया कित्येक पायऱ्या वर आणून ठेवले. आणि ह्याचमुळे डॉ.सिंग हे समस्त शेटजी-भटजी मीडियाच्या, राजनेत्यांच्या शत्रूयादीत अव्वल राहिले.

2011-12 च्या आसपास भारतात आलेल्या सोशल मीडियाने कित्येक लोकांना आवाज दिला. मुख्य मीडियातील संपादक लोकांनी सुरुवातीच्या काळात या सोशल मीडियाला आकार द्यायची भूमिका घेतली आणि त्यात भक्त लोक जन्माला आले. 2014 च्या मोदी लाटेला या भाजपसमर्थक उच्चवर्णीय, उच्चवर्गीय भक्तांचा सगळ्यात मोठा सहारा होता.

पण –

“तंत्रज्ञानाला बांधून ठेवता येत नाही” या न्यायाने सोशल मीडियावर बहुजन समाजाने पण मोठ्या प्रमाणावर स्वतःला व्यक्त करायला सुरुवात केली.

आजच्या घडीला बहुजन समाजामधील काँग्रेसची विश्वासार्हता संपलेली आहे. मिडियामधील शेटजी-भटजींचे वर्चस्व येत्या काही वर्षात मोडून पडणार आहे. कॉर्पोरेटच्या जीवावर मोठे इव्हेंट साजरे करून स्वतःचे महिमामंडन करणाऱ्या मोदींचे पाय आता हळूहळू जमिनीला टेकायला लागले आहेत. सोशल मीडिया येत्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर उलथापालथ करणार आहे. कन्हैय्या असो, रोहित वेमुला असो, हार्दिक पटेल असो, जिग्नेश मेवानी असो, जस्टीस कर्णन असो किंवा अगदी गेल्या आठवड्यापासून माध्यमांनी दखल घेतलेला भीम आर्मीचा चंद्रशेखर आजाद असो…हे सगळे सोशल मीडियावर बहुसंख्य असणाऱ्या बहुजन समाजाच्या अभिव्यक्तीने मोठ्या झालेल्या व्यक्ती आहेत.

 

Kanhaiya-Hardik-Rohith-marathipizza

काँग्रेसने भाजपच्या रुपात स्वतःला न झेपणारा विरोधक उभा केला, तसाच भाजपने सोशल मीडियावरून सत्तेला गवसणी घालता येते हे दाखवून स्वतःला न झेपणारा विरोधक “सोशल मीडिया”च्या रुपात उभा करून ठेवलाय. या देशातील बहुसंख्येने असणारा बहुजन युवक येत्या काळात या देशातील राजकारणाला मोठे हादरे देणार आहे.

सावध रहा…ही तुफानाची सुरुवात आहे!!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *