टीम उरी ते अमिताभ बच्चन : गलिच्छ राजनीती होताना दुसरीकडे मानवता दाखवणारे चेहरे आश्वासक आहेत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

१४ फेब्रुवारी २०१९ ह्या काळ्या दिवशी देशाने अत्यंत भयानक आणि दुखी क्षण अनुभवला. जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात एका भीषण दहशतवादी हल्ल्यात आपण आपले ४४ जवान गमावले.

जैश ए महंमद ह्या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला. ह्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान हुतात्मा झाले तर ७० जवान जखमी झाले.

ह्या हल्ल्यामुळे संपूर्ण देशावरच दुःखाचा डोंगरच कोसळला.ह्या हल्यात ज्या ४४ जवानांना हौतात्म्य आले त्यांच्या कुटुंबियांचे दुःख तर शब्दात व्यक्त न करता येण्यासारखे आहे.

ह्या हल्ल्यात त्यांनी आपले पुत्र, वडील, पती, भाऊ गमावले. त्यांची जागा दुसरे कुणीही घेऊ शकणार नाही. एकीकडे ह्या हल्ल्याची चर्चा करताना अनेक असंवेदनशील लोक बेताल वक्त्यव्ये करून आपले नीच विचार दाखवून देत आहेत.

 

PulwamaAttack-inmarathi
tfi.com

आपले जवान हे आपल्या सुरक्षेसाठी आपले घर दार सोडून, आपल्या कुटुंबाला सोडून जीवावर उदार होऊन सतत खडा पहारा देत असतात. त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा त्याग मोठा आहे. त्यांचे ऋण आपण फेडू शकत नाही.

आपण हे सतत लक्षात ठेवले पाहिजे की ते आहेत म्हणूनच आपण आपल्या घरी आरामात, शांततेत, सुरक्षित आयुष्य जगू शकतो. म्हणूनच आपण कायम आपल्या सशस्त्र दलाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.

आणि आतातर जेव्हा आपल्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबावर इतका दुःखद प्रसंग ओढवला आहे तेव्हा तर आपण त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली नैतिक जबाबदारीच आहे.हे जवान सर्वसाधारण परिस्थिती असलेल्या कुटुंबातील होते. ते घरातील कर्ते होते. त्यामुळे त्यांच्या जाण्यामुळे त्यांच्या कुटूंबाला दुःखाबरोबरच आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागणार आहे.

हे जवान सीआरपीएफचे असल्याने त्यांना पेन्शनची सुविधा नाही. त्यामुळे त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबालाही पेन्शन मिळणार नाही.

त्यांच्या पश्चात आपण सर्वांनी त्यांच्या कुटुंबाला आधार देणे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे आणि त्यांच्या वृद्ध आईवडील व पत्नीवर आर्थिक संकट ओढवणार नाही ह्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे.

 

pulwama-inmarathi
Scroll.in

हीच नैतिक जबाबदारी ओळखून सर्वसामान्य भारतीय नागरिकांपासून ते सेलेब्रिटींपर्यंत सगळेच ह्या कुटुंबांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. सर्वसामान्य लोक आपल्याला जमेल तितकी आर्थिक मदत पाठवत आहेत. आपल्या घरची कार्ये छोट्या प्रमाणात करून वाचवलेले पैसे ह्या कुटुंबांसाठी पाठवत आहेत.

असंघटित कामगार सुद्धा ह्यात मागे नाहीत, त्यांनी हातावर पोट असून सुद्धा आपले सामाजिक कर्तव्य ओळखून सढळ हस्ते आर्थिक मदत पाठवली आहे.

लहान लहान मुले सुद्धा आपली पिगी बँक रिकामी करून त्यांच्या छोट्या बांधवांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत पाठवत आहेत.

ह्या पैश्यांमुळे आपले भाऊ तर काही परत येऊ शकत नाहीत, ते गेले ह्याचे दुःख तर कमी होऊ शकत नाही, पण निदान पैश्यांवाचून त्यांच्या कुटुंबियांना त्रास होऊ नये, त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांच्या वृद्ध आईवडिलांना म्हातारपणी पुत्रवियोगाच्या दुःखाबरोबर उपजीविकेसाठी कष्ट करावे लागू नयेत हाच विचार सगळे करीत आहेत.

एकीकडे ह्या दुःखद घटनेचे गलिच्छ राजकारण होत असताना दुसरीकडे मात्र माणुसकी जपणारे आश्वासक चेहेरे अजूनही आहेत ह्याचेच समाधान आहे.

 

SBI-inmarathi
sbibank.com

बहुसंख्य लोकांना आपल्या नैतिक जबाबदारीची जाणीव आहे आणि लोक एकत्र येऊन ह्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. उरी -द सर्जिकल स्ट्राईक ह्या चित्रपटाची टीम हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांसाठी एक कोटीची मदत करणार आहे.

तसेच क्रिकेटपटू गौतम गंभीर ह्यांनी १०० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलणार असल्याचे जाहीर केले आहे.

ह्याच कारणासाठी तडफदार क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग सुद्धा पुढे आला आहे. तो सुद्धा हुतात्मा जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी पुढे आला आहे.

ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन ह्यांनी प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची ग्वाही दिली आहे. मुकेश अंबानी ह्यांच्या रिलायन्स फाउंडेशनने जखमी जवानांना मदत देऊ केली आहे. तसेच हुतात्मा जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची तसेच नोकरीची जबाबदारी घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सरकारने इतर काही जबाबदारी दिल्यास ती देखील पार पाडण्यास तयार असल्याचे देखील एका निवेदनात सांगितले आहे. भारताचे क्रिकेटपटू शिखर धवन व मोहम्मद शमीने देखील आपल्या सहकाऱ्यांप्रमाणेच जवानांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत देऊ केली आहे .

 

amitabh-inmarathi
bollyfy.com

रणजी चषक व इराणी चषक विजेत्या विदर्भ क्रिकेट संघाने आपली बक्षिसाची रक्कम हुतात्मा जवानांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी देत असल्याचे म्हटले आहे. भारतीय स्टेट बँकेने हुतात्मा जवानांचे कर्ज तात्काळ माफ करत असल्याचे जाहीर केले आहे.

४४ पैकी २३ जवानांनी काही कर्ज घेतले होते, त्या कर्जाची जी काही रक्कम बाकी असेल ती तात्काळ माफ करण्याचा निर्णय भारतीय स्टेट बँकेने घेतला आहे असे बँकेचे चेअरमन रजनीश कुमार ह्यांनी सांगितले.

“आपल्या सुरक्षेसाठी सदैव झटत असणारे आपले जवान ह्या भीषण हल्ल्यात गमावणे ही अत्यंत दुःखदायक घटना आहे. त्यांच्या कुटुंबांवर आपली माणसे गमावण्याचा अतिशय दुःखद प्रसंग ओढवला आहे. अश्या दुःखात त्यांची छोटीशी का होईना मदत म्हणून त्यांनी घेतलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”

असे रजनीश कुमार म्हणाले.

ह्याशिवाय सलमान खानच्या बीइंग ह्युमन फाउंडेशनने भारत के वीर फन्डमध्ये काही रक्कम दान केली आहे. त्याने किती रक्कम दान केली हा आकडा जाहीर केलेला नाही.

ह्याशिवाय अक्षय कुमार, भूमी पेडणेकर, तापसी पन्नू, क्रीती सॅनन ह्यांनी सुद्धा भारत के वीर फंडाद्वारे हुतात्मा जवानांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत पाठवली आहे आणि ते इतरांना सुद्धा मदत करण्याचे आवाहन करीत आहेत.

 

Akshay-Kumar-inmarathi
firstpost.com

भारत की वीर ह्या साईटवरून देशभरातून लोक जवानांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदत पाठवत आहेत. लोक आपापल्या परीने ह्यात खारीचा वाटा उचलत आहेत. सामान्य माणसे फूल ना फुलाची पाकळी म्हणून जमेल तितकी मदत पाठवीत आहेत.

फक्त आता ज्यांनी आश्वासन दिले आहे त्यांनी खरंच ही मदत आपल्या हुतात्मा बांधवांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवावी.

आणि ज्यांनी विविध माध्यमांतून मदत पाठवली आहे ती खरोखर कुटुंबीयांपर्यंत पोहोचावी हीच सर्वांची इच्छा आहे.

आपले गेलेले बांधव तर परत येऊ शकत नाहीत, पण कमीत कमी आपल्या खारीच्या वाट्याने त्यांच्या कुटुंबियांना तरी पुढे त्रास होऊ नये हीच भावना सर्वांच्या मनात आहे. भारमातेच्या ह्या शूर सुपुत्रांना साश्रू नयनांनी विनम्र श्रद्धांजली!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?