तिच्या असामान्य धाडसामुळे अपहरण झालेल्या विमानातल्या १५२ प्रवाशांचे प्राण वाचले होते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===  

मंडळी,

तुम्हाला युली डेरिकसन नाव माहिती आहे?

बहुतेक नसावे.

पण तुम्हाला नीरजा भानोत हे नाव नक्कीच माहिती असणार आणि तुम्ही तिला विसरूही शकत नाही.

होय ही तीच नीरजा भानोत, जिने पॅन ऍम 73 या विमानाचे पॅलेस्टाइनच्या अबू निदाल या गटाच्या दहशतवाद्यांनी अपहरण केलेले असताना विमानातील चारशे प्रवाशांची मोठ्या धाडसाने सुटका केली.

पण त्यातच तीन लहान मुलांचा जीव वाचवण्यासाठी तिने त्यांच्या अंगावर स्वतःला लोटून दिले आणि दहशतवाद्यांच्या गोळ्या तिला लागून तिचा प्राण गेला पण मुलं बचावली.

पुढं मरणोत्तर सर्वोच्च नागरी पुरस्कार अशोकचक्र देऊन तिच्या वीरतेचा सन्मान करण्यात आला. ही घटना होती सप्टेंबर १९८६ ची.

त्याच्या आधी जून १९८५ मधे देखील असेच एक अपहरण नाट्य घडले होते आणि त्यात नीरजा भानोत प्रमाणेच युली डेरीकसन हिने अपहृत विमानातून अनेक प्रवाशांचे प्राण वाचवले होते.

 

uli derrikson
Confessions of a Trolley Dolly

बघुया मंडळी,ही युली डेरिकसन कोण आहे? आणि तिने अपहरणकर्त्यांच्या हातून प्रवाशांना कसे वाचवले ते. एंजल ऑफ द स्काय नावाने ओळखली गेलेली युली ही TWA ची कर्मचारी होती आणि चीफ फ्लाईट पर्सर होती.

तो दिवस होता शुक्रवारचा..तारीख १४ जून १९८५.

TWA म्हणजेच ट्रान्स वर्ल्ड एअरलाईनचे उड्डाण अथेन्स ते रोम होणार होते.

युली आपल्या सहकारी मैत्रिणी ज्यूडीथ कॉक्स, हेझेल हेस्प, एलिझाबेथ होवेज,हेलन शिहान यांच्यासह अथेन्स एअरपोर्टवर कैरोहून येणाऱ्या बोइंग 727-200 ( N6 4339) या विमानाची वाट बघत थांबली होती.

इथे सर्व प्रवासी उतरल्यावर इथून नवीन क्रू मेंबर्स बरोबर कॅप्टन जॉन टेस्ट्रेक, को पायलट फिलिप मरेस्का आणि फ्लाईट इंजिनिअर ख्रिस्तीयन झिमर्मन हे विमान घेऊन रोमकडे उड्डाण भरणार होते.

पुढे रोम नंतर हेच विमान फ्रँकफर्ट मार्गे बोस्टन आणि शेवटी सॅन दियागो इथे जाणार होते.

ठीक दहा वाजून दहा मिनिटांनी सर्व औपचारिकता पार पाडून एअर ट्रॅफिक कंट्रोलरची परमिशन मिळताच TWA 847 विमानाने अथेन्स विमानतळावरून उड्डाण केले.

 

twa airplane inmarathi
Confessions of a Trolley Dolly

सर्व प्रवासी आपापल्या जागी बसून ड्रिंक्सची वाट बघत होते.

युली डेरीकसन आपली इतर प्राथमिक कामे मार्गी लावून ड्रिंक्सचा ट्रे घेऊन केबिनबाहेर प्रवाशांच्या कक्षात आली आणि तिची पावले तिथेच थिजली.

असं काय घडलं होतं विमानात? युली एवढी का घाबरली होती?

या प्रश्नाचे उत्तर घेण्याआधी आपण थोडं मागे जाऊन युली विषयी जाणून घेऊया.

युतीचा जन्म ८ ऑगस्ट १९४४ चा.झेकोस्लाव्हाकियाची नागरिक असलेल्या आईच्या पोटी ती जर्मनीच्या सीमेवरील छोट्याशा गावात जन्मली.

पुढे पूर्व जर्मनीत तिचे शिक्षण झाले पण नोकरीसाठी ती अमेरिकेत आली आणि ट्रान्स वर्ल्ड एअरलाईनमधे तीने फ्लाईट अटेंडन्ट पदासाठी अर्ज केला आणि नंतर तिथे ती रुजू झाली.

नेहमीप्रमाणे त्या दिवशी ती ड्रिंक्सचा ट्रे घेऊन आली आणि अचानक त्याचवेळी दोन प्रवासी जागेवरून उठले आणि त्यांनी अरेबिक भाषेत आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि आपल्या बंदुका त्यांनी प्रवाशांवर रोखल्या.

आपल्या विमानाचे अपहरण झालेय हे एव्हाना सर्वांच्याच लक्षात आले आणि गोंधळ सुरू झाला.

सर्वच प्रवासी भयभीत झाले होते.त्यांच्या किंचाळ्या घुमू लागल्या त्याचवेळी एक अफरणकर्त्याने युलीची मान पकडली आणि तिच्या छातीत जोरदार लाथ घातली.

युली खाली पडली पण तरीही त्यांनी तिला मारझोड चालूच ठेवली.या बरोबरच ते घोषणा देत होते “अमेरिकन्स डाय,कम टु डाय”.
आता दहशतवाद्यांनी तिला इतकी मारहाण केलेली पहाताच बाकी प्रवासी घाबरून चुपचाप बसले.

एका दहशतवाद्याने सर्व प्रवाशाना त्यांच्या जागेवरून उठवले आणि सर्व पुरुषांनी कोणतीही गडबड करू नये म्हणून खिडकीशेजारील सीटवर बसवले व स्त्रियांना बाजूच्या सीटवर बसवले.

तसेच त्यांनी गुडघ्यात मान घालून दोन्ही हात डोक्याच्या मागील बाजूस घेण्यास फर्मावले. सर्व प्रवासी सांगितल्या प्रमाणे चुपचाप बसून राहिले.

हे घडत असताना युलीने इंटरकॉम् वरून कॅप्टन जॉन टेस्ट्रेक याना घडलेल्या घटनेची कल्पना दिली. तोवर दुसरा अतिरेकी पायलटच्या केबिनच्या दरवाजावर लाथा मारून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला.

 

HIJACK INMARATHI
YouTube

या दरम्यान अतिरेक्यांनी सर्वांचे पासपोर्ट गोळा करण्यास युलीला फर्मावले.हे पासपोर्ट गोळा करत असताना कर्ट कार्लसन या अमेरिकन प्रवाशाने कुजबुजत तिला सांगितले की त्याच्याकडे दोन पासपोर्ट आहेत एक निळा व दुसरा रेड.

रेड पासपोर्ट म्हणजे तो अमेरिकन डिप्लोमॅट होता.

युलीने त्याला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याच प्रवाशाचा पासपोर्ट पुढे केला. त्यावेळी त्यांनी फक्त पासपोर्ट जमा करून घेतले होते पण चेक केले नव्हते.

ज्या दोन अतिरेक्यांनी हे विमान अपहरण केले होते ते लेबननचे होते व त्याची नावे हमादी आणि इझलद्दीन अशी होती. अमेरिकेच्या तुरुंगातून हजारो लेबनिज कैद्यांची सुटका करून घेण्यासाठी त्यांनी हे विमान अपहरणाचे नाट्य घडवून आणले होते.

एखादे विमान पळवायचे आणि प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात तुरुंगातील अतिरेक्यांची सुटका,मोठ्या प्रमाणात पैसे व हत्यारे यांची मागणी,पळून जाण्यासाठी सुरक्षित मार्ग याची मागणी करायची..

न दिल्यास सर्व प्रवाशांसह विमान उडवून द्यायची धमकी देणे हाच मार्ग पत्करल्याचे दिसून येत होते. सरकार अशावेळेस वाटाघाटी करून प्रवासी सुखरूप कसे राहतील याची काळजी घेते.

TWA 847 विमाना मधील परिस्थिती गंभीर होती.

पायलटच्या डोक्यावर 9 MM पिस्तुल रोखून त्याला अतिरेक्यांनी जबरदस्तीने विमान बैरुत विमानतळाकडे वळवण्यास भाग पाडले होते.

बैरुत विमानतळावर माहिती पोचताच त्यांनी धावपट्टीवर बसेस व इतर वाहने उभी करून धावपट्टी बंद केली आणि हे विमान उतरवण्यास मनाई केली.

 

BEIRUT AIRPORT INMARTHI
Blog Baladi

दरम्यान पायलट आणि अतिरेकी यांच्यात बोलणी सुरू होती. अतिरेक्यांना इंग्लिश अजिबातच येत नव्हते पण एकाला थोडेसे जर्मन येत होते हे लक्षात आल्यावर युलीकडे दुभाषाचे काम आले.

युलीचे शिक्षण जर्मन भाषेत झालेले असल्याने युलीने वाटाघाटीच्या कामात पुढाकार घेतला. ती अतिरेक्यांचे बोलणे इंग्रजीतून भाषांतरित करून पायलट पर्यंत पोचवू लागली.

कॅप्टन जॉन टेस्ट्रेक यांनी अतिरेक्यांच्या मागणीनुसार विमानतळावर उतरायची परवानगी मागितली पण बैरुतच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरनी मागणी धुडकावून लावली.

धावपट्टी बंद केल्याने इमर्जन्सी लँडिंग देखील करता येत नव्हते.

अखेर कॅप्टन जॉन यांनी संदेश पाठवला, “परिस्थिती गंभीर आहे.अतिरेकी गन रोखून आहेत आणि त्यांनी ग्रेनेडची पिन काढून विमान उडवून द्यायची तयारी दर्शविली आहे.आम्हाला कृपया इथे उतरायची परवानगी द्यावी,दुसरा कोणताच मार्ग शिल्लक उरला नाहीय” .

विमानतळावर यावर चर्चा चालू असताना युली जर्मन भाषेतून अपहरणकर्त्याना कळकळीची विनंती करत होती की कृपा करून वृद्ध व्यक्ती व लहान मुले यांची तरी मुक्तता करण्यात यावी.

अखेरीस बैरुतला उतरल्यावर वृद्ध आणि लहानमुले यांची सुटका करण्यास ते तयार झाले. बैरुतला विमान उतरवायची परवानगी मिळाल्यावर सात वृद्ध महिला आणि दोन लहान मुलांना सोडून देण्यात आले.

बैरुत विमानतळावर इंधनाची मागणी करण्यात आली आणि इंधन भरून झाल्यावर वैमानिकाला विमान अल्जेरियाकडे नेण्यास सांगण्यात आले. बैरूतवरून विमानाने उड्डाण केल्यावर बैरुत विमानतळ प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.

इकडे विमानात आणखीनच नाट्यमय घडामोडी घडल्या. प्रवाशांचे सामान तसेच त्यांची झडती घेत असताना सहा प्रवासी असे सापडले ज्यांनी केसांचा सोल्जरकट केला होता.

 

HIJACK 1 INMARATHI
Confessions of a Trolley Dolly

त्यांच्यापैकी चार जणांकडे पासपोर्ट नव्हता पण ग्रीन आयकार्ड होते आणि ते सहाजण अमेरिकेचे सैनिक होते.त्यांना खूप मारझोड करण्यात आली आणि वैमानिकाच्या केबिनमध्ये त्यांना नेऊन फ्लाईट इंजिनिअरच्या खुर्चीस त्यातील दोघांना बांधून घातले.

त्यांच्या चेहऱ्यावरील आणि अंगावरील जखमा पाहून युलीने त्यांच्या जखमांवर ड्रेसिंग करायची तयारी केली तेव्हा “या अमेरिकन डुकरांना असेच मरू दे, ड्रेसिंग करायचे नाही असे त्यांनी बजावले.”

दरम्यान बैरुत विमानतळावरून सर्वत्र या अपहरणाबद्दल माहिती पोचवण्यात आली परिणामी अल्जेरियात त्यांना उतरण्यास मज्जाव करण्यात आला.

एअरपोर्ट बंद करण्यात आला परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अल्जेरियाच्या अध्यक्षांना विनंती करून विमान उतरवण्यास परवानगी देण्यात यावी असे सांगितले.

अखेर विमान अल्जेरियाच्या भूमीवर उतरले. विमान उतरले खरे पण पैसे भरल्याशिवाय इंधन भरू देण्यास विमानतळ प्रशासनाने परवानगी दिली नाही.

पुन्हा एकदा गोंधळ उडाला.अखेर युलीने तिचे पेट्रो कार्ड वापरून इंधन भरले त्यांची अन्नपुरवठा करण्याची मागणी फेटाळण्यात आली आणि विमान आकाशात झेपावले.

अल्जेरियाकडे विमान झेपावले खरे पण पुन्हा हमादीने विमान बैरुतकडे वळवण्यास भाग पाडले.

या दरम्यान कोणी ज्यू विमानात आहेत का याचा शोध घेण्यात आला आणि अमेरिकन नेव्हीतील सी डायव्हर रॉबर्ट स्थेतहम याला मारहाण करून बैरुत एअरपोर्टवर विमानाबाहेर फेकण्यात आले आणि त्याच्यावर नेम धरून त्याला पुन्हा गोळ्या घालण्यात आल्या.

हा एकच प्रवासी मृत्यूच्या जबड्यातून वाचू शकला नाही. इथे ७ संशयित ज्यू प्रवाशांना मुस्लिम संघटनेच्या ताब्यात देण्यात आले.

इथून पुन्हा विमान अल्जेरियाकडे नेण्यात आले परंतु तेथे न उतरवता पुन्हा बैरुतकडे वळवण्यात आले.बैरुत जवळ येताच त्यांनी वाटाघाटी करण्यास सुरुवात केली.

या वेळी कर्ट सल्झोन चा रेड पासपोर्ट मिळाल्याने त्याला वाटाघाटीसाठी पुढे करण्यात आले. इस्रायलच्या ताब्यातील तसेच इतरत्र असलेल्या १००० लेबनिज कैद्यांच्या सुटकेची मागणी करण्यात आली.

पण अखेर ३१ कैद्यांच्या सुटकेच्या बदल्यात अपहरणाचे नाट्य संपुष्टात आले. युलीच्या जर्मन भाषेतील शिष्टाईने १५२ प्रवाशांचे प्राण वाचले.

 

uli derrikson 1 INMARATHI
Velvetpark

तिचा शांततेच्या मार्गाने वाटाघाटी करण्याचा निर्णय इतक्या प्रवाशांना वाचवू शकला. फक्त रॉबर्ट स्थेथहम चे प्राण ती वाचवू शकली नाही.
एवढ्या जबरदस्त नाट्यमय घडामोडीत फक्त एकच बळी गेला. एकूण १६ प्रवाशांना आधीच सोडण्यात आले होते.

या प्रयत्नांचे फळ एखाद्या मोठ्या पुरस्कारात तिला मिळाले असेल असे वाटतंय का तुम्हाला? नीरजा भानोत प्रमाणे एखादा सर्वोच्च नागरी पुरस्कार तरी?

अं हं.. नाही,कसलाही पुरस्कार मिळाला नाही उलट तिने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ज्यू प्रवाशाचा बळी दिला असा ज्यू समुदायाकडून आरोप करण्यात आला. एवढेच नाही तर तिला जीवे मारण्याच्या धमक्या देखील आल्या.

अखेर तिने ज्यू प्रवाशांना वाचवायचा प्रयत्न केला हे सिद्ध झाल्यावर अतिरेक्यांना मदत करणाऱ्या संघटनांकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या.

इकडे आड तिकडे विहीर अशी तिची वाईट परिस्थिती झाली. १५२ जणांचे प्राण वाचवणाऱ्या युली डेरीकसन हिला स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी ऍरिझोना इथे स्थलांतर करावे लागले. मात्र एक जेष्ठ नागरिक संघटनेने तिच्या शौर्याचा सन्मान म्हणून तिला सिल्व्हर मेडल दिले.

एवढ्या मोठ्या शौर्याचा इतकाच काय तो सन्मान. पुढील आयुष्यात देखील ती फ्लाईट अटेंडन्ट म्हणून कार्यरत राहिली.

या विमानाचा अपहरणकर्ता हमादी अली नंतर जर्मनीत पकडला गेला. १९ वर्ष शिक्षा भोगून पॅरोलवर सुटका झाल्यावर तो फरार झाला तो अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

पुढे २००१ च्या सप्टेंबर महिन्यात ९ तारखेला असेच विमान अपहरण करून अमेरिकेच्या ट्वीन टॉवरवर धडकवण्यात आले.शेकडोंच्या संख्येत लोक मारले गेले. याचा बदला घेत अमेरिकेने ओसामा बिन लादेन या कुख्यात अतिरेक्याला संपवून टाकले.

 

uli derrikson 2 INMARATHI

 

अशी नाट्ये घडू नयेत म्हणून काळजी घेतली जाते पण तरीही एखादी नीरजा यात बळी पडते किंवा एखाद्या युली डेरीकसनला देश बदलावा लागतो.ही एक मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?