' सोनिया गांधींच्या “परदेशी/इटालियन मूळ” च्या पलीकडची, अशीही एक हळवी बाजू… – InMarathi

सोनिया गांधींच्या “परदेशी/इटालियन मूळ” च्या पलीकडची, अशीही एक हळवी बाजू…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखिका : मेधा कुलकर्णी 

===

कॉंग्रेसच्या प्रचारासाठी ही पोस्ट नाही. घराणेशाहीचं समर्थन करण्यासाठीही नाही. एखाद्या व्यक्तीचं परिस्थितीवश राजकारणात येणं आणि तिने ते निभावणं म्हणजे काय असतं, त्याचं हृद्य चित्रण एका पुस्तकात वाचलं.

ही व्यक्ती सोनिया गांधी.

 

sonia_inmarathi
theunrealtimes.com

दोन प्रचंड लोकप्रिय पंतप्रधानांच्या कुटुंबाची सदस्य असूनही एके काळी भारतीय राजकारणाच्या पटावर अस्तित्त्वातसुद्धा नसलेली व्यक्ती.

कालांतराने या पटावर लक्षवेधक प्रवेश करणारी, प्रचंड तुच्छता, झिडकारलेपण वाट्याला आलेली, आणि पुढच्या कालक्रमात देशाच्या राजकारणाला निर्णायक वळण देणारी व्यक्ती – अशी तिची ओळख बदलत गेली.

हे सगळं एखाद्या फिल्मी कथानकाहूनही फिल्मी वाटण्यासारखं. पण ही कथा नाहीच, वास्तव आहे.

सोनियांमधली स्त्री, प्रेयसी, पत्नी, सून, आई, मुख्य म्हणजे, हाडामांसाचं माणूस या पुस्तकात ठळकपणे भेटतं. या चरित्रातल्या दोन गोष्टी खूप भावल्या. इंदिरा आणि सोनिया – सासूसुनेतलं घट्ट आत्मीय नातं. आणि इंदिरा-राजीव यांच्यातलंही मायलेकाचं नातं.

राजीव आणि सोनिया या दोघांनाही राजकारणापासून दूर राहायचं असतानाही याच क्षेत्रात यावं लागलं, हे आपल्याला माहीत आहेच.

 

sonia-g-inmarathi
alaiwah.wordpress.com

पण हे घडत गेल्याचे तपशील, आईचं एकटेपण, संकटांत घेरलं जाणं हे न बघवून आईच्या मायेपोटी राजीवने घेतलेले निर्णय, सोनियांनी सासूला १६ वर्ष केलेली भावनिक सोबत, त्यांची लेकीच्या मायेनं घेतलेली काळजी.

कुणाबरोबर बाहेर जेवायला जायचं असलं तरी राजीव सोनिया इंदिराजींचं जेवण होईपर्यंत त्यांच्याबरोबर बसत आणि त्यांचं जेवण आटोपल्यावरच बाहेर जात वगैरे. हे अगदी उत्कटपणे या चरित्रात उतरलंय.

दुसरं भावलं ते सोनियांचं व्यक्तिमत्व.

ही मुलगी शांत, मृदू आणि सरळ स्वभावाची, परिस्थितीशी जुळवून घेणारी, कुटुंबाचा आधार होणारी आहे, ही इंदिरा गांधींची पारख तिने सार्थ ठरवली.

संजय गांधींच्या कारभाराविषयी त्यांची, राजीवची तीव्र नापसंती असतानाही मनेकाच्या गरोदरपणात तिची काळजी घेणं, ती घर सोडून गेल्यानंतरही वरूणबद्दल त्यांना वाटणारी ओढ.

सासू, दीर, नवरा यांच्या स्वार्थी, लाळघोट्या समर्थकांविषयी त्यांची चीड, राजीवकडून मोतीलाल, जवाहरलाल यांचं कर्तृत्व समजून घेत राहाणं, सासूबाईंकडून भारत जाणून घेण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न.

 

sonia-gandhi-inmarathi
4to40.com

आजारी, थकलेली, मनःस्वास्थ्य हरवलेली सासू त्वेषाने जेव्हा दलित हत्याकांड घडलेल्या बेलचीला जायचं ठरवते, तेव्हा ते काय असतं ते सोनियांना नेमकं समजू शकतं. ती नेहमीसारखी त्यांची बॅग भरून देते.

नेहरू गांधी कुटुंबाच्या प्रथापरंपरा जपण्याचा त्यांचा आग्रह, रामकृष्ण मिशनवरची त्यांची श्रद्धा. पुढच्या काळात सोनिया पट्टीची वाचक बनल्या. जवाहरलाल यांच्या लेखनातले संदर्भ भाषणासाठी राजीवला सुचवण्याइतकं सखोल वाचन त्यांनी केलं.

समोरच्या माणसाचं बोलणं लक्षपूर्वक ऐकणं हाही त्यांचा एक गुण.

स्वतःला चारचौघात बोलायचा धीर होत नाही, सफाईदार हिंदी येत नाही, धोरणप्रक्रिया कशी असते ते माहीत नाही हे मोकळेपणे मान्य करून पक्षातल्या ज्येष्ठांची विद्यार्थिनी होणार्‍या, कितीही टिंगलटवाळी झाली, तरी उत्तर न देता चिवटपणे गोष्टी शिकत राहाण्याचं त्यांचं धैर्य….असं कितीतरी.

त्यांच्या विरोधातल्या उथळ, हीन प्रचाराच्या धुरळ्यापलीकडच्या सोनिया गांधी जाणून घ्याव्याशा वाटल्या, तर हे पुस्तक अवश्य वाचावं.

 

sonia-gandhi-book-inmarathi
bookganga.com

राजहंस प्रकाशनाचं हे पुस्तक. स्पॅनिश लेखक हाविएर मोरो याने लिहिलेल्या मूळ चरित्राच्या इंग्रजी अनुवादाचा मराठी अनुवाद माझी मैत्रीण सविता दामले हिनं केलाय. अगदी मस्त जमलाय अनुवाद.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?