१५० जणांच्या कंपनीमध्ये केवळ ६ जण उरले, पण त्याने हार काही मानली नाही…आणि आज…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
तुम्हाला आठवत असेल अगदी ५-१० वर्षांपूर्वी एखादा चित्रपट अथवा एखाद नाटक बघायला जायचं असेल तर तिकीट खिडकीवर स्वत: जाऊन बुकिंग करावं लागायचं किंवा मग त्या ठराविक दिवशी जाऊन तिकीट खरेदी करावं लागायचं.
पण जसजसा काळ बदलला तसतशी ही पद्धत देखील लोप पावली आणि सुरु झाली ऑनलाईन तिकीट बुकिंग सिस्टम!
त्या काळी जर कोणाला सांगितलं असतं की ऑनलाईन घरी बसून देखील तिकीट बुक करता येऊ शकतं, तर तेव्हा लोकांनी येड्यात काढलं असतं.
पण आज बघा जवळपास ६०-७० टक्के लोक हे ऑनलाईन तिकीट बुक करतात. आता तुम्हाला आम्ही विचारलं की तुम्ही कोणत्या वेबसाईटचा चित्रपट किंवा नाटक तिकीट बुकिंग साठी वापर करता? तर बहुतेक सर्वच जण एकमुखाने नाव घेतील- Book My Show !

अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली ही वेबसाईट आज भारतातील नंबर वन एन्टरटेन्मेन्ट तिकीट बुकिंग वेबसाईट आहे. केवळ चित्रपट आणि नाटकंच नाही तर शोज, लाईव्ह कॉन्सर्टची तिकीट देखील येथे उपलब्ध होतात, एवढा या वेबसाईटचा आवाका वाढला आहे आणि –
या यशस्वी संकल्पनेमागची व्यक्ती आहे अर्थातच Book My Show चे फाउंडर आशिष हेमराजनी!
बहुतेक जण या भ्रमात असतील की आशिष हेमराजनी यांची ही ऑनलाईन तिकीट बुकिंग संकल्पना लगेच यशस्वी झाली असावी. पण तसे बिलकुल नाही. जेव्हा तुम्ही या व्यक्तीचा आजवरचा प्रवास जाणून घ्यालं, तेव्हा तुमच्या लक्षात येईल या माणसाने किती मेहनत घेत या क्षेत्रात आपले पाय रोवले आहेत.

१९९७ साली मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBA केल्यानंतर आशिष हेमराजनी यांनी J Walter Thompson या कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पण पहिल्यापासूनच बिझनेसच्या वेडाने झपाटलेला हा माणूस नोकरी मध्ये स्वस्थ बसणारा नव्हता. साउथ आफ्रिकेला एखादा ट्रीपवर गेले असताना त्यांच्या डोक्यात पुन्हा एकदा बिझनेसचे खूळ सुरु झाले.
साउथ आफ्रिकेमधील आल्हाददायक वातावरणात एका झाडाखाली बसून ते रेडियोचा प्रोग्राम ऐकत होते. त्या प्रोग्राम मधून कोणत्या तरी रग्बी गेमचे Ticket promotion केले जात होते.
त्याच वेळी आशिष हेमराजनी यांच्या मनात एक हटके संकल्पना आली. भारतात देखील Ticket promotion केले जाऊ शकते आणि तो बिझनेस यशस्वी होऊ शकते असे त्यांना वाटले.
साउथ आफ्रिकेमधून भारतात परतेपर्यंत त्यांचा या नवीन बिझनेस आयडिया बद्दलचा विचार पक्का झाला होता आणि त्यांनी नवीन कंपनी खोलण्याचा निर्णय घेतला. १९९७ साली त्यांनी आपलं स्वप्न अस्तित्वात उतरवलं.
त्यांना ही आयडिया एका झाडाखाली मनन-चिंतन करताना आली होती म्हणून त्यांनी आपल्या नव्या कंपनीचे Bigtree entertainment Pvt. Ltd असे नामकरण केले आणि त्या अंतर्गत Book My Show चा कारभार सुरु झाला. यावेळेस त्यांना परीक्षित दार आणि राजेश बालपांडे या दोन कॉ-फाउंडरची अमुल्य साथ लाभली.

अनेकांना ही गोष्ट माहित नाही पण आशिष हेमराजनी यांनी आपल्या ब्रँडला पहिलं GoForTicketing असं नाव दिलं होतं, त्यानंतर ते बदलून IndiaTicketing हे नाव धारण केलं आणि शेवटी Book My Show या नावावर त्यांचा शोध येऊन थांबला.
पुढे अनेक प्रयत्न केल्यावर अखेर त्यांना २ करोड रुपयांची पहिली इन्व्हेस्टमेंट मिळाली. सारं काही सुरळीत सुरु असताना २००२ साली जेव्हा इंटरनेट क्षेत्राला डॉट कॉम बबलचा तडाखा बसला तेव्हा त्याचा परिणाम आशिष हेमराजनी यांच्या कंपनीवर देखील झाला.
त्यांच्या १५० लोकांच्या कंपनीमध्ये आता केवळ ६ च कर्मचारी उरले होते. कंपनी जवळ जवळ संपुष्टात आली होती. आशिष हेमाराजनी यांच्या दोन वेळेच्या जेवणाचे वांदे झाले होते. पण त्यांनी हार मानली नाही.
२००२-२००६ या काळात अनेक ठिकाणी हातपाय मारून देखील आशिष हेमाराजनी यांना इन्व्हेस्टर्स मिळत नव्हते. शेवटी डॉट कॉम बबलचे वादळ ओसरल्यानंतर ऑनलाईन क्षेत्राला सुगीचे दिवस आले आणि Book My Show साठी देखील पोषक वातावरण निर्माण झाले.
या काळात भारतातील मल्टीप्लेक्सच्या संख्येत देखील लक्षणीय वाढ झाल्याने आता Book My Show च्या संधी देखील वाढल्या होत्या. त्यांनी मल्टीप्लेक्सला automated ticketing software विकण्यास सुरुवात केली.
हळूहळू Book My Show यशाची शिखरे पादाक्रांत करू लागले आणि अवघ्या एका वर्षात ० वॅल्यु असणाऱ्या कंपनीचं वॅल्युएशन २४.१ करोड पर्यंत पोचलं.

आता पुन्हा एकदा फ्रेश इन्व्हेस्टर्स शोधायची मोहीम सुरु झाली आणि त्याचा फायदा उचलला Network 18 ने! त्यांनी तब्बल १४.५ करोड रुपयांची इन्व्हेस्टमेंट देत Book My Show ला नवीन उमेद मिळवून दिली.बस्स! आता काय?
आशिष हेमाराजनी यांनी पुन्हा एकदा नवीन डाव खेळला आणि BookMyShow.com वेबसाईट लॉन्च करत आपला स्वतंत्र ऑनलाईन तिकीट बुकिंग बिझनेस सुरु केला.
त्यानंतरच्या काळात जे काही घडलं त्याला आपण देखील साक्षीदार आहोत. सध्याचे Book My Showचे मासिक उत्पन्न तब्बल ६० लाखांच्या घरात आहे ते देखील केवळ त्यांच्या वेबसाईटवर येणाऱ्या व्हिजीट्समधून!
येणाऱ्या दोन वर्षांमध्ये IPO लॉन्च करण्याचा त्यांचा हेतू आहे. तो सफल होवो हीच सदिच्छा!

आज BookMyShow.com प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पोचली आहे. तिकीट बुक करायची वेळ आली की मनात पहिल्यांदा नाव येते Book My Show चे यातच आशिष हेमाराजनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची यशोगाथा दिसून येते.!
त्यांचा हा अद्भुत प्रवास नव उद्योजकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.