ह्या गोड नटीने २ कोटींची जाहिरात नाकारली – ज्याचं आपण मनापासून कौतुक करायला हवं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

आपल्याकडे लोकांना गोऱ्या रंगांचं आकर्षण पहिल्यापासूनच आहे. खरं तर आपला देश म्हणजे सावळ्या रंगाच्या लोकांचा देश आहे. युरोपियन लोक तर सरळ आपल्याला ब्राउन किंवा ब्लॅक सुद्धा म्हणून मोकळे होतात.

इंग्रज गेले आपण आपलं गोऱ्या रंगाचं वेड काही गेलं नाही. गोरं म्हणजेच सुंदर असा समज आपल्याकडे आढळतो.

खरं तर सावळ्या रंगावर फीचर्स जास्त उठून दिसतात. पण आपल्याला गोरेपणाची इतकी क्रेझ आहे की लोक आपल्या त्वचेचा रंग उजळवण्यासाठी काय काय उपाय करतात.

आपल्या श्रीरामाचे वर्णन “सावळा गं रामचंद्र” असे केले आहे. श्रीकृष्ण सुद्धा “मेघश्यामच” होता असे म्हणतात. तसेच द्रौपदी सुद्धा सावळी पण सौंदर्यवती होती असे वर्णन केलेले आहे.

 

krushna inmarathi
lord.com

तरीही आपण काही गोऱ्या रंगाचा पिच्छा सोडायला तयार नाही. मग त्यासाठी दूध आणि बेसनाचा लेप ह्या घरगुती उपायापासून तर विविध क्रीम्स लावून गोऱ्या रंगासाठी प्रयत्न केला जातो. स्किन व्हाईटनिंग ,लेझर ट्रीटमेंट सारखे महागडे उपचार सुद्धा केले जातात.

गोऱ्या रंगाला आपल्याकडे इतके अवास्तव महत्व दिले जाते की सावळ्या रंगाच्या मुला मुलींना आपल्यात काहीतरी उणीव आहे असे वाटू लागते.

खुद्द मायकल जॅक्सनसारख्या यशस्वी सुपरस्टारने सुद्धा इन्फेरीयॉरिटी कॉम्प्लेक्स येऊन आपला रंग बदलून घेतला होता तर तिथे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांची काय कथा?

मुलगी सावळी असेल तर तिला काहीतरी गुन्हा केल्यासारखी वागणूक मिळते. लग्नाच्या बाजारात तर मुलगा भलेही डांबराच्या रंगाचा असेल, त्याला बायको सुंदर आणि गोरीच हवी असते.

भारतीयांची हीच मानसिकता ओळखून अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांनी आपल्या ह्या गोऱ्या रंगाच्या क्रेझचा गैरफायदा घेत वर्षानुवर्षे “गोरं” हेच सुंदर हे आपल्या मनावर बिंबवण्यात कुठलीही कसर सोडली नाही.

 

fair and lovely
india-store.de

अनेक नट्यांवर मेकअपचे थरच्या थर चढवून “मिळवा १४ दिवसांत गोरेपणा” अश्या आशयाच्या जाहिराती करून कोट्यवधी रुपये कमवले आहेत.

ह्यांच्या फेअरनेस प्रॉडक्टसच्या जाहिरातींमध्ये “काळ्या/ सावळ्या रंगाच्या मुलींना कमी कॉन्फिडन्स असतो आणि त्यांना नोकरी/ व्यवसायात अपयश मिळते, मग त्या ह्यांचे फेअरनेस क्रीम लावतात आणि काहीच दिवसात चंद्रकोरीसारखा त्यांचा रंग पालटून लख्ख गोरा होतो आणि त्यांना यश मिळते, हवा तो जोडीदार मिळतो.”

गेली अनेक वर्ष आपल्या मनावर ह्याच जाहिरातींचा भडीमार होतो आहे आणि आपण सुद्धा मुर्खासारखे गोरे तेच सुंदर समजून ह्यांची विविध उत्पादने घेऊन त्याचा मारा आपल्या सावळ्या पण निरोगी त्वचेवर करून आपल्या त्वचेचा नैसर्गिक चांगला पोत त्यावर केमिकल्सचा मारा करून खराब करून घेत आहोत.

ह्या जाहिराती करणाऱ्या नट्या सुद्धा गोऱ्याच असाव्या लागतात.

सुरुवातीला तर सावळ्या रंगाच्या नट्यांना सुद्धा काही स्थान नव्हते. नंतर नंतर लोकांची मानसिकता बदलू लागली. तरीही आपले गोरेपणाचे खूळ अजूनही तसेच आहे.

आता तर पुरुषांसाठी सुद्धा विविध फेअरनेस क्रीम्स आले आहेत. आणि पुरुष सुद्धा आपला रंग बदलेल ह्या आशेने ह्या कंपन्यांचा कोट्यवधींचा व्यवसाय करून देत आहेत.

 

fair and handsome
india.com

केवळ प्रसिद्धी आणि पैश्यांसाठी ह्या फेअरनेस प्रॉडक्ट्सच्या जाहिराती स्वीकारणाऱ्या नट नट्यांनाही हे चांगले ठाऊक असते की ही असली उत्पादने वापरून रंगात फरक पडत नसतो. ते स्वतः सुद्धा ते प्रॉडक्ट्स वापरत नाहीत.

पण ह्या कंपन्या जाणून बुजून ह्या नट्यांना जाहिरातीत घेतात कारण त्यांना माहिती असते की ह्या नट नट्यांचे आंधळे चाहते आणि गोरेपणाची आशा असलेले लोक आपली उत्पादने नक्कीच विकत घेतील.

केवळ पैश्यांना महत्व देणाऱ्या आणि तत्वांशी काहीही संबंध नसलेल्या ह्या नटनट्यांच्या भाऊगर्दीत मात्र एक नटी अशीही आहे जिने आपल्या तत्वांशी तडजोड करणार नाही म्हणत फेअरनेस प्रॉडक्ट्सची दोन कोटींची जाहिरात नाकारली आहे. साई पल्लवी असे ह्या गोड अभिनेत्रीचे नाव आहे.

साई पल्लवी ही दक्षिणेकडील एक यशस्वी अभिनेत्री आहे. काही काळापूर्वी ती अथिरन ह्या मल्याळम चित्रपटात फहाद फासील ह्या अभिनेत्याबरोबर झळकली होती.

ती पडद्यावर झळकतानाही अगदी कमीत कमी मेकअप करण्यास प्राधान्य देते. तिचे नैसर्गिक सौंदर्य जपण्यावर तिचा भर आहे.

 

sai pallavi inmarathi
background.com

आपल्या ह्याच तत्वांशी तडजोड करणार नाही असे सांगून तिने दोन कोटी मानधन मिळत असून देखील ती जाहिरात करण्यास नकार दिला. ती तिच्या रोजच्या आयुष्यात देखील अगदी क्वचित ह्या उत्पादनांचा वापर करते.

त्यामुळे केवळ पैश्यांसाठी मी ही फेअरनेस क्रीमची जाहिरात करणार नाही असे तिचे धोरण आहे. तिने स्वतःच ह्याबद्दल माहिती दिली.

“मी कधीच सौंदर्यप्रसाधनांची जाहिरात करत नाही. मला ते मान्यच नाही. तुम्ही जसे असाल,तुमच्या त्वचेचा रंग कुठलाही असला तरीही तुम्ही स्वतःच्या रूपाबद्दल आत्मविश्वास बाळगला पाहिजे.” असे साई म्हणते.

नुकताच तिने मारी -२ हा यशस्वी चित्रपट दिला आहे. ती तिच्या सर्व चित्रपटांमध्ये कायम तिच्या नैसर्गिक रूपात वावरते.

तिला मेकअप करून तिचे खरे रूप लपवण्याची गरज वाटत नाही. मग चेहेऱ्यावर मुरूम किंवा डाग असले आणि ते कॅमेऱ्यावर दिसले तरी ठीक पण त्वचेवर मेकअपचा भडीमार करणार नाही असे तिचे विचार आहेत.

साईने २०१५ साली प्रेमम मलरे हा मल्याळम चित्रपटातून पदार्पण केले. तिचा पहिलाच चित्रपट यशस्वी ठरला. त्यानंतर तिने अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. त्यामुळे चाहत्यांना तिचा अभिनय व तिचे नैसर्गिक रूप आवडते ह्यात शंका नाही.

उत्तम अभिनत्री असण्याबरोबरच एक उत्तम नृत्यांगना असलेली साई तत्वनिष्ठ सुद्धा आहे हे तिने दाखवून दिले आहे.

 

sai pallavi inmarathi
IndiaWords.com

पैसे व प्रसिद्धीसाठी कुठल्याही थराला जाणाऱ्यांच्या ह्या क्षेत्रात साईने तरुण तरुणींपुढे एक नवीन आदर्श घालून दिलेला आहे.

आशा आहे की साईकडून आदर्श घेऊन तरुणी सुद्धा आपल्या सावळ्या रंगाचा न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने वावरतील आणि आपल्या त्वचेवर केमिकल्सयुक्त उत्पादनांचा मारा करून आपली सुंदर आणि निरोगी त्वचा खराब करून घेणार नाहीत.

समाजाने सुद्धा आता रंगाला प्राधान्य देण्याचे सोडून माणसाच्या स्वभावाला व गुणांना प्राधान्य दिले पाहिजे तेव्हाच समाजात चांगला बदल घडून येईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?