' अटलजींच्या अस्थींचं “असं” गलिच्छ राजकारण करून भाजप काय साध्य करू पहात आहे? – InMarathi

अटलजींच्या अस्थींचं “असं” गलिच्छ राजकारण करून भाजप काय साध्य करू पहात आहे?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

१६ ऑगस्ट रोजी अटल बिहारी वाजपेयींचे निधन झाले. लोकप्रिय वक्ते, प्रतिभावंत कवी, कर्तव्यदक्ष राज्यकर्ते आणि आणखीही बरेच काही.. अशा चौफेर भूमिका समर्थपणे वठवत असताना भारतीय जनमानसावर कायमची छाप सोडून जाणाऱ्या अटलजींना त्यांच्या समर्थकांसह राजकीय विरोधकांनीही मनापासून श्रद्धांजली वाहिली.

अटलजी एक भारतरत्न, राजकीय धुरंदर, उत्कृष्ट संसदपटू तर होतेच पण एक प्रतिभाशाली कवी आणि प्रेमळ स्वभाव असलेले दिव्य व्यक्तीमत्व होते. त्यांचा जाण्याने एक न भरून निघणारे नुकसान देशाला झाले आहे.

एक कुशाग्र विद्यार्थी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, एक स्वातंत्र्य सेनानी ते एक अजरामर कारकीर्द असलेले प्रधानमंत्री, अटलजींचा प्रवास हा एक विविध रंगी व दिव्य प्रेरणेने भरलेला आहे.

 

atal-bihari-vajpayee-inmarathi03
latestly.com

एक मुत्सुद्दी राजकारणी आणि लोकप्रिय पंतप्रधान हरपला म्हणून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असतांना, काही लोकांनी व मीडियाने आपल्या विकृतीचं दर्शन घडवत वाजपेयीजींवर आगपाखड केली.

अत्यंत घृणास्पद रित्या त्यांचा वर टीका केली. त्यांचा मृत्यू मुळे आनंद साजरा करणारे देखील अनेक होते. परंतु या विकृत लोकांची विकृती कमी होती की त्याहून एक अजून विकृत प्रकार देशात घडवला जात आहे.

महत्वाचं म्हणजे ती विकृती अटल बिहारी वाजपेयींनी ज्या पक्षाच्या उभारणीसाठी आयुष्य झिजवलं त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून, त्यांनी विकृतीचा हद्दी पार करत वाजपेयींचा नावाचा व लोकप्रियतेचा वापर येणाऱ्या निवडणुकीसाठी करायचा चंग बांधला आहे.

आधी वाजपेयींच्या मृत्यूनंतर भारतीय जनता पक्ष व पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून,

“अटल बिहारी वाजपेयींजीना खरी श्रद्धांजली ही भाजपाला २०१९ साली पूर्ण बहुमत मिळवून देऊन भारतीयांनी द्यावी.”

अशी आवई सोशल मीडियात उठवण्यात आली. तसे फलक देखील जागोजागी लावण्यात आले. त्यांचा मृत्यूचे राजकारण करत त्यांचा नावाने मत मिळवण्यासाठी खटाटोपी सुरु करण्यात आल्या. एवढ्यावरच न थांबता भाजपाने एक पाऊल पुढे टाकत विकृतीत एक नवीन उंची गाठली आहे.

भारतीय जनता पक्षाकडून अटलजींच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांचे ४००० अस्तिकलश तयार करण्यात आले असून ते भारतभर वितरित करण्यात आले आहेत.

अनेक राज्यात अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. श्रद्धांजली सभा ठेवण्यात आल्या आहेत. ते करण्यात काही गैर नाही. पण भाजपाने नीच राजकारण खेळायला सुरुवात केली आहे. त्यांनी मध्य प्रदेश, बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि ओडिशा या राज्यात ते अस्थिकलश घेऊन त्यांची बूथ बूथ वर यात्रा काढ़ली जाणार आहे.

 

atal-asthi-kalash-inmarathi
jagranimages.com

यातून येत्या निवडणुकीत सहानभूतीच्या बळावर मतं मिळण्याचा कपटी डाव भाजपा खेळत आहे. या साठी पक्षाच्या जेष्ठ नेत्याचा मृत्यूचं मार्केटिंग करत आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात भाजपाचे प्रस्थापित सरकार आहे. परंतु भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे भाजपाविरोधी वातावरण या भागात निर्माण होत आहे. अश्यावेळी अटलजींच्या लोकप्रियतेचा वापर करून घेत तयार झालेली अँटी इंकंबसी परावर्तित करून मत घशात घालण्याचा डाव भाजपाने मांडला आहे.

इंडिअन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार,

त्यासाठी गावोगावी अस्थिकलश यात्रा भाजपा काढत आहे. त्यातून एक सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा भाजपाचा डाव आहे.

यासाठी भाजपचे मुख्यमंत्री त्या अस्तिकलशांचा यात्रेत सहभागी होऊन आपली कामं जनतेत पोहचवून, अटलजींच्या स्वप्नातील भारत बनवण्यासाठी लोकांकडे मत मागणार आहेत.

भाजपासाठी वाजपेयींनी आयुष्य दान केलं. जिवंत असतांना त्यांनी केलेल्या अखंड प्रयत्नांमुळे आज देशाच्या कानाकोपऱ्यात भाजपा पोहचू शकली आहे.

विरोधी पक्षांनी देखील वाजपेयींप्रति प्रेम प्रकट केलं आहे. त्यांना आदरांजली वाहिली आहे. अश्यावेळी त्यांचा स्वतःच्या पक्षाकडून त्यांची अशी अवहेलना झाल्याने त्यांच्या चाहत्यांचं मन दुखावत आहे. आधी त्यांचा अस्थीकलशाचे ४००० भाग करणे नंतर ते गावोगाव फिरवणे हे सर्व विकृत आहे अशी भावना लोक व्यक्त करत आहेत.

 

atal-inmarathi
naiduniya.com

अटलजींच्या पुतणीने वाजपेयींच्या होणाऱ्या अश्या अवहेलनेवर नाराजी व्यक्त केली आहे.

भाजपा कार्यकर्त्यांनी तर नीचपणाच्या सर्व हद्दी पार करत, अस्थिकलशासोबत सेल्फी काढणे, त्याला घेऊन नाचणे या सारखे उपक्रम हाती घेतले आहेत. अश्याप्रकारची विकृत श्रद्धांजली भाजपा आपल्या नेत्याला वाहत आहे. एकीकडे लोकं हळहळ व्यक्त करत असतांना भाजपाने ही विकृती केली आहे.

शांतपणे त्यांचा अस्थिकलशाला गंगेत विसर्जित करण्याऐवजी ते कलश ४००० भागात वाटून अटलजींचा एकप्रकारे अपमान करत आहेत. त्यासोबत त्याची मिरवणूक काढून एक नव्या विकृतीचं त्यांनी दर्शन घडवलं आहे.

 

atal bihari vajpayee asthi kalash celibration 2 inmarathi
लोकमत

हिंदू धर्म संस्कृतीत जोपर्यंत अस्थिकलश विसर्जन होत नाही तोपर्यंत आत्म्याला मुक्ती मिळत नाही असं म्हटलं जातं. मग भाजपाला त्यांचाच पूजनीय नेत्याच्या आत्म्याला मुक्ती मिळावी असं वाटत नाही का?

एकीकडे श्रद्धेय अटलजी म्हणत चौका चौकात बॅनर लावणारी भाजपा, अश्यावेळी ती श्रद्धा कुठे असते भाजपाची? स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारी भाजपा हे कुठले संस्कार दाखवत आहे?

मृत्यूचं राजकारण या देशाला नवं नाही, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या मृत्यूचं देखील राजकारण करून भयंकर मत काँग्रेसने मिळवली आहे. पण स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणणारी भाजपा काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेवत अथवा एक पाऊल पुढे टाकत एक घृणास्पद राजकारण खेळत आहे निंदनीय आहे.

यांतून भाजपा स्वतःच्या तत्वांनाच तिलांजली देत आहे.

 

vajpayee-inmarathi
youtube.com

भारतीय लोकशाही सध्या एका प्रचंड घाणेरड्या वळणावर येऊन उभी आहे. स्वच्छ प्रतिमेचे राजकारणी व पक्ष जाऊन, विकृती व सत्ता प्रिय असणाऱ्या राजकारण्यांच युग आलं आहे. राजकारणाचा व्यापार मांडला आहे.

येत्या काळात हे अजून विकृत होईल अशी चिन्हे दिसत आहेत. सुसंस्कृत राजकारण्यांची, नेहरू – शास्त्री – इंदिरा- वाजपेयी यांची पिढी, वाजपेयींचा मृत्यूनंतर आज भारतीय राजकारणातुन बाद झाली आहे.

आयुष्यभर निष्कलंक राहिलेल्या वाजपेयींचा वापर एका अत्यंत घाणेरड्या राजकारणासाठी त्यांचा स्वकीयांकडून केला जात आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?